Login

#बंध रेशमी नात्याचे भाग -५०

काय घडले असेल या चार वर्षांत ?
#बंध रेशमी नात्याचे.. भाग -५०


ओवी आईच्या घरात आली तशी ती धायमोकलून रडायला लागली.

बाबांनी ओवीला हाताला पकडून सोफ्यावर बसवले आणि ओवीच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणाले , “काय झाले ओवी बाळा ?”

आईही घाबरली होती. ओवीच्या हातातली बॅग पाहून असे वाटत होते की ,ओवी काही दिवसांसाठी आईकडे राहायला आली आहे पण ती रडतेय का ? या विचाराने आई अस्वस्थ झाली होती.

“ओवी कोणी काही बोलले का तुला ? बोल ना काय झालेय ? तू रडू नकोस बरं.” आईचेही डोळे पाणावले होते.


“कसं सांगू आई तुला ? काय झाले ते. आई नियतीने माझ्याकडून सगळेच हिरावून घ्यायचे ठरवले आहे बहुतेक.” ओवी आईच्या कुशीत डोके ठेवून रडत होती.


“नाही ग ओवी , असे बोलू नकोस बाळा. अगं जे नियतीने तुझ्यापासून घेतले ते तुझे नव्हते असे समज. आता तू आणि अर्णवने घेतलाय ना दत्तक मुल घ्यायचा निर्णय. तर तू त्या बाळाला आईची माया दे. कोण म्हणते स्वतः जन्म दिल्यावरच एक स्त्री आई बनते. अगं श्रीकृष्णाला जन्म न देताही त्यांची आई म्हणून यशोदामाईला ओळखले जाते की नाही ? मग तू अशी उदास होऊन नको बोलूस.”


“आई हे सगळे खूप छोटे दु:ख वाटतेय ग ,जे मी आज माझ्या कानाने ऐकले त्यापुढे. ते ऐकल्यावर मलाच माझ्या नशिबाची कीव येतेय.” ओवी डोळे पुसत पुढे म्हणाली , “मी अर्णवच्या सोबतीने कोणतेही दुःख अगदी हसत पेलत होते पण ज्याच्यावर विश्वास ठेवला , ज्याच्यासाठी जगले , लहानपणापासून ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्यानेच असे खोटे बोललेले समजल्यावर खूप वाईट वाटतेय ग!” ओवीचा कंठ दाटून आला होता.


“काय झालेय ओवी ? नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल अगं. अर्णवला आपण आज ओळखतो का ? कितीही चिडला असला तरी तुझ्याशिवाय त्याचे पानही हलत नाही माहित आहे ना तुला ? तोही तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. आम्हाला माहित आहे बाळा. आम्हा पुरुषांना तुमच्यासारखे प्रेम दाखवता येत नसते.” बाबा लेकीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले.


“हो ओवी , बाबा म्हणतात ते खरे आहे.” आई म्हणाली .


ओवी म्हणाली , “बाबा हे सगळे जरी खरे असले तरी अर्णवणे अमेरिकेत गेल्यावर बॉसच्या मुलीशी म्हणजेच रियाशी लग्न केले होते. मी जिवंत असताना त्याची पहिली बायको जिवंत असताना आणि हे त्याने मला आत्ता सांगितले. मी आता त्याला काहीच देऊ शकत नाही. म्हणून मी त्याला दुसऱ्या लग्नाचे सुचवले होते पण त्याने नकार दिला कारण तो आधीच लग्न करून मोकळा झाला होता.”


“काय ! हे काय बोलतेयस तू ओवी ?” बाबा दु:खी होत म्हणाले.


“हो बाबा अगदी खरे आहे .”ओवीने झालेल्या सर्व घटना आई बाबांना सांगितल्या. त्यावर आई-बाबा नाराज झाले. बाबांनी यावर आपण उद्या चर्चा करून असे सांगून ओवीसाठी जेवणाचे ताट तयार करायला आईला सांगितले. ओवीने नकार दिल्यावर बाबांनी तिला खूप समजावले. ओवीने कसेबसे दोन घास खाल्ले. आणि अर्णव पासून दूर व्हायचा निर्णय घेऊन ओवी झोपी गेली.


*****************


इकडे अर्णवणे आई-बाबांना घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. आई-बाबांना हे ठाऊक होते की अर्णव जाणून बुजून ओवीला धोका कधीच देणार नाही. पण ओवीची बाजूही त्यांना मान्य होती आल्यानंतर अर्णवणे ओवीला सगळे खरे सांगायला हवे होते. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी देवावर विश्वास ठेवत अर्णवचे आई बाबा ओवी आणि अर्णवच्या सुखासाठी प्रार्थना करत होते.


तितक्यात अर्णवला राकेशचा फोन आला. अर्णव राकेशला भेटायला गेला. राकेशला अर्णवचा चेहरा पाहिल्यावर काहीतरी बिनसले आहे हे समजले. त्याने अर्णवला काय झाले हे विचारल्यानंतर अर्णवणे सगळा भूतकाळ आणि वर्तमान काळ राकेश समोर व्यतीत केला. आपण नवीन आयुष्याची सुरुवात जुन्या गोष्टींची माफी मागत करण्याचे ठरवले होते हे राकेशला सांगितले पण नियतीला बहुतेक मला सुखात पाहायचेच नाहीये. अर्णव भावूक झाला होता.


************************


राकेशलाही ओवीने घेतलेला निर्णय ऐकल्यावर फारच वाईट वाटले. त्याने रात्रीच रियाला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. रियाचे डोळे पाणवले. जी गोष्ट होऊ नये म्हणून तिने अगदी जीवाचा आटापिटा केला होता तीच गोष्ट घडली हे ऐकून रियाही उदास झाली. आपल्याच विचारात असणारी रिया पायऱ्या उतरून खाली येताना तिचा पाय घसरला आणि ती वरच्या पायरीवरून खाली पडली. रक्तबंबाळ झालेली रिया पाहिल्यावर घरातील सर्व नोकर धावत आले. त्यांनी रियाला उचलले आणि अगदी काही सेकंदातच रिया हॉस्पिटलमध्ये पोहोचली. अमेरिकेतून आलेला फोन रियाच्या आईबाबांना खूप मोठ्या वेदना देत होता. त्यांनी राकेशला फोन करून बाळाची काळजी घ्यायला सांगितली. रियाला काय झालेय ? हे पाहण्यासाठी ते रात्रीच अमेरिकेला जायला निघाले.


बाळाला अनाथाश्रमात ठेवून काही तास झाले होते. राकेश बाळाजवळच होता पण अर्णवचा फोन आल्यामुळे तो त्याला भेटायला गेला होता. तो परत अनाथाश्रमामध्ये आला. आता त्याला बाळाची खूपच काळजी वाटत होती. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. रियाच्या चुकीची शिक्षा तिच्या मुलांनाही भेटली पण देवा यापुढे सगळे सुरळीत घडू दे. म्हणून राकेश बाळाच्या डोक्यावरून हात फिरवून देवाकडे प्रार्थना करत होता.


****************


चार वर्षानंतर..


सेंट जोसेफ प्रायमरी स्कूल अगदी छान सजली होती.

“विश यु हॅपी मेरी क्रिसमस !” म्हणत मिस मेरी सगळ्यांना विश करत होत्या. ओवीने दरवर्षी प्रमाणे स्कूलचा कानाकोपरा अगदी छान सजवला होता. क्लास मधील काही मुले सांताक्लॉज बनली होती. त्यांच्या बॅग गिफ्टने आणि चॉकलेट्सने भरल्या होत्या. ख्रिसमस ट्री आणि त्याचे डेकोरेशन पाहिल्यावर मन भरून येत होते. छोटे छोटे जीव आई-बाबांसोबत स्कूल मधील ख्रिसमसचा आनंद लुटत होते.

ओवी या सगळ्यांचे प्रसन्न चेहरे पाहिल्यावर मनातून खूप खुश होती. ती सर्वच मुलांची फेवरेट टीचर होती. मुलांचे पालकही ओवीच्या जवळ येऊन नेहमीप्रमाणे तिचे भरभरून कौतुक करत होते. ओवी प्रिन्सिपल मॅडम असलेल्या मिस मेरीचीही अत्यंत लाडकी डॉटर होती. मिस मेरींचे ओवी शिवाय पानही हालत नव्हते. आता सॉंग्स सुरू झाले. प्रत्येक जण त्या तालावर ठेका धरून नृत्य सादर करत होता. सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. तितक्यात सगळ्यांना सरप्राईज देत छोटे छोटे सांता गिफ्ट घेऊन आले. सांताने दिलेले गिफ्ट मुलांसाठी खूप स्पेशल होते.


मुले कुतूहलाने ते गिफ्ट स्वीकारत होती. एकमेकांना शुभेच्छा देत होती. पण हे काय ! एका कोपऱ्यात एक मुलगी अगदी शांत बसली होती. ओवी नेहमीप्रमाणे सगळी तयारी झाल्यावर मुलांकडे वैयक्तिक लक्ष देत होती. तिला त्या मुलीकडे पाहिल्यावर तिची दया आली. ‘एवढासा जीव !इतका उदास का बसलाय ?’ हा मनात विचार करून ओवीने तिला बोलते करायचे ठरवले.

ओवी तिच्याजवळ जाऊन हात पुढे करत तिला म्हणाली , “हॅपी ख्रिसमस डे क्युटी पाई!” पण त्या मुलीने ओवीकडे पाहिलेही नाही. ती बाजूला तोंड करून तशीच हिरमुसून बसली होती.

ओवीला आता नक्कीच काहीतरी प्रोब्लेम आहे असे वाटले. ओवी तिच्या बाजूलाच कठड्यावर बसली.


“तुझं नाव काय आहे?” ओवी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली.

तशी ती मुलगी पळत जाऊन मुलांच्या गर्दीत मिसळली.

‘कोण असेल ही मुलगी ? इतकी अबोल आणि गर्दीपासून अलिप्त राहणारी. याआधी हिला मी तरी कधी पाहिले नाही.’ ओवी मनात विचार करत होती.

“ओवी झालीस का दरवेळी प्रमाणे उदास ? आजवर कधीच तुझ्या उदासीचे कारण विचारले नाही पण आज तुला विचारतेय , मुलगी मानते गं मी तुला. सांग ना काय आहे तुझा भूतकाळ ? नेमके याच दिवशी तुझ्या डोळ्यांत पाणी का येते?” मिस मेरींचे हे वाक्य ऐकल्यावर ओवीचे डोळे डबडबले.


ओवी म्हणाली , “खरे सांगू मिस मेरी मला तुमच्या पासून काहीच लपवायचे नाहीये पण काही गोष्टी अशा असतात ज्या दुसऱ्यांना सांगताना स्वतःला फार त्रास होतो.”


“डॉटर प्लीज तुला जेव्हा सांगावं वाटेल तेव्हा सांग. आजच्या या आनंदी क्षणी तू मला सांगावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही पण एक सांगू तू उदास असलीस ना की मलाही करमत नाही ग!” मिस मेरी.


“हो मिस मेरी मला माहिती आहे. मलाही आज माझ्या स्वतःच्या दुःखापेक्षा कोणीतरी जास्त दुःखी आहे असे वाटले आणि मी उदास झाले.” ओवी.


“पण कोण?” मिस मेरी.


“आता इथे एक मुलगी बसली होती आणि ती बिलकुल हसत नव्हती. इतकं कशाचं टेन्शन असेल तिला ? हाच मला प्रश्न पडला. म्हणून मी तिच्या जवळ गेले पण तिने अगदी मला न पाहिल्यासारखे केले आणि ती या गर्दीत कुठेतरी मिक्स झाली.” ओवी.


“हो , आले माझ्या लक्षात. तू त्या न्यू ऍडमिशन बद्दल बोलतेस ते. अगं तिला कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी ती कुणाशी बोलत नाही की कोणाला स्वतःचे नावही सांगत नाही. तिच्या विषयी मी उद्या तुझ्याशी बोलणारच होते.” मिसमेरी.


“ठीक आहे मिस मेरी. चला मला आज दरवर्षीप्रमाणे लवकर घरी जायचे आहे.” असे म्हणून ओवी उठली.

“ओके तू निघू शकतेस ओवी.” मिस मेरी म्हणाल्या.

ओवी घरी जातानाही तिची नजर मात्र त्या चिमुकलीलाच शोधत होती. ओवी जेंव्हा रिक्षात बसली. तेव्हा ती चिमुकलीही तिला पाहताना दिसली. ओवी जाण्याचीच ती वाट पाहत असावी. ओवीने तिच्याकडे बघून गोड स्माईल दिली. ओवी घरी आली. आज तिचा मूड नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. म्हणजे चक्क ती हसत घरी आली होती. आई-बाबांनाही आश्चर्य वाटले.


ओवी फ्रेश व्हायला गेली. तेव्हा ओवीचे बाबा तिच्या आईला म्हणाले , “आजच्या दिवशी ओवीला खूश पाहून आनंद मानावा की दुःख हाच प्रश्न पडला आहे.”

“हो ना मलाही तसेच वाटतेय. किती बरे होईल ना ,ओवी त्या भूतकाळातील कटू आठवणीतून बाहेर पडून आयुष्याची नवी सुरुवात करेल तेंव्हा.”


काय घडले असेल या चार वर्षांत ?

पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ. प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)


🎭 Series Post

View all