Login

बंध रेशमी नात्याचे.. भाग -४९

ओवीच्या आई बाबांना तिच्या येण्याची काय कारण सांगेल ओवी ?


बंध रेशमी नात्याचे...भाग - ४९




“अर्णव अरे एकदा आपल्या मुलांना डोळे भरून पहा तरी .अर्णव प्लीज! प्लीज अर्णव!” रिया अगदी मोठमोठ्याने हेच पुटपुटत होती.


“ये रिया ,अगं काय झालेय तुला ? कुठेय अर्णव ? स्वप्न वगैरे पाहिलेस का तू ?” रियाच्या आई रियाला उठवत म्हणाल्या.

रिया घाबरून जागी झाली. तिने इकडे तिकडे पाहिले. ती धायमोकलून रडू लागली.


“आई किती विचित्र स्वप्न होतं ते ! खरंच मी आत्ता राकेशला फोन करून सांगणार आहे मी इंडियामध्ये नाही येऊ शकत.” रिया म्हणाली.


“बरे झाले रिया , उशिरा का असेना पण तुझ्या डोक्यात प्रकाश पडला. सोपे नसते रिया पोटच्या गोळ्याला असे दुसऱ्याला देणे. तू तुझा निर्णय बदलला हे ऐकून मला तर फार आनंद झाला.
अगं मी तुला तेच सांगत होते केंव्हापासून , दोन्ही मुलांना देवाने एकत्र जन्माला घातले आहे तर तू त्यांना वेगळे नकोस करूस. अर्णव आणि ओवी दत्तक मुलं घेतील अगं. शिवाय त्या मुलालाही इतके चांगले आई-बाबा मिळतील. या दोघांना सांभाळायला आपण समर्थ आहोत.” आई म्हणाली.


“आई प्लीज! तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी खूप स्वार्थी वागले आहे. थोड्याशा निस्वार्थ भावनेने मी काहीतरी करू पाहतेय ,तर तू असे बोलून माझे मन परावर्तित नको करूस. माझे बाळ देणार नाही असे नाही म्हणालेय मी.” रियाचा कंठ दाटून आला होता.


“मग आत्ताच म्हणालीस ना , की तू इंडियात नाही जाणार ते.” आई पुन्हा म्हणाली.


“हो ,बाळाला घेऊन तू आणि बाबा इंडियामध्ये जा. मी येणार नाही असे म्हणायचे होते मला. रिया आपल्या हाताची मूठ घट्ट करत पुढे म्हणाली , म्हणजे आई मी तिथे गेले आणि अर्णवने जर मला पाहिले तर ..त्यानंतर ओवी आणि अर्णव , त्यांच्या घरचे ,त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या कुटुंबात होणारे वाद-विवाद , गैरसमज आणि महत्त्वाचे म्हणजे चूक माझी असताना ओवीला मिळणारी शिक्षा हे सगळे नकोय ग मला. आयुष्यात खूप मोठी चूक माझ्याकडून घडलीय. एकतर्फी प्रेमात खूप चुकीची वागलेय मी पण आता नाही. बाबा म्हणतात तेच योग्य आहे. अर्णवला आणि ओवीला माझेच बाळ आई-बाबा म्हणणार यातच माझ्या चुकीचे प्रायश्चित होईल असे मला वाटतेय.” रिया.


रियाने अगदी सकाळी सकाळी राकेशला फोन केला आणि तिला पडलेले ते भयंकर स्वप्न तिने राकेशला सांगितले. राकेशलाही रियाचे म्हणणे योग्य वाटत होते कारण ओवी आत्ताच एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडली आणि हा मानसिक आघात तिला सहन होणार नाही शिवाय चांगल्या माणसाचा चांगुलपणावरचा विश्वासच उडून जाईल. त्यापेक्षा रिया म्हणते तेच बरोबर आहे असे म्हणून राकेशने रियाच्या आई बाबांना ते बाळ अनाथ आश्रमामध्ये थोड्यावेळासाठी ठेवा असे सांगितले. कारण अर्णवला तुम्हीही दिसता कामा नये अशी राकेशने सक्त ताकीद दिली.

त्यानंतर रियाच्या बाबांना त्यांचाच एक मित्र आठवला. जो रियाच्या बाबांना अगदी व्यवस्थित मदत करेल असा. त्यांनी बाळाला आश्रमात कसे सोडायचे ? याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. मित्राला कॉल करून ही सर्व हकीकत सांगितली. सगळे ऐकल्यानंतर तो ही निःशब्द झाला. रियाचा स्वभाव त्याला लहानपणापासून माहीत होता पण रियाने घेतलेला हा निर्णय ऐकून त्यालाही रियाचे कौतुक वाटले.


रियाचे आई बाबा भारतात यायला निघाले होते. रियाने परत एकदा तिच्या त्या गोड बाळाला आपल्या जवळ घेतले. कितीतरी मायेने ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती.


“चल रिया , येतो आम्ही. शांता आम्ही लगेच रिटर्न येऊ. तेंव्हा रियाची आणि बाळाची काळजी घे.” अशी शांतालाही सूचना देऊन रियाच्या बाबांनी रियाच्या हातून तिच्या बाळाला घेतले.

“हो साहेब , तुम्ही काही काळजी करू नका.” शांता म्हणाली.


रियाचे आई बाबा इंडियात पोहोचले होते.

अर्णव ओवीला घेऊन कॅन्डल लाईट डिनरला गेला होता.

“अर्णव तू कधीपासून ख्रिसमस सेलिब्रेशन करायला लागलास ?” ओवी म्हणाली.

“ये नाही हं ओवी , ख्रिसमस सेलिब्रेशन वगैरे काही नाही. मी तुला कॅन्डल लाईट डिनरला सहज घेऊन आलोय. मी माझ्या बायकोसाठी इतके तर करू शकतोच ना ? ” अर्णव म्हणाला.


ओवीला हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन ती पुढे म्हणाली ,”ते बरोबर आहे तुझे. पण खरं सांगू ?आज तू कितीतरी दिवसांनी इतका रोमँटिक वाटतोस. जो मध्यंतरी कुठेतरी हरवला होतास.”


“कुठेही हरवला नाही तुझा अर्णव. तू असे विचार डोक्यातून काढून टाक.” अर्णव ओवीचा हात हातात घेत म्हणाला.


“हम्म. पण तरीही अर्णव मला असे वाटलेले ,आज काही स्पेशल आहे. म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही असे कधी होत नाही. एखाद्या वेळी तू विसरू शकतोस पण मी लक्षात ठेवतेच. म्हणून मगाचपासून मी माझ्या डोक्याला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करतेय पण मला तरीही नव्हते आठवत.” ओवी म्हणाली.


“सांगितले ना मग मी तुला. आता नको जास्त विचार करू.” अर्णव म्हणाला.



“ओवी नवरा बायकोच्या नात्यांमध्ये स्पेशल दिवसाची गरजच नसते. प्रत्येक दिवस स्पेशल असतो. सुखदुःखात साथ देणारे नाते म्हणजेच पती-पत्नीचे नाते. हो ना ? तू नेहमी माझ्या सुख दुःखात सहभागी झालीस पण मी मात्र तुला सतत दुःख दिले. उद्या आपल्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे म्हणजे बघ , आपण एका बाळाचे आई-बाबा होणार आहोत आणि माझी अशी इच्छा आहे की मागच्या काळात काय घडले ? हे मी तुला सांगितले नाही तर माझ्या मनात आयुष्यभर ही खंत राहील की मी माझ्या ओवीला फसवले.” अर्णव उदास होऊन म्हणाला.



“अर्णव तुला माहितीये ना माझा तुझ्यावर किती विश्वास आहे ते. माझा अर्णव माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवणार नाही. मला विश्वास आहे.” ओवी असे म्हणाली तेव्हा अर्णवचे डोळे डबडबले होते. कुठून सुरुवात करावी हेच त्याला कळत नव्हते.


“हो ओवी आणि याच विश्वासाला तडा जायला नको म्हणून मी सतत प्रयत्न करतो पण माझ्याकडून खूप मोठी चूक घडलीय. तू माफ करशील की नाही हे माहीत नाही .” अर्णव म्हणाला.


“अर्णव अरे सांग ना काय झाले ते?” ओवी अर्णवचा हात हातात घेऊन म्हणाली.


“हम्म म्हणून अर्णवने ओवीचा हात घट्ट पकडला आणि तो बोलू लागला , “ओवी इथून अमेरिकेला गेल्यानंतर मला धक्क्यावर धक्के मिळाले. रिया बॉसची मुलगी आहे हे मला एअरपोर्टवरच समजले. तुला माहितीये ओवी , घराचे डॉक्युमेंट्स सरांनी त्यांच्याकडे का गहाण ठेवले होते?”

“का ?” ओवी घाबरून म्हणाली.


“तो सगळा रियाचा प्लॅन होता. तिला माझ्याशी लग्न करायचे होते आणि म्हणूनच तिने मला अमेरिकेत बोलावले होते. सरांनी एक वर्ष मी भारतात परतणार नाही या कॉन्ट्रॅक्ट पेपर वर माझ्याकडून सह्या घेतल्या.” अर्णवच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडते न पडते तोच ओवीने अर्णवच्या हातातून आपला हात अलगद बाजूला केला.


“काय ? हे कसे शक्य आहे ?” ओवी खाली बसत बोलली.


“हो ओवी. इतकेच नाहीये पुढे रियाने ते कॉन्ट्रॅक्ट पेपर सतत माझ्यासमोर पकडत माझ्यासोबत लग्न केले. त्यावेळी कुंतीची परिस्थितीत फार वाईट होती. तू त्या टेन्शनमध्ये असल्यामुळे आणि रियाच्या धमक्यांमुळे मला काहीही सांगण्याची हिंमत होत नव्हती. खूप मूर्खासारखा वागलो मी. पण प्लीज माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसरे कोणीच नाहीये हे लक्षात ठेव. मला माफ कर! असं मी कधीच म्हणणार नाही पण तू जी शिक्षा देशील ती भोगायला मी तयार आहे.” अर्णव म्हणाला.


“काय बोलू मी अर्णव ? हे सगळे रियाच्या बाबांनी ,आईने रियाने माझ्यापासून लपवून ठेवले. मूर्ख बनवले रे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला. तरीच आल्यापासून मला तुझ्यामध्ये बदल जाणवत होता. माझा अर्णव कुठेतरी हरवलाय हे मला स्पष्ट जाणवत होते.” ओवी अश्रू ढाळत बोलत होती.


“ओवी ,प्लीज ! तू असे बोलू नकोस. मी मुद्दाम काहीच केले नाही.” अर्णव ओवीचा हात पकडत म्हणाला.


“चूक ही चूक असते अर्णव . इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस म्हणजे तुझ्या मनात रियाबद्दल…” ओवी.


“नाही ओवी. प्लीज!” अर्णव.


ओवीनी अर्णवचा हात आपल्या डोक्यावरती ठेवला आणि ती म्हणाली , “ हे माझी शप्पथ ! खरे सांग ,तुला एकदाही रियाबद्दल काहीच वाटले नाही का रे?”


अर्णव ओवीची खोटी शपथ घेऊ शकला नाही. त्याने हात बाजूला घेतला. ओवीला काय समजायचे ते ओवी समजली होती.


“सॉरी अर्णव ! खूप मोठा विश्वासघात झालाय माझा. आई ,बाबांचा लग्नाला विरोध असतानाही साऱ्या जगाशी लढण्याची मी तयारी दाखवली आणि तू काय केलेस ? हेच तुझे प्रेम. सतत तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत आले मी. तुझा राग अगदी हसत हसत सहन केला रे मी कारण माझे तुझ्यावर खरे प्रेम होते पण ते प्रेम दुसऱ्या कोणासोबत विभागले गेलेय म्हटल्यावर आता यापुढे मला नाही काहीच सहन होणार रे. ऑपरेशन पेक्षाही माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे रे. ” असे म्हणून ओवी रडू लागली .


अर्णवने ग्लासमध्ये पाणी भरले आणि तो ग्लास ओवीच्या समोर पकडत तो म्हणाला , “ओवी प्लीज पाणी घे.”


“नकोय अर्णव मला पाणी. खूप तुटले मी आतून. हे सगळे माझ्याच बाबतीत का घडले ? पण मी हार मानणार नाही अर्णव. तुला असे वाटले असेल मी तुझी जबाबदारी आहे. मी तुझ्या कुटुंबासाठी खूप केले आणि म्हणून तू जर मला स्वीकारले असेल तर तो तुझा गैरसमज दूर कर. आता मी तुला दाखवून देईन , ही ओवी एक स्त्री असूनही काय करू शकते ते.” ओवीने पर्स उचलली आणि ती तिथून निघून गेली.


“ओवी थांब! प्लीज ! माझे ऐकून तरी घे.” अर्णव ओवीच्या मागे जात बोलत होता.


“यापुढे आपले रस्ते वेगळे असतील अर्णव.
या सगळ्याला आता खूप उशीर झाला आहे. आणि माझ्यावर खरे प्रेम केले असशील तर प्लीज यापुढे माझा पाठलाग करू नकोस.” ओवी म्हणाली.


ओवी ऑटोने घरी पोहोचली होती.

अर्णवच्या आई ओवीला एकटीच का आली ? अर्णव कुठे आहे ? असे प्रश्न विचारत होत्या. त्यावर ओवीने “सगळ्या प्रश्नांची उत्तरे अर्णव देईल.” असे सांगितले. आज पहिल्यांदा ओवी अर्णवच्या आई-बाबांशी उद्धटपणे वागत होती. आई-बाबांनाही वाईट वाटले. ओवीने रूम मध्ये जाऊन आपली बॅग भरायला घेतली.
बॅग भरून ती खाली आली. तेव्हाही अर्णवचे आई बाबा “कुठे चालली आहेस ओवी ? का असे करतेय ?” विचारत होते. अर्णव दारात उभा होता.

ओवी पुन्हा म्हणाली , “आई बाबा तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे अर्णव देईल. येते मी.”

ओवीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून आई-बाबा अश्रू ढळत होते.


अर्णव काय देईल आई-बाबांच्या प्रश्नांची उत्तरे ?

ओवीच्या आई बाबांना तिच्या येण्याची काय कारण सांगेल ओवी ?

पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)