बंध प्रेमाचा भाग ३(अंतिम)

One Lovestory
बंध प्रेमाचा भाग ३(अंतिम)

आदेश हर्षालीची वाट बघत लॉनवर बसला होता. काही वेळाने एक शिपाई तिथे येऊन म्हणाला,
“साहेब, तुम्हाला हर्षाली मॅडमने गेस्ट रूममध्ये बोलावलं आहे.”

शिपाई आदेशला गेस्ट रूमकडे घेऊन गेला. तिथे हर्षाली आधीच येऊन बसलेली होती. तिच्या समोरील खुर्चीत तिने आदेशला बसण्यास सांगितले. शिपायाने आदेशला पाणी व चहा आणून दिला.

“माझ्याकडे आपलं काय काम होतं?” हर्षालीच्या डोळ्यात आदेश बद्दल अनोळखी भाव होते.

“मी आदेश कांडेकर, आपण एकाच शाळेत होतो. एकाच बसने ये-जा करायचो. आपण रहायला सुद्धा एकाच एरियात होतो. होप सो तुम्हाला आठवत असेल.” आदेश चेहऱ्यावर स्माईल आणून म्हणाला.

“हो आठवलं. तुम्हाला माझा इथला पत्ता कोणी दिला?” आदेशने त्याची ओळख सांगितली, तरीही हर्षालीच्या चेहऱ्यावर भाव बदललेले नव्हते.

“शिवानी.” आदेशने उत्तर दिले.

“ओके. मला भेटायला येण्याचं काही कारण होत का? सहज तर तुम्ही भेटायला आलाच नसाल.” हर्षाली रुक्षपणे बोलत होती.

“तुझ्याबद्दल आईकडून कळालं. मी इथे पुण्यातच असल्याने विचार केला की, प्रत्यक्षात येऊन तुला भेटावं.” आदेश.

“माझ्या आयुष्यात जे घडलं ते माझ्या नशिबात होत, असं मी समजते. आता मी एका वेगळ्या जगात रमले आहे आणि हे सगळं करायला मला आवडतं. मी इथे खुश आहे.” हर्षाली आदेश सोबत तुटकपणे बोलत होती.

“हर्षाली, तू इतक्या रुक्षपणे का बोलत आहेस? आपण एकदमच अनोळखी आहोत असं तू बोलत आहेस. मला तुझी काळजी वाटत होती, म्हणून मी भेटायला आलो होतो.” आदेश बोलता बोलता मध्येच थांबला.

हर्षाली पुढे म्हणाली,
“आदेश, मला कोणाचीही सिम्पथी नकोय. मला कोणाच्याही जवळ जायची भीती वाटते. मी ज्याच्या जवळ जातो तो मला सोडून दूरवर निघून जातो. मी मात्र भूतकाळाच्या आठवणीत झुरत बसते. या सगळ्यामुळे मी ठरवलं आहे की, कोणाशीच अगदी कोणाशीच प्रेमाने बोलायचं नाही, अतिजवळीक साधायची.

मला खूप चटके बसल्याने मी इतकी रुक्ष झाले आहे. हळूहळू मी स्वतः ला भावनाशून्य बनवत चालले आहे.”

“हर्षाली, आपण माणूस आहोत. आपण भावनाशून्य कधीच होऊ शकणार नाही. तुला असं तुटक बोलताना, वागताना त्रास होत असेलच ना. शिवाय नंतरही तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होत असेलच.

तुझ्या आयुष्यात जे काही घडून गेलं ते वाईटच होतं, पण यापुढेही असं काही घडेल ही अपेक्षा ठेवणंच चुकीच आहे.” आदेश कळकळीने बोलत होता.

यावर हर्षाली म्हणाली,
“आदेश, तुमच बोलणं खरंही असेल पण मी आता आयुष्य कस जगायचं हे ठरवलं आहे आणि मी त्या मार्गावर वाटचाल करत आहे. बरं तुम्हाला काही बोलायचं आहे की मी जाऊ?”

आदेश मिश्किल हसून म्हणाला,
“मला जे बोलायचं होत ते आता न बोललेलंच बर. उगाच माझ्याही मनाला वेदना होतील आणि तुझ्याही(शेवटचं वाक्य तो अस्पष्ट बोलला). तुला भेटून छान वाटलं. स्वतःची काळजी घे. येतो मी.”

आदेश लगेच आश्रमातून बाहेर पडला. त्याने लगेच शिवानीला फोन लावला,

“रोमिओ अँड ज्युलिएटची भेट कशी झाली?” शिवानीने आदेशला चिडवण्यासाठी विचारले.

“शिवानी, ज्या हर्षालीवर मी प्रेम करत होतो, ती ही नाहीये. ही हर्षाली खूप बदलली आहे. ती दोन वाक्य सुद्धा नीट बोलू शकत नाहीये. किती रुक्ष झाली आहे ती. माझं तिच्यावर प्रेम आहे, हे मी तिला सांगितलं नाही. मी सांगणार होतो, पण त्यावर तिची अशी प्रतिक्रिया असली असती की, त्याने मला प्रचंड मनस्ताप झाला असता.

असो, हर्षाली नावाचा धडा कायमचा बंद. माझ्या मनात जो आमच्या प्रेमाचा बंध होता, तो तसाच एका कोपऱ्यात बंद असलेलाच बरा.” बोलताना आदेशला भरून आल्याने त्याने फोन कट केला.

शिवानीने हर्षालीला फोन केला,

“हॅलो हर्षाली, हे तुझं काय चाललंय? तुझ्या अश्या वागण्याने आदेशला किती त्रास झाला याची कल्पना तरी तुला आहे का? आयुष्य तुला एक नवीन संधी देऊ पाहत होते, तरी तुला ते नको होते.” शिवानी थोडी रागातच बोलत होती.

शिवानीला शांत करण्यासाठी हर्षाली म्हणाली,
“शिवानी, माझं बोलणं तर ऐकून घे. आदेश माझ्यावर प्रेम करतो ह्याची कल्पना तर तू मला दिलीच होतीस. शिवानी, त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल असणार प्रेम मला स्पष्टपणे दिसून येत होतं.

त्याने त्याच्या मनातील भावना माझ्यासमोर मांडल्या असत्या आणि मी त्याला नकारच दिला असता, तर त्याला आता जेवढा त्रास होतो आहे, त्यापेक्षा खूप त्रास झाला असता.

आता सध्या त्याच्या मनात माझी एक निगेटीव्ह इमेज तयार झाली असल्याने त्याला मला विसरणं सोपं जाईल. आदेश आयुष्य माझ्यासारख्या मुलीमुळे अफेक्ट होऊ नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा होती.”

“अग, पण त्याला सगळं माहीत असतानाही तो तुझ्यापर्यंत आला होता, म्हणजे त्याने तुला तुझ्या भूतकाळासह स्विकारलं असतं.” शिवानीच वाक्य अर्धवट तोडत हर्षाली म्हणाली,

“शिवानी, अग मला माझ्या आयुष्यात कोणीच नकोय. मी एकटी आनंदी आहे. माझ्या मनात आदेश बद्दल प्रेम नव्हतं आणि नाहीये. त्याच्या मनात जो प्रेमाचा बंध आहे तो तसाच राहुदेत. त्या बंधात लवकरच एखादी मुलगी कडून त्यांचा प्रेमाचा बंध खुलेल बघ.

चल मला बरीच कामं आहेत. मी फोन ठेवते.”

“तू खरंच रुक्ष झाली आहेस.” फोन कट करताना शिवानी म्हणाली.

हर्षाली आदेशच पहिलं प्रेम होती, पण त्यांच्या प्रेमाचा बंध अपूर्णच राहिला.

समाप्त.

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all