Login

बाळंतपण भारी देवा... भाग 1

बाळंतपणात चांगली वागणूक द्यायला हवी
बाळंतपण भारी देवा... भाग 1
©® ऋतुजा वैरागडकर



"नीलू अग ये नीलू..."

दारातून कुणाची तरी हाक ऐकू आली.

तश्या रमा ताई खोलीतून बाहेर आल्या.

"कोण आहे? कोण हवंय?" त्यांनी दार उघडताच विचारलं.

"नमस्कार मी आरती नलिनीची मैत्रीण."

"हो का? ये ना, आत ये."

आरती आत येऊन बसली.

रमा ताई तिच्यासाठी पाणी घेऊन आल्या.

"नीलू इकडे आहे की माहेरी गेली?"

"अग इथेच आहे ती, डिलिव्हरी झाली म्हणून माहेरी कशाला जायला हवं, इथे आहोत आम्ही तिची काळजी घ्यायला."

रमा ताईंच बोलणं ऐकून आरतीला आश्चर्य वाटलं.

"काय विचार करतेस जायचं ना भेटायला?"
"हो."

"तु आत जा पाय धुवून निलिमाच्या खोलीत ये."

निलिमाच्या लग्नाला तीन वर्ष पुर्ण झाली होती.

नीलिमा, नवरा सुधीर, सासू रमा ताई आणि सासरे माधवराव चौकोनी सुखी कुटुंब.

नीलिमा लग्न करून देशमुखांच्या घरात आली. ती लग्नाच्या आधीपासून नोकरी करायची त्यामुळे लग्नानंतरही तिने नोकरी सुरू ठेवली. घरातील सगळे समजूतदार होते. कधी रुसवा फुगवा नाही की कधी भांडण नाही.

नीलिमा जेवढी कामे जमतील तेवढी करून जायची त्यानंतर पुर्ण घराची जबाबदारी रमाताईंवर असायची.


कधी कधी नीलिमाला ऑफिसमधून यायला उशिर झाला तरी तीला कधी काळजी नसायची कारण रमाताई सगळ करून ठेवायच्या.

मी सासू आहे मीच का करायचं असं कधीच त्यांनी केलं नव्हत, सगळे आनंदाने राहायचे.

नीलूच्या डिलिव्हरीला एक महिना झाला, तिची आई दवाखान्यात तीच्या सोबत होती पण त्यानंतर मात्र तीला जावं लागलं.

"नीलू बाबांच्या तब्बेतीमुळे मला जावं लागतंय पण तिकडे गेल्यानंतरही तूझी काळजी लागून राहिलं बाळा."

"तुम्ही काही काळजी करू नका शालिनी ताई. मी आहे ना मी घेईल तिची काळजी, तुम्ही निश्चिंत रहा."

शालिनीताई गेल्यापासून रमाताई आईसारखं तिचं सगळ करतायेत.

"नीलू बाळा तूझी मैत्रीण आली आहे."

"अग आरती तू?"

"कशी आहेस नीलू?"

"मी मस्त."

"अगं तुझ्या बाळंतपणा बद्दल ऐकलं, तुला भेटण्याची ओढ झाली आणि इकडे निघून आले. माझ्या नवीन मोबाईल मध्ये तुझा नंबर नाहीये त्यामुळे तुला कॉल करू शकले नाही."


"काही हरकत नाही तू सरळ निघुन आलीस हे बर केलंस नाहीतर अशी कधीच आपली भेट झाली नसती."

"कशी आहेस तू आणि तुझ बाळ कस आहे?"


"झोपली आहे ती."

"अरे वा. किती गोड आहे ना."

"काय नाव ठेवलं?"


"निर्मयी."

"अरे वा किती छान नाव ठेवलंय."

त्या दोघींचं बोलणं सुरू असताना रमाताई तिथून निघुन गेल्या.