Login

बालविवाह भाग 11

Pre-teen children's sex education and emotions

“मला ती आपल्या घरात हवी आहे पण बहीण म्हणून अजिबात नकोय” अभिचे शब्द शरदच्या मनात रुंजी घालत होते. आणि त्याच क्षणी त्यांना एक चित्र सुस्पष्ट दिसू लागलं. 

शरद सावकाश वासंतीच्या जवळ आला. 

“वसु!” त्याने तिला हाक मारली पण तिचं तर लक्षच नव्हतं, तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आपला इतका चांगला संस्कारी मुलगा आपल्याला असं उलटून का बोलला? ती ह्याच विचारात मग्न होती. शरद जवळ आलेला तिला कळला सुद्धा नाही. 

“आपलं काय चुकलं रे? आपण त्याला संस्कार देण्यात काही चूक केली का?” ती हमसून रडत रडत विचारत होती आणि शरदने तिला मिठीत घेतलं. 

“आपण त्याला संस्कार देण्यात चूक केलेली नाही तर आपण त्याला समजून घेण्यात चूक केलेली आहे” शरदने तिची समजूत घालत म्हणाला. 

“म्हणजे?” तिने मन वर करून त्याला विचारलं. 

“त्याला वसुधा हवी आहे … सतत आपल्या जवळ हवी आहे पण ती त्याला बहीण म्हणून नकोय” 

“मग?” आश्चर्यचकित होण्याची वेळ आता वासंतीची होती. 

“प्रेमात पडलाय तो तिच्या!” शरद गालांत हसत म्हणाला. 

“काहीही काय बोलतोस? वेड लागलय का तुला? अरे तो आता फक्त अकरा वर्षांचा आहे आणि ती बारा”

“प्रेमाला वय नसतं ग राणी! मी तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा मी फक्त सोळा वर्षांचा होतो”

“हो मला मान्य आहे, पण आपण तेव्हा निदान वयात तरी आलो होतो. हा तर अजून टिनएजला सुद्धा नाही पोहोचला. हार्मोन्स तर भरपूर लांब आहेत. मग हा इतक्या लवकर प्रेमात कसा पडला?” वासंतीला हे सगळं पचवणं जड जात होतं. 

“प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्याला उगाचच असं वाटतं की माणसाचे हार्मोन्स ऍक्टिव्हेट झाले की प्रेम होतं. पण एक सांगू” शरद तिला समजावत बोलू लागला, “हार्मोन्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जे लगेचच होतं ना ते प्रेम नाही तर केवळ शारीरिक आकर्षण असतं”

हे ऐकताच वासंती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. शरदचं म्हणणं खरं असेल तर त्या दोघांमध्ये सुद्धा प्रेम नसून केवळ शारीरिक आकर्षण झालं होतं का?

“आपल्या बाबतीत थोडं वेगळं आहे कारण आपल्यात शारीरिक आकर्षण पेक्षा जास्त एकमेकांची ओढ आणि प्रेम होतं. म्हणून तर इतक्या संघर्ष नंतर सुद्धा आपल्या लग्न अजून टिकून आहे ना” शरदला तिचा न बोललेलं प्रश्न कळला आणि त्याच्या उत्तराने इकडे वासंतीचा जीव भांड्यात पडला. 

“मला मान्य आहे कि ते अडनिड्या वयातलं प्रेम फारसं टिकत नाही. पण इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. अभि  पौगंडावस्थेत  पोहोचण्यापूर्वीच प्रेमात पडलाय. त्यामुळे त्याचं प्रेम शारीर पातळीवरचं नाही तर ते भावनिक पातळीवरचं आहे. त्याला तिची ओढ वाटतेय … पण ती शरीराची नव्हे तर मैत्रीची आणि प्रेमाची”

शारदचं म्हणणं आता थोडं थोडं वासंतीला पटायला लागलं होतं. पण पुढे काय करायचं ते कळत नव्हतं. तिच्या मनातला पुढचा प्रश्न शरदने सहज ओळखला. कितीही झालं तरी बारा वर्षांचा संसार होता त्यांचा!

“जर हे प्रेम खरं असेल ना तर काळाच्या कसोटीवर नक्कीच टिकून राहील” शरद आपाल्या बोलण्यावर आणि विचारांवर ठाम होता. 

“मग आपण वसुधाला आपल्या घरी घेऊन यायचं की नाही? तू तिच्या मामांशी बोलायला गेला होतास ना? ते काय म्हणाले. तू तिच्या आई-वडिलांशी बोललास का?” वासंतीने बरेच प्रश्न एकदम विचारले. 

“तिच्या मामाला काहीच हरकत नव्हती. उलट त्यांना तर माझं प्रपोजल फारच आवडलं. त्यांनी तिच्या घरचा फोन लावून दिला. तिचे वडील थोडे गोंधळलेले वाटले … पण आजी … बापरे बाप … महा भयानक होती ती.

मला नको नको ते बोलली. आमची मुलगी आम्हाला काही जड  झाली नाही. तुम्ही पैसेवाले असाल आपल्या घरी.  म्हणून की तुम्ही आमची मुलगी विकत घेऊन जाणार का?” शरदने जे घडलं आणि जसं घडलं ते सांगितलं. 

“अर्थातच. मला नाही वाटत कि त्यांचं काही चुकलं. मी तुला आधीच सांगितलं होतं” वासंतीने आपलं जुनंच म्हणणं पुढे रेटलं. 

“तरीही आपण प्रयत्न करून पहिला याचं समाधान राहील ना. आता जे काही घडलं ते पाहता सद्य तरी तिला आपल्या घरी आणण्यात काही हशील नाही हे नक्की. आपल्याला ती हवी आहे पण अजून कदाचित दहा-बारा वर्षानंतर!”

“म्हणजे. नक्की काय म्हणायचं आहे तुला?” वासंती आता गोंधळात पडली होती. 

“मला खात्री आहे कि जर अभिचं प्रेम खरं असेल तर अजून काही वर्षांनी अभिच तिला जिंकून आपल्या घरी नक्की घेऊन येईल. माझा आपल्या लेकावर पूर्ण विश्वास आहे. फक्त आपण इथून जाण्यापूर्वी मला वसुधाशी थोडं बोलायचं आहे”

“म्हणजे तू आता तिला अभिच्या प्रेमाबद्दल सांगणार?”

“मुळीच नाही! त्याचं प्रेम आहे तर तो ते बघून घेईल. मी कशाला पॅच अप करायला जाऊ? पण जर हे प्रेम खरं असेल तर काळाच्या कसोटीवर नक्की टिकून राहील. 

ती एक खूप चांगली मुलगी आहे आणि तिचं आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी चांगलंच व्हावं असं मला वाटतं. त्याचवेळी असं चुकीच्या वयात प्रेमात पडून त्यांनी आपल्या आयुष्यातल्या ध्येयापासून विचलित होऊ नये असंही मला वाटतं”

“काय करायचं ठरवलं आहेस?” 

“आहे एक योजना डोक्यात … आता बघच तू …  काय करतो ते” शरदच्या डोक्यातली चक्र सुरु झाली होती. जे करायचं ते सांभाळून करावं लागणार होता. थोडीही चूक झाली तरी दोघांची आयुष्य पणाला लागली असती.

**********

दुसऱ्या दिवशी शरद मुद्दाम वसुधाला भेटायला तिच्या मामाच्या घरी गेला. अभिच्या वडिलांनी आपल्याला दत्तक घेण्याचा प्रस्ताव ठेवला हे तिच्या कानावर आलंच होतं. तिलाही ते फारसं पसंत पडलं नव्हतं पण आता काका आपल्याला एकटीला का भेटायला आले ते मात्र तिला कळेना.

“तिला घेऊन थोडं बाहेर जाऊ का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर” त्यांनी तिच्या मामाला विचारलं. 

मामाने होकार देताच ते तिला आपल्या कारमध्ये बसवून नदीकडे घेऊन गेले. दोघे अगदी त्याच खडकावर बसले जिथे अभिने तिला कालच प्रपोज केलं होतं.

“पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू?” त्यांनी विचारलं आणि वसुधा गोंधळली. ते नक्की कशाबद्दल विचारत आहेत ते तिला कळेना. 

“काका, मला माहितीये माझ्या आई-वडिलांनी मला तुम्हाला दत्तक द्यायला नकार दिला. पण खरं सांगू मलाही नसतं आवडलं ते!” शरद चे डोळे नकळत मोठे झाले ते तिने पाहिलं तशी तिने जीभ चावली. आपण जे बोललो त्याने काका  हर्ट झाले असतील का? तिच्या मनात विचार आला. 

“म्हणजे मला तुम्ही आणि काकू खूप खूप आवडता … आणि अभि सुद्धा! पण म्हणून आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाऊन राहणं मला कधीच नसतं आवडलं” वसुधा बोलली पण लगेच सावरली हे पाहून शरदला तिचं कौतुक वाटलं. 

“पण कधी ना कधी मोठी झाल्यावर तुला आपलं घर सोडून सासरी जावंच लागेल ना?” त्याने मुद्दाम विचारलं. 

“ते मोठी झाल्यावर बघू. सध्या तरी माझा लग्न करण्याचा काहिही  विचार नाहीये” तिचं बोलणं ऐकून अभिच्या बाबांचा जीव भांड्यात पडला. अभिच्या मनात काहीबाही येत असलं तरी तिचं डोकं अजून ठिकाणावर होतं.

“मग तुझा काय विचार आहे?” त्यांनी मुद्दाम विचारलं. 

“मला ना खूप शिकून मोठं व्हायचंय … खरं सांगायचं तर अगदी तुमच्या सारखं इंजिनिअर व्हायचं आहे.” वसुधा म्हणाली. 

“वसुधा तू इतकी हुशार आणि मेहनती आहेस ना, की तू जर का योग्य मार्गाने  मेहनत घेतलीस तर तू इंजिनियरच काय, तू तर सायंटिस्ट सुद्धा होऊ शकतेस.” हे ऐकताच वसुधाची कळी खुलली. 

“खरंच तुम्हाला असं वाटतं काका?”

“नक्कीच! पण जर तुला इंजिनियर व्हायचं असेल तर छोटी छोटी स्वप्न समोर ठेवू नकोस मोठी मोठी स्वप्न बघ”

“म्हणजे?”

“आपल्या देशातली सर्वात मोठी इंजीनियरिंग शिक्षण संस्था कोणती आहे माहिती आहे का?”

“हो आयआयटी ना”

“मग तेच टार्गेट ठेव. आत्तापासून मेहनत केलीस तर तू नक्की तिथे पोहोचशील. मला पूर्ण खात्री आहे.

“खरंच काका तुम्हाला असं वाटतं की मला आयआयटी ला इंजिनिअरींग साठी एडमिशन मिळू शकेल?”

“माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि तुला कसलीही आर्थिक मदत लागली ना तर मी तुझ्या पाठीशी सदैव उभा राहीन” त्यांचं बोलणं ऐकून वसुधा मनातल्या मनात सुखावली. 

“पण काका …” वसुधा थोडी चाचरत म्हणाली, “अभिकडे बघितलं ना की वाईट वाटतं मला!”

“ते आणि का?” शरद ला माहित होतं तरी त्याने मुद्दाम तिला विचारले. 

“अभि सुद्धा खूप हुशार आहे. माझ्यापेक्षा थोडाफार जास्तच बुद्धिमान असेल, पण त्याचा फोकस क्लियर नाही. तो वेड्यासारखा क्रिकेटमध्ये किंवा इकडे तिकडे भटकण्यात वेळ घालवत असतो. जर त्याने थोडं अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं ना तर माझ्या आधी तोच आयआयटी ला पोहोचेल असं मला वाटतं”

“मग तूच ते त्याला का सांगत नाहीस?”

“मी सांगून ऐकेल का तो? तो तर कधीच कोणाचं ऐकत नाही” वसुधा बोलत होती पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी शरदला स्पष्ट दिसली.

“तुझ्याशिवाय!” काका गालात हसत म्हणाले तशी वसुधा हळूच लाजली. 

क्रमश:

तुम्हाला काय वाटतं? वसुधा का लाजली. अभिला जसं तिच्याबद्दल वाटतं आहे तसंच तिलाही वाटत आहे का?

अभिच्या वडिलांची नक्की काय सिक्रेट योजना आहे? ती सफल होईल का?

©️®️ स्नेहा प्रकाश २०२३

0

🎭 Series Post

View all