#बंध रेशमी नात्याचे.. भाग -४२
"हॅलो राकेश ,आवाज येतोय का माझा ? राकेश अरे बोल ना." रिया पुढे बोलणार तोच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.
"हॅलो रिया , मी सुखरूप इंडियात पोहोचलोय. काळजी करू नकोस. तू बाळाला घे. आपण नंतर बोलू." असे म्हणून राकेशने फोन ठेवला.
राकेश हळवा झाला होता. अर्णव ,ओवी किती सरळ स्वभावाचे ,कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही असेच वागणारे असूनही त्यांच्या बाबतीत हे फार चुकीचे घडतेय. याची राकेशला खंत वाटत होती. त्याने गाडी स्टार्ट केली आणि तो घरी पोहोचला. एके दिवशी सकाळी सकाळी रियाचा फोन आला.
"राकेश माझ्या मनात सतत वाईट विचार येतायेत. तिकडे सगळे ठीक आहे ना रे ? सगळे बरे आहेत ना ?" रिया म्हणाली.
"रिया ,तुला माहितीये मी तुझ्याशी कधीच खोटे नाही बोलू शकत आणि आता तुला खरे सांगून तुला टेन्शनही नाही देऊ शकत. त्यापेक्षा तू आता काहीच विचारू नकोस. तू आणि तुझी मुले छान आहात ना ?" राकेश म्हणाला.
"काय झाले राकेश ? प्लीज ! सांग ना." रिया म्हणाली.
"इथे इतके भयंकर असे घडलेय की , कोणी स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही. अर्णव त्यातून कसा सावरेल ? याचेच मलाही टेन्शन येतेय." राकेश म्हणाला.
आता रियाचे डोळे पाणावले होते. तिला कोणाला काय झालेय हेच कळत नव्हते. ती इमोशनल होऊन पुन्हा म्हणाली ,
"प्लीज लवकर सांग ना ,तू असा कोड्यात बोलून राहिलास तर मला खरंच अटॅक येईल आता. बोल ना काय झालंय अर्णवला." रिया पुन्हा पुन्हा विचारत होती.
राकेश म्हणाला ," तुला तर माहितीच आहे अर्णवला एक वेळ काही झालेच तर तो पुन्हा खंबीरपणे लढू शकतो पण त्याची ताकद असणारी ओवी , ती मात्र सध्या खूप वाईट कंडिशन मध्ये आहे. तिचे ऑपरेशन करायचे ठरले आहे. तिला सर्व्हायकल कॅन्सर झालाय. ती आणि अर्णव आता कधीच आई-बाबा नाही होऊ शकणार."
"काय ? पण हे कसे शक्य आहे ? ओवी इथे आल्यानंतर तर तिला काहीच त्रास जाणवत नव्हता." रिया घाबरून म्हणाली.
"हो रिया ,हा कॅन्सर लवकर लक्षात येत नाही पण त्याची लक्षणे जाणवत असतात. नॉर्मल म्हणून ओवी या लक्षणांकडे दुर्लक्ष करत होती. अर्णवणे मला सगळे सांगितले. लग्नानंतर त्यालाही सगळे जाणवले पण ओवी काहीच बोलत नाही म्हणून त्याने गांभीर्याने घेतले नाही. आताही ती हॉस्पिटलमध्ये नकोच म्हणत होती पण अर्णव तिला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हे सगळे समजल्यावर ,आता त्या दोघांची अवस्था पाहिल्यावर मीच खूप हताश झालोय." राकेशने दीर्घ श्वास सोडला.
रियाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती म्हणाली ,"माझीच नजर लागली का रे त्यांच्या सुखी संसाराला ? मलाच उशीर झाला का , देवाकडे दोघांच्या सुखासाठी प्रार्थना करायला ?" रिया हुंदके देत बोलत होती.
"नाही रिया ,तू रडू नकोस. आधी शांत हो. यात कोणाचीही चूक नाहीये. मला ना नियतीच्या अनोख्या खेळाचे आश्चर्य वाटते. सगळे आपल्या मनात आहे तसे घडत नाही. नियतीच्या जे मनात असते तेच घडते. मी अर्णवची आणि ओवीची काळजी घेईन. तू तुझी आणि बाळाची काळजी घे प्लीज !" राकेश म्हणाला.
"अगं रिया अशी का बसली आहेस इथे ? आणि तू रडतेस का ? अगं कोणाचा फोन आला आहे ? बघू आण तो फोन इकडे." म्हणून आईने फोन घेतला.
रिया गार्डनमध्ये होती. हे सगळे ऐकल्यावर तिचे पाय गळून गेले. ती तिथेच खाली जमिनीवर बसली होती.
आईने राकेशशी बोलायला सुरुवात केली. राकेशने ओवीची कंडीशन सांगितल्यावर आईच्याही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांनी ओवीलाही मुलगीच मानले होते आणि ओवी होती ही तशीच जीव लावण्यासारखी.
"कधी आहे ऑपरेशन ? आणि काहीही गरज लागली तर तू हक्काने फोन करू शकतोस. लक्षात ठेव. ओवीची ,अर्णवची आणि त्यांच्या फॅमिली मेंबरचीही काळजी घे." रियाच्या आई म्हणाल्या.
"हो काकू. ऑपरेशनची डेट मलाही नक्की माहित नाही आणि सॉरी ! मला यातले काहीच रियाला सांगायचे नव्हते. पण तिने हट्ट धरला म्हणून सांगावे लागले. काळजी घ्या रियाची." राकेश म्हणाला.
"अरे नाही सॉरी कशाला म्हणतोयस ? रिया ही कालपासून अपसेट होती. तिला सतत तुमच्या सगळ्यांचीच आठवण येत असते. इतक्या वर्षाची मैत्री आहे म्हटल्यावर काळजी तर वाटणारच ना ? मी घेईन रियाची काळजी. तू नको काळजी करूस." रियाच्या आई म्हणाल्या.
