बालविवाह भाग १०
अभिषेक सहावीत असताना त्याच्या वडिलांची बदली एका धरणाच्या कामावर झाली आणि त्याचं कुटुंब ह्या गावात आलं. इथे आल्यावर त्याला एक जिवाभावाचा नवीन दोस्त अर्थात वैभव भेटला. खरं तर अभि त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. पण त्याची आठवीतल्या वैभवशी एकदम घट्ट मैत्री झाली. मैत्रीला कुठे वयाचं बंधन असतं? साधारण सारख्या डोकॅलिटीची दोन-तीन टाळकी एकत्र आली कि मैत्री आपसूक होतेच. आणि मैत्री होण्यासाठी एकवेळ गुण जुळले नाही तरी चालेल, पण अवगुण मात्र जुळावे लागतात. ते मात्र त्या दोघांचे अगदी बरोबर ३६ अवगुण जुळत होते.
वैभवशी मैत्री झाल्यानंतर अभि बदलत गेला आणि नंतर जेव्हा वसुधा त्याच्या आयुष्यात आली त्यामुळे तर तो पूर्णपणे पालटला. अभिसाठी वैभव आणि वसुधाची मैत्री म्हणजे जीव कि प्राण! काहीही झालं तरी त्याला त्या दोघांपासून दूर जायचं नाही हे अभि च्या आईला कुठेतरी जाणवत होतं.
यापूर्वी जेव्हा जेव्हा घर बदलायची वेळ यायची तेव्हा तेव्हा अभि खूप त्रागा करायचा पण ह्यावेळी मात्र तो अजिबात त्रागा न करता अवकाश आपलं काम करत होता. तिला मदत करत होता. तो अत्यंत अंतर्मुख झाला होता आणि असं का झालं हे तिला चांगलंच कळत होतं.
तिने हे अभिच्या बाबांशी बोलण्याचा निर्णय घेतला.
“अहो ऐकलंत का!” वासंतीने रात्री झोपताना शरदला वेगळीच हाक मारली आणि त्याला जाणवलं की हिला काहीतरी महत्वाचं आणि वेगळं बोलायच आहे म्हणून अशी करतेय. त्या दोघांचा प्रेमविवाह होता त्यामुळे ती नेहमी त्याला अरे-तुरे करायची पण बाहेरच्या लोकांसमोर किंवा फक्त मस्का मारायचा असला कि ‘अहो’ म्हणून हाक मारायची.
“बोला मॅडम ह्यावेळी काय नवीन? अभिने परत त्रागा सुरू केला का?” शरदने विचारलं.
“नाही! यावेळी उलट काहीतरी वेगळच घडतंय. तो चक्क शांतपणे मला सामान पॅक करायला मदत करतोय” वासंती उत्तरली.
“मग चांगलंच आहे की … तू कशाला टेन्शन घेतेस?” शरद खांदे उडवत म्हणाला. अभिने हि स्टाईल आपल्या वडिलांकडून अगदी जशीच्या तशी उचलली होती.
“पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे” वासंती बोलत असली तरी तिचं लक्ष मात्र भलतीकडेच आहे हे शरदला जाणवलं.
“नक्कीच नवीन खोड्या येत असतील त्याच्या त्या सुपीक डोक्यात! आणि आता तो त्या आपल्यावर ट्राय करणार असेल”
“त्याने आधीही आपल्यावरती खोड्या ट्राय केल्या होत्या ना, आणि त्यानंतर त्याला चांगलंच माहिती झालंय की आपल्या समोर त्याचं काहीही चालत नाही ते” वासंती भुवया जवळ आणत म्हणाली.
“मग प्रॉब्लेम काय आहे?”
“वैभव … ” ती पुढे काही बोलणार तोच शरद मधेच म्हणाला, “म्हणजे आता वैभव आणि अभि दोघे मिळून आपल्याविरुद्ध खोड्या करणार आहेत तर? आपलं इथून जाणं थांबवण्यासाठी ते दोघं काहीही करू शकतात ना”
“ह्यावेळी फक्त वैभव नाही तर त्याची ती कझिन वसुधा सुद्धा … ” वासंती काहीतरी सांगत होती पण शरदने पुन्हा तिचं वाक्य अर्धवट तोडलं ते तिला अजिबात आवडलं नाही.
“ती तर खूप चांगली मुलगी आहे. ती नाही खोड्या करणार” त्याने तिचं म्हणणं खोडून काढलं.
“खोड्यांच नाही बोलत मी. मला असं वाटतंय कि अभिला ह्यावेळी वैभव आणि वसुधापासून वेगळं व्हायचा त्रास होतोय म्हणून तो असा अंतर्मुख झालाय” वासंतीचं बोलणं आता शरद कान देऊन ऐकू लागला.
“तुला कळतंय का, कि अभि आता मोठा होतो आहे. त्याला सद्या त्याच्या वयाच्या एका कम्पॅनियन ची गरज आहे जे आपण कदाचित त्याला कधीच देऊ शकत नाही. अभिच्या वेळेस प्रेग्नेंसी मध्ये मला इतके त्रास झाले होते की आपण दुसऱ्या बाळाचा विचार पुढे ढकलला. त्यांनतर आपण खूप प्रयत्न केले पण तरीही आपण त्याला कधीच भावंड देऊ शकलो नाही” वासंतीने आपल्या मनातली खंत बोलून दाखवली.
“वसु, तुला एक सांगू … आपण थोडा उशीरच केलाय. आपण खरंतर अभिनंतर दुसर मूल नाही झालं तेव्हा एखादं बाळ अनाथ आश्रमातून दत्तक घ्यायला हवं होतं.”
“मग ते तर आताही करू शकतो. वात्सल्य ट्रस्ट (*) मध्ये जाऊन नोंदणी करूया. मला वाटतं चार सहा महिन्यात आपल्याला एखादं बाळ नक्की मिळेल.”
“हो पण अनाथ आश्रमात शक्यतो अगदी लहान मुलं दत्तक देतात. आपल्याला कोणीतरी अभिच्या वयाचं पाहिजे. आणि एवढं मोठं मुल मिळवण्यासाठी कदाचित खूप वेळ लागू शकतो.”
“मग काय करायचं?”वासंतीने विचारलं
“ही वसुधा कशी वाटते तुला” शरदच्या डोक्यात एक नवीन विचार उमलू लागला होता.
“खूप चांगली मुलगी आहे हो. खूप हुशार पण आहे … थोडीशी अभिपेक्षा वरचढच म्हणा ना … म्हणून तर तो तिला थोडा टरकून असतो ना! नाहीतर आजवर त्याला कधी असं कोणासमोर झुकताना पाहिलंय का?”
“एक्झॅक्टली! माझ्या मनात एक विचार आलाय की जर आपण हिलाच आपल्या घरी आणलं तर?”
“असं कसं चालेल? मला वाटतं कि एखादं मूल दत्तक घ्यायचं तर जे अनाथ आहे ते घ्यावं. ज्याला स्वतःचे आई-वडील नसतील, ज्या बाळाला आपली गरज आहे ते बाळ आपल्यामध्ये व्यवस्थित सामावून जाईल ना. पण जिला स्वतःचे आई-वडील आहेत तिचा ओढा आपल्या खऱ्या पालकांकडेच असणारच ना!” वासंतीने आपली शंका मांडली.
“हे बघ. आपण जर आश्रमातून बाळ आणलं तर अभिला भावंडं मिळेल पण त्याच्या वयाचं असं कॉम्पॅनियन नाही मिळणार. मोठं मूल आणलं तर ते आपल्या घरात कितपत अड्जस्ट होईल याची शंकाच आहे. त्यापेक्षा ही वसुधा कितीतरी उजवी आहे. ती आपल्या सर्वांनाच आवडते आणि आपल्या घरात सहज सामावून जाईल असं मला वाटतं.”
“पण तिचे आई-वडील तयार होतील का?”
“एकदा विचारून बघूया. मला वाटतं की त्यांना तीन मुली आहेत आणि घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा फारशी चांगली नाही. आपण जरी तिला दत्तक घेतलं तरी तिला आपल्या आई-वडिलांकडे हवं तेव्हा जायची मुभा असेलच की.”
“मला पण वसुधा फार आवडते हो, पण हे काही होईल असं मला वाटत नाही. फक्त आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून कोण आपली मुलगी दुसऱ्याला देऊन टाकतं का? मला तरी हे योग्य वाटत नाही तरीही तुम्ही विचारून बघा”
दुसऱ्या दिवशी शरद वसुधाच्या मामांना भेटायला गेला आणि इकडे अभिच्या आईने अभिला त्यांचं काल रात्रीचं झालेलं बोलणं सांगितलं. ते ऐकताच मात्र अभिचा संयम पूर्णपणे सुटला.
आईने तिला दत्तक घेण्याचा उल्लेख करताच त्याच्या मनातलं आतापर्यंतच साठलेलं मळभ दूर झालं आणि चित्र स्पष्टपणे दिसू लागलं. आधी तो थोडा गोंधळलेला होता की आपल्याला वसुधाबद्दल जे वाटतंय ते नक्की प्रेम आहे की मैत्री आहे कि अजून काही? पण जेव्हा त्याच्या आईने तिला दत्तक घेण्याचा विचार बोलून दाखवला तेव्हा त्याच्या मनात थोडीही शंका उरली नाही.
वसुधा आपल्याला ह्या घरात हवी आहे पण बहीण म्हणून नक्की नको ह्या विचारावर तो आता ठाम होता.
“आई तुला वेड लागलंय का? मला ती आपल्या घरात हवी आहे पण बहीण म्हणून अजिबात नकोय” तो आईवर कधी नव्हे ते डाफरला आणि आपल्या खोलीत धावत जाऊन त्याने धाडकन दार लावून घेतलं. त्याच्या अंगाचा तिळपापड होत होता.
तो असा का वागतोय ते ना त्याला कळत होतं ना त्याच्या आईला. काहीतरी वेगळी भावना मनात घर करून बसली होती आणि आता जे होतंय ते त्याच्या मनासारखं नव्हतं. ते त्याला नको होतं.
इकडे वासंतीची अवस्था काही वेगळी नव्हती. अभि कितीही खोडकर आणि मस्तीखोर असला तरी आजपर्यंत तो आपल्या आईला असं उलटून कधीच बोलला नव्हता. तिने त्याच्यावर केलेल्या संस्कारात ते बसत नव्हतं.
आपण अभिवर संस्कार करताना काही चूक केली का? आज असं काय झालं की तो आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आईला उलटून बोलला. तिला काहीच कळेना झालं. डोक्याला हात लावून ती सोफ्यावर तशीच कोसळली.
समोर नजर गेली तर शरद दारात उभा होता. त्याने हा सगळा प्रकार पाहिला होता. अभिने नुकतेच उच्चरलेले शब्द त्याच्या मनात रुंजी घालत होते.
क्रमश:
अभि आणि वसुधा किती विचित्र परिस्थितीत सापडलेत बघा!
इकडे अभिला वसुधाशी बालविवाह करावासा वाटतोय तर तिकडे अभिच्या वडिलांना वसुधाला आपली मुलगी बनवून दत्तक घेऊन घरी आणायचं आहे.
तुम्हाला काय वाटतं? कोणाची योजना सफल होईल?
©️®️ स्नेहा प्रकाश
टीप: (*) वात्सल्य ट्रस्ट, मुंबई हि एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत संस्था आहे. अनाथ, परित्यक्त आणि निराधार मुलांसाठी हि संस्था मुख्यत्वे करून काम करते.
'अनाथ/निराधार मुले आणि उपेक्षित अकुशल तरुणांवर विशेष भर देऊन समाजातील निराधार आणि वंचित सदस्यांची काळजी, संरक्षण आणि सक्षमीकरण' करण्यासोबतच हि संस्था अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी पालकांना मदत करते. समाजातील अनेक जोडप्यांना दत्तक पालकत्व मिळवण्याचा मार्ग सुकर करते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा