शरदचं लक्ष होतंच तिच्याकडे! आग दोनों तरफ बराबर लागी है, हे त्याने जाणलं पण मुद्दाम चेहऱ्यावर मात्र आपल्याला काही माहीतच नाही असे भाव ठेवले.
“तुझं नक्की ऐकेल. एकदा सांगून तर बघ"
“म्हणजे नक्की कसं सांगायचं?” वसुधा विचारत पडलेली पाहून अभिच्या बाबांनी तिला एक सिक्रेट योजना सांगितली आणि ती आयडिया ऐकून तिचा चेहरा फुलला.
“काका खरंच असं होऊ शकतं? म्हणजे मी आणि अभि मोठे झाल्यावर पुन्हा एकदा भेटू शकतो?” तिला आता एक आशा वाटू लागली होती.
“आता तर तू आठवीत आहेस. फक्त पाच वर्षात तू पोचशील ना तिथे. मग तो भेटेलच ना तुला. फक्त मी सांगितलं तसं करायचं.” त्यांच्या बोलण्यावर वसुधाने मानेनेच होकार दिला.
अभिचे वडील घरी आले तरी अभिने मात्र अजूनहि स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं. त्याने आपल्या रूमचा दरवाजा उघडला नव्हता.
“अभि! मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. वसुधा बद्दल … आत्ताच्या आता दरवाजा उघडला नाहीस तर मी तो तोडून आत येईन” त्यांनी निर्वाणीचं सांगितलं. वसुधा चं नाव ऐकून तो दरवाजा उघडेल याची त्याच्या बाबांना खात्री होती आणि झालंही तसंच. अभिने थोडा नाईलाजाने का होईना पण दरवाजा उघडला.
“आपण उद्या निघतोय पण त्यापूर्वी तू जाऊन एकदा वसुधाला भेटून यावं असं मला वाटतं. तसंही तिच्या आई-वडिलांनी तिला दत्तक द्यायला नकार दिलाय” हे ऐकताच अभिची कळी कशी एकदम खुलली ते त्याच्या बाबांच्या नजरेतून निसटलं नाही.
“तुम्ही दोघे पुन्हा कधी भेटाल काय सांगावं. ती नदीवर तुझी वाट बघत असेल. जा जाऊन भेटून ये” बाबांचं बोलणं ऐकून अभिला जणू कोणी त्याच्या मनातलंच करायला सांगितलं असं वाटलं.
तो जवळ जवळ धावतच नदीवर पोचला. वसुधा तिथे पाठमोरी उभी होती.
“सुधा” त्याने हाक मारली. सगळे तिला वसु म्हणत असले तरी अभि मात्र तिला कधीच वसु अशी हाक मारायचा नाही कारण ते त्याच्या आईचं नाव होतं. तसं तिचं खरं नाव वासंती असलं तरी शरद तिला वसु म्हणायचा आणि हेच कारण होतं कि अभिला वसु हे नाव उच्चरायला कसंतरीच वाटायचं.
तो वसुधाला चिंगी, बावळट, येडपट, चेटकीण अशा अनेक नावांनी हाक मारायचा आणि तिला राग आला कि तो घालवायला तिला प्रेमाने ‘सुधा’ म्हणायचा. ते मात्र तिला फार आवडायचं.
आपलं नाव त्याच्या तोंडून ऐकताच ती वळली आणि धावत येऊन तिने त्याला मिठी मारली. आता वेगळं व्हायचं आहे हे तिच्या मनाने शेवटी मान्य केलं होतं.
तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आपण आज वेगळे होत असलो तरी आपल्याला जितका त्रास होतोय तितकाच तिलाही होतोय हे अभिला जाणवलं आणि त्याचा अंतरात्मा कुठेतरी सुखावला.
“अभि, मला कालपर्यंत वाटत होतं की आपण आज नंतर पुन्हा कधीच भेटणार नाही. पण आता माझ्याकडे एक उपाय आहे आपण पुन्हा भेटण्यासाठी” वसुधा बोलत होती आणि अभि तिचा उत्साह पाहून थक्क होत होता.
“खरंच … मग मला तुझा मुंबईचा एड्रेस दे. मी बाबांना पुढच्या वेळी मुद्दाम आपली बदली मुंबईला घ्यायला सांगतो मग आपण दोघे पुन्हा लगेच भेटूया” अभिने सुद्धा तितक्याच उत्साहात तिला उत्तर दिलं.
“तुला खरंच असं वाटतं की बदली आपल्या मर्जीने मिळते?” वसुधा आपल्या नेहमीच्या स्टाईल ने एक भुवई उडवत म्हणाली तसा तो वरमला. तिच्या बोलण्यात तथ्य होतं. त्याने नकारार्थी मान हलवली.
“आपलं भेटणं तुझ्या बाबांच्या बदलीवर का अवलंबून असावं? आपण स्वतःही डायरेक्ट भेटू शकतो ना?” वसुधाने विचारलं.
“पण त्यासाठी तर आपल्याला मोठं व्हावं लागेल. आणि त्याला खूप वर्ष लागतील. कदाचित दहा-बारा सुद्धा” अभि हिरमुसला होऊन म्हणाला.
“दहा-बारा नाही फक्त पाच किंवा सहा” वसुधा ठामपणे म्हणाली तसं त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.
“म्हणजे?”
“हे बघ मी आता आठवीत आहे आणि बारावीनंतर इंजिनिअरिंग करणार, म्हणजे पाच वर्षांनी मी इंजिनिअरिंगला जाणार. आणि तू सुद्धा जर का त्याच कॉलेजला आलास तर आपण दोघं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भेटूया ना. मी फार तर फक्त एक वर्ष तुझ्यापुढे असेन. म्हणजे फक्त सहा वर्षांत भेट होईल आपली!”
“ह्या महाराष्ट्रात किती इंजिनिअरिंग कॉलेज आहेत चे माहिती आहे का तुला? आणि आपण दोघं ठरवून एकच कॉलेजला कसं जाणार? बारावी नंतरची ऍडमिशन किती कठीण असतात माहित आहे ना? तुला एका ठिकाणी कुठेतरी मिळेल आणि मला दुसऱ्याच कुठल्यातरी जिल्ह्यात. मग कसं भेटणार?” अभिने आपली शंका काढली पण वसुधाचं उत्तर तयारच होतं.
“पण आपण महाराष्ट्रातले कॉलेज टारगेटच नाही करायचे. आपण तर डायरेक्ट आयआयटी टार्गेट करायचं.” वसुधा अगदी अभिच्या स्टाईल मध्ये खांदे उडवत म्हणाली. तो नेहमी असाच बेदरकार पणे बोलायचा तिला माहित होतं.
“तुझ्या डोक्यात दगड भरलेत का ग? तिथे ऍडमिशन घेण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो माहितीये का तुला?” कालपासून रडवेला झालेला अभि जाऊन त्याच्या जागी मूळचा अभि आता जागा होत होता तशी ओरिजनल वसुधा सुद्धा जागी झाली.
“मला माहिती आहे किती अभ्यास करायचा ते. आणि माझा मी करेन … तुझं काय ते तू बघून घे. मला भेटायचं असेल तर अभ्यास कर नाहीतर गेलास उडत” ती वैतागत म्हणाली आणि मुद्दाम जायला वळली.
"दुसरा काही उपाय नाही का ग?" अभिने तिचं कोपर पकडुन तिला परत आपल्याकडे वळवलं. तो थोडा हिरमुसला झालेला दिसला तशी तिला मजा यायला लागली. हीच तर सिक्रेट योजना होती, अभिच्या बाबानी तिला सांगितलेली.
"अजिबात नाही! लवकर भेटायचं असेल तर हाच एक उपाय आहे" ती फणकाऱ्याने म्हणाली.
"मला तुझा ऍड्रेस तरी दे" अभि अगदी काकुळतीला आलेला दिसला तशी तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली. पण हसू बाहेर येऊ नये म्हणून ती महत्प्रयासाने ते दाबून धरत होती. चेहऱ्यावर गंभीर भाव आणत होती.
आजवर अभिने तिला खूप छळलं होतं. आज तिची वेळ आली होती.
"मुळीच देणार नाही मला भेटायचं असेल तर आय आय टी मध्ये येऊन भेट, नाही तर काय मी तुला भेटत नसते"
आता मात्र अभि थोडा चरकला, कारण तिचं स्वप्न त्याला माहित होतं. तिला इंजिनियर व्हायचं होतं , अगदी त्याच्या बाबांसारखं! पण ते त्याचं स्वप्न कधीच नव्हतं. खरं तर त्याने स्वतःला मोठं होऊन काय व्हायचंय, कशात करियर करायचंय याचा सिरियसली कधी विचारच केला नव्हता. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली. नेहमीप्रमाणे मान तिरकी करून आणि एक भुवई उडवून ती त्याच्याकडे रोखून बघत होती, त्याच्या उत्तराची वाट पाहत. चेहऱ्यावर होतं एक चॅलेंज. आता मात्र पटकन निर्णय घेणं भाग होतं.
तिने दिलेलं चॅलेंज त्याने स्वीकारलं, "नक्की तिथे भेटेन मी तुला. पण आपल्या दोघांना वेगवेगळ्या शहरात ऍडमिशन मिळालं तर?”
ह्याचा तर तिने विचारच केला नव्हता. आधीच त्याला एवढं मोठ्ठ चॅलेंज दिलंय, त्यातून एका विशिष्ट शहरात ऍडमिशन म्हणजे थोडं कठीण होतं, कारण तिला तरी कुठे माहित होतं कि ती स्वतः कुठे ऍडमिशन घेईल ते! पण एकदा तिथे पोचलो की त्याच कॉलेज च्या इतर शहरातल्या विद्यार्थ्यांची माहिती काढणं नक्कीच कठीण नसेल.
"हरकत नाही, सगळ्या आय आय टी एकमेकांशी कनेक्टेड असतात." तिला माहित नव्हतं तरी तिने अंदाज बांधून ठोकून दिल.
"डील!" इतकं बोलून त्याने हॅन्डशेक साठी हात पुढे केला आणि तिनेही अगदी सहज हात मिळवला.
पण त्यानंतर त्याने काहीतरी वेगळंच केलं. त्याने दुसरा हात पुढे करून दोन्ही हातांनी तिचा हात हातात घेतला.
“खरंच भेटशील ना?” अभिने आपले डोळे बारीक करत तिच्या डोळ्यांत बघत विचारलं.
“नक्कीच! शंभर टक्के”
“हो आता आय आय टी टार्गेट करायची तर तेवढे मिळवावे च लागतील” अभि पुटपुटला तरी तिने ते स्पष्टपणे ऐकलं आणि गालातच हसली. अभिचं एक मन वैतागलं होतं पण त्याच वेळी दुसरं मन आनंदाने उड्या मारत होतं.
“ठरलं तर मग! आता आपली पुढची भेट आय आय टी मध्ये. मी काहीही करीन पण आय आय टी ला एडमिशन नक्की मिळवेल" अभीचा ठामपणा पाहिला आणि वसुधा आतून सुखावली. तिला खात्री होती की मनात आणलं तर तो काहीही करू शकतो.
आणि अशाप्रकारे अभिच्या वडिलांनी फक्त अभि आणि वसुधाचा डोक्यात चाललेला बालविवाह रोखला नाही तर त्या दोघांना करियरच्या अगदी योग्य वाटेवर आणून सोडलं.
दोघेही आता लग्न करण्याच्या विचारापेक्षा आपलं करिअर घडवण्याच्या मागे लागले.
अभिषेक आणि वसुधाच्या नात्याचा तो अंत नव्हता तर आरंभ होता मैत्री आणि साहचर्याचं एक नवं नातं निर्माण करण्याचा!
आणि आपल्यासाठी वेळ आलीय ती ह्या कथेचा निरोप घेण्याची.
अभिषेक आणि वसुधाच हे अनोखं नातं इथेच संपेल की अजून पुढे जाईल. ते खरंच मोठे झाल्यावर भेटतील. आय आय टी ला दोघेही पोचतील का? की अजून कुठे भेट होईल?
मग लवकरच आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. कि ह्याच कथेचा पुढचा सिझन वाचायला आवडेल तुम्हाला?
तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा.
कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपली अमूल्य टिप्पणी द्या आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा.
समाप्त
©️®️ स्नेहा प्रकाश २०२३
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा