Login

#बंध रेशमी नात्याचे. भाग -४०

काय असतील ओवीचे रिपोर्ट ?
# बंध रेशमी नात्याचे भाग - ४०




पाहता पाहता दिवाळी संपत आली होती. आज रियाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता. रियाच्या बेबींचे वेलकम करण्यासाठीची तयारी अगदी बेबींच्या जन्मापासूनच सुरू झाली होती. आजी , आजोबा ,घरातील नोकर मंडळी यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. हॉस्पिटलमधील फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर रिया घरी जाण्यासाठी बेडवरून खाली उतरत होती. बाळासाठी असलेल्या केअर टेकर रियाच्या बाळांना घेऊन शेजारीच उभ्या होत्या. आई रियाजवळ थांबली होती. रियाला थोडासा विकनेस जाणवत होता. कितीही लोक आजूबाजूला असले तरी बाळाला आईच्या मायेची ऊब समजत असते. रियाचे आता चांगलेच जागरण सुरू झाले होते. झोप पूर्ण न झाल्याने रियाला अनफ्रेश वाटत होते पण बाळाकडे पाहिले की सगळा थकवा छू मंतर होत होता.त्याच्या इवल्याशा हालचालीही किती आनंद देत होत्या. त्याचे झोपेत डोळे बंद करूनच मधेच हसणे ,मधेच रडणे पाहिले की मोठ्यांच्या चेहऱ्यावरही आपोआप हसू येत होते.

"काँग्रॅच्युलेशन रिया !" म्हणत चेहऱ्यासमोर बुके पकडत कुणीतरी रियाच्या बेडजवळ आले. रियाला आश्चर्य वाटत होते.
रिया चेहरा पाहण्यासाठी आतुर झाली होती. तेवढ्यात राकेशने चेहऱ्याच्या समोर पकडलेला बुके रियाच्या हातात दिला.

आणि तो म्हणाला ," वन्स अगेन , काँग्रॅच्युलेशन रिया !"

"राकेश तू ? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज !" रिया आनंदाने म्हणाली.

"हो. कंपनीच्या कामानिमित्त मी इथे आलो होतो तर मग मनात विचार आला , तुला भेटूनच परत जावे. बाबांना कॉल केला आणि हॉस्पिटलचा पत्ता विचारला. पण हे काय ! तू कुठे निघालीस ?" राकेश म्हणाला.

"अरे आज मला डिस्चार्ज मिळाला आहे. मी घरी जातेय. चल घरी जाऊन निवांत बोलूया." रिया.

"हो राकेश , आलाच आहेस तर चल घरी." रियाचे बाबा म्हणाले.


"हो येतोय .माझी रात्रीची फ्लाईट आहे त्यामुळे माझ्याकडे वेळ आहे. चला निघूया मग." म्हणून राकेश गाडीत जाऊन बसला.

ड्रायव्हरने सर्वसामान गाडीत ठेवले. रिया ,आई ,बाबा आणि बाळासाठी असलेल्या केअर टेकर बाळाला घेऊन गाडीत बसल्या. त्यांच्या पाठोपाठ राकेशची गाडी होती. गाडी जेव्हा रियाच्या घराजवळ येऊन थांबली. सगळे प्रसन्न वातावरण पाहिले तेव्हा रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गार्डनमध्ये ठीक ठिकाणी वेलकम बेबीचे बोर्ड लागले होते. बलून्स आणि बाळाच्या रूमचे अप्रतिम डेकोरेशन , रियाचे आणि बाळाचे औक्षण करताना शांताने म्हटलेल्या त्या ओळी अक्षरशः इतक्या अर्थपूर्ण होत्या की , त्या ओळी ऐकताना सगळ्यांचा चेहरा प्रसन्न झाला होता.

"दुर्वांसारखा वंशवेल वाढो
कापसासारखे म्हातारे व्हा
सुपारीसारखे ठणठणीत आयुष्य जगा
सोन्यासारखे तेजस्वी , वैभव संपन्न बना
तिळाच्या तेलासारखे प्रेमळ , मायाळू राहा
हा संदेश तुम्हाला देत , तुमचे औक्षण करते आणि शुभ चिंतिते !"

"किती छान संदेश दिला आहेस शांता! दोन्ही मुलांच्या आयुष्यात तू म्हणतेस तसेच सगळे शुभ घडू दे." रियाच्या आईंनी पर्समधून पैसे काढून शांताच्या हातात दिले.

"मॅडम , याची काहीच गरज नव्हती." शांता म्हणाली.

"अगं आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि तुझे आरतीचे ताट रिकामे कसे ठेवू मी ?" रियाची आई म्हणाली.

"हो शांती मावशी. राहू दे ग. यावेळी तुझ्यासाठी दिवाळीचे गिफ्ट ही घ्यायला जमले नाही हे गिफ्ट समज आणि ठेव तुझ्याकडे ते पैसे." रिया म्हणाली.

शांताच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. रिया आज शांताला प्रेमाने बोलत होती.
सर्वजण बाळाच्या खोलीकडे गेले. अप्रतिम डेकोरेशन बाळासाठी असलेले सॉफ्ट टॉईज , बाळासाठी असलेले वेगवेगळे स्किन प्रोडक्ट्स , मेडिसिन अगदी व्यवस्थित जिथल्या तिथे सुंदर पद्धतीने मांडले होते. रियाने बाबांना प्रेमाने मिठी मारली. बाबांनी किती लक्षपूर्वक आणि प्रेमाने छोट्या छोट्या गोष्टीही आठवणीने मांडल्या होत्या. आई हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे बाबांनीच सगळी तयारी केली होती. रियाच्या डोळ्यातील अश्रू पुसत बाबा म्हणाले , "ये रिया रडायला काय झाले ? मला तर वाटले तुला हे सगळे पाहून खूप आनंद होईल."


"हो बाबा ,खरंच मला खूप आनंद झालाय आणि हे आनंदाश्रूच आहेत." रिया हसून म्हणाली.


'रिया तुझ्या याच आदांवर तर मी फिदा आहे!' मनात विचार करत राकेश स्मितहास्य करत होता.


आई बाप लेकीचे प्रेम दुरूनच पाहत होती. तिच्याही चेहऱ्यावर आनंद होता. आई राकेशच्या जेवणाची तयारी कर असे सांगायला शांताकडे गेली. बाबाही बाहेर गेले . रिया राकेश जवळ जाऊन त्याला म्हणाली ,"राकेश फ्रेश होऊन ये."

राकेश आपल्याच विचारात दंग होता. रिया पुन्हा म्हणाली ,"राकेश अरे कसला विचार करतोयस? लक्ष कुठे आहे तुझे?"

"तुझाच विचार करतोय." राकेश हसून म्हणाला.

"माझा ? सांग कसला विचार करतोस ? मलाही कळायला हवे माझ्याबद्दल कसला विचार करतोयस ते ?" रिया गंभीर होऊन म्हणाली.

"खरं सांगू ना ,म्हणजे बघ हं तुला राग तर येणार नाही ना ?" राकेश म्हणाला.

"सांग रे पटकन. हल्ली राग वगैरे नाही येत मला." रिया म्हणाली.

"म्हणजे तू कितीही कठोर वागलीस ना , तरी तू तुझी चूक मान्य करतेस. अर्थात याला बराच वेळ घेतेस हे ही खरेय." राकेश म्हणाला.


"हम्म , मला समजले तुला काय म्हणायचे आहे ते. असो जे झाले ते झाले यापुढे नाही होणार असे." रिया म्हणाली.

"म्हणजे याचा अर्थ असा की , तू अर्णवला विसरून आयुष्यात पुढे जायचे ठरवले आहेस तर." राकेश.

"नाही रे अर्णवला विसरणे शक्यच नाही. अर्णवच्या आठवणीं सोबत आणि माझ्या या दोन चिमुकल्यांसोबत मी माझे आयुष्य जगेन." रिया म्हणाली.

राकेशचा चेहरा पडला होता. त्याला वाटले होते , रिया आता नव्याने आयुष्य सुरू करेल. तो रियाच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. तो रियावर अजूनही तितकेच प्रेम करत होता. पण रियाच्या या वाक्याने नेहमीप्रमाणे त्याची आशा मावळली होती.
रियाच्या बाळांसाठी आणलेले गिफ्ट राकेशने रियाकडे दिले. तो फ्रेश व्हायला गेला.

फ्रेश होऊन आल्यावर त्याने बाळांसोबत सुंदर फोटो काढले. रिया सोबत जुन्या गप्पा मारताना वेळ कसा गेला त्याला समजलेच नाही. जेवणाची तयारी झाल्यावर आईने रिया आणि राकेशला जेवायला बोलावले. केअर टेकर बाळाजवळ थांबल्या होत्या. जेवण आटोपल्यावर राकेश थोडा वेळ विश्रांती करण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये गेला.
रियाही आपल्या रूममध्ये आराम करत होती. दोन्ही बाळेही शांतपणे झोपली होती. राकेश फ्रेश होऊन आला होता. रियाची भेट घेऊन तो लगेच निघणार होता.

"राकेश किती घाई करतोयस ?अरे अजून वेळ आहे ना फ्लाईटला ?" रियाचे बाबा म्हणाले.


"हो बाबा , पण मी मित्राची गाडी घेऊन आलोय. आधी त्याच्या घरी जावे लागेल. नंतर तो मला एअरपोर्टवर सोडायला येणार आहे." राकेश म्हणाला.

"अच्छा ! पोहोचल्यावर कॉल नक्की कर." रियाचे बाबा म्हणाले.

"हो." म्हणून रियाच्या आईबाबांचा आशीर्वाद घेऊन रियाला बाय करत राकेश गाडीत बसला.

***********************


इकडे अर्णव आणि ओवीची दिवाळी अगदी थाटात साजरी झाली होती. अर्णव ओवीला चेन्नई शहरात घेतलेली जागा पाहण्यासाठी घेऊन आला होता. ओवीला अचानक प्रचंड पोटात दुखायला लागले होते. ती अस्वस्थ झालेली पाहून अर्णव घाबरला होता. तो ताबडतोब तिला तिथल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या पण अर्णवणे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना इथे थांबता येणार नाही असे सांगितल्यामुळे डॉक्टरांनी फक्त कोणत्या टेस्ट करायच्या आहेत हे लिहून दिले. तुम्ही मुंबईला गेल्यानंतरही या टेस्ट करू शकता असे डॉक्टर म्हणाले. तात्पुरत्या मेडिसिन देऊन ओवीचा त्रास थांबला होता पण अर्णवला ओवीची काळजी वाटत होती. रात्रीच्या फ्लाईटने दोघेही मुंबईमध्ये पोहोचले.

अर्णवच्या आई बाबांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनाही फार वाईट वाटले. अचानक ओवीला काय झालेय ? सगळ्यांनाच काळजी वाटत होती. दुसऱ्या दिवशी अर्णव ओवीला घेऊन प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर जगताप यांच्याकडे गेला. डॉक्टरांनी ओवीचे चेकअप केले. ओवीच्या गर्भाशयाला सुज आली होती. शिवाय सोनोग्राफीमध्ये तिथे एक गाठही दिसत होती. त्या गाठीची टेस्ट करून रिपोर्ट येईपर्यंत सगळ्यांच्या जीवाची घालमेल वाढली होती.

अर्णवचे डोळे पाणावले होते.
आईला अर्णवचा चेहरा पाहवत नव्हता. त्यांनी अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या म्हणाल्या ,"अर्णव काळजी करू नकोस. सगळे काही ठीक होईल."

"आई ,सगळे काही व्यवस्थित चालू असताना अचानक असे वादळ माझ्या आयुष्यात येतेच. आता कुठे ओवीला मी सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे काय होऊन बसलेय ?" अर्णव म्हणाला.


काय असतील ओवीचे रिपोर्ट ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©® सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)

0

🎭 Series Post

View all