आता ताबडतोब माफी मागितलेली बरी नाहीतर आपलं काही खरं नाही.
“सॉरी!” तो कसनुसं बोलला.
“जादूगर म्हणायचंय का तुला? एखाद्या मुलीसाठी चेटकीण हा शब्द वापरु नये.” ती त्याच्यावर न रागवता चक्क त्याला शिकवत असल्यासारखी बोलत होती.
“खरंच सॉरी!” त्याने पुन्हा माफी मागितली. तोपर्यंत त्याला कळलं होतं की तिला क्रॉस करायचं नाही.
“पण तू असं कसं समोरच्याचं मन वाचतेस? तुझ्या आजूबाजूला जे काही घडतयं ते तुला आपोआप कसं कळतं?" अभि मुद्दाम तिची तारीफ करत म्हणाला.
"फक्त नीट निरीक्षण केलं ना की सगळ कळत. आपल्या चेहऱ्यावर आपल्या विचारांचं प्रतिबिंब पडत असतं आणि मी ते फक्त वाचण्याचा प्रयत्न करते. तशी मी इतकी काही एक्सपर्ट नाहीय पण तुला ओळखलंय मी.” ती मुद्दाम त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली. तसे अभिचे डोळे फार बोलके होते. अगदी हिरव्या गोट्यांसारखे, गर्द हिरवे डोळे.
आता अभि तिला घाबरायला लागला होता, त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी दिसत असेल म्हणून.
तिने त्याला धीर दिला, “काळजी करू नकोस. ही चेटकीण तुला खाणार नाहीये!” दोघेही हसायला लागले. ती पुढे म्हणाली, "तू माझ्या भावाचा खूप चांगला मित्र आहेस, आणि त्याला तू खूप आवडतोस. मग तुला कशी खाईन मी."
“तो असं म्हणाला का? खरं तर मी त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.” वैभव त्याला चांगला मित्र मानतो हे ऐकून अभि खुश झाला.
"मैत्रीला वय नसतं. कसले भेदभाव नसतात, मैत्रीचे बंध कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट असतात."
"कुठल्या पुस्तकातून सरळ सरळ उचललंस ग हे." त्याला आता खात्री पटली होती की, ही पुस्तकी कीडा आहे.
"तू पण पुस्तकं वाचतोस का?" तिने डोळे बारीक करत विचारलं.
“चॅक, मुळीच नाही! पण माझी आई मला कधी कधी जबरदस्ती करते ना … तेव्हाच मी वाचतो. तशी ती स्वतः खूप वाचते आणि मला पण वाचायला लावते.” अभिचं ऐकून वसुधाचे डोळे चमकले. आता सुट्ट्या सुरु झाल्या होत्या म्हणजे ह्याच्या आईने नक्कीच नवीन पुस्तकं आणली असतील.
"ह्या सुट्टीत नवीन काय दिलंय तुझ्या आईने वाचायला?" हा नसेल वाचत तर निदान मी तरी वाचेन, असा विचार करून तिने पुढचा प्रश्न टाकला.
इकडे अभि खरंच टरकला. हे तर त्याच्या चेहऱ्यावर पण दिसत नव्हतं तरी तिने ताडलं होत. त्याचं आधीच फास्ट असलेलं डोकं आता भन्नाट धावू लागलं. नक्कीच हिला माझी पुस्तकं हवीत म्हणून तर असं वागतेय. आता त्याला पण गंमत वाटायला लागली आणि तिची दुखरी नस मिळाल्याचं समाधान.
“तू खरंच चेटकीण ... सॉरी जादूगार आहेस ग!” त्याने असं बोलताच ती देखील हसायला लागली तेवढ्यात तो पुढे म्हणाला, "चिंगी!"
पुन्हा ते नाव ऐकून तिने परत डोळे मोठ्ठे केले. तिला ते नाव आवडत नव्हतं हे तर उघड होतं.
"मी तुला सांगितलं ना, मला चिंगी बोलायचं नाही म्हणून" तिने त्याला पुन्हा खडसावलं.
“बावळट! मी वाचत असलेल्या पुस्तकाचं नाव सांगितलं तुला. इतकं वाचतेस तरी ऐकलंस नाही का कधी?” तेव्हढ्यातल्या तेवढ्यात त्याने तिच्यावर तोंडसुख घ्यायची संधी सोडली नाही.
"ऐकलंय मी. पण तू मला चिंगी का म्हणतोस?"
“कारण तू ना अगदी तिच्यासारखी आहेस, मघाशी जेव्हा मी तुला पाहिलं ना तेव्हा मला वाटलं की तू त्या पुस्तकातूनच बाहेर आलीयेस.” तो म्हणाला तशी वसुधाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मिताची रेषा उमटली.
"तुझ्याकडे ते पुस्तक आहे?" तिने विचारलं तसा त्याने मानेनेनच होकार दिला. तिच्या काळ्याभोर डोळ्यात एक चमक आली.
"मला देशील प्लिज?" पहिल्यांदाच त्याने तिच्या डोळ्यात विनवणी पाहिली.
“ती पुस्तकं म्हणजे माझ्या आईचा बालपणीचा खजिनाच आहे. ती नाही इतक्या सहजासहजी देणार. हरवलं तर मला ओरडेल.” तो मुद्दाम तिला खेळवत होता. आता कुठे गोष्टी त्याच्या नियंत्रणात येत होत्या.
"मी नक्की एक-दोन दिवसात परत येईन." ती म्हणाली.
त्याने थोडा वेळ विचार केला. "मी माझ्या आईला विचारतो."
तिचा वीक पॉइंट मिळाला म्हणून तो मनातल्या मनात हसला. आता तिच्यावर नियंत्रण ठेवणं सोपं होणार होतं.
मग थोडा वेळ ते बोलत बसले. अभिला खरं तर तिच्याशी मैत्री करून तीच पाणी जोखायचं होतं. ते काम सुरु झालं होतं. आता हळूच तिला लवकरच मुंबईला परत धाडण्याचा प्लॅन बनवायचा होता. मग वैभवचा पूर्ण वेळ त्यालाच मिळाला असता. आजच्यासारख रोज हिची ब्याद घेऊन फिरायला लागणार नव्हतं.
पण बोलताना काहीतरी वेगळंच उलगडत गेलं. ती रागीट वाटली तरी तशी नव्हती. खरं तर ती आधी त्याच्यावर रागवली त्याला तोच कारणीभूत होता. पण नंतर तिच्याशी बोलताना ती एखाद्या चांगल्या टीचर सारखी वाटली. ते कसे मुलांना कधी कधी रागवतात पण प्रेमाने विषय पण समजावून सांगतात, तसंच काहीसं.
तिकडे त्यांच्या टीमची शेवटची विकेट पडली होती. मैदानातून समोरच्या टीमच्या जल्लोष ऐकू आला तसा अभि म्हणाला, “आलोच मी” आणि अगदी शांतपणे चालत पुन्हा पिचवर गेला, अजिबात न लंगडता.
ठरल्याप्रमाणे वैभवने खेळ रोखून धरला होता. अभि यापूर्वी जखमी असल्याने त्याला पुन्हा फलंदाजीची परवानगी देण्यात आली. सामना पुन्हा सुरु झाला आणि त्याने विजयी धावा केल्या.
त्याच्या प्लॅन प्रमाणे सर्व काही घडत होतं. त्याची युक्ती कोणालाच उलगडता आली नाही. अपवाद फक्त वसुधाचा. चेहऱ्यावर विजयी हास्य घेऊन तो परत आला तेव्हा ती त्याच्याकडे संशयाने पाहत होती.
“तू जिंकण्यासाठी काहीही करू शकतोस ना? अगदी स्वतःचा गुडघा फोडून घेतलास?”
“हो! पण त्यात काय चूकल. यालाच तर जिंकण्याची स्ट्रॅटेजी म्हणतात.” त्याने खांदे उडवले पण आतून हादरला. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या आरपार पाहू शकल होतं. त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या भन्नाट कल्पना न सांगताच कोणाला तरी कळत होत्या. कोणीतरी त्याला असं समजू शकत होतं जे आजपर्यंत कोणालाच जमलं नव्हतं.
"मला कळत नाही की सगळे तुला अभि का म्हणतात? तुझं टोपणनाव तर जीत असायला पाहिजे होतं" वसुधा पुढे बोलली तसा अभि चमकला.
"जीत?" आता हे नवीन नाव कुठून आलं असा प्रश्न त्याला पडला. म्हणजे आता हि तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याला नाव ठेवणार होती तर.
“हो, तुझ्याच नावाचा दुसरा अर्धा भाग. तुझं नाव अभिजीत आहे ना?"
"नाही! माझं नाव तर अभिषेक आहे." तो म्हणाला आणि वसुधाला तिची चूक कळली. वैभवने त्याची अभिजीत अशी ओळख करून दिली नव्हती. तो फक्त अभि म्हणाला होता. तिनेच गैरसमज करून घेतला होता.
"जाऊदे, माझंच चुकलं” तिने खांदे पाडले आणि तिथून जायला वळली. पण आता तो जाऊ द्यायला तयार नव्हता. त्याने पटकन तिचं कोपर पकडलं आणि तिला परत वळवलं.
"जीत! म्हणजे हिंदीत जिंकणं. इंग्लिश मध्ये 'व्हिक्ट्री' असं?" त्याने विचारलं आणि तिने मानेनेच होकार दिला.
तिने लोकांना दिलेली टोपणनावं त्यांना का आवडतात, ते त्याला आता समजलं. तिने त्यालापण असं नाव ठेवलं कि जे त्याला जाम आवडलं.
"मला आवडलंय. तुला पाहिजे तेव्हा तू मला जीत म्हण.” तो मनापासून हसला.
"पण याचा अर्थ असा नाही की तू मला चिंगी बोलायचं. कळलं?" तिने नाक उडवत ताकीद दिली.
“ठीक आहे! आज मी पण तुला एक नवीन नाव देईन. 'सुधा' कसं वाटतंय?”
तिने थोडा वेळ विचार केला. खरं तर तिला विचारायचं होतं की तो तिला 'वसु' का म्हणू शकत नाही. पण तो तिला इतक्या सहजतेने सांगणार नाही याची तिला खात्री होती. तिने ते नंतर शोधायचं ठरवलं. सुधा पण काही वाईट नाव नव्हतं. ती नेहमीच सगळ्यांना नवीन नावं द्यायची पण आज कुणीतरी पहिल्यांदा तिला नाव देण्याचं धाडस केलं होतं.
तो उत्तराची वाट पाहत होता.
"मला आवडलंय." वसुधा त्याच्याच शब्दांत उत्तरली. त्याच्या ओठांवर एक छानसं हसू उमटलं आणि त्यापाठोपाठ त्याच्या गालावरची ती खळी दिसायला लागली. त्याचं हसू इतकं छान होतं कि ती पण मनापासून हसली.
बस्स, हेच हवं होतं त्याला.
"पण तरीही मला हवं तेव्हा मी तुला बोलेन" तिला मुद्दाम छेडत तिच्या कानाजवळ गेला आणि जोरात ओरडला, "चिंगी."
आणि तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता पळून गेला. त्याला हवा तसा शॉक तिला बसला असणार याची त्याला खात्री होती.
क्रमश:
अभि मुद्दाम वसुधा ला त्रास देतोय. पण ती सुद्धा काही कमी नाही. वसुधा आता त्याला कसा धडा शिकवेल?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … बालविवाह!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा