Login

#बंध रेशमी नात्याचे.. भाग -४७

ओवीने अर्णवला खरेच माफ केले असेल का ?
# बंध रेशमी नात्याचे.. भाग - ४७


अर्णवणे राकेशला ओवीची इच्छा सांगितली. राकेशने डोक्याला हात लावला.

‘सगळे अगदी अचानक ओवीसमोर आले होते. ते ओवी कसे स्विकारेल ?’ हा मनात विचार करत राकेश उदास झाला.

“भूतकाळातील कटू आठवणी कितीही लपवून ठेवायच्या म्हटल्या तरी त्या एक ना एक दिवस डोके वर काढतात हेच खरे.” अर्णव खिन्न होऊन राकेशला म्हणाला.

राकेशने रियाला कॉल करून ओवीने उद्या तिला घरी बोलावले आहे असे सांगितले. रियाला तर खूप अपराधी असल्यासारखे वाटत होते पण ‘ओवीच्या क्रोधाला सामोरे जावेच लागेल. चूक केलीय तर शिक्षाही भोगायला हवी.’ हा मनात विचार करून रिया अर्णवच्या घरी दोन्ही मुलांसह जायला तयार झाली .


ओवी घरी येणार म्हणून आई-बाबा वाट पाहत बसले होते. स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली होती. आज जेवणामध्ये ओवीच्याच आवडीचा मेनू होता. ओवीने घरी आल्याबरोबर औक्षणाचे ताट तयार केले. स्वतः ते ताट सजवले आणि फुलांचे डेकोरेशन करणाऱ्यांना डेकोरेशनची ऑर्डर दिली. ओवीचे काय सुरू आहे ? हे कोणालाही काही समजत नव्हते. डेकोरेशन वाल्यांनी येऊन घर अगदी सुंदर सजवले. संध्याकाळी रिया येणार होती.


ओवीने आईबाबांना या घराचे सुख परत येतेय असे सांगितले. आईबाबांना अर्णव आणि ओवीचा दत्तक मुल घेण्याचा निर्णय माहिती होता. त्यामुळे नक्कीच छोटे बाळ घरी येणार आहे हे डेकोरेशनवरून लक्षात येत होते. आई बाबा खुश होते पण अर्णव म्हणावा तितका खुश दिसत नव्हता. आई-बाबांच्या मनात विचारांची गर्दी झाली होता.


ओवी मनापासून आनंद दाखवत होती तेंव्हा तिच अर्णवसाठी मोठी शिक्षा होती. अर्णवला एक शब्दही ती हॉस्पिटलमधून आल्यापासून बोलली नव्हती. याहून मोठी शिक्षा ती काय !अर्णवही स्वतःहून ओवीला बोलण्याचा प्रयत्न करत नव्हता कारण तो चुकला होता आत्ता ओवीची माफी कोणत्या तोंडाने मागावी हेच त्याला कळत नव्हते.



ओवीने राकेशला कॉल करून येत्या चार-पाच दिवसात रियाच्या बाळांचा नामकरण सोहळा अगदी उत्साहात साजरा करायचाय असे सांगितले. पण आत्ताच हे कोणाला सांगू नको अशी रिक्वेस्ट ओवीने राकेशला केली.राकेशला ओवीच्या या बोलण्यावर काय रिएक्ट व्हावे हेच कळत नव्हते. ओवीचे मोठे मन पाहून राकेशला आश्चर्य वाटले. राकेशला शहरातील फाईव्ह स्टार हॉटेल बुक करायला सांगून ओवीने नामकरण सोहळ्याची सगळी तयारी करायला सुरुवात केली होती.

संध्याकाळी रिया तिच्या आलिशान गाडीतून ओवीच्या घरी आली. भीतभीतच तिची पावले गाडी बाहेर पडली. समोर पाहिले तर बलून्स ,फुलांच्या रांगोळ्या ,लाइटिंग आणि वेलकम रिया हे वाचल्यावर रियाचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.

ओवीने रियाला पाय धुवायला सांगितले. बाळाचे आणि रियाचे औक्षण करून त्यांना आत बोलावले. रियाने ओवीला मिठी मारली.

“अर्णवचे बॉस इथे का आले आहेत ? काय चाललय ओवी ? ही कोण आहे ?” अर्णवचे बाबा म्हणाले.

“बाबा सगळं सांगते मी. थोडा वेळ थांबा.” ओवी म्हणाली.


अर्णवचे आई बाबा रियाकडेही आश्चर्याने पाहत होते. रियाच्या बाबांचे डोळे पाणावले होते.

‘अर्णवच्या आई-बाबांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ? कुठून सुरुवात करायची ?’ या विचाराने रियाच्या बाबांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते.


रिया ही खूप घाबरली होती.

‘मी स्वार्थी होऊन फक्त अर्णवचाच विचार केला पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाही आपल्यासारखी एक फॅमिली आहे हे मी पूर्णतः विसरले होते. एकतर्फी प्रेमातून मी किती जणांच्या भावनांशी खेळलेय.’ हा मनात विचार करून रियाचे डोळे डबडबले होते. ती हात जोडून ओवीच्या पायाजवळ बसली.

“ओवी मला माफ कर. मी खूप चुकलेय. पण मी तुला प्रॉमिस करते मी तुझ्या आयुष्यात यापुढे कधीच येणार नाही. माझे हे बाळ तुझे आणि अर्णवचेच असेल.” रिया म्हणाली.


ओवी तिला उठवत म्हणाली ,“रिया अगं तू का माफी मागतेस ? यात तू फक्त निमित्त आहेस. हे सर्व विधिलिखित होते. जे मी तर मान्य केलेय.”

ओवीचे आई-बाबाही प्रश्नार्थक नजरेने ओवीकडे पाहत होते.

“ही कोण आहे ? आणि तुझी माफी का मागतेय ?” ओवीची आई आवाज चढवून म्हणाली.


ओवी म्हणाली , “आता तुम्हा सगळ्यांना सकाळपासून जे प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे मी देते. ही रिया अर्णवच्या बॉसची मुलगी. जिने अर्णववर अगदी शाळेत असल्यापासून प्रेम केले. अर्णव ज्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकला त्याच स्कूलमध्ये रियाही होती. मी नगरपरिषद शाळेत शिकले. पण कॉलेजला आम्ही तिघेही एकत्र आलो. रिया अर्णववर प्रेम करते हे मला माहीत नव्हते. पण एके दिवशी रियाने अर्णवला प्रपोज केले.

अर्णवणे रियाला त्याचे माझ्यावर प्रेम आहे हे स्पष्ट सांगितले. तेंव्हा रिया कायमची अमेरिकेला निघून गेली. आम्हाला वाटले ती त्या कल्चरमध्ये इकडच्या गोष्टी केव्हाच विसरली असेल पण तसे झाले नव्हते. रियाने तिथे राहूनही फक्त अर्णववरच प्रेम केले. (रिया हुंदके देत रडत होती.) अर्णवचा इंजिनिअरिंगला असताना एक सब्जेक्ट बॅक राहिला तेव्हा बाबांनाही नुकताच अटॅक आला होता. ते घरी होते. पैशाची खूपच गरज होती हे रियाला समजल्यावर तिने तिच्या बाबांना सांगून अर्णवला त्यांच्या ऑफिसमध्ये जॉब मिळवून दिला.


इतकेच नाही मध्यंतरी बाबांची बायपास सर्जरी , गुडघ्याचेही मोठे ऑपरेशन झाले त्यातही रियाच्या बाबांनी अर्णवला मदत केली. पण ऑफिसमधल्या प्रत्येकाला निस्वार्थ भावनेने मदत करणारे देवमाणूस अर्णवच्या बाबतीत मात्र मुलीचे ऐकून चुकीचे वागले. (रियाचे बाबा पहिल्यांदा शरमेने मान खाली घालून उभे होते.)

अर्णवला मदत करण्याच्या बदल्यात त्यांना या घराचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे गहाण ठेवावे लागले. कारण त्या देव माणसांना अर्णवला आपला जावई बनवायचे होते. ते पेपर पुढे अर्णवला ब्लॅकमेल करण्यासाठी कामी आले. अचानक माझ्या आणि अर्णवच्या लग्नाची बातमी रियाच्या कानावर गेल्यावर तिला ते सहन झाले नाही आणि तिने अर्णवला कायमचे अमेरिकेला बोलवायचा प्लॅन केला. तिथे तिने अर्णवसोबत लग्न केले. (आईबाबांचा चेहरा रागाने लाल झाला होता.) इतकेच नाही ही दोन्ही गोड मुले अर्णव आणि रियाचीच आहेत.” ओवी डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत म्हणाली.

सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
सगळ्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता.



“ओवी नाही , माझा अर्णव असा वागू शकत नाही. म्हण ना , हे सगळे खोटे आहे. तू फक्त माझ्या अर्णवचीच आहेस.” ओवीकडे पाहत आई बोलत होती.

“अर्णव अरे तू तरी सांग तिला , तिचा काहीतरी गैरसमज झालाय.” अर्णवच्या आई अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.


“नाही आई ,हे सगळे खरे आहे. विचारा ना अर्णवला. त्याने मला काही सांगितले नसले तरी राकेशकडून मला सगळे खरे समजलेय.” ओवी.


“नाही ओवी , अर्णव फक्त तुझाच आहे. तू असे नको बोलूस. जे झाले त्यात त्याची काही चूक नाही. मी दोषी आहे. तुम्ही सगळे द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.” रिया.


“तुम्ही दोघांनी माझ्या मुलीला फसवलेय. अर्णव का वागलास असा ?” ओवीचे बाबा अर्णवला म्हणाले.


अर्णवचा कंठ दाटून आला होता. तो ओवीजवळ जाऊन हात जोडून रडत होता.



ओवी म्हणाली , “आईबाबा प्लीज तुम्ही कोणालाही दोष देऊ नका. तुमची मुलगी अभागी आहे असे समजा. आजवर अर्णवच्या सुखासाठी , त्याच्या कुटुंबासाठी मी अगदी माझे सुखही ओवाळून टाकायला तयार झाले. देवालाही हेच हवे होते. म्हणूनच मातृत्वाचे सुखही त्याने माझ्याकडून हिरावून घेतले कारण अर्णवचे सुख आता तुमच्या डोळ्यासमोर आहे.


अर्णवचे आई बाबा ओवीजवळ येत म्हणाले , “ओवी अशी का बोलत आहेस तू?”


“आई बाबा मला माहितीय तुम्हाला धक्का बसलाय. तसा काल मलाही बसला. पण खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलेय यात दोष कोणाचाच नाही. जेंव्हा लग्न करून आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला गेलो होतो ,तेव्हा रांगेत उभारलेल्या प्रत्येक नववधूला गुरुजी “अष्टपुत्र सौभाग्यवती होवो!” असा आशीर्वाद देत होते.


मी दोनदा पाया पडूनही गुरुजींनी मला आशीर्वाद दिला नाही तेव्हा मला वाईट वाटले पण जेव्हा माझे ऑपरेशन झाले तेव्हा माझी खात्री पटली
की ,मी कधीही आई होऊ शकत नाही.
मी जरी आई नाही होऊ शकले तरी अर्णव बाबा होऊ शकतो म्हणून मला त्याने दुसरे लग्न करावे असे मनापासून वाटत होते. पण कुठे ठाऊक होते ? देवाने आधीच त्याची गाठ रियाशी बांधली होती. रिया अगं तू किंवा अर्णव चुकीचे वागलाच नाहीत. आम्ही दुसऱ्याचे मूल दत्तक घ्यायला निघालो होतो. पण तू तुझ्या मनाचा मोठेपणा दाखवून आपले बाळ आम्हाला द्यायला निघालीस तेव्हा तू माझ्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केलेस. जे करायला खूप मोठे मन लागते.


ओवीने अर्णवला खरेच माफ केले असेल का ?
काय घडेल पुढे ?

पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)


जे वाचक आवर्जून कथा वाचत आहेत त्यांनी प्लीज अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all