#बंध रेशमी नात्याचे.. भाग-55

ओवीला तो स्पर्श अजूनही जाणवत होता.‘कोण असेल तो ? अर्णव ?’ ओवीचे मन विचार करत होते.
भाग -55




त्या व्यक्तीने अर्णव सिंग रायजादा सरांच्या हातात दिलेली ती पर्स तो व्यक्ती गेल्यानंतर एक्सीडेंट झालेल्या स्त्रीची माहिती मिळविण्यासाठी अर्णवसरांनी उघडली.

आज त्यांना कितीतरी दिवसानंतर त्यांच्या ओवीचा भास होत होता. रोजच मनात असलेली ओवी आज आसपास कुठेतरी आहे अशी त्याच्या मनाला चाहूल लागली होती.

‘हे आज माझ्यासोबत काय घडतेय ? माझी ओवी आसपास कुठेतरी आहे असे मला का वाटतेय ? देवा माझ्या ओवीला नेहमी सुखात ठेव. मी तिला फक्त दुःख दिले पण माझ्या वाट्याची सर्व सुखं तू तिला दे हीच मी तुला रोज प्रार्थना करतो. तिचा अबोला मी दूर नाही करू शकलो. हे गिल्ट माझ्या मनात आयुष्यभर राहील.’ असा मनात विचार करत अर्णवणे पर्समध्ये ओळख शोधण्यासाठी चैन उघडायला हात चैनवर ठेवला.


त्या पर्समध्ये ओवीच्या स्कूलचे आयडेंटी कार्ड होते. ते पाहिल्यावर अर्णव त्याच्या ओवीला लगेच शोधू शकणार होता पण तितक्यात पोलीस तिथे आले आणि नुकत्याच जाॉइन झालेल्या त्यांच्या ऑफिसरला अर्णव ची ओळख करून देत इन्स्पेक्टर म्हणाले “ हे मिस्टर्स अर्णव सिंग रायजादा , थँक्यू सर! एवढे मोठे बिझनेसमॅन वेळात वेळ काढून हॉस्पिटलमध्ये थांबले आहेत आणि ही त्यांची मदतीसाठी धावून यायची पहिलीच वेळ नाहीये. याआधीही कित्येक प्रसंगी आम्ही यांना गरजूंना मदत करताना पाहिले आहे. खरंच तुम्ही व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात. आता तुम्ही गेलात तरी चालेल. आम्ही त्या स्त्रीच्या घरच्यांना त्यांच्या अपघाताविषयी माहिती देऊन त्यांना इथे बोलावून घेऊ. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार.”


अर्णवचा तिथून पाय निघत नव्हता. त्याला त्या स्त्रीची खूप काळजी वाटत होती.

तो म्हणाला , “सर तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगा पण मी ही त्यांना शुद्ध येईपर्यंत इथेच थांबेन. का कोण जाणे ?माझ्या गाडीमुळे त्यांचा अपघात झालाय म्हणून मला इथून जाणे योग्य वाटत नाहीये.” असे म्हणून अर्णवणे पर्स पोलिसांच्या ताब्यात दिली.

पोलिसांनी ओवीचे आय कार्ड पाहिले आणि त्यावरील स्कूलचा नंबर डायल केला. तेव्हा मिस मेरींनी फोन उचलला. पोलिसांनी मॅडमला ओवीचा एक्सीडेंट झाला आहे हे सांगितले.

मिसमेरींना काय करावे तेच कळत नव्हते. आपण ओवीला उगाच त्या मुलीच्या घरी पाठवले आणि त्यामुळेच ओवीचा एक्सीडेंट झाला की काय असे वाटून मिसमेरींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. हात पाय थरथरत होते. त्यांनी ओवीच्या घरी कॉल करून सांगितले तर ओवीचे आई-बाबा घाबरतील हा विचार करून त्या आपल्या सोबत ड्रायव्हरला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. स्टाफमध्ये ओवीच्या एक्सीडेंट बद्दल समजल्यावर सगळेच हळहळ व्यक्त करत होते. मॅडम हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तेव्हा पोलिसांनी त्यांना ओवीविषयी सांगितले.


“आपण कोण?” असे इन्स्पेक्टर ने विचारल्यावर


मिसमेरी म्हणाल्या , “मी तिची आई आहे.”

एवढेच अर्णवने ऐकले होते.

ऑफिसमधून फोन आल्यामुळे अर्णव दूर जाऊन बोलत होता.

पुढे त्या म्हणाल्या , “ खरं सांगायचं तर इन्स्पेक्टर साहेब ओवीचे आणि माझे रक्ताचे नाते नाहीये. मी ओवीला माझी डॉटर मानते. ती गेल्या चार वर्षापासून माझ्या स्कूलमध्ये नोकरी करते. त्यामुळे मला तिच्याविषयी आणि तिच्या घरच्यांविषयी माहिती आहे. तिच्या घरी तिचा एक छोटा मुलगा आणि तिचे आई बाबा राहतात. तिचे आई बाबा आजारी असतात. आता या क्षणी तिच्या घरी फोन केला तर ते खूप घाबरतील म्हणून मी स्वतः इथे आले आहे.
ओवीला शुद्ध येईपर्यंत त्यांना काही सांगायला नको. शुद्ध आल्यानंतर मी स्वतः तिच्या आई-बाबांना फोन करून सांगेन. प्लीज सर , आय विल रिक्वेस्ट यू , तुम्ही सिच्युएशन समजून घ्याल का ?”


“एस ,एस. व्हाय नॉट ?” पोलिसांनी ठीक आहे म्हटल्यावर मिसमेरींच्या जीवात जीव आला.

“थँक्यू सो मच !” म्हणून मिसमेरींनी इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडले.

इन्स्पेक्टर साहेब म्हणाले , “अहो मला कसले थँक्स म्हणताय ? तुम्हाला आभार मानायचेच असतील तर या देवदुताचे माना. हे मिस्टर अर्णवसिंग रायजादा. आज यांच्यात गाडीला तुमची मुलगी धडकली होती.”

मिस मेरींचे डोळे विस्फारले होते. ‘या गृहस्थामुळे माझ्या ओवीचा एक्सीडेंट झालाय आणि मी त्याचे कसले आभार म्हणायचे ?’ हा मनात विचार करून कदाचित त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते.

तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणाले , “मॅडम एक्सीडेंट जरी यांच्याकडून झाला असला तरी चूक पूर्णतः तुमच्या मुलीचीच होती बरं का ! रॉंगसाईडने त्याच आल्या होत्या. कसल्या विचारात होत्या देव जाणे ! त्यांना समोरून येणारी भली मोठी गाडी दिसली नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलेत , त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही काही प्रश्न विचारलेत. सर्वांनी साहेब निर्दोष आहेत हेच सांगितलेय. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही मनात कसलाही गैरसमज करून घेऊ नका.”


आता कुठे मिस मेरींना वास्तव घटनेचे ज्ञान झाले होते.

त्या म्हणाल्या , “या सगळ्यात माझीच चूक आहे. मी त्या मुलीची चौकशी करायला तिला पाठवले नसते तर आज ही वेळच आली नसती. दुसऱ्यांचे दुःख पाहून हळवी होणारी माझी लेक आज मात्र स्वतः दुःखाच्या भोवऱ्यात अडकलीय.” मिस मेरींनी आपले पाणावलेले डोळे टिपले.


मिसमेरी हात जोडून अर्णवला म्हणाल्या , “थँक्यू सो मच!”

अर्णव म्हणाला , “अहो आभार नका मानू. मलाही फार वाईट वाटतेय त्यांच्याबद्दल.”


ऑपरेशन थेटर समोर उभ्या असलेल्या मिस मेरी जीजसची प्रार्थना करू लागल्या.

“प्लीज गॉड ! हेल्पस टू माय डॉटर .”म्हणून त्या चक्क रडत होत्या.

अर्णवला कंपनीतून फोन आल्यामुळे अर्जंट निघावे लागणार होते त्यामुळे अर्णव मिस मेरीजवळ जाऊन म्हणाला , “मॅम डोन्ट वरी. युवर डॉटर वील डेफिनेटली बी फाइन .काळजी करू नका. तुमची मुलगी नक्की ठीक होईल.”


मिसमेरींनी होकारार्थी मान हलवली. अर्णव जड पावलाने निघून गेला.

थोड्यावेळाने डॉक्टर ओ.टी. बाहेर आले. अर्णवणे अमाउंट न लिहीता चेक काउंटर जमा केला होता. कितीही खर्च आला तरी तो खर्च करण्याची अर्णवची तयारी होती पण त्या मुलीने लवकर ठीक व्हायला हवे यासाठी तो प्रयत्न करणार होता. डॉक्टरांना पाहताच मिसमेरी हात जोडून म्हणाल्या , “हाऊज् माय डॉटर डॉक्टर?”


“शी इज आऊट ऑफ डेंजर नाऊ. प्लीज वेट फोर सम टाईम. ती लवकरच शुद्धीवर येईल.” डॉक्टरांच्या या वाक्याने मिसमेरींना खूप आनंद झाला.

त्यांनी चेहऱ्यावर स्मित हास्य करत जीजसचे (गॉड येशूचे )आभार मानले.

थोड्यावेळाने ओवी शुद्धीवर आली. मिस मेरी ओवीजवळ पोहोचल्या. त्यांनी ओवीच्या डोक्यावरून हात फिरवला.


“मिसमेरी मी इथे कशी आली आहे ? काय झाले आहे मला ?” ओवीने आपल्या कपाळावरील पट्टीला हात लावत विचारले.


“ओवी घाबरू नकोस बाळा. तुझा एक छोटासा एक्सीडेंट झाला होता पण एका देवदुताने तुला वाचवले. तू आता आऊट ऑफ डेंजर आहेस. आता फक्त आराम कर. कसलेही टेन्शन घेऊ नकोस. आणि कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नकोस.” मिसमेरी ओवीचा हात हातात घेऊन म्हणाल्या.


ओवीची नजर कोणालातरी शोधत होती हे पाहून मिस मेरी म्हणाल्या ,‌ “ओवी आरव आणि तुझ्या आई बाबांना मी यातले काहीच सांगितले नाही. आता तू शुद्धीवर आली आहेस तर ड्रायव्हरला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला सांगते.”


“ठीक आहे. पण ती व्यक्ती कोण होती ? ज्यांनी माझा आज जीव वाचवला.” ओवी म्हणाली.


“अग ते ना ते खूप मोठे बिझनेसमन आहेत. त्यांना त्यांच्या ऑफिस मधून कॉल आल्यावर निघावे लागले. मी येण्याअगोदर तेच तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होते. तू बरी झालीस की त्यांचे आभार मान हो. मला माहितीये तुला त्यांचे आभार मानायचे असणार. आता तू आराम कर. मी बाहेर थांबते. डॉक्टरांनी तुला रेस्ट करायला सांगितले आहे आणि हो दोन- चार दिवस तर तुला येथे हॉस्पिटलमध्ये थांबावे लागेल.” मिस मेरी म्हणाल्या.


ओवीने होकारार्थी मान हलवली.
ओवीला तो स्पर्श अजूनही जाणवत होता.
‘कोण असेल तो ? अर्णव ?’ ओवीचे मन विचार करत होते.


आरवला स्कूल मधून घेऊन ड्रायव्हर ओवीच्या घरी पोहोचले. मिस मेरीने सांगितल्याप्रमाणे ओवीच्या एक्सीडेंट विषयी ड्रायव्हरने ओवीच्या आई बाबांना काहीही सांगितले नाही. फक्त मिसमेरींनी त्यांना भेटायला बोलावले आहे एवढेच सांगितले.


ओवीचे आई बाबा ड्रायव्हर सोबत जातील का ? ओवीला अशा अवस्थेत पाहिल्यावर त्यांना काय वाटेल ?
आरव व आर्याचे सत्य ओवी आई बाबांना सांगू शकेल का ?


पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ.प्राजक्ता पाटील (प्राजक्तराज)

🎭 Series Post

View all