“चिंगी इथे राहत नाही,” तिनं चपखलपणे उत्तर दिलं आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला.
“थांब!” त्याने नाणी खिशात टाकली आणि लगेच हात दारात अडकवला, तिला दरवाजा बंद करण्यापासून रोखण्यासाठी, “वैभव कुठे आहे?”
“मग चिंगीला कशाला विचारत होतास?” तिने वैतागून त्याला असा काही लुक दिला कि वैभव तिला इतका का घाबरतो, हे त्याला आपोआप कळलं.
“भावा,” मान वळवून तिने प्रेमाने वैभवला एका नवीन नावाने हाक मारली, असं की जे त्याने यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं, “तुला कोणीतरी बोलवतंय.”
वैभव धावतच बाहेर आला. त्याची चिमुकली बहीण वैष्णवी त्याच्या पायाला लटकलेली होती. तिची दाराकडे नजर गेली तशी ती आपल्या भावाला सोडून त्या दिशेने धावली. वसुधाने खाली गुढग्यावर बसत तिला पकडण्यासाठी आपले हात पसरले, पण तिला क्रॉस करून विशुने अभिवर उडी मारली. अभिने पण तिला प्रेमाने जवळ घेतलं तर ती त्याच्या टी-शर्टच्या छातीचा खिसा शोधू लागली. लॉलीपॉप सापडताच “थांकु अभि-दादा” असं बोबडं बोलत तिने अभिच्या गालावर ओठ टेकले.
वसुधा तर बघतच राहिली. आपली बहीण एका बाहेरच्या मुलाला जास्त भाव देतेय हे तिला पचवायला जड जात होतं. अभिने पहिली पायरी जिंकली होती. त्याच्या प्लॅन प्रमाणे काम सुरु झालं होतं.
वैभवने दोघांची ओळख करून दिली.
“हाय वसुधा” त्याने तिला हात केला.
“मला सगळे वसु बोलतात” तिने फणकाऱ्याने उत्तर दिलं.
“मला नाही आवडत ते बोलायला, तुला काही दुसरं नाव आहे का?” तिला जाणवलं कि तो तिचं टोपणनाव उच्चारत पण नव्हता. त्याच्या वागण्याचं तिला थोडं आश्चर्य वाटलं. कोणीही कोणाला काही विशिष्ट टोपणनावाने हाक मारण्यास का नकार देईल?
“नाही,” ती ठाम होती.
“ठीक आहे, मग मी तुला 'चिंगी' बोलेन.”
“नाही!” ती परत म्हणाली, “लोकांनी मला नावं दिलेली मला आवडत नाही.”
“आणि तू सगळ्यांना तुला हवी तशी नावं ठेवशील? वैभवने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय.” तो थोडा रागानेच बोलला, पण त्या क्षणी त्याला पश्चात्ताप झाला. आता ती भडकणार आणि आपला प्लॅन फसणार.
त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती भडकली, पण त्याच्यावर नाही … आपल्या भुवया वर करत वैभवकडे तिने एक भयंकर कटाक्ष टाकला.
'अजून काय म्हणालास?' वैभव तिच्या न उच्चारलेल्या प्रश्नाने अस्वस्थ दिसत होता आणि त्याने तिची नजर टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ती काही बोलली नाही. उलट ती अभिकडे वळली, “अजून काय सांगितलंय?”
“हम्म…काहीच नाही….” अभि तिच्या चेहऱ्याच्या पलीकडे पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले. वैभव नक्की त्याला आपल्या बोटांनी थांबण्याचा इशारा करत असेल हे तिने ओळखलं.
तिने एक पाऊल पुढे टाकलं त्यांची नजरा-नजर रोखण्यासाठी दोघांच्या बरोबर मध्ये उभी राहिली.
“त्याने माझ्याबद्दल आणखी काय काय सांगितलं आहे?” प्रश्न पुन्हा विचारताना तिची चिडचिड वाढली.
“हम्म्म… तो म्हणाला की तू तुझ्या आजूबाजूच्या लोकांना नवीन नावं देतेस आणि बहुतेक वेळा त्यांना सुद्धा तू ठेवलेली नावं आवडतात.”
“ते खरं आहे,” प्रत्येक नवीन नाव ती खूप खोल विचार करून देत असे आणि म्हणूनच तिने ठेवलेली टोपणनावं लोकांना इतकी आवडायची.
“दुसरं काय सांगितलं?” ती अभिवर नजर रोखून विचारत होती.
“आणि तो म्हणाला की, तू आल्यावर तो कदाचित माझ्याबरोबर खेळू शकणार नाही कारण त्याला तुझ्याबरोबर जास्त वेळ घालवायचा आहे. तुम्ही दोघं फक्त शाळेच्या सुट्टीतच एकत्र येता.” हे पण खरं होत. ते दोघ जरी आते - मामे भावंडं असली तरी त्यांचं एकमेकांवर सख्ख्या भावा-बहिणीपेक्षाही जास्त प्रेम होत. दोघांना एकत्र खूप कमी वेळ मिळायचा त्यामुळे ते दोघं एकत्र असताना त्यांना आपल्यामध्ये तिसरा कोणीही नको असायचा.
हेच कारण होतं की हा तिसरा येणारा अभि वसुधाला अजिबात आवडला नव्हता.
“अरे बाबा! काहीतरी नवीन सांग ना.” ती त्याच्या फालतूच्या बडबडीला कंटाळली होती.
“आणि तो म्हणाला की तू जरी त्याची कझीन आहेस तरी तू त्याच्यासाठी खऱ्या बहिणीसारखी आहेस. जशी त्याच्या दुसऱ्या आईचीच मुलगी.”
आणि मग त्याने तिचा चेहरा झरझर बदलताना पाहिला. तिने आपल्या भावाकडे धाव घेतली आणि आपले हात त्याच्या गळ्यात घातले. वैभवने तिला मिठीत घेतलं आणि स्वतः ला वाचवल्याबद्दल धन्यवाद म्हणून अभिकडे बघून मानेला हलकासा नोड दिला.
तेवढ्यात वैभवची आई स्वयंपाकघरातून बाहेर आली.
“वैभव, आज मी विशूला डोस द्यायला जातेय. मैदानावर जाताना वसूला सोबत घेऊन जा.”
“पण आज आमची क्रिकेटची मॅच आहे. हा मुलांचा खेळ आहे. वसू तिथे काय करेल?” वैभवने विरोध केला.
“कोण म्हणतं मुली क्रिकेट खेळू शकत नाहीत.” मागून खंबीर आवाज आला तसा अभि तिकडे वळला.
“मी येतेय तुझ्यासोबत.” वसुधाने आपला निर्णय ऐकवला.
“अर्थातच, ती आपल्या बरोबर खेळू शकते. आपण तिला फिल्डिंग देऊ आणि कमीतकमी कच्चा निंबू म्हणून तरी वापरू.” अभिच्या बोलण्यावर तिने परत त्याला एक सडू लुक दिला.
एवढासा अभि तिला कच्चा निंबू म्हणाला ते तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. तो असा कसा म्हणू शकतो. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती.
“तू इथे मघाशी आमच्यात भांडण लावत होतास, म्हणून तूला पश्चात्ताप होतोय का?”
अरे देवा! ती अभिच्या अपेक्षेपेक्षा जास्तच हुशार निघाली. हिने आपल्या मनातलं बरोबर कसं ओळखलं?
समोरचा प्रतिस्पर्धी ताकदीचा असला कि काहीजणांना लढायला जरा जास्तच चेव येतो. अभिचंही आता तेच होत होतं. त्याच्या डोक्यात चक्र सुरु झालं.
“आपण नंतर बोलुया!” असं म्हणत तिने अभिकडे एक रागीट कटाक्ष टाकला.
पण त्याचा सरळ सरळ अर्थ 'मी तुला बघून घेईन' असा होता, हे न समजायला अभि पण काही कच्चा नव्हता.
“चला आता निघुया” ती म्हणाली आणि तिच्या मागून येणाऱ्या दोन्ही मुलांकडे न बघताच ती दाराबाहेर गेली.
तिला ऐकू येणार नाही इतकी ती पुढे गेल्यावर वैभवने श्वास सोडला आणि त्याला वाचवल्याबद्दल अभिचे आभार मानले, “पण हे कुठून आलं. ‘दुसऱ्या आईचीच मुलगी’ व्वा, असलं मला कधी सुचलंच नसतं!”
“तुझ्यासाठी कायपण, भावा!” त्याने अचानक तिचा शब्द का वापरला त्याला कळेचना. “तूच तर म्हणाला होतास ना की तिची आई तुझ्यावर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करते. मी ते फक्त योग्य शब्दात मांडलं.”
त्या दोघांची तिला क्रिकेट खेळायला जाताना न्यायची अजिबात इच्छा नव्हती, पण त्यांना ते करणं तिने भाग पडलं होतं.
समोरची टीम बॅटिंग करत असताना वसुधा फिल्डिंग करत होती. पण तिला बॅटिंग करायची परवानगी नव्हती. वैभव आणि अभि बॅटिंग करत होते आणि तिच्याशी बोलायला कोणीच नव्हतं. ती कंटाळली आणि मैदानाच्या एका बाजूला नाना नानी पार्क होतं तिथे गेली. तिथे लहान मुलांसाठी काही खेळणी होती पण झोपाळ्यांवर गर्दी होती. तिने एक बकुळीचं झाड पाहिलं. मग काही वेळ फुलं गोळा केली आणि कोपऱ्यातल्या बाकावर बसून खेळ बघत बसली.
धाव घेताना अचानक तिला अभि घसरलेला दिसला. मुलं ग्रुप करून काहीतरी बोलली आणि मग तो तिच्याकडे लंगडत येताना तिला दिसला. त्याच्या गुडघ्याला लागलं होतं आणि थोडं रक्त पण येत होतं.
“तू रन आऊट झालास की जखमी?” तिने डोळे बारीक करत विचारलं.
“जखमी.” तपशीलात न जाता त्याने थोडक्यात उत्तर देण्याचे ठरवले. हिच्याशी जास्त बोललं तर काय करील याचा नेम नाही, हे त्याने एव्हाना ओळखलं होतं.
“तू हे मुद्दाम केलंस ना? मी पाहिलं. आता तरी ढोंग करणं थांबव.” तिच्या योग्य अनुमानाने तो थक्क झाला. हिला कसं सगळं न सांगता कळतं याचं त्याला आश्चर्य वाटत होतं.
“तू चेटकीण आहेस का गं?” हे उच्चरताच पुढच्या क्षणाला आपलं चुकलंय हे त्याला कळलं पण भात्यातून शब्द निसटून गेले होते.
क्रमश:
अभि टरकला आहे हे मात्र खरं! काय करेल वसुधा आता?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … बालविवाह!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा