Login

बालविवाह भाग 6

A new series depicting the thought process of Pre-teen children and their sex education

यावर्षी वसुधा आठवीत जाणार  होती. म्हणजे या वर्षी ची सुट्टी शेवटची. पुढच्या वर्षी पासून सुट्टीतले क्लासेस सुरू होणार होते. त्यात हा उपटसूंभ अभि तिचा वैभव सोबतचा वेळ कमी करत होता. त्याच्या दृष्टीने खेळ म्हणजे  नुसतं क्रिकेट जे तिला अजिबात आवडत नव्हतं. कारण त्या गावातली मुलं आपल्यात मुलींना खेळायला घेत नसत. आणि घेतलं तरी लींबू टिबू सारखं वागवत.

पण ते तिघे जेव्हा रानावनात भटकायचे ते मात्र तिला आवडायचं. हल्ली तर वैभव नदीत पोहायला जायचा आणि जाताना वसुधाला पण बरोबर यायचा आग्रह करायचा. अभिनेच वैभवला पोहायला शिकवलं होतं आणि आता तो वसुधाला पण पोहायला शिक म्हणून म्हणून मागे लागला होता. ती मात्र त्याला अजिबात दाद देत नव्हती.

अभिच्या सारख्या खोड्यांनी ती वैतागली होती आणि त्यात त्याला खूप एटीट्यूड पण होता. एक दिवस वसुधा खडकावर बसलेली असताना अभिने हळूच मागून जाऊन तिला पाण्यात ढकलून दिलं. नंतर दोघांनी मिळून तिला बाहेर काढलं. तिच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं तरी तिने अभिला चांगलंच फैलावर घेतलं. पण पोहायला येणं किती महत्वाचं आहे हे तिला सुद्धा तेव्हा जाणवलं … आणि आपण कुठेतरी चुकतोय ते अभिला!

तिने शेवटी त्याच्याबरोबर पोहणं शिकण्याचा निर्णय घेतला. मग ते तिघे एकत्र नदीवर जायचे आणि खूप वेळ पाण्यात खेळत रहायचे. वसुधा खेळता खेळता पोहायला शिकत होती. 

पुढचे काही दिवस वसुधाने सतत अभिच्या मागे 'चिंगी' पुस्तक देण्यासाठी भुणभूण लावली होती. त्याला ते आवडत नव्हतं पण त्याला तिला त्रास द्यायला मजा येत होती म्हणून तो मुद्दाम पुस्तक देत नव्हता. तो सतत तिच्या खोड्या काढायचा. काहीतरी त्रास देऊन वर आपण काहीच केलं नाही अशा थाटात वावरायचा. 

गेले काही दिवस अभि तिला कसं झुलवतोय ते  वैभवच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. अभिने इतर कोणाच्या बाबतीत हे केलं असतं तर वैभवने त्याला एकवेळ सोडून दिलं असतं, पण आपापल्या लाडक्या बहिणीच्या - वसूच्या बाबतीत तो हे खपवून घेणार नव्हता. त्याने एक दोनदा अभिला समजावलं पण अभि कोणीही समजावून ऐकणाऱ्यातला नव्हताच. 

आता या अभिला अद्दल कशी घडवायची याचा वैभव तो विचार करत होता. तशी संधी त्याला लवकरच मिळाली. 

वैभवच्या वडिलांना त्याला काही करून इंजिनियर बनवायचं होतं म्हणून नववी पासूनच त्यांनी त्याला सुट्टीतले क्लासेस सुरु केले. 

अभिचं मात्र असं काहीही स्वप्न नव्हतं … त्याचे वडीलच इंजिनियर होते. त्यामुळे आपल्याला त्या वाटेला जायचं नाही हे त्याने कधीच ठरवून टाकलं होतं. 

अभि ला मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांसारखे इंजिनियर नव्हे तर क्रिकेटर बनायचं होतं. त्याचे वडील त्याला वारंवार श्रीनाथ आणि कुंबळेचे उदाहरण देत. ते दोघे इंजिनिअर असून सुद्धा किती चांगले क्रिकेटर बनले तसं तू सुद्धा बनवू शकतोस पण अभिचं मात्र पालथ्या घड्यावर पाणी!

वैभवच्या रोजच्या क्लासेस मुले तिघांचं एकत्र भटकणं बंद झालं. वसुधा आणि अभिच आधीच पटत नव्हतं त्यामुळे ती काही त्याच्या बरोबर एकटी भटकायला जाणार नव्हती. 

आता वैभव घरात नसताना वसुधाला एकटीला बसून कंटाळा यायला लागला होता. विशू छोटी होती त्यामुळे तिच्याशी तरी किती खेळणार. मग तिच्या डोक्यात एक आयडिया आकार घेऊ लागली. 

एक दिवस सकाळी वैभव क्लासला जायला निघाला तशी वसुधा म्हणाली, "जाताना मला अभिच्या घरी सोडशील?" 

तिच्या डोक्यात काहीतरी कीडा आलाय हे त्याच्या लक्षात आलं. आता फक्त तिला अभिच्या अंगावर सोडून दिलं कि त्याचा बदला घ्यायला ती सक्षम होती. 

वैभव आणि वसुधा दोघे सोबतच घराबाहेर पडले. 

"इथून सरळ जा, पाचवा बंगला" एका वळणावर त्याने तिला अभिच्या घरी जायचा रस्ता दाखवला. 

खरं तर त्याला वसु अभिची कशी फिरकी घेते ते बघायला थांबायचं होतं, पण क्लास जास्त महत्वाचा होता. आणि तिथे पण कोणीतरी होतं ना … त्याच्या आवडीचं … म्हणून तो पुढे निघून गेला. 

वसुधा बंगले मोजत निघाली. पण पाचवा बंगला तर फारच सुनसान वाटत होता. तिथे कोणी रहात असेल असं वाटत नव्हतं. तेवढ्यात तिला पुढच्या बंगल्याच्या अंगणात स्टॅण्डवर वाळत घातलेले कपडे दिसले. अभिचा शर्ट तिने लगेच ओळखला आणि जाऊन बेल दाबली. एका तिशीतल्या स्त्रीने दरवाजा उघडला. 

"काकू, मी ते... "समोरच्या स्त्रीला पाहताच वसुधाचा आवाज घशातच अडकला. तिला काकू बोलताना वसुधालाच कसंतरी वाटलं, कारण ती अजिबात काकूबाई वाटत नव्हती. तिने कॉटनचा सलवार कमीज घातला होता, त्यावर मॅचिंग दुपट्टा आणि तशाच रंगाची बारीकशी टिकली, छानपैकी सेट केलेले केस. रंगाने तर अगदी दुधासारखी गोरी, अभिपेक्षाही किंचित जास्तच. वसुधाच्या मनातल्या आईच्या प्रतिमेला ती पूर्णपणे छेद देत होती. हि नक्की अभिची आईच आहे ना … तिला थोडी शंका आली. पण तिचे अगदी अभिसारखे दिसणारे हिरव्या रंगाचे डोळे त्याची साक्ष देत होते. तेवढ्यात तिने एक गोड स्माईल देत "कोण हवंय" असं विचारलं आणि तिच्या गालावरची खळी बघून वसुधाची खात्रीच पटली. 

"आँटी, अभि इथेच राहतो ना?" वसुधाने उगाचच विचारलं, तिला माहित होतं तरीही. 

हि काकू वरून अचानक आँटी वर आल्याचं अभिच्या आईला जाणवलं तरी ती काही बोलली नाही. तिच्या मनात वेगळेच विचार सुरु होते. कालपर्यंत अभिला कोणी मित्र सुद्धा नव्हते आणि आज अचानक मैत्रिणी घरी येऊ लागल्या. तिला थोडी गंमत वाटली.

"तू अभिची मैत्रीण का ग?" तिने वसुधाला आत घेत विचारलं. खरं तर 'मैत्रीण नाही दुश्मन' असं वसुधाला सांगावंसं वाटत होतं पण बाहेर काही भलतंच आलं. 

"मी वैभव ची बहीण, वसुधा. पण तुम्ही मला 'वसु' बोलू शकता." वसुधाचं नाव ऐकून ती थोडी चपापली ते हिला जाणवलं. हि इकडे विचार करत राहिली कि ह्यांच्या अख्ख्या कुटुंबालाच माझ्या नावाशी काहीतरी प्रॉब्लेम आहेसं  वाटतं. 

अभिचं घर आतून खूप छान होत. मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या वसुधाने असे सुंदर टुमदार बंगले आतून कधी पहिलेच नव्हते. त्यातून अभिच्या आईने ते मेहनतीने सजवलं होतं. त्याचे पडदे, कार्पेट, मोजकंच पण क्लासी फर्निचर, भिंतीवरची चित्रं या सगळ्यातून तिची उच्च अभिरुची झळकत होती. वसुधाला हे घर फार आवडलं आणि मग तिच्या लक्षात आलं कि अभिची आई तिच्याकडेच बघत होती. 

वसुधा थोडीशी वरर्मली. आपण फारच बारकाईने ह्यांचं घर पाहत होतो ते तिच्या लक्षात आलं. 

"तू बस. अभि आंघोळीला गेलाय, येईलच इतक्यात. तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खाऊ आणते." अभिची आई तिच्याशी इतक्या प्रेमाने बोलत होती की खडूसपणे वागणारा अभि नक्की हिचाच मुलगा ना … वसुधाला परत एकदा शंका आली. 

"नको मावशी, माझा नाश्ता झालाय. खरं तर माझं तुमच्याकडेच काम होतं" वसुधाने असं म्हणताच अभिची आई जी किचनकडे जायला वळली होती ती थबकली.

आधी काकू, मग आँटी आणि आता मावशी ...वसुधा नक्की थोडी भांबावलेली होती.  अभिच्या आईचे डोळे बारीक झाले. ती आता वसुधाला वरपासून खालपर्यंत न्याहाळायला लागली. 

"अभिने तुला काही त्रास दिला? खोडी काढली? तुला काही लागलंय का?" तिच्या डोळ्यात आता थोडी काळजी दिसत होती. 

आणि इकडे वसुधा विचार करायला लागली की प्रत्येक आई आपल्या मुलाला किती चांगलं ओळखते. 

"तूम्ही काळजी करू नका. मला कोणी हात लावण्याची हिम्मत करणार नाही. आणि जो करेल ना त्याला मी बघून घेईन.” अभिची आई आ वासून तिला बघतच राहिली. लहानपणी अभिला जेव्हा शाळेत मोठी मुलं त्रास द्यायची तेव्हा तो पण असाच बोलायचा. आपले प्रॉब्लेम स्वतःच सोडवायच्या वसुधाच्या दृष्टीकोनाचं तिला कौतुक वाटलं. 

"मी काही इकडे अभिच्या कागाळ्या करायला नाही आले. माझं एक वेगळंच काम आहे … तुमच्याकडे” वसुधा म्हणाली तशी अभिची आई तिकडे विचारात पडली. 

क्रमश:

वसुधाचा नक्की काय प्लॅन आहे?

जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … बालविवाह!

0

🎭 Series Post

View all