Login

बालपण देगा देवा

जुन्या आठवणी
लहान होतो तेंव्हा..मोठ्यांचा मार खाताना वाटायचं
'आपण कधी मोठे होणार? कोणाला काही न विचारता आपल्या मनासारखं सगळं काही करू शकणार? कोणी ओरडणारे नसेल..अडवणारे नसेल.


मग हळू हळू मोठे होत गेलो. लहानपण हरवत गेलं तसं शहाणपण येत गेलं.
जबाबदाऱ्या कर्तव्य हे सगळं निभावताना लहानपण मात्र प्रत्येक क्षणी आठवलं.


सकाळी उठून आंघोळ करून आयता चहा. त्यासोबत खारी किंवा दोन बटर. पार्लेजी बिस्कीट असलं म्हणजे आहाहा...सोन्याहून पिवळ म्हणायला हरकत नाही. चार बिस्कीट मध्येही समाधान मिळत होतं. आता बाजारात शंभर प्रकाराचे ब्रँड आले आहेत पण करपलेल्या पार्लेची चव त्यांना नाही.


रव्याचा गोड शिरा बनत असल्यावर त्यासाठी लागणारे कापून ठेवलेले काजू बदाम म्हणजे पर्वणीच होती. दुसऱ्याच्या प्लेट मध्ये काजू असला आणि त्याच्याहून काजूचा एक तुकडा जास्त आपल्याला मिळाला की असं वाटायचं जगच जिंकलं आपण. आता काजू बदामाचे डब्बे समोर असून सुद्धा खायची इच्छा होत नाही.


तेंव्हा ताटात येईल ते गपगुमान गिळावं लागायचं आणि आत्ता पंच्चपक्वान्न असूनही खाता येत नाही.
एकमेकांचे डब्बे वाटून खातांना पोटाची भूक बघितली गेली. उच नीच या भिंती कधीच मध्ये आल्या नाहीत. कट्टी घेतल्यावर बट्टी व्हायला फार वेळ लागत नसे. पण आता मात्र आडवा येतो तो सगळ्यांचा अहंकार.


संत तुकाराम महाराज म्हणतात.
|| लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारा ||


मोठी माणसं तेंव्हा बोलायची लहान आहात तेच बरं आहे
पण तेंव्हा मोठं होण्याची घाई होती.
आता मोठं झाल्यावर समजतंय त्यावेळी मोठी माणसं अशी का बोलायची.
मोठं होतंच राहायचं आहे..ते ही एकेक सेकंदाला.
होता आलं पाहिजे ते लहान..


आता लहान होता येत नाही. हट्ट करता येत नाही. राग रुसवा धरून ठेवता येत नाही..
कारण रागावल्यावर मनवायला.. चिऊ काऊचा घास भरवायला कोणी नाही.
आपण मोठे झालो याची जाणीव क्षणाक्षणाला होते. लहान होता येतं नसलं म्हणून काय झालं?


केंव्हातरी लहान होऊन बघावं, मस्त हिंडाव फिरावं
लगोरीचे डाव खेळतांना कट्टी असलेल्या मित्राला मुद्दाम जोरात चेंडूने मारावं
मारलेल्या चेंडूमुळे कट्टीने बट्टीत बदलाव
आणि पुन्हा एकदा लहान होऊन पहावं
मस्त बेभान हिंडाव फिरावं

विटी दांडू खेळतांना दुसऱ्याला चिडखोर म्हणावं
काचा काचातून वेगळ्या करताना सगळंच एकदम फिस्कटावं
पाच दगडांच्या खेळात एका दगडाने खालीच रहावं
आणि चिप्पीच्या खेळात चिप्पीने केसात कसं...गुपचूप गुरफटून जावं
खरंच पुन्हा एकदा लहान होऊन पहावं
आणि मस्त बेभान हिंडाव फिरावं

नदीतल्या पाण्यात अगदी मनसोक्त डुंबाव
रंगीबेरंगी दगड गोटे शोधत तासनतास बसावं
लागलाच हाती एखादा मासा की आपणही आपलं तोंड त्याच्या तोंडासारखं चंबू करून बघावं
आणि पुन्हा एकदा लहान होऊन पहावं
मस्त बेभान हिंडाव फिरावं


लहान लहान पाखरं आता खूप मोठी झाली
घरटे आपले सोडून भूर उडून गेली
कर्तव्य जबाबदाऱ्या निभावतांना तारांबळ त्यांची उडाली
लहान दिसणारी मुलं आता खरंच समजुतदार झाली


वाटतं आता कधी कधी शांत बसून रहावं
लहानपण आठवून त्यातच थोडं रमावं
काम थोडं बाजूला सारून भूतकाळात डोकावून बघावं
पुन्हा एकदा लहान होऊन पहावं आणि मस्त बेभान होऊन हिंडावं फिरावं

©® श्रावणी लोखंडे (श्रावू)
0