#बंध रेशमी नात्याचे.. भाग-४८
“पण याचा अर्थ असा बिलकुल घेऊ नकोस की मी तुला आणि अर्णवला माफ केलेय. अर्णवला जी शिक्षा द्यायची ती तर मी देईनच.” ओवी कठोरपणे म्हणाली.
“ओवी प्लीज ,तू माझ्याशी बोल. तू बोलत नाहीयेस ही माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे. चुकलोय गं मी खरंच.” अर्णव कान पकडून म्हणाला.
“अर्णव अरे तू खूपच चुकला आहेस. रियाने तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केले यापेक्षा मला जास्त दुःख तू तिच्याकडे आकर्षित झालास याचे होतेय. तू विसरला होतास मला हे मला आता अगदी पटलेय. रियाला दिलेले ब्रेसलेट हा पुरावाच आहे की ,तू तिच्या प्रेमात पडला होतास. काय वाटले रे तुला , लग्नासारखी एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवून तू माझ्यासोबत सुखाचा संसार करणार ? आणि मला काहीच कळणार नाही. तू दोघींशीही नाते जोडू पाहत होतास. ज्यावेळी मी रियाला ब्रेसलेट मागत होते त्यावेळी मी स्वतःच्या डोळ्याने तुला नकारार्थी मान हलवताना पाहिले होते. याचा अर्थ तेव्हा समजला नसला तरी आता समजतोय.
आणि ही रिया , जिने तुला मिळवण्यासाठी अगदी आकाश पाताळ एक केले पण जेव्हा तुझा एक्सीडेंट झाला आणि तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तेंव्हा तिला माझी आठवण झाली आणि तुझा जीव वाचवण्यासाठी तिने मला अमेरिकेत बोलावले. ओवी फक्त सगळ्यांच्या हातातली कठपुतळी बनली होती. जो तो तिच्या साध्या स्वभावाचा फायदा घेऊ पाहत होता.” ओवीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. अर्णव ओवीजवळ जात होता. ओवीने हातानेच अर्णवला दूर थांबायला सांगितले. तसा अर्णव तिथेच थांबून केवळ अश्रूंतून आपल्या भावना व्यक्त करत होता.
अर्णवच्या आई-बाबांसोबत ,ओवीच्या आई-बाबांनाही अर्णवचा प्रचंड राग आला होता.
ओवी रियाच्या आई-बाबांना उद्देशून म्हणाली , “आईबाबा अर्णवचे लग्न माझ्यापासून लपवून तुम्हीही चूक केलीत. तुम्ही सगळे फक्त माझ्या भावनांशी खेळलात. ओवीला मुर्ख बनवलेत ना तुम्ही ? आज ओवी दुःखात आहे ती कधीही आई नाही बनू शकत तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल दया वाटू लागली आणि रियाने मोठे मन दाखवले या सगळ्यात ओवीला मात्र तुम्ही सगळ्यांनी दुर्बल बनवले. नकोय मला तुमच्या सगळ्यांची दया.”
“नाही ओवी , असे नको बोलूस बाळा.” रियाच्या आई-बाबांनी ओवीसमोर हात जोडले.
“ओवी आजची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती गं. प्लीज मला समजून घे.” अर्णव म्हणाला.
“अर्णव प्लीज! इनफ! आजवर मी फक्त तुला समजून घेण्याचे काम केले पण तू मात्र कमी पडलास मला समजून घेण्यात. त्यावेळी नसता सांगू शकला तरी इथे आल्यावर तू मला विश्वासात घेऊन रियाबद्दल सांगू शकत होतास. नवरा बायकोचे नाते विश्वासावर टिकते हे माहित आहे ना तुला ?
तू इथे नसतानाही मी नाती सांभाळत बसले आणि तू काय केलेस ? तू तुझ्या मूड प्रमाणे वागत राहिलास. मिस्टर अर्णव एकदाही तू मला सांगितले असते की तुझे रियाशी लग्न झाले आहे तेव्हाच मी तुझ्यापासून दूर झाले असते कारण खरे प्रेम केवळ जवळ राहून नाही मिळत. लांब राहूनही तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम असले असते पण आता फक्त तुझी दया येतेय मला तू तुझ्या ओवीला खूप कमजोर समजलास. माझी जबाबदारी म्हणून तू इथे आलास.”
तू इथे नसतानाही मी नाती सांभाळत बसले आणि तू काय केलेस ? तू तुझ्या मूड प्रमाणे वागत राहिलास. मिस्टर अर्णव एकदाही तू मला सांगितले असते की तुझे रियाशी लग्न झाले आहे तेव्हाच मी तुझ्यापासून दूर झाले असते कारण खरे प्रेम केवळ जवळ राहून नाही मिळत. लांब राहूनही तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम असले असते पण आता फक्त तुझी दया येतेय मला तू तुझ्या ओवीला खूप कमजोर समजलास. माझी जबाबदारी म्हणून तू इथे आलास.”
“नाही ओवी ,तू कमजोर नाहीयेस. तू खूप स्ट्रॉंग आहेस. तू माझी जबाबदारी नाहीस. माझे प्रेम आहेस म्हणून मी इथे आलो. रिया बद्दल सांगण्याची माझी खरंच हिम्मत होत नव्हती.” अर्णव म्हणाला.
“अर्णव हे शब्द आता तुझ्या तोंडात शोभत नाहीत. प्लीज तू आता शांत रहा.” ओवी.
रिया फक्त रडत होती.
“रिया आता यापुढे तुला आणि अर्णवलाच एकत्र राहायचे आहे. मी वकिलांशी बोलले आहे. लिगली अर्णव आता तुझा होईल. मी अर्णवला डिवोर्स देतेय.” ओवी.
ओवीच्या या वाक्यावर मात्र अर्णवचे आई-बाबा ओवी जवळ येऊन धायमोकलून रडू लागले. “ओवी अग तू फक्त अर्णवची बायको नव्हतीस या घराची मुलगी होतीस. प्लीज असला निर्णय घेऊ नकोस.”
“आई अर्णव जे वागला ते जर मी वागले असते तर तुम्ही अशीच अर्णवची समजूत घातली असती का ? नाही ना ? एक स्त्री काहीही सहन करू शकते पण तिचा आत्मसन्मान आणि तिच्या नवऱ्याचे ती जिवंत असताना निर्माण झालेले बाह्य संबंध ती कधीच सहन करू शकत नाही. मला माफ करा. आता मला नात्यात अडकवू नका.” ओवी गंभीर स्वरात बोलत होती.
“प्लीज तुम्ही तरी ओवीला समजावा ना.”अर्णवची आई ओवीच्या आईला म्हणाली.
ओवीच्या आई म्हणाल्या , “मला नेहमीच माझ्या ओवीचा गर्व वाटतो. तिच्यासारखी समजूतदार मुलगी माझ्या पोटी जन्माला आली याचा अभिमान वाटतो. ती कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. आजही तिने अगदी योग्य निर्णय घेतलाय. माफ करा पण या सगळ्या गोष्टींना आता खूप उशीर झालाय.” ओवीच्या आई हात जोडून म्हणाल्या.
“अर्णव अरे तू तरी थांबव तिला.” अर्णवचे बाबा म्हणाले.
अर्णव शांत उभा होता कारण त्याची ओवी किती हट्टी आहे हे त्याला माहीत होते. अर्णवने दीर्घ श्वास घेत फक्त नकारार्थी मान हलवली.
“आई बाबा चला निघूया का आपण ?” ओवी तिच्या आई बाबांना म्हणाली.
“आणि अर्णव ,मी आता इथून खूप दूर चालली आहे. जिथे मला अशी नाती नको आहेत ,ज्यांना गरज पडल्यावर ती माझ्या जवळ येतील आणि गरज संपल्यावर माझ्यापासून दूर जातील. तेव्हा माझा कुठेही शोध घेऊ नकोस. यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. तुम्हा दोघांच्या चुकीची शिक्षा त्या निष्पाप जीवांना अजिबात देऊ नका. त्यांना खरे प्रेम काय असते ते शिकवा आणि माझी शेवटची इच्छा म्हणून त्यांचा नामकरण सोहळा अगदी उत्साहात साजरा करा. मी हॉटेल बुक केले आहे. राकेश सांगेलच तुम्हाला सगळे.” असे म्हणून ओवीने आपल्या आई बाबांचा हात घट्ट पकडत अर्णवच्या घराचा कायमचा निरोप घेतला.
उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकताना ओवीचे मन कासावीस झाले. तिला लग्नानंतरचा गृहप्रवेश आठवला पण आज तिचे मन त्या घराला आपले मानतच नव्हते. ‘जिथे आपला नवरा आपला नसेल ते घर तरी कसे आपले मानायचे ?’हा मनात विचार करून ओवी घराबाहेर पडली.
**********************
इकडे रियाचे बाळ अचानक जागे झाले. त्याच्या रडण्याच्या आवाजाने सर्वजण भानावर आले
“रिया बाळाला घे. त्याला भूक लागलीय वाटते. रिया …” आई म्हणाली.
रिया शून्यात नजर लावून बसली होती.
“या सगळ्यांना फक्त मीच कारणीभूत आहे. खरंच आई बाबा , ओवी आणि अर्णव यांना मूल झाले असते तर मी त्यांच्या आयुष्यात परत कधीच आले नसते. मला माझ्या चुकीचा खूप पश्चाताप होतोय पण मी हे ओवीला कसे सांगू ?” अर्णवच्या आई बाबांसमोर हात जोडून रिया म्हणाली.
“आम्ही तुलाही कधीच माफ करू शकणार नाही. तू आणि अर्णवने आमच्या मुलीला दुखावले आहे. तुमच्या मुलांसोबत तुम्ही दोघे सुखाने राहा. आम्ही उद्याच अनाथ आश्रमामध्ये जातोय. आमच्या मुलाने आम्हालाही उतारवयामध्ये खूप दुखावले आहे.” अर्णवचे बाबा म्हणाले.
“आई तू तरी सांग ना बाबांना , काय बोलताय बाबा तुम्ही हे ? अहो तुम्हाला कसे सांगू हे सगळे मी मुद्दाम नाही केले. माझ्याकडून चूक झाली असली तरी ओवीला जाणून बुजून दुःख देण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता.” अर्णव आईबाबांचे पाय पकडत म्हणाला.
“उठ अर्णव ,आमचा निर्णय झालाय.” बाबा लाडक्या लेकाला उठवत म्हणाले.
हे ऐकल्यावर रियाच्या आई-बाबांनाही खूपच वाईट वाटले. अर्णवचे आई बाबा आपल्या खोलीत निघून गेले.
“अर्णव आता निर्णय तुझा आहे. तू माझ्या रियाला आणि तिच्या मुलांना स्वीकारावस अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी तुझ्यासमोर हात जोडतो. पण तरीही तुझा निर्णय काहीही असला तरी मला तो मान्य असेल.” रियाचे बाबा हात जोडून म्हणाले.
काय असेल अर्णवचा निर्णय ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)
©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा