बंध मैत्रीचे

बंध मैत्रीचे

बंध मैत्रीचे


ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ या स्पर्धेत मला सर्वात जास्त आवडलेली फेरी म्हणजे संबंधसेतू आणि जिच्याबद्दल लिहणार ती सुद्धा वेगळीच पण फार इंटरेस्टिंग आहे. सकाळची प्रसन्न सुरवात स्वामी नामाने होते आणि प्रत्येक वाटेवर स्वामी तिच्या पाठीशी आहेत; असा तिचा विश्वास आहे; कोण आहे ती? ती आहे भाग्यश्री सिद्धांती. कोणी कोणाच्या जीवनात विनाकारणान येत नसते. मागच्या जन्माचे ऋणानुबंध असतात किंवा आपली पुण्याई, म्हणूनच ते वर्तमानात त्यांच्या गाठीभेटी होतात. अशीच मला लाभलेली सखी म्हणजे भाग्यश्री. अचानक एका वळणावर भेटलेल्या व्यक्ती अगदी जीवाभावाच्या सख्या होऊन जातात.

ईरा चॅम्पियन स्पर्था २०२३ मध्ये आम्ही सर्व मुली एकाच ग्रुपमध्ये; मेघादी, ऋतू, ऋचा यांना मी आधीपासून ओळखत होते. कथांमधून अनु मॅम, अश्विनी मॅम, संध्या मॅम यांच्याशी लेखक वाचक म्हणून ओळख झाली. भाग्यश्री, अर्पणा मॅम, शरयू या मैत्रिणी नवीनच, पण यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आम्ही एकत्र आलो. आधी सर्वांनी फोटो पाठवून आपआपली चेहर्‍याने ओळख करून दिली. मेघादी, तिला कोण नाही ओळखत? सर्वच ओळखता. मेघादी आणि भाग्यश्री दोन्ही नणंद भावजय आहेत, हे कळल्यावर म्हटले,"वाह! एक उत्तम कथा तर दुसरी कविता लिहिते. दैवी देणगीच ती." कविता करणे सोपे नाही. कमी शब्दांत जास्त अर्थ असलेले भाव दर्शवणारी कविता वाचल्यावर मनात उतरायला सुद्धा हवी. मला नेहमी या कवी लोकांचे विशेष कौतूक वाटते. विशेष म्हणजे यांना दिलेल्या कोणत्याही विषयावर भरभर शब्द सुचतात. मला खरतरं नवल वाटत असते.


भाग्यश्रीचे लिखाण कधी वाचले नव्हते. पहिली फेरी आली आणि तिची कथा वाचली. 'जगा वेगळ्या मायलेकी' या कथेत खूप सुंदर अशी मायलेकीची जोडी होती. 'पडद्यामागचा बाबा', 'आयुष्य जगतांना', 'आयुष्य एक रंगमंच', ' बाबा', 'तुझी आठवण', 'एक जीव वाचवण्यासाठी' अशा सुंदर कविता आणि लेख तिने लिहले आहेत. त्यानंतर ग्रूपवर ह्या नाहीतर त्या कारणाने बोलणे सुरूच होते. भाग्यश्रीचे मनाचे तार समोरच्या व्यक्तीसोबत जुळले की तिची गाडी सुसाट धावते. तेही इतकी जोरात की बायकांचे आवडते काम म्हणजे शॉपिंग स्टेशन जरी आले तरी उतरणार नाही. सिरीयसली, शॉपिंग कोणी कसे काय सोडू शकते? पण आवडीच्या लोकांमध्ये, आवडीच्या विषयांमध्ये रमलेली भाग्यश्री मात्र शॉपिंगवर पाणी फेरू शकते. सरळ स्पष्ट बोलणे आणि वाईटातून ही पॉझिटिव्ह विचार करणे, तिचा हा स्वभाव मला फार आवडला. तिचे वैचारिक लिखाण आपल्या विचार करायला भाग पाडतात. तिला लहानपणापासून कविता करण्याची आवड तर होती, पण आता त्या कवितेला आपला गोड आवाज देऊन ती भावनाबद्ध करते. लिखाण, कविता करण्याचा विशेष असा वेळ आहे, तो म्हणजे रात्रीची निरव शांतता; त्याच वेळात तिला लिहायला भारी भारी सुचते. झोपेत ही काही सुचले तर ही वही आणि पेन घेऊन लिहायला बसणार; अशी ही लिखाणवेडी आहे.

भाग्यश्री सोबत बोलतांना कधीच मनात संकोच वाटला नाही आणि विदर्भातील असल्यामुळे त्या भाषेच्या गोडव्यामुळे लगेचच आमचे बंध जुळले. भाग्यश्रीचा नुकताच वाढदिवस झाला. नेमका माझा मोबाइल तेव्हाच आजारी पडला. ग्रुपवर सर्वांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मॅसेज आले होते. मला माहितीच नव्हते, पण जसा मोबाइल हातात घेऊन सुरू केला, तर ग्रुपमध्ये सर्वांचे मॅसेज दिसले, फक्त माझाच नव्हता. ती सर्वांचे आभार मानत होती सोबत तिने एक मॅसेज टाकला, "थँक्यू सर्वांनी विश केले एका व्यक्तीशिवाय." मी तो वाचला आणि थेट तिला फोन लावला. वाढदिवसाच्या दिवशी मॅसेजपेक्षा वन टू वन बोलेले मला चांगले वाटते आणि आम्ही फोनवर जे बोलायला लागलो, तर एक तास कुठे गेला माहितीच पडले नाही. बोलतांना असे वाटत होते की, खूप जून्या मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्यात; खी खी खू खू, चिडवणं, अशा खूप गप्पा मारल्या. ती एकदम उत्साही आणि हसरी; मनात म्हटले 'अरे ही तर आपल्यासारखीच आहे.' म्हणून आधी म्हटले मी यांची गाडी एकवेळ सुटली की थांबतच नाही. अशी गोड बिनधास्त असलेली मला "डॅबिस कार्टी" म्हणणारी मैत्रिण लाभली. हा मैत्रीचा झरा असाच अविरत वाहू दे. तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो, हीच स्वामीचरणी शुभेच्छा.

मैत्रीला कुठे नाव असते
असते फक्त आपुलकी
तिच्या नावातच सार आहे
तिच्या कणाकणात माणुसकी

स्पष्टवक्तेपणा रक्तातच आहे
म्हणूनच ती झगडते
खटकले जरी कोणालाही
झुकणाऱ्यातली ती नसते

हास्याचा खळखळणारा झरा
सदोदित वाहत असते
बोलक्या डोळ्यात मात्र
भावनांचे शिंपण पसरते

अप्रतिम लेखणीने
ठाव घेते हृदयाचा
भाग्यश्री नावातच
वारसा सर्वगुण संपन्नतेचा

©® धनदिपा