Login

बालविवाह

Pre-teen children's sex education and emotions

पहाटेचे पाच वाजले असतील. त्या नदीच्या पात्रातून भराभर पाणी कापत ती पुढे निघाली होती. तिला खात्री होती कि तो तिच्या मागेच असणार आहे. एकदा मागे वळून पाहावं का? पण नाही, आज पहिल्यांदाच ती त्याला हरवणार होती, तिची एक प्रकारची कसोटीच होती म्हणा ना … तिची आणि त्याची पण… कारण तो तिचा गुरु होता ना! 

कोणत्याही गुरुसाठी सर्वांत मोठी गुरुदक्षिणा काय असते माहिती आहे? आपल्या चेल्याने हरवणं हि …  आणि आज ती त्याला द्यायचं तिने पक्कं ठरवलं होतं.

किनारा जवळ आला तशी तो थोडी थांबली. पाय तसेच हलवत ठेऊन तिने हातांनी पाणी एका बाजूला सारलं आणि मग पाठीमागे वळली. तो कुठेच दिसत नव्हता … नेहमीसारखा पाण्याखाली तर गेला नसेल ना. डोक्यात विचार येताच तिने पटकन पाण्यात डोकं बुडवलं आणि डोळे उघडले. 

“किनाऱ्याजवळ कधीच पाण्यात डोळे उघडायचे नाहीत … ” त्याचे शब्द … त्याने शिकवलेला धडा तिला आठवला. 

पण तोपर्यंत उशीर झाला होता. डोळे झोंबू लागताच तिने पटकन परत मिटले आणि डोकं बाहेर काढलं. डोळे अजूनही चुरचुरत होते. कसेबसे हातांनीच ते पुसून तिने नदीवर एक नजर फिरवली … अगदी पार त्या दूरच्या धरणापर्यंत! पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. थोडं अंतर पुढे गेल्यावर तिचे पाय जमिनीला लागले. ताबडतोब ती वळली आणि नदीकडे तोंड करून उभी राहिली … त्याची वाट पाहत. 

"अभि!" तिने आवाज दिला पण काहीच प्रतिसाद आला नाही. असाच किती वेळ गेला काय माहित … पण आता तिच्या मनात काळजीचं धुकं दाटून यायला लागलं. त्याला काही झालं तर नसेल ना! 

तेवढ्यात तिच्या पायाला काहीतरी लागलं आणि ते काय असेल त्याचा विचार करायच्या आत ती धपकन पाण्यात पडली. त्यामागोमाग आला एक मोठा हसण्याचा आवाज. 

"चिंगी!" तो हसत हसत तिला पाण्यातून बाहेर काढत होता. 

"मुर्खा! तुला काही कळतं का? मी किती घाबरले." तिच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं पण तरीही त्याला फटकारण्याची संधी तिला सोडायची नव्हती. कारण एकतर त्याने तिची मस्करी केली, तिला पाण्यात पाडलं आणि वरून तिला अजिबात न आवडणारं ते नाव त्याने उच्चारलं. तो तिला सरळ सरळ तिच्या नावाने हाक मारू शकत नव्हता का? 

तिला स्वतःचं वसुधा हे नाव फार आवडायचं. तिच्या जवळचे तिला वसु म्हणायचे पण अभि कधीच नाही … तो तिला चिडवण्यासाठी मुद्दाम चिंगी म्हणायचा.

"तू तर ना भित्री भागुबाई आहेस!" तो एक हात झटकत म्हणाला. त्याला माहित होतं की तिला हे आवडणार नाही पण तिची टेर खेचायची एक पण संधी तो सोडणार नव्हता.

‘भित्री’ ह्या शब्दावर वसुधाने डोळे वटारले. त्याने आपलं म्हणणं त्या हातावरच्या पाण्यासारखंच झटकून टाकलंय हे तिला समजलं आणि त्याचा आणखीनच राग आला. 

"अज्जिबात नाही! तुझी काळजी वाटत होती, तुला काही झालं असतं तर तुझ्या आईला मी काय तोंड दाखवलं असत?" तो थोडं तोंड पाडून म्हणाली तशी त्याला सुद्धा आपली चूक जाणवली. पण आपला तोरा तर त्याला सोडायचा नव्हताच.

"मला काहीही होणार नाही आणि इथे मी तुला घेऊन आलोय” तो एक बोट आपल्या छातीकडे दाखवत म्हणाला, “तू मला नाही … हि नदी आणि ते धरण तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मला माहित आहे." तो वैतागला आणि किनाऱ्यावरच्या एका खडकावर जाऊन बसला … तिच्याकडे पाठ करून!  , 

तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं. तो जवळचे चपटे दगड उचलून पाण्यात फेकत होता. प्रत्येक दगड पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग निर्माण करत होता आणि ते तरंग हळू हळू पुढे सरकत होते. पाण्यात दगड फेकून जास्तीत जास्त  वर्तुळे निर्माण करायचं त्याला चांगलं जमायचं. आणि तशा अजून बऱ्याच गोष्टींत  तो निष्णात होता … पोहणं हे त्यापैकीच एक. तोच तर हात धुवून तिच्या मागे लागला होता ना पोहायला शिक म्हणून!

आणि आज जेव्हा ती सुद्धा पोहण्यात तरबेज झाली तेव्हा तिला ते त्याला दाखवावं असं वाटलं. त्याला तिच्या भावना कळत होत्या … पण आज त्याचं मन मात्र दुसऱ्याच गोष्टीवर होतं. तो तिच्यापासून दूर जात होता, कदाचित कायमचा. त्याला तिला सोडून जायचं नव्हतं … पण दुसरा काही पर्याय असेल का? 

अभिषेक पासून काही फूट अंतरावर वसुधा दुसऱ्या दगडावर उभी होती. तिचे कपडे टपकत होते. नीट पोहता यावं म्हणून तिने आपल्या स्कर्टला काष्टी मारलेली होती. अभिसोबत पोहायला जातेय हे तिने घरी सांगितलेलं नव्हतं म्हणून पोहण्यासाठी वेगळे कपडे न बदलता ती तशीच आपला घेरदार स्कर्ट घालून आली आणि पोहताना स्कर्टला काष्टी मारली. आता तो सायकलिंग शॉर्ट सारखा दिसत होता. 

तिने गाठ सोडली आणि ओला स्कर्ट पिळून घेतला. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे कपडे अंगावरच पटकन सुकत. मग घरी जायचं हा तिचा जवळ जवळ रोजचा शिरस्ता होता.

कपडे पिळून झाल्यावर तिने एक नजर अभिकडे टाकली. तशी ती त्याच्यावर रागावली होती पण आता तिला काही वेगळंच दिसलं. त्याचे डोळे डबडबले होते आणि ते पाणी ओघळणार नाही ह्याची तो काळजी घेत होता. नक्की काय कारण असेल? त्याचं काहीतरी बिनसलंय हे तिला जाणवलं. ती त्याच्या जवळ गेली आणि दगडावर शेजारी  बसली.

“काँग्रॅट्स, तू आता पोहण्यात एक्स्पर्ट झालीस” तो सहज हसत म्हणाला, पण त्यामागचा कातर झालेला आवाज तिने ओळखला.

“काय झालंय अभि?" तो हसत होता, पण ते हसू त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. तो चटकन वळला, त्याला आपला चेहरा लपवायचा होता … कारण … त्याला माहीत होतं की फक्त त्याचा चेहरा बघून सुद्धा ती त्याच्या मनातलं ओळखू शकते. 

"मला जावं लागेल." तो इतकंच म्हणाला. 

"ठीक आहे. उद्या पुन्हा भेटू. थोडं लवकर येऊया. उद्या मला अजून लांब जायचंय.” तिला पोहत म्हणायचं होतं पण घाईत तिने तो शब्द गाळला. 

“मला आता खूप लांब जायचंय. आपण कदाचित आता भेटणार नाही … कदाचित पुन्हा कधीच नाही.”

ती गोंधळली.

"बाबांची पुन्हा बदली झालीय, मला त्यांच्यासोबत जावं लागेल."

तिला कल्पना होती की त्यांना कधीतरी वेगळं व्हावंच लागेल, पण तिला खात्री होती कि ती जाणारी पहिली असेल. हा अचानक झालेला बदल तिच्यासाठी अनपेक्षित होता.

"वैभवला माहीती आहे का?" हे विचारताना तिचा आवाज कातर झाला होता. वैभव तिचा मामेभाऊ आणि अभिचा सच्चा दोस्त!

“हो, मी त्याला मागच्या आठवड्यात सांगितलं. पण त्याला तुला सांगू नको असं बजावलं होतं. खरं तर मला तुला हे स्वतःहुन सांगायचं होतं  पण नाही आणता आला मला हा विषय. आणि तुझा नीट निरोप घेतल्याशिवाय मी कसा जाईन ग?”

तिच्या विचारांचं चक्र सुरु झालं. गेल्या आठवडाभरापासून तो तिला पोहायला लवकर येण्याचा आग्रह का करत होता ते आता तिला कळलं. तिच्यापासून वेगळं होण्यापूर्वी त्याला तिचे पोहण्याचे धडे पूर्ण करायचे होते.

“आय एम सॉरी! ही बातमी तुला कशी सांगावी हे मला कळत नव्हतं.” त्याला फक्त रडू कोसळायचं बाकी होतं. 

"अभि, ठीक आहे रे. आपल्या दोघांनाही नेहमीच माहित होतं की आपल्याला कधीतरी वेगळं व्हावं लागेल”

पण ते इतक्या लवकर होईल असं दोघांनाही कधी नव्हतं वाटलं. वसुधाला माहित होतं कि जाणारी ती पहिली असेल कारण ती ह्या गावात नवीन आली होती. पण आता तर अभि तिच्या आधी निघून जात होता ते सहन करणं तिच्यासाठी सुद्धा खूप  मुश्किल होतं.

"तुलाही असंच वाटतंय का जसं मला वाटतंय?"  त्याने विचारलं.

तिने मानेनेच होकार दिला. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं पण त्याला ते दिसू नये म्हणून ती आटापिटा करत होती. 

"मला तुझ्यापासून वेगळं नाही व्हायचं. आपण कायमचे एकत्र राहू शकतो असा काही मार्ग असेल का?” अभिने विचारलं. 

“मला नाही माहीत. आणि आपलं कोण ऐकणार?”

"आपण प्राचीन भारतात किंवा निदान शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीत जरी जन्माला आलो असतो ना, तर एक मार्ग होता"

"काय?" तिचे डोळे चमकले. 

"कारण त्या काळात बालविवाह सर्रास होत होते. 

मला ना आज ब्रिटीशांचा जाम राग येतोय कारण त्यांनी ते   बंद केले … नाहीतर मी तुझ्याशी लग्न करून तुला माझ्यासोबत घेऊन गेलो असतो.”

त्याच्या डोक्यातून निघालेल्या त्या अतरंगी विचारावर तिला हसू आलं. पण मग लगेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिने ते आवरलं. अरे देवा! तो गंभीर होता.

"तू माझ्याशी लग्न करशील?" त्याने हळूच विचारलं. 

“ए हाफ तिकीट! डोक्यावर पडलास काय? आपलं वय काय … आपण बोलतोय काय? मी फक्त बारा वर्षांची आहे आणि तू तर अजून … अकरा … या वयात कोण लग्न करतं का?”

क्रमश:

काय …  चक्रावून गेलात की नाही? 

आजपर्यंत जबरदस्तीने केले गेलेले बालविवाह आणि त्यांचे मुख्यतः स्त्रियांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम ह्या विषयावर खूप काही वाचलं, ऐकलं आणि पाहिलं असेल ना! आयुष्याची समज येण्यापूर्वीच जबरदस्तीने लग्न लावून दिलेल्या अनेक मुलींच्या दुःखदायी कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. पण हि कथा थोडी वेगळी आहे … इथे एका लहान मुलालाच आपल्या जिवलग मैत्रिणीशी लग्न करायचं आहे … ते सुद्धा फक्त तिच्या पासून वेगळं होऊ नये म्हणून!

हि कथा कोणत्याही प्रकारे या बालविवाह या वाईट प्रथेचं समर्थन करत नाही किंवा करणार नाही. जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा म्हणजे कळेल कि ह्या कथेचं नाव बालविवाह का आहे ते?