Login

बालविवाह भाग 9

A new series depicting the thought process of Pre-teen children and their sex education

वसुधा मुंबईहून आली होती. त्यामुळे गावाकडचे वाक्प्रचार तिला माहित नव्हते. आता हिला कसं समजवायचं आणि त्याआधी हिचं रडू कसं थांबवायचं याचा तो विचार करू लागला.

"तू ते स्टेफ्री नाहीतर व्हिस्पर ची जाहिरात पहिली असशील ना ... सद्या तुला त्याची गरज आहे." अभि बोलला पण त्याचा आवाज थोडा थरथरत होता. 

वसुधाने पण तिच्या आईला कधीतरी त्याबद्दल विचारलं होतं आणि तिच्या आईने 'मोठी झालीस कि कळेल' एवढंच सांगून टोलवलं होत.

म्हणजे आपण मोठे झालो कि काय? पण खरं तर तिला काहीच कळलं नव्हतं. ती अजूनही भांबावलेलीच होती.

"तू काळजी करू नको. हे जे होतंय ना ते नॉर्मल आहे. तू नाही मरणार. विश्वास ठेव." अभिच्या पुढच्या शब्दांनी तिला थोडं बरं वाटलं.

"पण आता इथे ते स्टेफ्री - व्हिस्पर कुठे मिळणार?" तीन विचारलं.

"तुझ्या मामाचं घर लांब आहे, पण अभिचं  इथे जवळच आहे. तू माझ्या घरी चल. माझ्या आईकडे नक्की असेल." अभि तिला आश्वस्त करत म्हणाला.

"पण हे असं रक्त सांडत रस्त्यातून कसं जाणार?" तिचा प्रश्न योग्य होता पण लगेच काहीतरी उपाय शोधायला हवा होता.

अभि विचार करू लागला. त्याच्या आईने सांगितलं होतं कि सॅनिटरी पॅड नाही मिळालं तर काही स्त्रिया कपडा घडी करून वापरतात. ते फारसं हायजिनिक नसतं पण वेळेला उपयोगी पडतं. त्याच्या डोक्यात एक आयडिया आली.

नदीवर कपडे बदलायला जागा नव्हती त्यामुळे वसू पोहून आली कि अंगावरच कपडे पिळायची आणि थोडा वेळ उन्हात उभी रहायची. उन्हाळ्यात कपडे पटकन सूकत, मग ती घरी जायची. अभि आणि वैभव मात्र कपडे खडकावर ठेवायचे. पाण्यात जाण्यापूर्वी अभिने शर्ट आणि बनियन काढून तिथेच ठेवले होते. त्याने शर्ट घातलं आणि बनियन घडी करून तिच्या हातात दिला.

"तिकडे झाडीत जा आणि जिथून रक्त येतंय तिथे ठेव. हे फारसं हायजिनिक नसलं तरी घरी पोचेपर्यंत चालेल" अभि बोलला तशी वसुधा काही न बोलता झाडीत गेली.

अभिने बेल वाजवताच आईने दार उघडलं. त्याच्याबरोबर ओल्या कपड्यातली रडवेली वसुधा बघून तिचं काहीतरी बिघडलंय हे तिने ताडलं.

"वसु, ह्याने तुझी परत खोडी काढली?" अभिच्या आईने विचारलं. तिला आपल्या लेकाचे प्रताप चांगलेच माहित होते. इकडे  वसुधाला मात्र भरून आलं.

"नाही काकू, आज तो चक्क माझ्याशी चांगला वागला." तिने हुंदके देतच उत्तर दिलं.

"मग तू अशी रडतेस का?" आईचा प्रश्न.

"आई, तिला आज ते आलंय." अभि हळूच बोलला, पण त्याला शब्दच सापडत नव्हते.

"तू मला जे मागे सांगितलंस ना ...  ते ...  तिला पण ... तसंच समजावून सांग ना. तिला तर काहीच माहित नाही. आणि मला पण नीट नाही सांगता येणार."

आईच्या लक्षात सगळा प्रकार आला. ती वसुधाला घेऊन बाथरूम मध्ये गेली.

तोपर्यंत अभि दुसऱ्या बाथरूम मधून फ्रेश होऊन आला आणि किचनजवळ डायनींग टेबल वर आईची वाट बघत बसला. आज जे झालं त्याबद्दल त सुद्धा थोडा भांबावलेला होता. आता आईशी किंवा वसुधाशी काय आणि कसं बोलावं ते त्याला कळत नव्हतं.

थोड्या वेळाने आई बाहेर आली तसा तो लगेच तिच्याकडे गेला.

"आई, मी तिची शक्य तेवढी मदत केली. पण तू रागावणार नाहीस ना? माझी बनियन ..." तो थोडं तोंड पाडत म्हणाला.

"काहीहि बोलू नकोस," आईने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाली, "मला सगळं कळलंय. I am proud of my Son"

त्याच्या ओठांवरचा तिचा हात आता पाठीवर गेला होता आणि त्याला शाबासकी देत होता.

त्या दिवशी वसुधा शारीरिक दृष्ट्या मोठी झाली, पण अभिषेक मात्र बुद्धीने आणि मनाने सुद्धा मॅच्युअर झाला होता.
 

त्याने वसुधाचीफक्त मदत केली नाही तर त्याने आणि अभिच्या आईने अगदी प्रेमाने तिचं सगळं केलं. त्यामुळे असेल कदाचित पण वसुधाचा अभिकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. 

इकडे वसुधाच्या मामीने … अर्थात वैभवच्या आईने … तिचं पोहणं बंद केलं. कितीही झालं तरी वसुधा तिच्या नणंदेची मुलगी होती … फक्त सुट्टीपूरती आलेली त्यामुळे वैभवची आई वसुधाची अति काळजी करायची. 

त्या प्रसंगानंतर मात्र अभि सुद्धा थोडा सुधारला. आता तो वसुधाच्या जास्त खोड्या काढत नव्हता मग दोघांची हळूहळू मैत्री होऊ लागली. 

पुढे पुढे ती मैत्री इतकी घट्ट झाली कि अभिसाठी आता वैभवापेक्षा वसुधाच जास्त जवळची झाली. त्याला ती बरीचशी त्याच्यासारखीच वाटू लागली. त्याची खरीखुरी सोलमेट …. हळू हळू परिस्थिती अशी आली कि जेव्हा वेगळं व्हायची वेळ आली तेव्हा ती स्वतःपासून दूर  होऊ नये म्हणून तो काहीही करायला तयार होता. अगदी लग्न सुद्धा! 

तर अशी हि अभिषेक आणि वसुधाची जगावेगळी मैत्री? जिचं रूपांतर अभिला लग्नात करायचं आहे फक्त यासाठी कि वसुधापासून वेगळं होऊ नये म्हणून.

पण खरंच ते प्रेम आहे का? ना त्याला अजून माहित ना तिला!

म्हणतात ना प्रेमाला ना वयाचा बंधन असतं … ना वेळेचं! 

त्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं! वयात येण्याआधीच तो प्रेमात पडत चालला होता

मनातल्या भावना त्याला हळूहळू जाणवू लागलेल्या आज तिच्यासाठी वाटणारी काळजी … ती आपल्यापासून दूर जाईल म्हणून वाटणारी हुरहूर, कि आपण तिच्यापासून दूर निघालोय, म्हणून तिच्यासाठी अस्वस्थ होणं … हे सगळं तिकडेच निर्देश करत होतं. 

त्याच्या हृदयात तिचं असं एक विशिष्ट स्थान निर्माण झालं होतं जे कोणीही दुसरा कधीही ते घेऊ शकणार नाही. 

जी भावना जगातली सर्वात सुंदर भावना असते, ती अत्यंत स्पेशल असते आणि तिलाच तर म्हणतात ना प्रेम!

आपण नक्कीच तिच्या प्रेमात पडलोय!

त्याने एक सुस्कारा सोडला.  मन आनंदी होतं. या नवीन भावनेत वाहवत होतं अगदी समोरच्या व्हाळातलं पाणी जसं वहात होतं ना …. अगदी तसंच त्याच्या मनात काहीतरी उमटत होतं. 

पण ती अजून किती लहान आहे आणि आपण तर तिच्यापेक्षाही लहान. मग ही भावना खरी आहे का आपण मोठे  झाल्यावर सुद्धा ही भावना अशीच राहील की मग या वाहत जाणाऱ्या पाण्यासारखं हे प्रेम सुद्धा कुठेतरी वाहत निघून जाईल?

हे नक्की खरं प्रेम आहे का? ह्या बाबतीत तो थोडा गोंधळलेला होता पण तरीही काहीही झालं तरी त्याला वसुधाला आपल्यापासून दूर होऊ द्यायचं नव्हतं आणि त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. 

************

वर्तमानकाळ 

************

वसुधाला तिच्या गल्लीच्या कोपऱ्यावर सोडून अभि आपल्या घरी पोचला तेव्हा त्याने पाहिलं कि त्याची आई सामान बांधायला घेत होती.

थोड्याश्या नाराजीनेच तिने घर आवरायला घेतलं होत. हे असं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरणं ना तिला आवडत होतं ना अभिला! तिला अभिची हि घालमेल बघवत नव्हती पण अभिच्या वडिलांच्या - शरदच्या - फिरतीच्या नोकरीमुळे दोघांचाही नाईलाज होता. 

पण आज तिला काही वेगळंच जाणवत होतं. आधी जेव्हा जेव्हा अशी वेळ यायची तेव्हा अभि फार त्रागा करायचा पण आज तो ते अजिबात करत नव्हता. 

तो चक्क तिला मदत करायला लागला … ते सुद्धा तिने न सांगता … पण ते करताना आपल्या लेकाचं चित्त थाऱ्यावर नाही … त्याचं काहीतरी बिघडलंय … हे न ओळखेल तर ती आई कसली! तो कोणत्यातरी गहन विचारात गढला होता ते तिने ओळखलं. तिने अभिला हे असं यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. 

गेलं साधारण वर्षभर ते या गावात तळ ठोकून होते कारण इथे धरणाचं काम चालू होतं. ह्या गावात आल्यापासून त्याच्या आयुष्यात काही वेगळंच घडायला लागलं होतं.

क्रमश:

तुम्हाला काय वाटतं … त्याची योजना सफल होईल का? खरंच अभि आणि वसुधाचा बालविवाह होईल? थोडा धीर धारा आणि पुढचा भाग वाचा. 

0

🎭 Series Post

View all