“अभि सांगत होता कि तुमच्याकडे खूप पुस्तकं आहेत, मला ती बघायची होती." वसुधाने असं बोलताच तिचे डोळे चमकले, "तुला वाचायला आवडतं?"
"खूप म्हणजे खूपच आवडतं! आता इथे आहे तोपर्यंत सुट्टीत तुमची थोडी पुस्तकं वाचू का? अर्थात तुम्ही परवानगी दिली तरच." वसुधा गोड हसत उत्तरली.
"मला आवडेल, पण माझ्याकडे फारशी लहान मुलांची पुस्तक नाहीत. अभिला आवडत नाहीत म्हणून मी बरीचशी देऊन टाकली." तिचं ऐकून वसुधा हिरमुसली. मला आधी माहित असतं तर मी सगळी वाचून मगच दिली असती ना. अभि पण किती वेडा आहे ना, एवढा मोठा खजिना समोर असून वाचतच नाही.
"पण मावशी, मी कुठे लहान आहे? मी तर आता मोठी झालेय ना. बारा वर्ष पूर्ण! आता तर बस आणि ट्रेन मध्ये पण माझी फुल तिकीट लागते." तिचं ऐकून अभिच्या आईला हसू आवरलं नाही.
ह्या वयातल्या मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो. त्यांना आपण एकदम मोठे झाल्यासारखे वाटतो. अभिने आजपर्यंत असं वाक्य फेकलं नव्हतं. अजून त्याची बारा पूर्ण झाली नव्हती म्हणून कदाचित, पण तो लवकरच असंच काहीतरी बोलेल याची तिला खात्री होती.
तिने वसुधाला कोपऱ्यातलं कपाट दाखवलं. अगदी लायब्ररीत असतं ना तसं काचेच्या दरवाजाचं लोखंडी कपाट होतं.
"तू बघत बस, तोपर्यंत मी तुला बोर्नव्हिटा आणू?" वसुधाने तोंड वाकडं करताच ती मनात हसली. अभि पण अगदी दूधाचं नाव काढलं की असाच करतो.
"बरं, कोकम सरबत चालेल?" वसुधाने थोडे आढेवेढे घेतले पण नंतर मानेनेच होकार दिला तशी अभिची आई किचन मध्ये गेली.
इकडे अभि आंघोळ झाल्यावर नेहमीप्रमाणे नुसता टॉवेल गुंडाळून बाहेर आला. पण अचानक समोर वसुधाला बघून किंचाळला. त्याने लगोलग परत बाथरूम मध्ये धूम ठोकली.
वसुधाचं आधी लक्ष नव्हतं पण अभिचा किंचाळण्याचा आवाज आल्यावर ती मागे वळली तर तिला टॉवेल पकडून बाथरूम कडे धावणारा अभि दिसला. ती खुद्कन हसली … अगदी मनापासून!
आता तिच्या डोक्यातले किडे वळवळु लागले … मुद्दाम खूप त्रास देतो ना मला … ह्याची थोडी मजा करूया.
ती तशीच बाथरूम कडे गेली.
"तू इथे कशी आलीस?" दरवाजा थोडा किलकिला करून त्याने थोडं रागातच विचारलं.
"कशी म्हणजे? चालत." ती बेफिकिरीने उत्तरली तसा तो आणखी वैतागला.
"तू आधी इथून निघून जा." तो एकदम मोठ्या आवाजात बोलला.
"मी नाही जाणार. तशीही मी इथे तुला भेटायला नाही आलेय. तुझ्या आईला भेटायला आलेय." वसुधाने पण त्याच्याच टोन मध्ये उत्तर दिल्यावर त्याची जरा तंतरली. ही बहुतेक माझ्या कागाळ्या सांगणार.
"हे बघ, आपण आपले प्रॉब्लेम्स आपल्यात सोडवूया ना. आईला कशाला मध्ये घेतेस." अभि बाथरूमच्या फटीतून थोडा नरमाईने बोलत होता तशी वसुधाला गंमत वाटायला लागली.
"ठीक आहे तू बाहेर ये. आपण बोलूया." ती मुद्दाम बोलली. तिला माहित होतं हा काही असा बाहेर येणार नाही.
"ते ... आईला सांग ना, माझं शर्ट आणून द्यायला." अभिचा सूर आता एकदम खाली आला होता ते पाहून तिला मजा वाटली. मग ती स्वतःच बाहेर गेली आणि मघाशी पाहिलेले त्याचे वाळत घातलेले कपडे आणून दिले.
अभिची आई सरबत घेऊन आली आणि वसुधा डायनींग टेबल वर बसून सरबत पिऊ लागली. अभि बाहेर येऊन तिच्या बाजूला बसला तसा आईने त्याला नाश्ता आणि बोर्नव्हिटा आणून दिलं आणि स्वतः आतमध्ये गेली.
"एक ऑफर आहे!" अभिच्या अचानक कानाजवळ आलेल्या आवाजाने वसुधा दचकली.
"मला नको तुझं काहीच!" ती फणकाऱ्याने म्हणाली.
"तू हे बोर्नव्हिटा पी, मग मी तुला हवं ते पुस्तक देईन." अभि आपला कप तिच्याकडे सरकवत हळूच म्हणाला.
"मला नको म्हटलं ना," ती त्याच्याकडे वळून वैतागत बोलली, "तसंही तुझ्या आईने आता मला अख्ख कपाट दिलंय, तर माझं मी शोधून घेईन." ती नाक उडवत म्हणाली.
"ही ही" तो दात दाखवत म्हणाला, "चिंगी!" तिने परत डोळे मोठ्ठे केले तसं तो पुढे सावकाश अगदी तालासुरात म्हणाला, "नावाचं ... पुस्तक ... तिथे ... नाहीच."
आता तिला कळलं कि तो तिला ब्लॅक मेल करत होता. इथे येऊन पण तिला हवं ते मिळणारच नव्हतं. तिने गपचूप त्याच्या समोरचा कप घेऊन तोंडाला लावला तसं त्याने तिचा सरबताचा ग्लास ताब्यात घेतला.
"अरे, ते माझं उष्टं आहे" ती सांगत होती तोपर्यंत त्याने पिऊन परत ग्लास तिच्या समोर ठेवला.
"चालतंय मला" असं बोलून तो उठला. त्याचं एव्हाना खाऊन झालं होत. किचन कडे वळून त्याने आईला हाक दिली, "आई, मी खेळायला जातो ग." आणि सरळ दरवाजाकडे गेला.
आई हातात लाटणं घेऊनच बाहेर आली, "अरे, ही तुझ्यासाठी आलीय ना, आणि तू कुठे निघाला."
"नाही ग, ती तुला भेटायला आलीय" एवढं बोलून सरळ बाहेर गेला. वसुधाच्या अंगाचा आता तिळपापड होत होता. त्याच्या ब्लॅकमेलला ती बळी पडली होती आणि तिला हवं ते मिळालंच नव्हतं.
"मावशी, मी इथे वाचत बसते. तुमचं काम चालू द्या" वसुधा इतकं बोलून परत पुस्तकांकडे वळली पण तिच्या डोक्यात आता वेगळेच विचार सुरु झाले होते. थोड्या वेळाने ती अभिच्या रुम मध्ये घुसली आणि इकडे तिकडे बारकाईने पाहू लागली.
ती काहीतरी शोधात होती. थोड्या वेळात तिला हवं ते मिळालंच पण अजूनही काहीतरी वेगळंच मिळालं. आता तिच्या चेहऱ्यावर एक हास्य विलसत होत.
********
वसुधा घरी आली आणि तिने आपल्या कपड्यांत लपवलेली डायरी बाहेर काढली. उघडून बघते तो काय, ती बहुतकरून इंग्रजीत लिहिलेली होती. मराठीत अगदी थोडंफार लिहिलेलं होतं.
अभिच्या वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे त्याच्या शाळा सतत बदलत असायच्या. सुरुवातीची काही वर्षं ते शहरात राहत होते त्यामुळे तिथे तो इंग्रजी माध्यमात शिकला होता. पण एकदा गावात बदली झाली आणि त्याला मराठी शाळेत घालावं लागलं. त्यानंतर त्याच्या आईने त्याला दोन्ही भाषा घरी शिकवण्याचा निर्णय घेतला.
परिणाम असा कि अभि दोन्ही भाषांमधे एक्स्पर्ट झाला. तरी त्याला मात्र मराठीतल्या कान मात्रा वेलांट्यापेक्षा इंग्रजी स्पेलिंग जवळचे वाटायचे. मग त्याने डायरी इंग्रजीत लिहिली. त्यामुळे मराठी माध्यमात शिकलेल्या वसुधाला ती समजायला जड जात होती.
शेवटी तिने वैभव कडून डिक्शनरी मागून घेतली आणि अभिची डायरी वाचायला बसली.
जसजशी डायरी वाचत गेली तसतसा अभि तिला उलगडायला लागला.
‘मला वाचायला अजिबात आवडत नाही’ असं ठणकावून सांगणारा अभि लिहीत मात्र फार सुंदर होता. त्याचं अक्षर तर सुंदर होतंच पण त्याचे विचार त्याच्या वयाच्या आणि शरीराच्या मानाने फारच प्रगल्भ होते.
कधी कधी कसं असतं ना की एखादी व्यक्ती एकाच वेळी एक दुभंग जीवन जगत असते. लोकांना दाखवायचा मुखवटा एक आणि आत मध्ये ती व्यक्ती काही औरच असते. आपल्या हळवी बाजू लोकांना दाखवण्यात त्याला कमीपणा वाटतो. अभिच्या लहानपणी त्याच्या आयुष्यात जे काही घडलं होतं त्यामुळे असेल कदाचित पण अभि सुद्धा जवळ जवळ तसाच झाला होता. त्याला नेहमी लोकांसमोर स्वतःला स्ट्रॉंग दाखवायला आवडायचं. तो आपली ती हळवी बाजू कधीच कुणाला दाखवत नव्हता कारण त्याला वाटायचं कि तो हळवा असेल तर पूर्वीसारखे लोक त्याचा गैरफायदा घेतील. पण तो ती हळवी बाजू डायरीतून व्यक्त करत होता. डायरी आणि त्याच्या मधलं ते एक सुरेख रहस्य होत.
त्या डायरीत काही स्फुट लेखन आणि कविता होत्या. त्या वाचल्या नंतर आपल्याला दिसणारा अभि हा आतून काही वेगळंच रसायन आहे हे वसुधाला जाणवायला लागलं.
क्रमश:
वसुधा अभि ला समजून घेऊ शकेल का?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … बालविवाह!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा