Login

बालविवाह भाग २

A new series depicting Pre-teen children's sex education and emotions

"माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी बायको चालेल मला." त्याने खांदे उडवले.

"पण मला नाही चालणार माझ्यापेक्षा लहान नवरा! वयाने आणि उंचीने सुद्धा" ती फणकाऱ्याने म्हणाली.  

"आपण मोठे होऊ ना तेव्हा मी तुझ्यापेक्षा उंच असेन." त्याने वैतागत उत्तर दिलं. 

“चुप,यडपट! आपली फक्त चांगली मैत्री आहे. आपण काही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नाही ना" ती त्याला समजावत म्हणाली. 

“काही दिवसांपूर्वी तू काय म्हणाली होतीस ते आठवतंय ना? आपण  बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर आहोत. मग एक पाऊल पुढे जायला काय हरकत आहे” तो आपला हेका सोडायला तयार नव्हता. 

"या नदीत पोहताना एखाद्या खडकावर डोकं आपटलंय का तुझं?" आता मात्र ती पण वैतागायला लागली होती. 

"नाही, पण मला पक्क माहित आहे कि मी काय बोलतोय."

"हे कधीच शक्य नाही. तू खूप गोरा आहेस आणि मी सावळी. तू कधी असं जोडपं पाहिलस का जिथे बायको नवऱ्यापेक्षा काळी असते?" तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला.

"त्याने मला काही फरक पडत नाही. तुला वाटलं तर, माझा रंग तुझ्या सारखा होण्यासाठी मी दुपारच्या उन्हात स्वतःला टॅन करून घेईन." त्याच्या निरागस उत्तरावर तिला हसू आवरेना.

“पण तू माझ्यापेक्षा लहान आहेस ना … हेच महत्त्वाचं आहे” तिने त्याचा वेडपट प्रस्ताव नाकारण्याचा निर्धार केला होता आणि वय तर बदलण्यापलीकडे होतं ना!

“मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्धार केला आहे, आणि इतर काहीही महत्त्वाचं नाही."

"आता?" तिच्या मनात धाकधूक होत होती. 

"आता नाही बावळट … मला जरा विचार करू दे!"

एक ऐकू येणारा उसासा तिच्यातून सुटला.

"मग आपण मोठे झाल्यावर याचा विचार करू"

"म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायला काही हरकत नाही तर!" त्याच्या चेहऱ्यावर एक बारीकस हसू फुललं होतं. एक आशा वाटत होती. 

"असं काही नाही! मी फक्त म्हणाले की विचार करेन" ती फणकाऱ्याने म्हणाली. 

"म्हणूनच मला मुली अजिबात आवडत नाहीत. एक काही धड नसतं तुमचं!” तिने लगेच तिचे डोळे वटारले. तो पटकन सावरला आणि पुढे म्हणाला, "पण तू वेगळी आहेस आणि तू मला खूप आवडतेस. आई शप्पत, मी तुझ्याशीच लग्न करणार आणि मग आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही."

वसुधाने मनातच डोक्यावर हात मारून घेतला.  

"आता निघूया का? तो सूर्य बघ पश्चिमेकडे झुकलाय" वसुधा मुद्दाम विषय बदलत म्हणाली एव्हाना तिचे कपडे सुकत आले होते आणि घरी जाईपर्यंत पूर्ण सुकतील याची खात्री होती.

“बरं चल!” तो तिचं कोपर पकडत म्हणाला आणि दोघे वाटेला लागले.

एका वळणावर आल्यावर ते थांबले … कारण तिथून दोघांना दोन दिशांना जायचं होतं

"मी सांगितलेलं नीट लक्षात आहे ना?" अभिने विचारलं

"तुला ना वेड लागलंय. … जा घरी आई वाट बघत असेल." वसुधा वैतागत म्हणाली.

"तूच पहिली जा … तुला उशीर झाला ना तर तुझी मामी ओरडेल" अभि म्हणाला तसं तिला काहीतरी आठवलं आणि ती आपल्या रस्त्याला लागली.

तो मात्र अजूनही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच बघत होता.

“एक दिवस मी नक्की तुझ्याशीच लग्न करणार आणि तो दिवस फार दूर नाही” मनाशीच म्हणत तो वळला आणि आपल्या घराकडे निघाला.

अभिषेक घरी पोचला तेव्हा आई घर आवरत होती. आता त्यांच्याकडे जास्त दिवस नव्हते कारण अभिच्या बाबांची बदली झाली होती.

अभिचे बाबा राज्य शासनाच्या बांधकाम विभागात इंजिनियर म्हणून कामाला होते. त्यांची नेहमीच प्रोजेक्ट प्रमाणे बदली होत असायची. अभिला सुद्धा दर दोन-तीन वर्षांनी नवं गाव आणि नवी शाळा मिळायची. हेच कारण होतं की त्याला फारसे मित्र नव्हते … कोणाशी मैत्री होते न होते तोच बाबांची परत बदली व्हायची आणि जागा बदलायची वेळ यायची. तो प्रत्येक वेळी आपली नाराजी व्यक्त करायचा पण तो लहान होता. फक्त तो नाराज आहे म्हणून त्याचे बाबा नोकरी तर सोडू शकत नव्हते ना. 

आईला अभिची हि घालमेल बघवायची नाही. तिला सुद्धा हे असं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरणं आवडत नव्हतं पण तिचा नाईलाज होता. आतासुद्धा थोड्याश्या नाराजीनेच तिने आवरायला घेतलं  पण ते करताना तिचं मन हळू हळू मागे जात होतं. अगदी पार अभिच्या जन्मापर्यंत मागे … 

*******

भूतकाळ 

*******

अभिच्या जन्माची साडेसाती त्याच्या जन्मापासूनच सुरु झाली होती. अपुऱ्या दिवसांचा जन्मलेला अभि डॉक्टरांनी खूप प्रयत्न करून वाचवला. पण याची प्रगती इतर सर्वसामान्य मुलांसारखी होणार नाही याची त्यांनी त्याच्या पालकांना आधीच कल्पना दिली होती. 

"म्हणजे हा कधीच सामान्य आयुष्य जगू शकणार नाही का?" शेवटी आईचंच हृदय ते, वाईटातली वाईट शंका बोलून दाखवली. 

"तसं मुळीच नाही, फक्त प्रगती थोडी हळू असेल. म्हणजे जर इतर मुलं ३-४ महिन्यात उपडी होतात तर हा थोडा जास्त वेळ घेऊन ५-६ महिन्यात होईल. शरीराने कमजोर असेल त्यामुळे थोडा उशिरा रांगायला, चालायला लागेल. त्याची प्रतिकारशक्ती थोडी कमकुवत असेल त्यामुळे तुम्हाला त्याला नेहमीच्या आजारां पासून दूर ठेवण्याची काळजी घावी लागेल." डॉक्टरांनी वस्तुस्थिती सांगितली. 

"हे असं नेहमीच राहणार का?" अभिच्या वडिलांनी - शरदने - आपली शंका विचारली. 

"नाही, फक्त बालवयातील काही वर्ष. किशोरवयात किंवा पौगंडावस्थेत पोचेपर्यंत पूर्ण नॉर्मल झाला असेल." डॉक्टर म्हणाले. 

म्हणजे आता पुढची जवळ जवळ बारा - तेरा वर्षं पुढे काय वाढून ठेवलंय याची आईला थोडी कल्पना आली आणि तिने आपली नर्सची नोकरी सोडून पूर्णवेळ अभिच्या दिमतीला वाहून घेतलं. अभिचे वडील राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजिनियर होते, त्यामुळे नोकरी फिरतीची. वेळोवेळी बदलणाऱ्या पाण्यामुळे आजारपणं तर पाचवीलाच पुजलेली … त्यातून अभि कमजोर होत गेला आणि शारीरिक वाढ अजून मंदावली. 

पण शरीराची सर्व कमतरता त्याच्या तल्लख मेंदूने भरून काढली होती. अभि रांगायच्या आधीच बोबडं का होईना बोलायला लागला आणि चालायच्या आधीच श्लोक, परवचा, शुभं करोति वैगरे पाठ म्हणू लागला. अभि गिफ़्टेड बेबी आहे हे त्याच्या पालकांना कळलं होतं. पण फिरतीच्या नोकरीमुळे जिथे काही ठिकाणी चांगल्या शाळा मिळणं कठीण, तिथे त्याच्यासाठी खास शाळा कुठून मिळणार. वारंवार बदलणाऱ्या शाळांमुळे त्याला फारसे कोणी मित्र नव्हते. नवीन शाळेत मैत्री होण्याआधीच शाळा बदलायची वेळ यायची. त्याला सख्ख भावंड तर नव्हतच पण आते-मामे किंवा चुलत-मावस भावंड पण नव्हती. म्हणजे कुठेतरी असतील पण त्याला माहित नव्हती. आई वडिलांच्या पळून जाऊन लग्न करण्याचा परिणाम, दुसरं काय. अभि जवळ जवळ एकटेपणाचं आयुष्य जगात होता. सोबतीला होते फक्त आई आणि पप्पा!

आईच त्याची मैत्रीण आणि पप्पा मित्र. आई घरी त्याच्याबरोबर सगळे बैठे खेळ खेळायची. तो कॅरम आणि बुद्धिबळात पारंगत झाला होता. संध्याकाळी आई अंगणात त्याच्याबरोबर बॅडमिंटन खेळायची किंवा पप्पा आले की  क्रिकेट खेळायला घेऊन जायचे. एका धरणाच्या कामावर त्यांची बदली असताना त्यांनी अभिला नदीत पोहायला शिकवलं. थोड्याच दिवसांत अभि खूप वेळ श्वास रोखून पाण्याखाली राहण्यात तरबेज झाला.  

गेल्या काही वर्षात तर एक नवीन प्रकार होऊ लागला होता. पप्पांची बदली झाली कि शाळा वर्षाच्या अधेमधेच बदलावी लागायची. अभिच्या लहानखुऱ्या मूर्तीमुळे तो शाळेतल्या गुंडांना सोपं लक्ष्य वाटायचा. त्यातून पहिल्या बाकावर बसून शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली कि शिक्षक वर्गात तारीफ करायचे आणि गुंड शाळेबाहेर दोन हात! अभि मारल्याच्या खुणा घेऊन घरी आला कि आईला वाईट वाटायचं पण तोच तिला धीर द्यायचा. 

"तू काळजी करू नको, पुन्हा मला कोणी हात लावण्याची हिम्मत करणार नाही बघ." आईला त्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाच कौतुक वाटायचं आणि आपण काहीच करू शकत नाही याचं वैषम्य.

पण अभिचे शब्द पोकळ नव्हते. पुढच्या काही दिवसांत त्याला त्रास देणाऱ्या गुंडाना काही अनाकलनीय आणि अमानवीय अनुभव येऊ लागले. 

क्रमश:

नक्की काय घडतं आहे ? कि नवीन काही प्लॅन आहे अभिचा?

जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … बालविवाह!

0

🎭 Series Post

View all