चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
लघुकथा
शीर्षक:- बंध मनाचे
©® सौ.हेमा पाटील.
अवनीला आज उशीर झाला होता, त्यामुळे ती रिक्षा करून शाळेत पोहोचली होती. धावत जात तिने मस्टरवर सही केली, आणि ती आपल्या वर्गाकडे गेली. मुले तिची वाट पाहत होती. तिने मुलांची हजेरी घेतली, त्यानंतर त्यांच्याकडून रोजच्याप्रमाणे प्रार्थना म्हणून घेतली.
ती कपाटातून एकएक वस्तू काढून त्यांच्यासमोर ठेवू लागली. कोणाला तिने चित्र काढायला साहित्य दिले, कुणाला वाचायला पुस्तक दिले. रिद्धीला तिने खेळायला बाहुली दिली. विक्रमला फुले बनवण्यासाठी क्रेपचा कागद, कात्री आणि टेप तिने काढून आपल्या समोर टेबलवर ठेवला. हत्यारे आपण समोर असतानाच मुलांच्या ताब्यात द्यायची हे ती आवर्जून पाळत होती.
आधी तिने सर्व मुलांकडून पाढे म्हणून घेतले. त्यानंतर तिने मुलांना एक छानशी गोष्ट सांगितली. गोष्ट ऐकण्यात मुले रमून गेली होती असे तिला वाटले. काही मुले आपल्याच नादात होती. त्यांचे कशाकडेच लक्ष नव्हते. कुठेतरी शून्यात नजर लावून ती आपल्याशीच हसत बसली होती.
अवनी एका मतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. सर्वसाधारण मुलांच्या शाळेत काम करणे फार सोपे असते. दिलेल्या सूचना त्यांच्या मेंदूपर्यंत लगेच पोहोचतात. या मुलांसाठी मात्र जास्त प्रयत्न करावे लागतात. खूप पेशन्स ठेवावे लागतात.
अवनीला हे काम चॅलेंजिंग वाटत होते. इथे काम करायला लागल्यापासून आपले आयुष्य बदलले आहे असे तिला वाटत होते. आपण सर्वजण सर्वसाधारण माणसे आहोत, तरी येणाऱ्या संकटाला किती घाबरतो! इथे तर ही मुले सामान्य नाहीत. रोजचे आयुष्य कसे जगायचे याची काळजी आपल्याला लागलेली असते. या मुलांना कशासाठी जगायचे हेच माहीत नसते, तरीही आयुष्य आहे म्हणून जगावेच लागते त्यांना.
त्यांच्या घरच्या लोकांना याचा किती त्रास होत असेल असे तिला वाटत असे. चार तास मुले शाळेत असतात, तर त्यांना सांभाळताना आपल्या नाकी नऊ येते. मग ही मुले घरी असताना त्यांच्या आईला किती त्रास होत असेल, असा विचार अवनीच्या मनात कायम येत असे.
इतर मुलांचे ठीक होते, पण अलीकडे विक्रम मात्र जरासा वेगळा वागत होता हे तिच्या लक्षात आले होते. ती वर्गात आली, की तो तिच्याकडे एकटक पाहत बसायचा. तिने त्याला काही काम दिले, की तिचा हात पकडायचा. आपला हात पकडल्याने त्याला आधार वाटत असेल असे वाटून अवनी त्याचा हात झटकायची नाही. दोन मिनिटांनी हळूच त्याचा हात आपल्या हातावरून दूर करत असे.
या मुलांची बुद्धी अपुरी असल्याने ती त्यांना कधीच टाकून बोलत नसे. तो तिच्या शिकवण्याचा एक भाग होता. अवनी एम. एस. डब्ल्यू. झाली होती. अशा स्पेशल मुलांची काळजी घ्यावी या हेतूने अधिकारी म्हणून मिळणारी नोकरी डावलून तिने इथे नोकरी पत्करली होती.
यामागे एक कारण होते, तिचा भाऊ अमित हा जन्मापासून मतिमंद होता, हे तिने पाहिले होते. दुर्दैवाने सहा वर्षाचा असताना त्याचा मृत्यू झाला. त्याला जवळून पाहिलेले असल्याने तिला अशा मुलांची कणव येत असे. त्यामुळे तिने मतिमंद मुलांच्या शाळेत नोकरी करायचे ठरवले होते.
या मुलांची सहल काढायची असा हट्ट तिने प्रिन्सिपलकडे धरला.
" यांना कोण आवरणार? चार भिंतींच्या आत आहेत म्हणून ठीक आहे. काही कमी अधिक झाले तर त्याला कोण जबाबदार?" असे प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या. त्यांचेही बरोबरच होते; कारण आधीच मुलांना अडवणे खूप अवघड असते. त्यात ही मुले मतिमंद! त्यांना एकच सूचना वारंवार करावी लागते. बाहेरच्या मोकळ्या वातावरणात गेल्यावर त्यांना अडवणे किती अवघड होईल! परंतु अवनी ऐकायला तयार नव्हती.
घर ते शाळा एवढेच त्या मुलांचे विश्व होते. त्यांना एखाद्या दिवशी तरी बाहेरचे जग पाहता यावे असे तिला वाटत होते. ती आपल्या मैत्रिणींशी याबाबत बोलली. तिच्या चार-पाच मैत्रिणी सहलीत तिच्या मदतीसाठी यायला तयार झाल्या. तिने प्रिन्सिपल मॅडमची परवानगी काढली, आणि मुलांना बागेत घेऊन गेली.
तिथे गेल्यावर मुले खूप आनंदीत झाली. बागेतील फुले- झाडे पाहून त्यांना आनंद झाला. मुक्त वातावरणात ती विहरू लागली. काही मुले तर चक्क उड्या मारू लागली. अवनीने त्यांच्यासाठी बैठ्या खेळाचे सामान आणले होते. तसेच रिंग, बाॅल आणले होते. रिंग एकमेकांकडे फेकत ती झेलण्यात मुले गुंगून गेली होती.
तिने स्वतः त्या मुलांसाठी घरून शिरा, ढोकळा आणि रव्याचे लाडू आणले होते. डिशमधून तिने सगळ्यांना खाऊ दिला. तिच्या चार मैत्रिणी आणि ती मुलांवर सतत लक्ष ठेवून होते.
खाऊन झाल्यावर मुले इकडे-तिकडे फिरू लागली. विक्रम मात्र एका झाडाखाली जाऊन बसला होता. त्याला एकट्यालाच तिकडे दूर एका झाडाखाली बसलेले पाहून अवनी त्याच्याकडे गेली. ती त्याला म्हणाली,
" अरे, बाकीची सगळी मुले तिकडे खेळत आहेत, आनंदाने विहरत आहेत. तू एकटाच इथे का बसला आहेस?" त्याबरोबर विक्रम उठून उभा राहिला. अवनीच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला,
" मला कसेतरीच होत आहे." यावर अवनीने विचारले,
" काय झाले आहे तुला? काय होत आहे? तुला जेवणामुळे पित्त झाले आहे का? की ऊन लागले म्हणून डोके दुखत आहे?" यावर तो काहीच बोलला नाही. तिने त्याला ताप आला आहे का, हे चेक करण्यासाठी त्यांच्या कपाळावर आपला हात ठेवला. त्याला ताप आला नव्हता. ती आपला हात मागे घेणार, तेवढ्यात त्याने पटकन पुढे होऊन अवनीला घट्ट मिठी मारली. तिच्या ओठांवर ओठ ठेवून तो तिचे चुंबन घेऊ लागला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अवनी दचकली. काय करावे हे तिला समजेना. विक्रम वयात आला होता. ती भावना त्याला शांत बसू देत नव्हती. आता दररोज वर्गात विक्रम तिच्याकडे रोखून का पहात असतो, हे अवनीला समजले.
अवनीने त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या अंगात प्रचंड ताकद होती. त्यामुळे तो तिच्या मिठीपासून अजिबात दूर झाला नाही. उलट अधिक आवेगाने तिला घट्ट आवळत होता. तिचे ओठ हुळहुळत होते. त्याचे तोंड आपल्या दोन्ही हातांचा जोर लावून तिने बाजूला केले, आणि ती आपल्या मैत्रिणीच्या नावाने ओरडली.
" निशा, इकडे ये." तिकडे दूर काय चालले आहे याचा कुणाला पत्ताच नव्हता. तिने हाक दिली, त्याबरोबर सगळ्याजणी धावत आल्या. अवनीवर काय प्रसंग ओढवला आहे हे त्यांना समजले. त्या चौघींनी मिळून विक्रमला ओढून दूर केले. त्या चौघींचीही ताकद कमी पडत होती एवढी ताकद विक्रम मध्ये होती.
अवनी विक्रमच्या मिठीतून दूर होताच मटकन खाली बसली. असे काही होईल अशी तिने कल्पनाही केली नव्हती.' आज मैत्रिणी नसत्या तर आपली काय अवस्था झाली असती?' असे तिला वाटले. प्रिन्सिपल मॅडम बरोबर बोलत होत्या हे तिला पटले. त्यानंतर सहल आवरती घेऊन त्या सर्वजणी मुलांसह शाळेत परत आल्या.
तिथे जे काही घडले ते तिने प्रिन्सिपल मॅडमच्या कानावर घातले. मॅडम म्हणाल्या,
" यासाठीच मी तुला अडवत होते." अवनी म्हणाली,
" बरोबर आहे मॅडम, पण ही सुद्धा आपल्यासारखीच माणसे आहेत ना. त्यांना किती डांबून ठेवायचे?"
" बरोबर आहे गं, पण शेवटी त्यांचे नशीबच तसे आहे त्याला आपण काय करणार? जेवढे शक्य आहे तेवढे आपण करतोच ना."
आता विक्रम आक्रमक झाला होता. त्याला शाळेत ठेवणे धोक्याचे झाले होते. प्रिन्सिपल मॅडमनी त्याच्या आईवडिलांना बोलावून घेऊन याबाबत कल्पना दिली, आणि घरी सुद्धा याबाबत काळजी घ्या, असे सांगितले.
"इथून पुढे त्याला या शाळेत पाठवू नये. मनोविकारतज्ञांना दाखवून त्याच्याबाबत योग्य तो सल्ला घ्यावा." असे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे अवनी खूपच डिस्टर्ब झाली होती. ही मुले जरी मतिमंद असली तरी वयात येताना निसर्ग त्यांच्यावरही परिणाम करतो. आपल्या भावना कशा नियंत्रित कराव्यात याचे ज्ञान या मुलांना देणे आवश्यक आहे, असे तिला वाटले. यासंदर्भात शहरातील मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर शीला पाटील यांच्याशी चर्चा करायची असे तिने ठरवले.
डॉ . शीला पाटील यांची अपाॅईंटमेंट घेऊन ती त्यांना भेटायला गेली. तिने स्वतःबद्दल थोडी माहिती सांगितली आणि परवा घडलेला प्रसंग सांगितला. या मुलांना अशा परिस्थितीत कसे हाताळायचे हा प्रश्न तिने विचारला.
"खरं सांगायचं तर यावर काहीही उपाय नाही. टेस्टोस्टेराॅन हे सर्वात महत्वाचे ॲंड्रोजन आहे, जे काम वासना उद्दिपित करते, पण यासोबतच इतर अवयवांसाठीही ते आवश्यक असणारे ॲंड्रोजन आहे.
सजगता आणि पालकांचे मुलांवर बारीक लक्ष ठेवणे हेच प्रतिबंधात्मक उपाय आहेत. निसर्ग आपले काम करतच असतो. मेंदूतील उत्तेजित करणाऱ्या स्त्रावांचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी करता येते, पण तेवढेच.
अशी मुले भावनांचा निचरा न झाल्याने कधी कधी हिंसक होतात. आपल्या शेजारी-पाजारी, तसेच नातलगांना याची जाणीव करून देणे आवश्यक असते, अन्यथा विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. या वयातील मुलांकडून गोड बोलून व्यायाम, पोहणे, शारीरिक कामे करून घेतली, तर त्यांची अतिरिक्त शक्ती कामी येते."
हे ऐकून अवनीला समजले की, यावर काहीही उपाय नाही. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे हेच खरे. आपल्यावर आला तसा प्रसंग इतर कुणावर येऊ नये यासाठी तिने आपल्या शाळेतील पालकांची मिटींग ठेवली. डॉ. शीला पाटील यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. पालकांनी आपल्या मनातील प्रश्न त्यांना विचारले. यामुळे आपल्या पाल्याची काळजी कशी घ्यावी, मुलांना तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कसे सांभाळावे यांचे ज्ञान त्यांना झाले.
अवनीसोबत घडलेल्या विपरीत घटनेमुळे तिने आजची ही मिटींग घडवून आणली होती, जेणेकरून असा प्रसंग आणखी कुणावर येऊ नये.
समाप्त. ©® सौ.हेमा पाटील.
काही प्रश्न हे अनुत्तरितच असतात. कितीही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही उत्तरच नसते, तर सापडणार कोठून?
कथा आणि अवनीचा प्रयत्न आवडला तर नक्की लाईक कमेंट करा ही विनंती.