राकेशने फोन ठेवला.
************************
अगदी थोड्याच दिवसात ओवीच्या ऑपरेशनची डेट फिक्स झाली. ओवीला ऑपरेशन साठी बोलावले होते. अर्णव आणि घरातले सगळेच टेन्शनमध्ये दिसत होते. सगळ्यांच्या मनात अनामिक भीती होती. डॉक्टरांनी समजावून सांगितल्यावर सगळ्यांनी ओवीच्या शरीरासाठी हे ऑपरेशन खूप महत्त्वाचे आहे हे एक्सेप्ट केले होते.
पण तरीही ओवीला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जाताना सगळ्यांना वाईट वाटत होते. ओवीला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेल्यावर अर्णव देवासमोर हात जोडून उभा राहिला. राकेश अर्णवच्या सोबत होताच. त्याने अर्णवकडे चेक दिला आणि तो म्हणाला ," हा चेक घे. काहीही मदत लागली तर हक्काने सांग."
"राकेश याची काहीच गरज नाहीये. आता पैसे आहेत रे माझ्याकडे. तू ठेव तो चेक. आता तू जो शब्दांचा आधार देतोस ना , तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओवी लवकर बरी व्हावी हीच इच्छा आहे." अर्णव आवंढा गिळत बोलत होता.
राकेश अर्णवची स्थिती समजू शकत होता. तो फक्त त्याच्या हातात हात देत त्याला धीर देत होता.
बराच वेळ ऑपरेशन चालले होते. त्यानंतर सायंकाळी ओळीला शुद्ध आली होती. पेन्स जाणवत होते. ओवीचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. ऑपरेशनच्या त्रासापेक्षा आईपणाचे सुख आपल्याकडून हिरावून घेतले गेले याचे तिला जास्त दुःख असावे.
अर्णव ओवीजवळ गेला. त्याचा तो प्रेमळ स्पर्श तिला सुखदुःखात साथ देण्याचे आश्वासन देत होता. तू एकटी नाही आहेस आपण दोघे मिळून परिस्थितीवर विजय मिळवूया हा भाव डोळ्यात स्पष्ट दिसत होता. तिच्या अर्णवसाठी तिला स्वतःला खंबीर दाखवायचे होते. तीच अर्णवची ताकद आहे हे तिला माहीत होते. आता अर्णवची भक्कम साथ आणि प्रेम तिच्यासाठी पुरेसे होते.
दहा बारा दिवसांनंतर ओवीला डिस्चार्ज मिळाला पण ती आराम करण्यासाठी तिच्या आईच्या घरी गेली होती. अर्णव मात्र ओवीच्या विरहाने एक एक रात्र जागून काढत होता. ओवीचीही परिस्थिती वेगळी नव्हती. ती ही रात्री दचकून उठत होती.
वाईट काळ हा स्वप्नांसारखा विसरून जाता येत नाही हेच खरे. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी या ना त्या कारणाने तो समोर येतोच. ओवीने टीव्ही पाहणे कटाक्षाने टाळले होते. मालिकांतील काही हळवे सीन ओवीला सहन होत नव्हते. ती प्रत्येक गोष्ट तिच्या परिस्थितीशी जुळवत होती. त्यामुळे हे सगळे माझेच दुःख मला दाखवून मला त्रास देत आहेत असा विचार करत होती.
आई बाबा सतत समजवायला तयार असायचे.
"बाळा यामध्ये तुझ्यासारखी परिस्थिती असली तरी ,त्या परिस्थितीमध्ये स्वतःला कसे सावरायचे हे दाखवत आहेत. आपण ते घ्यायचे. दुःख वाटून नाही घ्यायचे. तुला दुःख वाटल्यानंतर ते हलके होणार आहे का ? उलट तू जेवढे दुःख वाटून घेणार नाहीस ,तेवढे तुला हलके वाटेल." बाबा आज आपल्या समजूतदार लेकीला पहिल्यांदा समजून सांगत होते.
कारण याआधी ओवीला समजून सांगण्याची वेळ कधीच आली नव्हती. तीच नेहमी सगळ्यांना समजून सांगायची.
रोज अर्णवची सकाळ , संध्याकाळ ओवीकडे चक्कर ठरलेली असायची. शिवाय अर्णवचे आई बाबाही दिवसभर ओवी जवळच थांबायचे.
अर्णवला त्याची ओवी कुठेतरी हरवल्यासारखी दिसत होती. अर्णव आल्यानंतर ओवी कितीही आनंदी दाखवत असली तरी आई-बाबांकडून दिवसभर घडलेला वृत्तांत अर्णवच्या कानावर यायचा तो उदास व्हायचा पण तोही ओवीसमोर अगदी आनंदी असल्याचे दाखवायचा.
अर्णवला त्याची ओवी कुठेतरी हरवल्यासारखी दिसत होती. अर्णव आल्यानंतर ओवी कितीही आनंदी दाखवत असली तरी आई-बाबांकडून दिवसभर घडलेला वृत्तांत अर्णवच्या कानावर यायचा तो उदास व्हायचा पण तोही ओवीसमोर अगदी आनंदी असल्याचे दाखवायचा.
आज राकेशला अर्णवचा फोन आला. त्याला राकेशला भेटायचे होते. राकेशने घड्याळात पाहिले. रात्रीचे १२.३० वाजले होते. त्याला आश्चर्य वाटले. पण तरीही वेळ न दवडता तो अर्णवने सांगितलेल्या हॉटेलमध्ये पोहोचला.
इतक्या रात्री का भेटायचे असेल अर्णवला ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा