बंध प्रेमाचा भाग २

One Lovestory
बंध प्रेमाचा भाग २

सकाळी झोपेतून उठल्यावर आदेशने शिवानीला फोन केला. तीन ते चार रिंग वाजल्यावर शिवानीने फोन उचलला.

“हॅलो, आदेश एवढ्या सकाळी कोणी फोन करत का?” आवाजावरून शिवानी झोपेतच होती, हे आदेशला जाणवलं.

“सॉरी, मी तुझी झोपमोड केली. काल आईकडून हर्षालीच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनांबद्दल कळलं, ते ऐकून खूप वाईट वाटलं. हर्षाली आता कशी आहे?” आदेश.

“आदेश, मी तिला भेटले जरी असले तरी तिने तिचं मन माझ्याकडे मोकळं केलं नाहीये. चेहऱ्यावर कितीही हसू दाखवत होती, तरी तिच्या डोळ्यात दुःखाची एक छटा मला दिसली. तुला जेवढं तिच्याबद्दल कळलं मलाही तेवढंच माहीत आहे.” शिवानीने सांगितले.

“शिवानी, मला तिचा नंबर मिळेल का? मला तिला भेटायचं आहे. मला तिची खूप काळजी वाटत आहे. तिच्या विचारात मला रात्री झोप सुद्धा लागली नाही.” आदेश एका दमात सगळं बोलून गेला.

“अरे हो, किती फास्ट बोलतो आहेस. जरा श्वास तर घे. फोनवर बोलण्यापेक्षा पुण्याला गेल्यावर ती ज्या महिलाश्रमात राहते तिथे जाऊन तिची भेट घे. मी तुला त्या महिलाश्रमाचा पत्ता पाठवते.” शिवानी.

यावर आदेश म्हणाला,
“हो चालेल, तू मला तिचा पत्ता पाठव. मी तिची प्रत्यक्षात जाऊन भेट घेतो.”

“तू तिला प्रत्यक्षात जाऊन भेट, पण आतातरी तिच्याकडे तुझं मन मोकळं कर. तुझ्या मनात तिच्याबद्दल ज्या भावना होत्या किंवा आता आहे त्या तिच्याकडे व्यक्त कर. किती दिवस मनात सगळं साचवून ठेवणार आहेस.” शिवानी म्हणाली.

“तुला हे सगळं कसं माहीत?” आदेशला आश्चर्य वाटले होते.

“भाऊ, तुझा जिगरी यार आपलाही जिगरी होता. तू नकळतपणे तिच्यासाठी जे करत होता, ते तिला नसेल समजलं तरी मला समजत होतं. बसमध्ये तिला बसायला जागा मिळाली नाही तर तू उठून तिला जागा द्यायचा. मला कधी जागा दिली नाहीस तू. शाळेतून आम्ही पुढे निघाल्यावर तू आमच्या मागे मागे यायचा. एक दिवस तिला सर ओरडले होते, म्हणून ती रडत होती, तेव्हा तुझ्याही डोळ्यात आलेलं पाणी मी बघितलं होत.

काल मी मुद्दाम तिचं नाव घेतल होतं, तिचं नाव ऐकल्यावर तुझ्या डोळ्यातील चमक मला बघायची होती. अरे भावा, कालसुद्धा तू तिचा नंबर माझ्याकडे मागितला नाहीस. निदान हर्षाली सोबत बोलताना आता विचार करू नकोस.” शिवानी.

“हो ताईसाहेब. आता तुझ्यासारखी बहीण सोबत असल्यावर कसली भीती. मी हर्षालीला भेटून ती माझं पहिलं प्रेम होती, हे सांगणार म्हणजे सांगणारच.” आदेश म्हणाला.

“ये हुई ना बात! तुमची भेट झाल्यावर तुमच्यात जे काही बोलणं होईल ते कळवायला विसरू नकोस.” शिवानीने बोलून फोन कट केला.

हर्षाली ज्या महिलाश्रमात राहत होती, त्याचा पत्ता शिवानीने आदेशला पाठवला.

पुण्याला जाऊन हर्षालीची कधी एकदा भेट घेऊ असं आदेशला झाले होते.

“आदेश, उद्या पहाटे लवकर निघाला असता तरी वेळेवर ड्युटीला पोहोचला असता. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तरी लवकर का जात आहेस? एकतर एवढ्या वर्षांनी आलास तर राहिला असतास.” आदेशचे बाबा बडबड करत होते.

“बाबा, माझ्या कंपनीतील एका कलीगचा काल अपघात झाला. आज लवकर गेलो तर त्याला जाऊन भेटणं होईल. उद्यापासून रुटीन सुरू झाल्यावर मला त्याला भेटायला जाता येणार नाही. मी आता पुण्यातच आहे तर वरचेवर तुम्हाला भेटायला येत जाईल.” आदेश बाबांना समजावत होता.

त्यांचं बोलणं ऐकून स्वयंपाक घरातून त्याची आई बाहेर येऊन म्हणाली,
“आदू, आता लग्नाचं मनावर घे. तुझ्या बरोबरच्या सगळ्या मुलांची लग्न झाली आहेत. तुच एकटा बाकी आहेस. तुझ्या आयुष्यात एखादी मुलगी असेल तर तसं स्पष्ट सांग, आमचं काहीही म्हणणं नसेल.”

“आई, आपण माझं लग्न या विषयावर नंतर बोलूयात. विशाल मला संगमनेरला सोडवणार आहे, तिकडून पुण्याला जाणारी बस लवकर मिळेल, तो माझी वाट बघत बाहेर उभा आहे. मी येतो.” आईच्या हातातील जेवणाचा डबा घेऊन आदेश घराबाहेर पडला.

विशालच्या गाडीवर बसल्यावर आदेश मनातल्या मनात म्हणाला,
‘देवा, मी आई-बाबांशी खोटं बोललो. मला माफ कर. आज फक्त माझी आणि हर्षालीची भेट होऊदेत.’

विशालने त्याला संगमनेरला सोडले, तो तेथून पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसला. ४ ते ५ तासांचा प्रवास करून तो पुण्यात पोहोचला. आदेशकडे बरच सामान असल्याने तो पहिले स्वतःच्या फ्लॅटवर गेला. फ्रेश होऊन हर्षाली ज्या महिलाश्रमात राहते त्या दिशेने तो गेला.

महिलाश्रमात गेल्यावर गेटवरच त्याला सिक्युरिटी गार्डने अडवलं,
“साहेब, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे?”

“मला हर्षालीला भेटायचं आहे.” आदेशने उत्तर दिले.

“तुम्हाला आधी संचालकांची भेट घ्यावी लागेल, त्यांनी परवानगी दिल्यावरच हर्षाली मॅडमला भेटता येईल.” गार्ड आदेशला संचालकांच्या केबिन पर्यंत घेऊन गेला.

संचालकांनी आदेशचा आयडी प्रूफ बघून त्याला हर्षालीला भेटण्याची परवानगी दिली. एक शिपाई त्याला हर्षालीकडे घेऊन गेला. हर्षाली एका खोलीत आश्रमातील लहान मुलींना शिकवत होती. शिपाई आदेशला तिथे सोडवून निघून गेला.

आदेश दरवाजाच्या बाहेर उभा तिच्याकडे बघतच राहिला. नेव्ही ब्लू रंगाचा ड्रेस तिने परिधान केलेला होता, त्या रंगात तिचे रूप खुलून दिसत होते. ती मुलींना शिकवण्यात इतकी मग्न झाली होती की, दरवाजात उभे राहून आदेश तिचे निरीक्षण करत आहे हेही तिच्या लक्षात आले नव्हते.

पाच ते दहा मिनिट गेल्यावर तिचे लक्ष दरवाजाकडे गेल्यावर तिला आदेश तिथे दिसला. तिने आपल्या जागेवरुन खुणेनेच त्याला काय हवंय म्हणून विचारलं.

आदेश दोन पावले पुढे येऊन म्हणाला,
“मला तुमच्याशी थोडं बोलायचं होत.”

“माझा वर्ग संपायला अजून दहा मिनिटे आहेत, मग मी तुम्हाला भेटते. इथे ताटकळत उभे राहण्यापेक्षा लॉनवर बाकडे आहेत, तिथे जाऊन बसा. मी आलेच.” हर्षाली पुन्हा शिकवण्यात मग्न झाली.

काहीवेळ तिथेच रेंगाळून आदेश लॉनच्या दिशेने गेला, तिथे एका झाडाखाली निवांत ठिकाण बघून त्या बाकड्यावर तो बसला.

‘हर्षालीच्या बोलण्यावरून तिने मला ओळखलं नसेल हेच जाणवत होते. हर्षाली माझ्याशी नीट बोलेल का? मी तिला माझ्या मनातील भावना सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल?’ असे विचार आदेशच्या मनात येऊ लागले होते.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all