Login

#बंध रेशमी नात्याचे.. भाग -५४

माझ्या रियाने अर्णवला मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. अर्णवला मिळवण्यात ती तिचे सुख शोधत होती. तिने बळजबरीने सुख मिळवले पण तिच्या नशिबी सुख नव्हतेच. त्या फुलपाखरासारखे माझ्या रियाचे सुखही गुदमरून गेले ग.
बंध रेशमी नात्याचे.. भाग -५४


“ओवी पाहिलंस ना ,नियती आपण केलेल्या पापांना इथेच फेडायला लावते. पण माझ्या रियाच्या चुकांची शिक्षा निष्पाप असलेल्या तिच्या चिमुकल्या जिवांना आणि जिने दुसऱ्याचे वाईट व्हावे असा स्वप्नातही विचार केला नाही अशा निर्मळ मनाच्या ,जिच्यावर माझे जीवापाड प्रेम आहे त्या माझ्या पत्नीला भोगावी लागतेय. आर्याला होणारा हा त्रास पाहून मला ,रिया गेल्यापासून आर्याच्या आयुष्यातील सुखाचे दरवाजे बंद झालेत असे वाटतेय. नाही पाहू शकत मी त्यांना अशा अवस्थेत. त्यांना अशा अवस्थेत पाहताना खूप वाईट वाटतेय मला.”रियाचे बाबा हुंदका देत म्हणाले.


ओवीला काय बोलावे हे सुचत नव्हते. तिने रियाच्या बाबांसमोर पाण्याचा ग्लास पकडला. त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला.



“ओवी , मला पाणी नकोय. प्लीज तू फक्त माझे ऐकून घे‌. गेली चार वर्ष मी माझ्या मनातील भावना बोलून नाही दाखवू शकलो. खूप काही बोलायचे आहे मला तुझ्याशी.
असे म्हणतात ,आजीच्या मायेतही मुलांना आईसारखीच माया मिळते पण देवाला तेही माझ्या आर्याला मिळू द्यायचे नव्हते आणि म्हणूनच त्याने आजीलाही असे वेडे करून ठेवलेय.” रियाचे बाबा अश्रूंच्या धारा पुसत बोलत होते.


ओवीलाही मनातून खूप वाईट वाटत होते. ती रियाच्या बाबांना हात जोडून म्हणाली , “प्लीज काका , तुम्ही रडू नका. झालेल्या गोष्टींचा विचार करून आता काय उपयोग ? जे आहे ते स्विकायला हवे आणि त्यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार करायला हवा.”



“हे सगळे स्वीकारले असले तरी यातून बाहेर पडायचा रस्ता दूर दूरवरही कुठे मला दिसत नाहीये. या हृदयात खूप काही साठले आहे. खूप गुंता झाला आहे. तो सोडवता सोडवता माझा जीव गुदमरून जातोय. ते म्हणतात ना , सुख हे फुलपाखरासारखे असते. अलगत येऊन आपल्या मुठीत विसावते पण बळजबरी केली की ते मरून जाते. माझ्या रियाने अर्णवला मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. अर्णवला मिळवण्यात ती तिचे सुख शोधत होती. तिने बळजबरीने सुख मिळवले पण तिच्या नशिबी सुख नव्हतेच. त्या फुलपाखरासारखे माझ्या रियाचे सुखही गुदमरून गेले ग. लग्नासाठी कितीतरी श्रीमंत मुले तिच्या मागे असताना तिने सगळ्यांना नकार दिला. लहानपणापासून तिचा प्रत्येक हट्ट पुरवणारा मी ही अगदी आंधळा झालो होतो. चांगले काय ? वाईट काय ? हे कळूनही रियाला साथ देत गेलो. कारणही तसेच होते ओवी , रियाने मला जग सोडून जाण्याची धमकी दिली होती आणि म्हणूनच मी तिचे अर्णवसोबत लग्न लावून द्यायचा अट्टाहास केला पण काय माहित होते माझ्या रियाच्या आयुष्यात अर्णवचा विरहच होता आणि आता तिच्या चिमुकल्यांच्याही आयुष्यात आई बाबांचा विरहच लिहीला आहे.”


रियाचे बाबा बोलत होते तसा ओवीला अर्णव दिसत होता. तिला स्वतःचाही राग येत होता. ‘परीक्षेतील प्रश्न सोडवताना दहा वेळा विचार करणारी ओवी तू आयुष्यातील एवढा मोठा प्रश्न किती कमी वेळात सोडवून रिकामी झालीस. तुला एकदाही वाटले नाही की सर्व गोष्टींची शहानिशा करून निर्णय घ्यावा. त्याच वेळी तू रिया आणि अर्णवला एकत्र आणले असते तर आज त्यांची मुले आई-बाबांच्या मायेला पोरकी झाली नसती.’ हा मनात विचार करून ओवी अस्वस्थ झाली होती.


