Login

#बंध रेशमी नात्याचे. भाग -५३

नात्यांची घट्ट वीण..
बंध रेशमी नात्याचे..भाग -५३



ओवीला त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता‌.
डॉक्टर काय म्हणाले तेही ओवीने ऐकले होते.

डॉक्टर येतो म्हणून जायला निघाले. ओवीला आपण इथे येऊन चूक तर नाही केली ना ? हा प्रश्न पडला कारण सध्याचे वातावरण पाहता बाहेर उभे असणारे नोकरही फारच चिंतातूर दिसत होते. ‘यांनाच विचारावे का ? काय झाले ते ? पण हे खरे कशावरून सांगतील ?’ ओवीच्या मनात असंख्य प्रश्नांची जणू रेलचेल सुरू होती.

डॉक्टर आले म्हणून ओवी पाठमोरी सरकली. त्यांच्या पाठोपाठ आलेली व्यक्ती ओवीच्या पाठमोरे आकृतीकडे पाहून म्हणाली ,‌ “मॅडम तुम्ही माझ्या आर्याविषयी माहिती मिळवायला आला आहात ना ? मला प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला होता. माहिती न घेताच निघालात वाटते. बोला ना काय माहिती हवी आहे तुम्हाला ?” ती व्यक्ती म्हणाली.


ओवीच्या कानांना तो आवाज अगदी ओळखीचा वाटला म्हणून ओवीने क्षणार्धात मागे वळून पाहिले.

“काका तुम्ही ?”ओवी म्हणाली.

“ओवी तू आणि इथे कशी अर्णव कुठे आहे ?”
रियाचे बाबा म्हणाले.

“काका ,तुम्हाला ज्या प्रिन्सिपल मॅडमने फोन केला होता त्याच शाळेत मी शिक्षिका म्हणून जॉब करतेय. आर्याविषयी माहिती मिळवायला मीच आले आहे.” ओवी म्हणाली.


“बाळा तू आत ये ना. खूप काही बोलायचे आहे मला तुझ्याशी.” हात जोडून रियाचे बाबा ओवीला विनंती करत होते.


आता मात्र ओवीला हे सगळे काय सुरू आहे हेच कळत नव्हते. ओवी आत गेली. भिंतीवर फुलांचा हार घातलेला रियाचा फोटो पाहिल्यावर ओवीच्या पायाखालची जमीन सरकली.

“रिया ?” ओवीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळू लागल्या.

“ओवी तू उभी का आहेस ? बस ना.” रियाचे बाबा आपुलकीने म्हणाले. ओवीचा चेहरा पडला होता. मनापासून तिला रियाबद्दल वाईट वाटत होते.

“काय झाले होते रियाला ?” ओवीचा कंठ दाटून आला होता.


“सगळे सांगतो ओवी आज तुला. मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे. झालेच तर मला माफ कर.” रियाचे बाबा साश्रू बोलत होते.


“माफी नका मागू. मला अर्णवणे सगळे काही सांगितले आहे. आता माफी मागूनही काय फरक पडणार ! अर्णव आणि रिया यांनी एकत्र यावे म्हणून मी तेंव्हाच दूर झाले होते. आता मी भूतकाळ विसरण्याचे ठरवले आहे.” ओवी.


“ओवी असे नको बोलूस बाळा. माझ्या रियाच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही.”रियाचे बाबा पुढे बोलणार तोच ओवी म्हणाली ,
“रियाला तर मला अर्णव पासून दूर करायचे होते उलट आता तिच्या आत्म्याला शांती लाभली असेल. त्यासाठीच तिने एवढा अट्टाहास केला होता.”


“ओवी तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव अथवा नको ठेवू पण मी माझ्या आर्याची शपथ घेऊन सांगतो , अर्णवचा एक्सीडेंट झाला तेव्हापासून रियाने अर्णवला तुझ्याकडे सुपूर्त केले होते. तुमच्या दोघांच्या सुखातच रिया तिचे सुख शोधत होती. त्याचवेळी रियाला ती अर्णवच्या बाळांची आई होणार आहे हे समजले.” बाबा बोलत असताना ओवीला अचानक धक्का बसल्यासारखे ओवी रिऍक्ट झाली.


“काय रिया अर्णवच्या बाळाची आई ! आर्या अर्णवची मुलगी आहे. हे सगळे अर्णवला माहित आहे.” ओवी म्हणाली.

“नाही ओवी अर्णवला यातले काहीच माहित नाही. अर्णवला हे समजले तर तुम्ही दोघे वेगळे व्हाल जे रियाला नको होते म्हणून तिने तुलाही आणि अर्णवलाही तेंव्हा ही गोष्ट सांगितली नाही. रियाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. जेंव्हा रियाला राकेशकडून तू कधीही आई होणार नाहीस हे समजले तेव्हा ती स्वतःच्या बाळाला तुला देणार होती. इथे आल्यावर तुम्हा दोघांना ती दिसली तर पुन्हा तुमच्या आयुष्यात वादळ निर्माण होईल म्हणून तिने स्वतः भारतात यायचे ही टाळले. मी आणि रियाची आई बाळाला घेऊन भारतात आलो. ख्रिसमसच्या दिवशी अनाथ आश्रमातून तुम्ही बाळाला दत्तक घेणार आहात म्हणून बाळाला अनाथ आश्रमात आदल्या दिवशी ठेवून आलो.
पण त्याच दिवशी राकेशकडून आम्हांला समजले की , तू अर्णवला आणि त्याच्या घराला सोडून कायमची निघून गेली आहेस. हाच धक्का रियालाही बसला. सगळ्या परिस्थितीचा दोष रिया स्वतःला देत होती. आणि या ट्रेसमध्येच जिन्याच्या पायरीवरून रियाचा पाय घसरला आणि रक्तबंबाळ झालेली माझी रिया काही तासातच हे जग सोडून निघून गेली.
अवघ्या नऊ महिन्याच्या माझ्या आर्याला आईचे प्रेम मिळालेच नाही.” रियाचे बाबा.

“म्हणजे राकेशने मला जे बाळ दिले ते ही रियाचेच आहे.” ओवी.


“हो ओवी आणि तीच माझ्या रियाची शेवटची इच्छा होती.” रियाचे बाबा धायमोकलून रडू लागले.


रियाच्या बाबांचा आवाज ऐकताच रियाच्या आईही धावतच बाहेर आल्या.

“कुठे माझी रिया ? बोला ना ,माझी रिया कुठेय ?” त्या रियाच्या बाबांच्या शर्टला पकडून जोरजोरात रडत होत्या. तितक्यात त्यांची नजर ओवीवर पडली.

“आली का रिया तू ? माझी रिया आली.” म्हणून त्या ओवीला अगदी मिठी मारू लागल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. त्यांची एकंदरीत स्थिती पाहिल्यावर ओवी सगळे काही समजून गेली.


“शांता लवकर ये. माझी रिया आली आहे. ऑफिस मधून दमून आलीय. कॉफी बनव तिच्यासाठी. शांता कुठेस तू ?” रियाच्या आईच्या ओरडण्याने एक बाई वेडेवाकडे तोंड करत किचनमधून बाहेर आली.

ती ओवीच्या हातात पाण्याचा ग्लास देत तिथून निघून गेली. ओवीने ग्लास बाजूला ठेवला.

तेव्हा रियाच्या आई म्हणाल्या , “रिया आवडली नाही का तुला कॉफी ? पी ना बाळा. का मी बनवून आणू तुझ्यासाठी कॉफी ?”

रियाच्या आईच्या या वाक्यावर ओवीचेही डोळे पाणावले होते. रियाच्या बाबांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सतत वाहत होत्या. रियाच्या आईचे अंग अगदी लटपटत होते.


त्यांनी ओवीकडे पाहत नकारार्थी मान हलवली. ओवीला रियाच्या बाबांना काय म्हणायचे आहे हे समजले.

‘ओवीला पूर्वीच्या रियाच्या आई आठवल्या. ज्यांनी ओवीला अगदी आईसारखा जीव लावला होता. अमेरिकेत असताना किती थाट होता त्यांचा ! आणि आज त्यांची ही अवस्था पाहून ओवीला फार वाईट वाटत होते. आई-बाबा मग ते कोणाचेही असो , आपल्या पोटच्या मुलांच्या विरहाचे दुःख नाही सहन करू शकत हेच खरे.’ ओवी मनात विचार करत होती.

“बोल ना बाळा , तुझ्यासाठी कॉफी बनवून आणू का मी ?” रियाच्या आई पुन्हा म्हणाल्या.

ओवीने रियाच्या आईचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली , “नको आई ,खूप छान झाली आहे कॉफी. हे बघ मी आता सगळी संपवते.” असे म्हणून ओवीनी पाण्याचा ग्लास संपवला.


“रिया तू माझ्याजवळ थांबशील ना ? कुठेही जाणार नाहीस ना मला सोडून.” सतत रियाच्या आई ओवीला हेच बोलत होत्या.


“हो आई.” ओवी अश्रू पुसत म्हणाली.

रियाच्या बाबांना रियाच्या आईच्या गोळीची आठवण झाली. त्यांनी गोळी ओवीच्या हातात देत तिला बजावले. “तू ही गोळी घेतलीस तर तुझी रिया कुठेही जाणार नाही. हो ना रिया.”

ओवीकडे पाहत रियाचे बाबा म्हणाले. ओवी म्हणाली , “हो आई थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले.”


ओवी पाणी आणायला किचनमध्ये गेली तेव्हा त्यांची कामवाली बाई ओवीला म्हणाली , “कशाला या वेड्यांच्या नादाला लागतात. तुमचे जे काम आहे ते करा आणि निघा. मला तर यांच्या घरात काम करायचा अगदी वैताग आला आहे पण हे मला सोडतही नाहीत आणि वर ती मुलगी अगदी सायको आहे. काही खात नाही , पीत नाही ,बोलतही नाही. नुसती वेड्यांची जत्रा भरली आहे यांच्या घरात.”

हे ऐकल्यावर ओवीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिच्या गालात एक चापट मारावी इतकी ओवी चिडली होती. पण रियाच्या आईसाठी ओवीने राग गिळून टाकला आणि पाणी घेऊन रियाच्या आईला गोळी द्यायला गेली.


आज कसलीही तक्रार किंवा कसलीही आदळपट न करता रियाच्या आईंनी शांतपणे गोळी खाल्ली. रियाच्या बाबांना आश्चर्य वाटले.

त्यांनी ओवीकडे पहात हात जोडले. ओवीने डोळ्यातून रियाच्या बाबांना धीर दिला. थोड्यावेळातच रियाच्या आईला डोळा लागला.


ओवी माणुसकीच्या नात्याने रियाच्या आईला या मानसिक आघातातून बाहेर पडायला मदत करेल का ?

पाहूया पुढील भागात क्रमशः