बंधन भाग 1

Love Story, Social Issues


( नमस्कार वाचकहो, कसे आहात ? खुमासदार कथा दररोज वाचायला मिळतात म्हणजे आनंदीच असणार तुम्ही तर आजपासुन एक नवीकोरी कथा तुमच्या भेटीला येतेय पण हि कथा ' निरागस प्रेमाच्या गोष्टी ' सारखी छान गोड गोड नसणार आहे यात बरीचशी वेगवेगळी पात्र तुम्हाला भेटणार आहेत आणि बरेच ट्विस्ट टर्न कथेत येतील सो तयार रहा आणि वाचत रहा. नवे भाग दर दोन- तीन दिवसांनी न चुकता प्रकाशित होतील काळजी नसावी )
टिप - सदर कथेतील कोणतीही व्यक्ती,घटना, स्थळांची नावे ही निव्वळ काल्पनिक आहेत. कथेची परिणामकारकता साधण्यासाठी काही वास्तवघटनांचा संदर्भ घेतला आहे. सदर कथा ही प्रेमकथा असली तरी काही सामाजिक प्रश्नांना स्पर्शून जाते पण कथा वैचारिक,सामाजिक नाही हि निव्वळ प्रेमकथा आहे याची नोंद घ्यावी )
 
" वाव ताई ! लुक्स ब्युटिफुल हा " आरश्यासमोर उभ्या असणार्‍या अनघाच्या गळ्यात हात टाकुन तिचे गालगुच्चे घेत रिया म्हणाली.
" थँक्यु " थोडीशी मान कलती करुन रियाच्या गालांवर हात फिरवत ती म्हणाली. " काय मग रिया मॅडम आज तुम्हाला अॉफिस नाही वाटतं. " आहे गं ताई " तिने अनघाच्या गळ्यातून हात बाजूला केले.
" मग " अनघाने तिच्याकडे वळून विचारल.
" त्याचं कसं आहे ना ताई आज तु इंटिरव्ह्युला जाणार ना म्हणून म्हटलं आपण जरा शुभेच्छा द्यावा."
" असं का बरं बरं " तिला रियाचं कौतुक वाटलं. तसं ते नेहमीच वाटतं म्हणा. दोघी बहिणींचा एकमेकींवर खूप जीव. त्यात वयाचं फार अंतर दोघींमध्ये नाही त्यामुळे दोघी मैत्रीणी सारख्याच एकमेकीशी वागतं. रियाचं नुकतंच कॉलेज पूर्ण झालं होतं पण तिच्या मनासारखा जॉबही तिला इथेच सांगलीतच मिळाला त्यामुळे ती खूश होती. अनघाने मात्र मॅनेजमेंन्टची पदवी शहरातील नावाजलेल्या ' गुरूकुल इंन्स्टिट्युट' मधून घेतली आणि एम.बी.ए. मुंबईतल्या 'के.जे. सोमय्या इंन्स्टिट्युट ' मधून पुर्ण केलं होतं. मुंबईत शिक्षण घेताना तिने एक गोष्ट ठरवली होती आपण एम.बी.ए.नंतर शिक्षकी पेशा स्विकारायचा. खरंतर एम.बी.ए.नंतर मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची पोस्ट, परदेशात जाण्याची संधी अशी किती स्वप्न असतात. तिच्यासोबत शिकणार्‍या प्रत्येकाची हिच स्वप्नं होती पण अनघाला मात्र आपल्या घरी सांगलीला परतायचं होतं. तिथेच प्राध्यापिकेची नोकरी करण्याची तिची इच्छा होती. घरी आई- बाबांनाही तिचा हा निर्णय मान्य होता. तिने घेतलेले निर्णय, तिच्या इच्छा याच्या आड ते कधीच येत नसत. आईबाबा, बहिण सगळ्यांचा छान सपोर्ट नेहमीच असायचा तिला. आजही ती इंन्टिरव्हुयला जाणार म्हणून घरचेच तिच्यापेक्षा जास्त एक्साइटेड होते. रिया मुद्दामहून सकाळपासुन तिच्या मागे मागे करत होती. आताही तिची तयारी होताच रिया रुममध्ये आली आणि तिची थट्टा करायला सुरूवात केली. आईने हाक मारताच दोघी खाली आल्या.
" अनु सगळे डॉक्युमेंन्ट्स घेतले का व्यवस्थित " श्रीधरने ( तिच्या बाबांनी) विचारलं.
" हो बाबा, फाईल नीट घेतलेली आहे." बाबांकडे ती धावत आली आणी त्यांना वाकून नमस्कार केला.
" यशस्वी भव, ए कुमुद अगं झालं का ये अनु निघाली बघ." श्रीधरच्या आवाजासरशी कुमुद ( अनघाची आई ) बाहेर आली. अनघाने आईला नमस्कार केला.
" हे घे पाण्याची बॉटल आणि डबाही घेऊन जा." आई म्हणाली.
" आई कश्याला एवढं सगळं मी कँन्टिनमध्ये खाल्ल असतं ना ! " अनु बॉटल पर्समध्ये ठेवत म्हणाली.
" नको, नी तसंही आज पहिल्यादांच तुला कॉलेजला जाताना डबा देतेय आणी आज आपण तुमच्या कॉलेजच्या स्टुडंट म्हणून नव्हे भावी प्राध्यापिका बाई म्हणून जाताय लक्षात असु दे." आई दटावत म्हणाली.
" हो हो आई " तिने मुकाटपणे मग डबाही पर्समध्ये घातला.
" चला मी येते " ती दाराबाहेर गेली. तशी रिया आतून दोन अंगठे उंचावून तिला बेस्ट लक देत होती.
" बाय बाय " सगळ्यांना तिने पुन्हा बाय म्हटलं.
" छान उत्तरं दे काय विचारतील त्याची. नीट जा वेळेवर पोच तिकडे." आई दारातून सुचना देतच होती.
" हो आई " गेटपाशी जात ती म्हणाली.
........................
" ताईला हा जॉब मिळाला तर किती मस्त ना! तिचं स्वप्न होतं 'गुरुकुल ' मध्येच जॉब करायचा. ती कॉलेजला होती तेव्हा पण सगळ्यांची ' फेव्हरेट स्टुंडट ' होती नाही ! " रिया तीन- चार वर्षांपुर्वीच्या ताईच्या कॉलेजलाईफच्या आठवणींना उजाळा देत म्हणाली.
" हो ना ! ती टि.वायला कॉलेजमध्ये पहिली आली होती तेव्हा भाऊसाहेब स्वतः घरी आले होते." बाबा म्हणाले.
" दरवर्षीच्या बक्षीससमारंभात हिला एखादं बक्षीस तरी भाऊसाहेबांच्या हातून मिळायचंच. टि.वाय.चा रिझल्ट कळल्यावर तर त्यांना इतका आनंद झाला होता. म्हणाले होते, हुशार आहे तुमची अनु तिला मनाप्रमाणे शिकू द्या." आई अभिमानाने म्हणाली.
" बरं आम्हाला नाश्ता मिळणार आहे का नाही " रियाने हसतच विषय बदलला आणि आई हो म्हणून आत गेली. अनघाचा इंटरव्हियु छान व्हावा म्हणून बाबांनी मनातून प्रार्थना केली.
.................................
 
वेगाने एक स्कोर्रपिओ येऊन 'गुरुकुल' च्या भल्या मोठ्या गेटपाशी थांबली. तसे प्रवेशद्वारापाशी उभे असलेले दोन्ही सिक्युरिटी गार्ड पुढे आले आणी त्यांनी गेट दोन्ही बाजूने उघडून गाडीला आतमध्ये जाण्यास प्रवेश दिला. गाडी थोडी आतमध्ये नेऊन ड्रायवरने एका बाजूला पार्क केली. तो खाली उतरला आणी त्याने गाडीचा दरवाजा अदबीने उघडला. गाडीतून साधारणतः सत्तावन्न- अठ्ठावन्न वयाचे एक गृहस्थ उतरले. पांढरेशुभ्र धोतर, सदरा त्यावर काळ्या रंगाचा कोट, पायात खणखणीत कोल्हापुरी चपला अश्या वेशातील ती व्यक्ती त्या ड्रायव्हरकडे पाहून हसली. कपाळावरच्या कितीतरी गोड कडू अनुभवांच्या सुरकत्या तरिही प्रसन्न, कनवाळू कोणालाही आपलंसं करणारी ती मुद्रा. त्या गृहस्थांच्या नजरेनं अभिमानाने त्या सहा मजली इमारतीवरती झळकणार्‍या नावाकडे पाहिलं, ' Gurukul Institute of Management& Technology 'अशी अक्षरं झळकत होती. सुमारे बाहत्तर एकरवरती वसलेली ती एक स्वायत्त शिक्षणसंस्था होती. मॅनेजमेंन्ट आणी आयटी विद्यार्थ्यांकरिता असलेली विश्वासू संस्था. सांगलीच नव्हे तर आजुबाजुच्या जिल्ह्यांतही त्या संस्थेची ख्याती पसरली होती. शहरातल्या मुलांना बी.एस.सी आयटी, कंप्युटर सायन्स, मॅनेजमेंन्ट स्टडिज, एम.सी.ए या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुंबई- पुण्याला जायला लागू नये. या कोर्सेस साठी होणारा खर्च, त्यातून मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याचा, खाण्या- पिण्याचा खर्च, इथल्या पालकांची मुलांना बाहेर पाठवताना वाटणारी काळजी हे सगळं लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना केली गेली. सोबतच मुलांकरिता समोर वृक्षांनी नटलेलं गार्डन, भव्य वाचनालय, प्लेसमेंन्ट सेल, ग्राहक भांडार, विद्यार्थी विकास मंडळातून ' कमवा व शिका योजना', सांगलीतून आलेल्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींकरिता तीन मजली वसतिगृह, खानावळ अश्या सार्‍या सोयींनीयुक्त अशी शिक्षणसंस्था.
" भाऊसाहेब, येताय ना " पुढे गेलेला ड्रायव्हर पुन्हा त्यांच्यापाशी येत म्हणाला. तशी त्यांची वरती पाहणारी नजर ड्रायव्हरकडे गेली.
" हो " म्हणत ते कॉलेजच्या आवाराच्या दिशेने चालू लागले.
ते पायरीच्या दिशेने येताना पाहून प्राचार्यांच्या केबिनबाहेरचा प्युन शंकर उठून लगबगीने आतमध्ये गेला आणि बाहेर आला. त्याच्या मागोमाग केबिनमधून प्राचार्य करंबेळकरही बाहेर आले. भाऊसाहेब पायर्‍या चढून वरती गेले.
" या या साहेब" प्राचार्य समोर येत अदबीने म्हणाले. इतक्यात शिपाई दिनेश हातात झेंडूच्या ताज्या फुलांचा हार घेऊन आला. भाऊसाहेबांनी पायातील चपला काढून बाजूला ठेवल्या. समोर काळ्या पाषाणाच्या उभ्या असणार्‍या प्रतिमेला त्यांनी नतमस्तक होऊन वंदन केलं आणी हार घातला. तोपर्यंत दोन्ही शिपाई, ड्रायव्हर, प्राचार्य शांतपणे उभे राहिले. त्यानंतर भाऊसाहेबांनी विचारलं," आलेत का सगळे ?"
" हो भाऊ, इच्छुक उमेद्वार मघाशीच आलेत." प्राचार्य म्हणाले.
" बरं,मग शुभस्य शिघ्रम. मुलाखतींना सुरूवात करुया. तुम्ही आहातच, खंदारे मॅडम आणि उपप्राचार्यांनाही बोलवा केबीनमध्ये." त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिपाई खंदारे मॅडम आणि उपप्राचार्यांना बोलवायला गेले.भाऊसाहेबांसह प्राचार्य केबिनकडे वळले.
 
क्रमशः
( आता दुसर्‍या भागात याच मुलाखतीकरता आलेल्या अनघाचा इंटरव्हियु कसा होतो, तिला जॉब मिळतो का कि अजून काही घडतं खरंतर कथेत खूप उलथापालथ पुढे होणार आहे आणि हो अजून बर्‍याच पात्रांना आपल्याला भेटायचं आहे. आज आपण अनघा, तिच्या घरातल्यांना भेटलो. 'गुरुकुल' ला भेटलो. आता पाहुया पुढे

🎭 Series Post

View all