ओवी रियाच्या बाबांना म्हणाली , “बाबा , हे सगळे ऐकल्यावर आता मला खूप वाईट वाटतेय. त्याचवेळी अर्णव आणि रियाला एकत्र आणले असते तर आज त्यांचे कुटुंब आनंदात राहिले असते. पण नेहमी अर्णवला सपोर्ट करणारे माझे मन यावेळी मात्र अर्णव दुसऱ्या कोणाचा तरी आहे हे मान्य करत नव्हते आणि म्हणूनच मी असे टोकाचे पाऊल उचलले. माणूस जिवंत असतो तोपर्यंतच इर्षा ,मोह ,राग ,लोभ एकदा तो निघून गेल्यानंतर काहीच उरत नाही ना आयुष्यात. नेहमी माणसांची , त्यांच्या भावनांची कदर करणारी मी अर्णवच्या आई-बाबांनाही कशी दूर लोटू शकले काय माहीत?”


“नाही ओवी , तुझं काही चुकलेलं नाही. या सगळ्यात मी आणि रिया खूप चुकलो. माफी मागून तर आता चुका दुरुस्त होणार नाहीत पण माझ्या आर्याला या सगळ्यातून बाहेर काढ. असे कुठल्या तोंडाने बोलू मला कळत नाही .” रियाचे बाबा गंभीर होऊन म्हणाले .


“शिक्षिका या नात्याने , आर्या रियाची मुलगी आहे हे समजण्याआधीच मी तिला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठीच इथे आले होते. आता हे सगळे पाहिल्यावर मला असे वाटतेय त्यासाठीच देवाने मला या शहरात आणले असेल. बाबा मी तुम्हाला शब्द देते आर्याला लवकरच या सगळ्यातून मी बाहेर काढेल. निघू मी आता ? काही मदत लागली तर केंव्हाही फोन करा.” असे म्हणून ओवी रियाच्या बाबांच्या पाया पडली.


“ओवी तू खूप चांगली आहेस ! देवाने तुला तुझ्या वाट्याची सर्व सुखे तुझ्या पदरात घालावी हीच माझी त्याच्याकडे प्रार्थना असेल.” रियाचे बाबा ओवीला आशीर्वाद देत म्हणाले.


ओवी जड पावलाने घरून निघाली. ओवीच्या डोक्यात अनेक विचारांचे काहूर माजले होते. तिथून ती आता स्कूलमध्ये जायला निघाली होती.

तिच्या आयुष्यात इतके काही घडेल अशी तिने स्वप्नातही कल्पनाही केली नव्हती. अर्णवमुळे झालेला त्रास आता कुठे ती विसरू पाहात होती. पण रियाच्या , तिच्या आई बाबांच्या आणि तिच्या मुलांच्या आयुष्यात आलेल्या वादळाची तीव्रता पाहिल्यावर ओवीला खंत वाटू लागली होती. स्वतःचाच राग येत होता. सतत तिच्या मनात ना-ना विचार थैमान घालत होते. ओवीने आपली स्कुटी चालू केली. आज तिचे कशातही लक्ष नव्हते. घरापासून स्कुटीपर्यंत ती कशी येऊन पोहोचली हे देवालाच ठाऊक होते.
आता स्कुटी चालू केल्यानंतरही ओवी कुठे चालली आहे हे न ठरवता ओवी भरधाव वेगाने निघाली. तितक्यात अतिशय वेगाने आलेली एक गाडी ओवीला धडकली. काही कळायच्या आतच ओवी खाली कोसळली. रक्तबंबाळ झालेला तिचा चेहरा रक्ताने माखला गेला.


गाडी चालक खाली उतरला. आजूबाजूची गर्दी पाहून त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. कारण एखादा अपघात झाला की , ड्रायव्हरची चूक समजून लोक अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी ड्रायव्हरला मारण्याचा प्रयत्न करतात. आलिशान गाडीतून एक रुबाबदार व्यक्ती बाहेर आला. त्याला पाहिल्यावर लोक आवाक् झाले.
शहरातील प्रसिद्ध उद्योगपती असलेला तो ड्रायव्हरला म्हणाला , “अरे पाहत काय बसलास ? चल उचलू त्यांना आणि गाडीत बसवू. आपल्याला लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचावे लागेल. तरच त्यांचा जीव वाचू शकतो.”


तेवढ्यात गर्दीतला एकजण म्हणाला , “साहेब तुमच्या ड्रायव्हरची काहीच चूक नाही. ही बाईच रॉंग साईडने आली आहे.”


“हो मलाही माहित आहे पण ही ती वेळ नाही कोण चूक ? आणि कोण बरोबर ? हे पाहायची. ते पोलीस पाहतील.” असे रागात बोलून साहेबांनी ओवीला उचलले.


“साहेब तुमचा ड्रेस ? थांबा. मी ठेवतो त्यांना गाडीत.” ड्रायव्हर म्हणाला.

“तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ? तू फक्त दरवाजा उघड.” साहेब आज पहिल्यांदा ओरडून बोलत होते.

“हो ,हो.” म्हणत ड्रायव्हरने दरवाजा उघडला. साहेबांनी ओवीला मागच्या सीटवर ठेवले. त्यांचे लक्ष सतत तिच्याकडेच होते. जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये अगदी काही सेकंदातच ड्रायव्हरने गाडी पोहोचवली. साहेबांनी फोनवर डॉक्टरांशी संपर्क साधला होता त्यामुळे हॉस्पिटलमधील ब्रदर्स अँड सिस्टर्सनी ओवीला स्ट्रेटाचेरवर घेतले. सगळेजण साहेबांच्या जीवाची घालमेल पाहत होते. साहेबांचे डोळे पाणावले होते. ड्रायव्हरला आश्चर्य वाटत होते.
‘कोणत्याही संकटाला हिंमतीने सामोरे जाणारे , जीवावर उदार होऊन वागणारे साहेब मृत्यूला इतके घाबरतात ?’ हा मनात विचार आल्यावर ड्रायव्हरला आश्चर्य वाटले.


स्ट्रेटाचेरसोबत साहेबही ओ.टी.पर्यंत पोहोचले.

“मिस्टर रायजादा डोन्ट वरी!” असे म्हणून डॉक्टरांनी साहेबांच्या पाठीवरती हात ठेवला.


रायजादा साहेबांनी होकारार्थी मान हलवली. त्यांचा स्ट्रेटाचेरवर असलेला हात ओवीने घट्ट पकडला. आता साहेबांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. सिस्टरने रायजादा सरांचा हात ओवीच्या हातातून बाजूला केला आणि ती ओवीला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन गेली.

‘हे मला काय होतेय ? का मी इतका हळवा होतोय ? या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये.’ हा मनात विचार करत ते डोळ्यांतून ओघळणारे अश्रू टिपत होते.


“साहेब पाणी.” असे म्हणून ड्रायव्हरने पाण्याची बॉटल समोर पकडली.

पाणी पीत असतानाच अचानक एक व्यक्ती धावतच त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला ,” “त्या एक्सीडेंट झालेल्या ताईंची ही पर्स दूर पडली होती. मला मिळाली. म्हणूनच तुमचा पाठलाग करत मी या हॉस्पिटलमध्ये आलो. त्यांची माहिती शोधण्यासाठी तुम्हाला या पर्सचा उपयोग होईल म्हणून घेऊन आलो.”

साहेब त्या व्यक्तीकडे आदराने पाहत होते.
“खूप खूप आभारी आहे.” असे म्हणून त्यांनी काही पैसे देऊ केले पण त्या व्यक्तीने ते पैसे घेतले नाहीत.

ती व्यक्ती म्हणाली , “साहेब रिक्षा चालवून जेवढे पैसे मिळतात तेवढे मला पुरेसे आहेत. तुम्ही खूप चांगले आहात. दुसऱ्यांच्या मदतीला धावून येणारे आहात म्हणूनच तुमची चूक नसतानाही तुम्ही ताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आहात. त्यांच्यावर उपचार करताय. श्रीमंत असूनही तुम्ही एका सामान्य ताईची मदत केलीत. इतकच नाही तर तुम्ही तुमच्या महागड्या ड्रेसचाही विचार केला नाहीत. हे बघा तुमचा ड्रेस किती खराब झालाय ते! तुम्हालाच इथे पैशांची गरज लागेल. मला नकोत हे पैसे.”

ती व्यक्ती गेल्यानंतरही साहेबांना त्या व्यक्तीचे बोलणे ऐकू येत होते. त्या व्यक्तीने शर्टकडे पाहायला सांगितले होते हे लक्षात आल्यावर त्यांची नजर शर्टकडे गेली. घरी गेल्यावर आई-बाबांच्या प्रश्नांची काय उत्तरे द्यायची ? हा विचार मनात आला आणि साहेबांना घाम फुटला होता.


ओवीची माहिती पर्समधून मिळेल का ?
ओवी ठीक होईल ना ?
ओवीच्या आईबाबांना हा धक्का सहन होईल का?

पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)

🎭 Series Post

View all