Login

# बंध रेशमी नात्याचे भाग - ४१

राकेशकडे रियाच्या प्रश्नांची काय असतील उत्तरे ?
# बंध रेशमी नात्याचे भाग - ४१



आज अर्णव आणि ओवीने डॉक्टर सिद्धार्थ जगताप यांची अपॉइंटमेंट घेतली होती. शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ असलेले हे डॉक्टर आणि त्यांचे माहेर हॉस्पिटल शहरातच नव्हे तर आजूबाजूला असणाऱ्या अनेक खेड्यांमध्ये प्रसिद्ध होते. कमी फीस मध्ये प्रसूती करणारे तसेच स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारांवर योग्य उपचार करणारे हे डॉक्टर अगदी नवीन असूनही प्रसिद्धीच्या झोतात होते.

त्यांनी प्रत्येक स्त्रीच्या हक्काचे माहेर म्हणून आपल्या हॉस्पिटलचे नावही "माहेर हॉस्पिटल" असे ठेवले होते. माहेरी आलेल्या प्रत्येक स्त्रीला जाताना सुख , समाधान आणि आनंद मिळालेला असतो. तसेच या हॉस्पिटलमध्ये येणारी प्रत्येक स्त्री सुख , समाधान आणि आनंद घेऊन परतत होती.

पण आज डॉक्टरांचेही डोळे पाणावले होते. ओवीच्या बाबतीत कोणतेच उपाय शक्य नव्हते. एवढ्या लहान वयात एवढ्या टोकाचा निर्णय घेणे डॉक्टरांनाही कठीण झाले होते पण पुढे ओवीला आयुष्यभर हा त्रास सहन करणे ही असह्य होते. त्यापेक्षा ऑपरेशन हाच उपाय योग्य आहे हे डॉक्टरांनी अभ्यासपूर्वक आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवले होते.


ओवी आणि अर्णव यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होते. भितभितच ओवीला घेऊन अर्णव हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता .
डॉक्टरांनी दोघांनाही बसायला सांगितले. ओवीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर डॉक्टरांना तिची दया येत होती. पण डॉक्टरांनी इमोशनल होऊन कसे चालणार ? हा मनात विचार करून डॉक्टर हिम्मत एकवटून म्हणाले ,"ओवी आणि अर्णव मला माहितीय , तुमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाची निशाणी म्हणून एक तरी अपत्य असावे अशी तुमची इच्छा असेल पण आता ते शक्य नाही. ओवी तुला सर्व्हायकल कॅन्सर झाला आहे."

ओवीला हे ऐकल्यावर अचानक चक्कर आली. आधीच तिचा आहारही खूप कमी झाला होता , पाय प्रचंड सुचले होते , सतत ती दमल्यासारखी दिसत होती. डॉक्टरांनी सिस्टरांना बोलवून लगेच ओवीला ऍडमिट करायला सांगितले. ओवीवर ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टरांनी अर्णवला सगळ्या बाजूने विचार करून निर्णय घ्यायला सांगितला. होणारे परिणाम आणि आधीच घेतलेली काळजी या दोन्हीतला फरकही सांगितला. अर्णवला डॉक्टरांचे म्हणणे योग्य वाटत होते , पण हे सर्व ओवी कसे सहन करेल ? या विचाराने त्याचे मन उदास झाले होते. ओवीला तर लहान मुले प्रचंड आवडतात हे त्याला माहीत होते.

अर्णवने भरल्या डोळ्याने समोरच असणाऱ्या गणपती बाप्पाजवळ हात जोडले.

'देवा आजपर्यंत प्रत्येक संकटात तू माझी साथ दिली आहेस ना ? तुझे अस्तित्व आता मी मान्य करायला सुरुवात केली आणि तू लगेचच माझ्या ओवीच्या बाबतीत असा का वागलास ? इतका निष्ठुर का झालास ? कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर ?' अर्णव मनात बाप्पांशी वाद घालत होता.


तेवढ्यात सिस्टरांनी ओवीला शुद्ध आली हे सांगितले. अर्णव धावतच ओवीकडे गेला. अर्णवला पाहिल्यावर ओवीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. अर्णवला त्याच्या ओवीसमोर कसलेही दुःख दाखवायचे नव्हते. तो बाहेरून येतानाच डोळे पुसून आत आला होता.

तो ओवीजवळ येऊन तिचे डोळे पुसत म्हणाला , " ये वेडाबाई ,बरी आहेस ना तू ? आणि एवढ्या हसऱ्या चेहऱ्यावर हे असले अश्रू अजिबात चांगले दिसत नाहीत."

"अर्णव , मी आता कधीच आई नाही होऊ शकणार !" पुन्हा ओवीला गहिवरून आले.

"म्हणून काय झाले ? फक्त जन्म दिल्यावरच आई होता येता का ? नाही ना. अगं माझ्यासाठी मुलांपेक्षाही माझी ओवी खूप महत्त्वाची आहे. तिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो आणि कायम करत राहीन. आपली एकमेकांना साथ असेल तर आपल्याला कोणाचीच गरज भासणार नाही." अर्णव ओवीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.

"नाही अर्णव ,मला तर असे वाटतेय मी तुझ्या आयुष्यात आले आणि तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे सतत प्रॉब्लेम येत राहिले.आज मला आठवतेय की ,मंदिरातल्या गुरुजींनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव: हा आशीर्वाद मला का नाही दिला ते. खरंच मी खूप अनलकी आहे. मी आई-बाबांनाही आनंद नाही देऊ शकत. त्यांना आजी आजोबा व्हायची किती घाई झाली होती. कित्येक वेळा त्यांनी हे बोलून दाखवले होते. पण आता ?" ओवी पुढे बोलणार तोच अर्णवचे आईबाबा खोलीत आले.

अर्णवणे मगाशी फोनवर ओवीला चक्कर आली हे सांगितले होते. डॉक्टर काय म्हणाले ,हे सांगतानाही अर्णवचा कंठ दाटून आला होता.
त्यामुळे अर्णव आणि ओवीच्या काळजीने आईबाबा हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांनी ओवीचे आणि अर्णवचे सगळे बोलणे ऐकले होते. डोळ्यातील अश्रू पुसून ते हसत आत आले.


ओवीच्या डोक्यावर हात ठेवून अर्णवच्या आई म्हणाल्या ," ओवी तू माझी मुलगी आहेस त्यामुळे एक आई आपल्या मुलीचे दुःख समजू शकते. तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. आजी आजोबा होता आले नाही तरी आम्हाला नाही वाईट वाटणार. तू लवकर बरी होऊन घरी ये."

"हो बाळा ,तू कशाचेही टेन्शन घेऊ नकोस. सध्या या सिच्युएशन मधून बाहेर पडणे खूप महत्त्वाचे आहे. तुझा जीव खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी." बाबा म्हणाले.

अर्णवचे आई बाबा मनातून उदास असले तरी ओवीचा आणि अर्णवचा एकमेकांवर किती जीव आहे हे त्यांना माहीत होते. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत त्यामुळे ओवी लवकर बरी व्हावी यासाठीच आई-बाबा ,आजी आजोबा होण्याचे दुःख बाजूला सारून ओवी कशी ठीक होईल यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते.

ओवी अर्णवच्या आईचा हात हातात घेऊन फक्त अश्रू ढाळत होती.

तेवढ्यात राकेशचा अर्णवला फोन आला. अर्णवचा आवाज ऐकून त्याला अर्णव खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे हे समजले. त्याने अर्णवला कुठे आहेस ? असे विचारल्यावर अर्णवने त्याला हॉस्पिटलचे नाव सांगितले. अर्णवला राकेश त्याला भेटायला येईल असे बिलकुल वाटले नव्हते पण राकेश धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे गेल्यावर अर्णव आणि ओवीची स्थिती पाहिल्यावर त्यालाही नियतीच्या चक्राचे अजबच वाटले. तिकडे अर्णव जुळ्या मुलांचा बाबा झालाय म्हणून त्याचे कौतुक वाटत होते. आणि इथे आल्यावर ओवीची ही स्थिती पाहून दोघांचीही दया येत होती. हळवा असणारा राकेश नि:शब्द झाला होता.


ओवी म्हणाली ,"राकेश तू नेहमी मला माझ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढतोस ना रे ? आता देवाने असा प्रॉब्लेम क्रिएट केलाय की , यातून तूच काय कोणीच मला या जन्मी तरी बाहेर काढू नाही शकत. तुला माहितीये मी कधीच आई नाही होऊ शकत."

राकेशने ओवीकडे बघून डोळे मिटले. अर्णव ओवी जवळ गेला आणि तिचा हात हातात घेत पुन्हा म्हणाला , "ओवी बस झाले ना आता. किती वेळा सांगशील हे ?"

"अर्णव मला खूप वाईट वाटते रे. कसे सांगू मी तुला ? काय चूक झाली माझ्याकडून ? की देवाने मला त्याची एवढी मोठी शिक्षा दिलीय."
ओवीच्या या वाक्याने आता सगळ्यांचे डोळे डबडबले होते. कुंती ताईच्या बाळाला वाचवण्यासाठी ओवीने रात्रंदिवस प्रयत्न केले होते. आई-बाबांच्या डोळ्यासमोर हा भूतकाळ आला आणि त्यांना ओवीच्या वाक्याने अक्षरशः रडायला भाग पाडले.

अर्णवला आता मात्र त्याच्या चुकीची शिक्षा देवाने ओवीला दिली की काय ? असा प्रश्न पडला.

तो म्हणाला ,"ओवी तुझ्याकडून कधीच कोणतीच चूक होऊ शकत नाही. चुका झाल्या असतील तर त्या माझ्याकडून आणि माझ्याशी लग्न केल्यामुळे देवाने माझ्या चुकांची शिक्षा तुला दिली आहे बहुतेक." अर्णव ओवीच्या डोक्यावर डोके ठेवून अश्रू ढाळत होता. इतका वेळ कठोर वाटणारा अर्णव आता हळवा झाला होता.

राकेश अर्णवला समजावत म्हणाला ,"अर्णव अरे आई बाबांचा तरी विचार करा. तुम्ही असे रडल्यावर आई-बाबांना किती त्रास होत असेल ? याचा विचार करा आणि हे काय ओवी , आयुष्यात आई हे एक नाते निभावण्यासाठीच तू जन्म घेतला आहेस का ? अरे अनाथ आश्रमामध्ये जाऊन पहा जरा , ज्यांना आपलं म्हणावं असं कोणीही नाही. तुमच्याकडे तर इतरही नाती आहेत. त्यांना जपा. माझ्याकडे बघ ,मी तर लग्न न करण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे आई बाबा असली नाती माझ्यापासून कोसो दूर आहेत."


अर्णव आणि ओवी आई-बाबांकडे पाहिल्यावर शांत झाले. ओवीलाही राकेशचे म्हणणे अगदी खरे वाटले. तिने आणि अर्णव ने डोळे पुसले. राकेशने सगळ्यांना पाण्याच्या बॉटल्स दिल्या.

"खरंच राकेश आज तुझ्यामुळे हिम्मत मिळाली. किती छान समजावलेस तू ."अर्णवने राकेशला मिठी मारली.

"ओवी आता कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घ्यायचे नाही. लक्षात येईल ना तुझ्या ? आणि हे काय चेहरा किती सुकलाय बघ. अर्णव तिला वेळेवर खायला घाल , मेडिसिन दे. म्हणजे लवकर रिकव्हर होऊन पूर्वीची ओवी पाहता येईल." राकेश हसून म्हणाला.

सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शन दूर झाले होते. राकेश निघून गेला असला तरी त्याच्या विचारांची छाप पाडून गेला होता. राकेश गाडीत बसतो न बसतो तोच रियाचा फोन आला.

"रियाचा फोन." राकेशने पटकन फोन उचलला.

"हॅलो राकेश ,पोहोचलास ना रे व्यवस्थित ? पोहचल्यावर फोन करतो म्हणाला होतास. तुझा फोन आला नाही म्हणून मीच फोन केला. बरा आहेस ना ? अर्णव ,ओवी बरे आहेत ना रे ?" रियाने एका दमात एवढे प्रश्न विचारले.


राकेशकडे रियाच्या प्रश्नांची काय असतील उत्तरे ?

पाहूया पुढील भागात क्रमशः