असं म्हणतात की हृदय तुटल्याशिवाय कविता सुचत नाही. पण मग अभिचं हृदय कधी तुटलं असेल? का सुचल्या असतील त्याला अशा कविता? वसुधा डायरी वाचता वाचता विचार करत होती.
अभिच बेदरकार वागणं, त्याची मस्ती, खोड्या हा फक्त एक मुखवटा होता. आतून मात्र तो किती हळवा आहे ते वसुधाला डायरी वाचल्यानंतर जाणवायला लागलं.
त्याला आई वडिलांचं प्रेम भरपूर मिळत होतं पण त्याच्या घरी त्याच्या वयाचं कोणीही नव्हतं. त्याला भावंडं तर नव्हती च पण आई वडिलांची भावंडं त्यांच्यापासून दूर असल्याने त्याला कझिन्स नव्हते. त्याला वसुधा-वैभव सारखी आते-मामे भावंडं असतात आणि ती एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात ह्याचीच माहिती नव्हती.
मैत्रीची सुद्धा तीच गत! सतत बदलत्या शाळांमुळे त्याला वैभव वगळता कोणीही जवळचा मित्र नव्हता.
ज्या प्रकारचं आयुष्य तो जगात होता ते वर वर पाहता फार सुखासीन होतं पण आतून तो प्रेमासाठी भुकेला होता … मैत्रीसाठी तरसत होता. आणि कदाचित हेच कारण होतं कि त्याला वैभवाची मैत्री काहीही झालं तरी गमवायची नव्हती. मग वैभवच्या आयुष्यात येऊन त्याला पूर्णपणे आपल्या कह्यात ठेवणारी वसुधा त्याला आपल्या आयुष्यातली व्हिलन वाटत होती. आणि म्हणूनच तो जमेल तसा जमेल तिथे तिला त्रास देत होता.
अभिशी वागताना आता थोडं वेगळं वागायला हवं हे हळूहळू वसुधाला उमजू लागलं. त्याला थोडासा भाव दिला कि तो समोरच्यासाठी काहीही करायला तयार असतो पण कोणी जर त्याला फटकारलं तर मात्र तो समोरच्याला अजिबात सोडत नाही. उलट जास्तच त्रास देतो हे तिला जाणवलं. त्यांनतर तिने अभिला उगाचच क्रॉस न करण्याचा निर्णय घेतला. उलट त्याच्या आयुष्यातील पोकळी आपल्या मैत्रीने कशी भरून निघेल याकडे ती जास्त लक्ष द्यायला लागली.
आणि थोड्याच दिवसांत तिला तशी संधी चालून आली.
वैभवचे सुट्टीतले क्लासेस सुरु झाले आणि त्याचा अभिसोबतचा वेळ अजून कमी झाला. अभि आणि वैभवचा सर्वांत आवडता खेळ (अर्थात क्रिकेट सोडून) म्हणजे गावाबाहेरच्या जंगलात नदीच्या काठाकाठाने भटकणं. वसुधा आल्यापासून वैभव तिलासुद्धा सोबत न्यायचा आणि तिला सुद्धा ते हल्ली आवडू लागलं होतं.
अभि इतर मुलांबरोबर क्रिकेट खेळायला जायचा पण जसा तो सतत वैभवसोबत चिकटलेला असायचा तसं त्याचं बॉण्डिंग इतर मुलांसोबत नव्हतं. त्यामुळे ते काही त्याच्यासोबत जंगलात यायला तयार नव्हते. मग अशा वेळी धावून आली ती वसुधा. तिलासुद्धा वैभव आणि अभि सारखंच नवीन जागा पहायला, भटकायला आवडायचं.
वसुधा अभिसोबत जंगलात भटकायला तयार झाली तेव्हा त्याला थोडं आश्चर्य वाटलं. पण मग नवीन ठिकाणी एकटं फिरण्यापेक्षा सोबत असलेली बरी म्हणून तो तयार झाला. त्यातून हल्ली ती त्याला सारखी सारखी त्रास देत नव्हती. मग त्यानेसुद्धा तिच्या खोड्या काढणं सोडून दिलं.
मग काय आता अभि आणि वसुधा दोघेच दिवसभर नदीकाठच्या जंगलात भटकत रहायचे आणि उरलेला वेळ नदीत डुंबायचे.
पण एक दिवस असंच नदीत पोहत असतानाच अचानक वसुधाच्या आजूबाजूचं पाणी लाल होऊ लागलं.
"अभि" तिने घाबरून हाक मारली पण तो कुठेच दिसत नव्हता. ती थांबली आणि पाण्यात उभी राहिली. नशीब ते उथळ पाण्यात होते. खोल असतं तर तिचं काही खरं नव्हतं.
"अभि!" रडवेली होऊन तिने परत हाक मारली. त्याच्यापर्यंत पोचली कि नाही ते नक्की कळलं नाही, पण कसंतरी त्याच्या लक्षात आलं कि ती जवळ पोहत नाहीय. आधी तो तिच्या जवळच पाण्याखाली पोहत होता. पण ती जवळ नाहीय हे लक्षात येताच तो पाण्यावर आला. मागे वळला तेव्हा ती थोड्या दूरवर उभी होती.
थांबल्यामुळे एव्हाना तिच्या आजूबाजूचं बरंच पाणी जास्त लाल झालं होतं. अभि सुद्धा लहानच होता ना! रक्त बघून थोडा घाबरला.
"तुझ्या पायाला काही लागलं का ? रक्त येतंय ते." नदीच्या तळाला काही खडक होते आणि त्यातले काही अणकुचीदार पण होते. वसुधाला नीट पोहता येत नव्हतं म्हणून ती वाकडे तिकडे पाय मारायची. नक्कीच एखाद्या खडकाने पायाला कापलं असणार.
"तुझा पाय कुठे आपटला होता का? काही कापल्या सारखं वाटलं का?" त्याने परत विचारताच तिने मानेनेच नाही म्हटलं. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा ओघळतच होत्या.
"मला वाटतंय तूच मला काहीतरी केलंस. मी पाहिलं तू पाण्याखाली गेला होतास. मला माहितीय मी तुला आवडत नाही ते." वसुधा आवेगात वेड्यासारखं काहीही बरळत होती.
"हे बघ तू वैभवची बहीण आहेस ... आणि तुला हर्ट होईल आणि असं रक्त येईल, असं मी काहीही करणार नाही." तो तिचे दोन्ही खांदे धरून हलवत बोलला.
"विश्वास ठेव." त्याने आपल्या ओल्याच बोटांनी तिचे अश्रू पुसले. का कोण जाणे पण वसुधाला त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटला.
"चल बाहेर जाऊन चेक करूया" तो म्हणाला.
दोघेही पाण्याबाहेर जाऊन खडकावर बसले आणि चेक करू लागले. पण तिच्या पायांना किंवा हातांना कुठेच काही लागलं नव्हतं. तिने उभं राहून स्कर्टची काष्टी सोडली आणि तो पिळला तसं त्यातून पुन्हा लाल पाणी बाहेर पडलं.
ती उभी होती तेव्हाच अभिला पुन्हा तिच्या पायांवर लाल ओघळ दिसले. त्याने तिला दाखवताच ती रडू लागली.
"माझ्या पोटातून येतंय ते. कालपासून थोडं थोडं पोट दुखत होतं तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं. आता मी मरणार!" ती अजून मोठ्याने रडू लागली.
तिचे शब्द ऐकून अभिच्या डोक्यात प्रकाश पडला. काही दिवसांपूर्वीच टीव्ही वरची जाहिरात पाहून त्याने आईला सॅनिटरी पॅड म्हणजे काय ते विचारलं होतं. बहुतेक आया मुलग्यांनी विचारलं तर असल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत आणि मुलींनी विचारलं तर 'मोठी झालीस कि कळेल' असं सांगून कटवतात.
पण अभिची आई वेगळी होती. ती चांगली शिकलेली, वैद्यकीय पेशातली होती पण लग्नानंतर अभिच्या वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे गृहिणीची भूमिका सांभाळत होती. तिने शक्य तितक्या वैज्ञानिक भाषेत त्याला सगळं समजावलं होतं.
"अशा वेळी आपल्या आईला किंवा जवळच्या स्त्रिला, मग ती काकी, मामी, मावशी किंवा ताई कोणीही असो, शक्य तितकी मदत करायची. त्यांना दुखत खुपत असतं आणि मानसिक स्थिती पण ठीक नसते." आईचे शब्द अभिच्या कानात घुमले.
"पण त्यांना ओळखायचं कसं? म्हणजे नाही ओळखलं तर मदत कशी करणार ना ?" अभिच्या निरागस प्रश्नाने आई गालातच हसली.
"त्या अशा वेळी थोडी जास्त चीडचीड करतात. पण सद्या तरी तुला ओळखायची गरज नाही. अचानक कोणी असं जवळ असलंच तर तुझ्याकडून त्यांच्या बाबतीत काही वाईट साईट बोललं किंवा वागलं जाऊ नये म्हणून सांगतेय. तसं गावाकडे अशा काळात बायका बाजूला बसतात, शेजारी एक तांब्या उपडा ठेऊन. मग इतरांना कळतं कि यांना त्रास नाही द्यायचा. तिकडे 'तांब्या उपडा पडला' किंवा 'कावळा शिवला' असे वाक्प्रचार पण वापरले जातात. पण शहरातली घरं छोटी असतात. तिथे जागा कमी असल्यामुळे नाही असं कोणी करत. तुला तर याबद्दल कधी कळणारही नाही. पण कधी चुकून कळलंच तर जमेल तेवढी मदत कर."
तशी वसुधा नेहमीच अभिवर चीडचीड करायची. पण आज जरा जास्तच करत होती. म्हणजे त्याचा अंदाज खरा होता.
"मला वाटतं तुला कावळा शिवलाय," अभिने हळूच असं बोलताच वसुधा चमकली.
"ए बावळट! डोक्यावर पडलास काय?" तेव्हढ्यातही तिने त्याच्यावर तोंडसुख घेतलंच आणि पुढे म्हणाली.
"काहीही येड्यासारखं बरळू नकोस. ते कावळे किती लांब आहेत बघ!" वसुधा दूरवरच्या एका झाडाकडे बोट दाखवत म्हणाली.
"इथे एकही आला नाही. आणि कावळ्याने चोच मारली असती तरी इतकं सारं रक्त कसं येईल?" वसुधाने वैतागत विचारलं तसं अभिने डोक्यावर हात मारला.
क्रमश:
वसुधा ला काय झालंय ते तिला कळलं नाही पण अभिला कळलं आहे? अभि तिला समजून घेईल कि अजून काही करेल?
जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा … बालविवाह!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा