Login

#बंध रेशमी नात्याचे. भाग -४४

रियाच्या या निर्णयावर काय असेल आईची प्रतिक्रिया ?
# बंध रेशमी नात्याचे.. भाग-४४



राकेशने मूल दत्तक घ्यायचा निर्णय अर्णववर सोपवला होता. अर्णवने भेटल्यानंतर बोलू असे म्हणून फोन ठेवला.


राकेश जे बोलत होता ते ऐकून अर्णव खूप खुश झाला. ‘हे माझ्या का लक्षात आले नाही ? हे त्याला थोड्या वेळाकरिता वाटले पण त्याने ओवीचा विचार केला. ओवीला हा निर्णय योग्य वाटेल ना ? की परत ती यातूनही वेगळा अर्थ काढेल. कदाचित तिला मुल होत नाही आणि मला मुल हवे आहे असे वाटून ती नाराज व्हायची. त्यापेक्षा नको काहीच बोलायला. सध्या ओवीची कंडीशन पाहता शांतच राहिलेले बरे.’ हा मनात विचार करून अर्णव खाली आला.


त्याच्या डोक्यात सतत विचार चक्र चालूच होते. आई-बाबांना अर्णव आणि ओवीची प्रचंड काळजी वाटत होती. आईने नाष्ट्याची प्लेट समोर ठेवली पण अर्णवच्या घशा खालून घास उतरत नव्हता.


तितक्यात ओवीच्या बाबांचा अर्णवला फोन आला.
ते म्हणाले ,”अर्णव आम्ही शुगर चेक करायला जातो आहोत. ओवीजवळ थांबशील का थोडा वेळ ? आम्ही लगेच परत येऊ. ओवी काही बोलत नसली तरी रात्री तू घराकडे चक्कर मारली नाहीस तेव्हा , खूप वेळ तिची नजर तुला शोधत होती हे आम्हाला चांगले समजले.”


हे ऐकल्यावर अर्णवला ओवी काल जे बोलली त्याचा विसर पडला आणि तो लगेच म्हणाला ,“हो बाबा आलोच मी.”


“आई मी आलोच ओवीला भेटून.”असे म्हणून अर्णवणे नाश्त्याची प्लेट बाजूला ठेवली.

“अरे अर्णव असे भरल्या ताटावरून उठू नये रे.” आई म्हणाली.

“हो आई , मलाही माहितीये पण प्लीज यावेळी मला समजून घे ना .”असे म्हणून अर्णव बाहेर गेला.

घरी गेल्यावर बाबा अर्णवची वाट पाहत बाहेर उभे असल्याचे अर्णवणे पाहिले. बाबांनी आईला आवाज दिला. आईने ओवीला आधीच सांगितले होते की , ते दोघे हॉस्पिटलमध्ये चालले आहेत ते. पण तरीही आईने “ओवी येतो गं आम्ही. तोपर्यंत अर्णव आणि तू छान गप्पा मारत बसा.” असे म्हणून ओवीचा निरोप घेतला आणि आई घरातून बाहेर आली.


अर्णव आत गेल्यावर त्याने पाहिले ,ओवी आपल्याच विचारात हॉलमध्ये बसली होती. अर्णवला पाहताच ओवीचा चेहरा खुलला होता. पण का कोण जाणे ? तिने अर्णवला पाहून न पाहिल्यासारखे केले.

अर्णव ओवीच्या जवळ जाऊन बसला. तरीही ओवीने अर्णवकडे पाहिलेही नाही.

अर्णवने ओवीचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला , “ओवी हे सगळे तू मुद्दाम करतीयेस ना ? का करतीयेस असे ? काल तू मला जे बोललीस ते मी इतके मनाला लावून घेतले की , रागाच्या भरात मी काय वागतोय याचेही भान मला राहिले नाही. किशोर होता म्हणून मी स्वतःला सावरू शकलो पण एक सांगू का ? तू जे बोललीस ते अजूनही मी कोणाला सांगितले नाही. हे बोलताना तुला काहीच कसे वाटले नाही याचे मात्र मला खूप वाईट वाटले. तुला माहित आहे ना ? परिस्थिती कशीही असली तरी एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही हे वचन दिले आहे आपण. मग तू अशी का वागलीस ? आजही तू मला मुद्दाम इग्नोर करतेस.”


“अर्णव आपण एकमेकांना हे ही वचन दिले होते की आपण संसार सुखाचा करू पण आता आपला संसार सुखाचा होईल असे वाटते का तुला ? त्यापेक्षा मी जे तुला बोलले त्यावर तू विचार कर. खरंच तू दुसरे लग्न कर.” असे म्हणून ओवीने नजर उचलून अर्णवकडे पाहिले तेव्हा अर्णवच्या हाताला तिला पट्टी बांधलेली दिसली.


अर्णवने ओवीच्या ओठांवरती आपला हात ठेवला. अर्णवचे डोळे डबडबले होते. दोघांचीही स्थिती एकसारखीच होती.


“यापुढे हे वाक्य वापरले तर तुझा अर्णव या जगात नसेल हे लक्षात ठेव. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही मी पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही. अर्णव मनात विचार करत होता (रियासोबत माझे लग्न झालेले असूनही मी तिला पत्नी म्हणून कधीच नाही स्वीकारू शकलो. माझ्या मनातील तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत.) अर्णवच्या या वाक्यावर ओवीने अर्णवच्या गळ्यात पडून मोठ्याने हंबरडा फोडला.

“तुझ्या हाताला काय झाले आहे ?” ओवी घाबरून म्हणाली.

“ही तर खूप छोटी जखम आहे. तू जे काल बोललीस त्या विचाराने इथे तर खूप मोठी जखम झालीय. जी तुला नाही दिसणार .” असे म्हणून अर्णवणे ओवीचा हात आपल्या हृदयावर ठेवला.


ओवीने अर्णवचा हात हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले.

“जखम इथेही झालीय.” अर्णव पुन्हा हृदयाकडे बोट दाखवत म्हणाला.

“काय रे तू पण.” ओवी गोड हसून म्हणाली.


सुखदुःखांच्या लपंडवांमध्ये ओवीचे हरवलेले हसू अर्णव शोधू पाहत होता. जे आता दिसत होते.


“अर्णव काय होऊन बसले ना हे सगळे ? मला माहितीय , तुलाही लहान मुले खूप आवडतात आणि मलाही. सतत माझ्या मनात हाच विचार येतोय की ,आता आई बाबा बनण्याचे आपले स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार.” ओवी म्हणाली.


अर्णवने काळजावर दगड ठेवला आणि हीच ती वेळ असे समजून तो ओवीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला , “ओवी मी तुझी शपथ घेऊन सांगतो. बाबा होण्यापेक्षाही मला तुझा चांगला नवरा व्हायला जास्त आवडेल. त्यामुळे मी आता जे बोलतोय त्याचा तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. तुला आणि मला आई-बाबा बनता येईल त्यासाठी आपल्याला अनाथ आश्रमामध्ये जाऊन एखादे बाळ दत्तक घ्यावे लागेल पण तुझी तयारी असेल तर.”

ओवीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

“खरंच असे होऊ शकते का ?” ओवी.

“का नाही होऊ शकत ?” अर्णव.

“पण आई-बाबा आणि बाकी सगळे ?” ओवी.

ओवी पुढे बोलणार तोच अर्णव म्हणाला , “आई बाबांचा आनंद आपल्या आनंदात आहे. त्यामुळे त्यांना आनंद होईल याची मला खात्री आहे. बाकी सगळ्यांचा‌ विचार आपण याआधी कधी केला आहे का ? मग आता तरी का करायचा?” अर्णव ओवीचा हात पकडत म्हणाला.

“हम्म.” म्हणून ओवीने स्मित हास्य करत अर्णवला मिठी मारली.


“आपण उद्याच अनाथाश्रमामध्ये जाऊया चालेल ना ?” अर्णव म्हणाला.


“उद्या ?” ओवीच्या या वाक्यावर अर्णवच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

“काय झाले ? उद्या नको का ?” अर्णव म्हणाला.

“तसे नाही रे. उद्या मला डॉक्टरांनी बोलावले आहे ना चेकिंग साठी. तर मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल.” ओवी म्हणाली.

“ठीक आहे. तू म्हणशील तेव्हा जाऊया आपण. मग तर झाले.” अर्णव ओवीला धीर देत म्हणाला.



“हो.” म्हणून ओवीने मान डोलावली.

*********************


इकडे रियाचेही विचार चक्र सुरू होते. रिया अचानक अर्णवच्या फोटोला का घेऊन बसलीये हा विचार करून आई रियाजवळ आली आणि म्हणाली , “काय गं रिया ,अर्णवची आठवण येतेय का ? नाही म्हणजे अगदी लग्नाचा अल्बम घेऊन बसलीयेस म्हणून विचारले.”


“लग्न कसले गं आई ! शिक्षाच म्हण ! मी अर्णवला दिलेली आणि आता नियतीने ही दिलेली.” रिया हताश होऊन म्हणाली.


“जाऊ दे गं रिया , होणाऱ्या गोष्टी चुकतात का ? सांग बरं ? आणि तू सतत तुलाही दोष देऊ नकोस. हे सगळे घडते ते त्याच्या इच्छेनुसार. तू तुझ्या तब्येतीची ,बाळाची काळजी घे. आता तू एकटी नाहीस ना ! तुला एक चांगली आई बनायचे आहे लक्षात ठेव. पत्नी बनण्याचे सुख तुझ्या नशिबात नसले म्हणून काय झाले ? या दोन गोंडस मुलांची आदर्श आई बनून दाखव सगळ्यांना.” आई रियाच्या खचलेल्या मनाला आधार देत होती.


“हो आई , ते तर आहेच. पण तुला एक सांगू , मला असे मनापासून वाटते की ,मी माझे बाळ अर्णव आणि ओवीला द्यावे. चूक सुधारण्याची ही एक संधी आहे असे मला वाटते आणि शेवटी नियतीच्याही हेच मनात असेल. दोन जुळी मुले मला देवाने त्यासाठीच दिली असतील.” रिया म्हणाली.


“अग रिया , हे काय बोलतेस तू ? तूच म्हणत होतीस ना अर्णवला यातले काही सांगायचे नको म्हणून. तुझ्या जुळ्या मुलांबद्दल सांगून तू त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतीयेस असे त्यांना वाटेल. तू परत त्यांच्या आयुष्यात नको जाऊस. तुझ्या आणि अर्णवच्या नात्याबद्दल ओवीला समजले तर अर्णव आणि ओवी कायमचे दुरावतील.” आई म्हणाली.


“आई अगं माझे ऐकून तरी घे. असला कोणताही विचार माझ्या मनात नाहीये. काल मला राकेशचा फोन आला होता आणि तो म्हणत होता अर्णवने ड्रिंक केली होती. नशेत तो बाबा होऊ शकत नाही हेच बोलत होता. रात्रभर राकेश त्याच्याजवळ बसून होता. तेव्हा राकेशला असे वाटते की , अर्णव आणि ओवीनी एक मूल दत्तक घ्यावे. ज्यामुळे त्यांच्या दुःखावर हळुवार फुंकर घातली जाईल. मी जेव्हा हे ऐकले तेंव्हापासून मला असे वाटते की , देवाने मला हे गिफ्ट त्यासाठीच दिले असेल. मी मुलगी माझ्याजवळ ठेवीन आणि मुलगा अर्णवला देईन. तो त्याच्या बाबाच्या सानिध्यात राहील. बाबा सारखाच कर्तव्यनिष्ठ , प्रामाणिक आणि चांगला व्यक्ती म्हणून घडेल. अर्णवलाही त्याच्या हक्काचे नाते मिळेल.” रिया मोठ्या मनाने हा कठोर निर्णय सांगत होती.


रियाच्या या निर्णयावर काय असेल आईची प्रतिक्रिया ?
पाहूया पुढील भागात क्रमशः

©® सौ.प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)