Login

बंध रेशमी नात्याचे.. भाग -५१

काय असेल ओवीचा निर्णय ?
#बंध रेशमी नात्याचे.. भाग -५१




“आजी अगं मम्मा आली आहे ना ? कुठेय ती ?” आरव.


“अरे आरव , तू कसा काय आला इतक्यात ? मी तुला घ्यायला येणार होतो. आणि तुला कसे समजले ? तुझी मम्मा आली आहे ते.” ओवीचे बाबा म्हणाले.


“कारण मी मम्माला ऑटोमध्ये बसलेले पाहिले होते. हो आजोबा , तुम्ही मला घ्यायला येणार आहात हे मला मम्मा बोलली होती पण त्या काकांनी मला इथे ड्रॉप केले आणि मी ही इतक्या लवकर येणार नव्हतो पण हे बघा मी तिथल्या पार्टीमध्ये पडलो आणि मला हाताला खरचटले.” आरव म्हणाला.


ओवीचे बाबा धावतच आरवजवळ गेले. ओवीच्या आई स्वयंपाक घराकडे गेल्या. ओवीच्या आई हळद घेऊन आल्या. ती हळद आरवच्या जखमेवर बसवणार तितक्यात आरव म्हणाला , “आजी अगं तू हळद कुठे बसवणार ? हे बघ त्या काकांनी आधीच बँडेज बसवले आहे.”


ओवीच्या आई म्हणाल्या , “हो का ! अगं बाई मी पाहिलेच नाही. पण आरव त्या काकांबद्दल तुझ्या मम्माला अजिबात सांगू नकोस नाहीतर ती विनाकारण काळजी करेल.”


“काय गं आई ,माझ्यापासून काय लपवायला सांगतेस अरवला ? आणि आरव तू इतक्या लवकर घरी कसा आलास ?” ओवी म्हणाली.


“तेच सांगतोय मम्मा , मी त्या पार्टीमध्ये पडलो पण तू घाबरशील म्हणून आजीला वाटले तुला लगेच नको सांगायला.” आरव.


ओवीने धावत येऊन अरवला कुठे लागले आहे ते पाहिले. त्याच्या गालावरून हात फिरवत ओवी म्हणाली , “आरव अरे म्हणून मी तुला पार्टीला जाऊ नको म्हणत होते पण तू ऐकायलाच तयार नव्हतास.बघ किती लागले आहे तुला.”


“सॉरी मम्मा !यापुढे ऐकेन मी. पण विहानला वाईट वाटायला नको ना म्हणून मी गेलो , त्याने बोलल्यावर मी पार्टीला गेलो नसतो तर त्याला वाईट वाटले असते . विहान माझा बेस्ट फ्रेंड आहे ना आणि तूच म्हणतेस बेस्ट फ्रेंडची नेहमी काळजी घेतली पाहिजे. आणि तू काळजी करू नकोस. मला अगदी थोडेसेच लागले आहे पण अजून तू फुंकर मारली नाहीस त्यामुळे थोडे दुखतेय.” आरव आपले टपोरे डोळे इवलेसे करत म्हणाला.


“हो , का!” आपलीच वाक्ये आपल्यालाच ऐकणाऱ्या छोट्याशा आरवचे ओवीला कौतुक वाटले. ओवीने हसून आपल्या लाडक्या लेकाच्या जखमेवर फुंकर घातली.


आई बाबा आई आणि मुलाचे हे गोड नाते दररोज पाहत होते. दिवसागणिक आरव आणि ओवी अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त एकमेकांना जिवापाड जपत होते.


“पण आरव , तू इथे कसा आलास ? म्हणजे कोणी सोडले तुला घरी आणून ? “ओवी म्हणाली.


‘अरे देवा ! मी कितीही सांगू नको म्हटलं तरी आता मम्माचा लाडका मम्माला सगळे खरे सांगणार आणि ओवी उगाच टेन्शन घेणार.’ असा मनात विचार करून आई थोडीशी उदास झाली.



“मम्मा विहानच्या घरी मी ख्रिसमस पार्टीला गेलो होतो ना तिथे एक अंकलही आले होते. जे खूप चांगले होते. त्यांनीच मला घरी आणून सोडले. मला काहीही लागले की , तुझी किती आठवण येते माहितीये ना तुला ? आणि तू तिथे नव्हतीस म्हणून मला पार्टीत थांबावेसे नाही वाटले. मग मी विहानच्या मम्माला तुला कॉल करायला सांगितला. तेव्हा त्या अंकलनी मी कुठे राहतो ? असे मला विचारले आणि ते म्हणाले मी याला ड्रॉप करेन. मलाही तिकडेच जायचे आहे आणि मी घरी आलो.” आरव म्हणाला.





“अरे पण विहानच्या मम्मीने तुला सोडले कसे असे कोणत्याही अनोळखी अंकलसोबत. ते काही नाही. मी आत्ताच विहानच्या मम्मीला कॉल करून चांगली खडसावते.” ओवी म्हणाली.


“वेट !वेट !मम्मा ऐकून तर घे. ते अंकल विहानच्या डॅडच्या ओळखीचेच होते. म्हणजे ते विहानच्या डॅडचे बॉस होते. खूप चांगले होते. अगं त्यांनी माझी खूप माया केली. हे बघ हे गिफ्ट सुद्धा त्यांनीच मला दिले. मी नको म्हणत असतानाही.” आरव म्हणाला.


“मग ते आत का आले नाहीत ?”ओवी म्हणाली.


“आता ते मला कसे माहित ? त्यांनाही घाई असावी. सतत ते फोनवर बिझी होते.” आरव.


“ओवी ,किती प्रश्न विचारशील तू ? लहान आहे तो पण तेवढाच हुशार आहे. काळजी करू नकोस. चल रे आरव आपण फ्रेश होऊ या.” असे म्हणून ओवीचे बाबा आरवला फ्रेश व्हायला घेऊन गेले.


ओवीच्या डोळ्यात अश्रू आले. आईने जवळ येऊन ओवीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि आई म्हणाली , “ओवी , मला माहितीये तू आरवच्या बाबतीत किती हळवी आहेस ते ! तुला काळजी वाटणे साहजिक आहे पण ती व्यक्ती अनोळखी असली तरी खात्रीशीर असल्यामुळेच त्या विहानच्या आईने आपल्या आरवला त्यांच्यासोबत पाठवले असेल.”


“हो आई , तू म्हणतेस ते पटतेय मला. पण आजवर मी माझ्या आयुष्यात माझ्या आवडत्या व्यक्ती गमावल्या आहेत. तो अनुभव माझ्यासाठी खूप कठीण होता. मला आरवला नाही गमवायचेय. राकेशचा त्या दिवशी फोन आला आणि माझे आयुष्यच बदलले. मी अर्णव पासून दूर झाल्यावर नव्या आयुष्याची सुरुवात करु शकले ती केवळ आरवमुळेच. अनाथ आश्रमामध्ये आरवला पाहिले तेव्हा एवढ्याशा मुलांना देव आयुष्य जगण्याची हिंमत देतो तर मी तर एवढी मोठी आहे. जगू शकतेच अर्णव शिवाय. हा विचार करून मी या शहरात आले. मला माझ्या आरवला खूप प्रेम द्यायचे आहे , खूप मोठा झालेला पाहायचा आहे.” ओवी म्हणाली.


“आरवही खूप प्रेम करतो तुझ्यावर. खूप गुणी आहे , समंजस आहे. नक्कीच तो खूप मोठा होईल.” ओवीच्या आई म्हणाल्या.


ओवीला विहानच्या आईचा कॉल आला. ओवीने कॉल उचलला. तशा त्या म्हणाल्या , “आरव व्यवस्थित घरी पोहोचला ना ?”


“हो. पोहोचला तो व्यवस्थित घरी.” ओवी म्हणाली.


“सॉरी ! घरी खूप गेस्ट आल्यामुळे आमच्यापैकी कोणी आरवला सोडायला येऊ शकले नाही पण रायजादा सर खूप चांगले आहेत. त्यांना लहान मुले खूप आवडतात आणि म्हणूनच ते तुमच्या आरवला स्वतः त्यांच्या गाडीतून घरी सोडायला आले.” विहानच्या आई.


“रायजादा सर..” ओवी हळूच पुटपुटली.


“हो. हो. आमच्या विहानच्या डॅडाचे बॉस. ओके ठेवू फोन. अजूनही घरी खूप गेस्ट आहेत नंतर कॉल करेन तुम्हांला.” विहानच्या आई.


“हो. चालेल.” ओवी म्हणाली.



*********

ओवीच्या आई ओवी साठी कॉफी आणायला गेल्या.रायजादा हे नाव ऐकले तेंव्हापासून ओवी तिच्या भूतकाळात रमली होती. आज तिला त्या मुलीला पाहिल्यापासून तिचे शाळेतले दिवस आठवत होते. ती ही अशीच अबोल होती. पण अर्णवसारखा मुलगा जेव्हा त्यांच्या शेजारी राहायला आला तेव्हापासून ओवी अगदी बोलकी झाली होती. अर्णव तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करायचा. तिचा तो बालपणीचा मित्र तिच्यासाठी सगळे जग होता. पण मोठा झाल्यावर त्याचा स्वभाव इतका बदलेल असे ओवीला स्वप्नातही वाटले नव्हते. छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणारा अर्णव इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवेल अशी कल्पनाही केली नव्हती ओवीने.
ओवीचे डोळे पाणावले होते.


“ओवी तू अजूनही त्या अनोळखी व्यक्तीचाच विचार करतेस का? अग सांगितले ना आरवने की तो चांगला व्यक्ती होता. तू नकोस बरे टेन्शन घेऊ. आपला आरव सुखरूप आलाय की नाही घरी आणि यापुढे त्याला आपण एकट्याला कुठेच नाही सोडायचे.” आई कॉफीचा कप ओवीसमोर पकडत म्हणाली.


तशी ओवी वर्तमान काळात आली. तिने डोळे पुसले आणि ती म्हणाली , “नाही ग आई , मी त्या व्यक्तीचा नाही विचार करत. आज शाळेत एक मुलगी भेटली होती. जी अगदी हुबेहूब माझ्यासारखी होती. तुला आठवतेय मी शाळेत किंवा घरी आल्यावरही कोणालाही नाव सांगायचे नाही. मला माझे नाव कोणाला सांगायला आवडायचेच नाही.” ओवी म्हणाली.



आई गोड हसून म्हणाली , “अग मी कशी विसरेल आहे माझ्या लक्षात आणि जेंव्हापासून अर्णव आपल्या शेजारी राहायला आला तेव्हापासून तू सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला लागली. हो ना?”


“हो. पण त्या मुलीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मिस मेरी म्हणत होत्या. त्या संदर्भात त्या माझ्याशी उद्या बोलणारही आहेत.” ओवी.

“अगं बाई! हो का!” आई.


आरव आणि ओवीचे बाबा खाली आले होते. आरव आणि ओवीच्या बाबांना पाहिल्यावर ओवीच्या आई बाबांसाठी कॉफी आणि आरवसाठी दूध आणायला किचनमध्ये गेल्या. दूध घेतल्यानंतर आरव त्याचे फेवरेट स्टिकर बुक घेऊन बसला.

ओवीही तिचे स्कूल वर्क करत बसली होती.


दुसरा दिवस उजाडला…


ओवी आरवला घेऊन स्कूलमध्ये पोहोचली. मिस मेरींनी ओवीला बोलावून घेतले आणि त्या म्हणाल्या , “ओवी इथे आल्यापासून दरवर्षी तुझ्या उत्कृष्ट कामामुळे तुझे प्रमोशन झाले आहे. म्हणजे सीनियर केजीपासून तू आता फिफ्थ स्टॅंडर्ड पर्यंत शिकवू शकतेस हा मला विश्वास आहे. पण यावर्षी मी तुला ज्युनिअर केजी चा क्लास देत आहे. तुला खालच्या वर्गाकडे का पाठवत आहे याचे कारण तू मोठ्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवत नाहीस असा बिल्कुल नाही. पण एक शिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडत असताना तू लहान मुलांची आई बनतेस जी गोष्ट त्या न्यू ऍडमिशन झालेल्या मुलीसाठी खूप फायद्याची ठरू शकते.”

मिस मेरी पुढे बोलणार तितक्यात ओवी कपाळावर आठ्या पाडत म्हणाली , “म्हणजे?”


“म्हणजे असे की त्या मुलीला आई नाहीये. आणि त्यामुळेच ती उदास असते. तिच्या घरातल्यांचाही म्हणावा तितका रिस्पॉन्स नाहीये. आल्यापासून एकही पेरेंट मीटिंग त्यांनी अटेंड केलेली नाही. त्यासाठी तू तिचा वर्ग निवडावास असे मला वाटते.” मिस मेरीच्या या वाक्यावर ओवीच्या डोळ्यात पाणी आले.


काय असेल ओवीचा निर्णय ?
ती मुलगी ओवीला प्रतिसाद देईल का ?

पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)