भाग 101
( गेल्या भागात दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्याने आठवणीने तिला शुभेच्छा दिल्या.पण तिने नताशासोबत त्याला बोलताना पाहिलं आणि रागातच तिने त्याला अँकलेट्सचं गिफ्ट परत पाठवून दिलं. तिच्या वागण्याचा उलट परिणाम झाला आणि त्याने तिला यावरुन बरचस सुनावलं. पाहूया पुढे)
सामंत सर नुकतेच कॉलेजमधून घरी आले. आल्या आल्या आधी त्यांनी क्षीणलेला देह सोफ्यावरती टेकवला. ए.सी.च्या थंड गार झुळकीने त्यांना जरा बरं वाटलं. एप्रिल नुकताच सुरु झाला होता. एप्रिल-मे परीक्षांचे महिने म्हटलं की कॉलेजमध्ये कामांचा व्याप संपता संपायचा नाही. त्यांनी खिश्यातील मोबाईल बाजूला ठेवला आणि राजेशला हाक मारली.
" राजेश, अरे पाणी घेऊन ये जरा."
पहिल्या हाकेसरशी ओ देईल तर तो राजेश कसला! ते स्वतःच स्वतःवरती हसले आणि उठून स्वयंपाक घरात गेले.
..............................................
राजेश मघापासून खोलीत येरझार्या घालत होता. आपण काहीतरी मोठा स्फोट करायचं ठरवलेलं आहे इथपर्यंत ठीक. पण हे सगळं पुढे आपल्या अंगलट यायला नको असही मन त्याला बजावत होतं. पण काहीही करून विक्रमची निंदानालस्ती झालेली त्याला हवीच होती. त्याने बरेच दिवस वाट पाहिली नताशाच्या मदतीने तिला विक्रम बद्दल उलट-सुलट सांगून इतका प्लॅन तयार केला पण अनघा... त्या दिवशीची अनघाची प्रतिक्रिया त्याच्यासाठी अनपेक्षित होती. त्याला वाटलं होतं आपण अनघाला सगळं सत्य सांगितलं म्हटल्यावर ती आपले आभार मानेल. एकटी पडलेली, विक्रमच्या कचाट्यात फसलेली ती रडेल, ओरडेल मग आपण तिला मदतीचा हात देऊ आणि तिच्या सतत संपर्कात राहून जितकं विक्रम विषयी, त्याच्या स्वभावाविषयी सांगता येईल तितके सांगू. त्याला माहीत होतं आपल्याला काही तिखट-मीठ लावून तिला सांगण्याची गरजच पडणार नाही कारण विक्रमने कॉलेजमध्ये केलेले कारनामे आणि त्याचा स्वभावच त्यासाठी पुरे आहे. त्याला माहीत होतं. अनघा अगदी विक्रम सारखी स्वतःच्याच मतांवर अडून राहणारी, स्वाभिमानी, हुशार, हट्टी आणि तितकीच इगोइस्ट आहे. पण दोघांमध्ये एकच गोष्ट वेगळी ती म्हणजे दोघांच्या कामांबाबतीतली तत्व. तिचा प्रामाणिकपणा आणि त्याचा खोटेपणा, तिचं कॉलेज बाबतीत, भाऊसाहेबांबद्दल हळवं असणं आणि त्याचा कॉलेज बद्दल चा बिजनेस माईन्डचा दृष्टिकोन याचा उपयोग करून दरी निर्माण करता येईल असा त्याचा मानस होता. ज्या मुलीकरता आपल्या मित्राने आपल्यावरती हात उगारला तीच मुलगी जेव्हा त्याला नजरेसमोरही उभं करणार नाही तेव्हा त्याला होणार्या यातना बघूनच आपल्या जीवाचं समाधान होईल. पण अनघा राजेशिर्केंचं घर सोडून गेल्यानंतर पुढे काहीच घडलं नव्हतं. तो त्याच्या घरी आणि ती तिच्या माहेरी. कॉलेजमध्ये पुन्हा ' आदर्श जोडपं ' म्हणून ते मिरवत होते ते वेगळंच. त्याने ठरवलं, आता खरंच भूकंप घडवण्याची वेळ आलीय! याच सगळ्या प्रयत्नामध्ये तो काही दिवसांपासून होता. या त्याच्या खटाटोपांची कल्पना मात्र कोणालाच नव्हती अगदी नताशालासुद्धा नाही! तो याच विचारात होता इतक्यात हातातल्या मोबाईलच्या रिंगटोनने तो भानावर आला.
" हॅलो, बोल रे."
काहीतरी मनाजोगी बातमी ऐकायला मिळेल या उत्सुकतेने त्याने विचारलं.
" रे मित्रा, डन..... काम झालं. तु मला जी खबर दिली होतीस. त्याची इन्फॉर्मेशन काढली मी आणि जे काही समजलं ते बापूसाहेबांना जाऊन त्यांच्या कानावर घातलं. आता बघ कसा धमाका होतो ते!"
" अरे यार, काय माणूस आहेस तू! पण यात माझं नाव नाही ना इन्लव्होलव होणार."
" नाही रे, बापूसाहेब तुला कसा माणूस आहे ते माहितीय न! त्यातून विरोधी पक्षाचे नेते आहेत ते! भाऊसाहेबांवर टिकेचे बाण सोडायचा एक चान्स सोडत नाही तो माणूस. तेव्हा डोन्ट व्हरी."
" ओके " राजेश कसतरी म्हणाला तसा पलिकडून त्याचा मित्र त्याला धीर देत पुन्हा म्हणाला,
" अरे यार डोन्ट व्हरी. पत्रकार आहे मी शेवटी. कोणाचं नाव कुठे घ्यायचं न कुठे नाही ते बरोबर कळतं आम्हा लोकांना." तो हसत म्हणाला.
" हो रे बॉस." राजेशने मनातली शंका झटकून टाकतं म्हटलं.
" राजेश, ओ माय गॉड! हे न्युजवरती बघ ना काय दाखवतायत." हॉलमधून सामंतसर घराला आग लागल्यासारखे ओरडत होते. त्याला हाका मारत होते.
" ए, चल थँक्स रे. ओके बाय." राजेशने अत्यानंदाने फोन ठेवून दिला आणि आपल्याला काहीच माहित नाही असा चेहरा ठेवत तो धावत हॉलमध्ये गेला.
............................................................
" What happened डॅड ?" चेहऱ्यावरती साळसूदपणाचा आव आणत त्याने विचारलं.
" अरे, हे बघ काय! " भेदरलेल्या नजरेने सामंतांनी समोरच्या टीव्हीवरल्या बातमीकडे त्याचं लक्ष वेधलं. टीव्हीच्या पडद्यावर ठळक अक्षरात ब्रेकिंग न्यूज असे शब्द धडाधड आपटत होते. वृत्तनिवेदक खणखणीत आवाजात पुन्हा पुन्हा म्हणत होती,
' माजी आमदार बापूसाहेब धनावडे यांचे गंभीर आरोप गुरुकुल इन्स्टिट्यूट वरती भ्रष्टाचाराचे आरोप '
दोनदा तिने बातमी सांगितली आणि मग नेहमीच्या टोन मध्ये अधिक माहिती जाणून घेऊया आमचे सांगलीचे प्रतिनिधी ऋत्विक साळवे. आता टीव्ही स्क्रीनवर एका बाजूला ती न्यूज रूम मधील वृत्तनिवेदक आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा दुसरा रिपोर्टर दोघांचे चेहरे दिसू लागले.
" हॅलो, वृषाली. आता तासाभरापुर्वीच बापूसाहेबांनी हे आरोप केल्याचं कळतय आणि त्यांनी यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे आहेत असं देखील म्हटलं आहे. या सगळ्यात गुरुकुलचे सद्याचे डायरेक्टर आणि भाऊसाहेबांचे थोरले चिरंजीव विक्रम राजेशिर्केंवरती बरेचसे ताशेरे त्यांनी ओढलेत. त्यांच्या संमतीनेच हा प्रकार सुरू होता आणि त्याचा विद्यार्थी आणि पालकांना मनःस्ताप होत होता म्हणून काही पालक या संबंधीची तक्रार घेऊन बापूसाहेबांना भेटले असं त्यांनी मघाच्या पत्रकार परिषदेत म्हटलं. पुढे जाऊन ते असंदेखील म्हणाले या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी चाप बसवण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांच्या सुनबाईंनी केला होता आणि यातूनच विक्रम राजेशिर्केंनी त्यांना प्रेशराईझ्ड करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं प्रकरण कौटुंबिक हिंसाचारापर्यंत पोचलं होतं. तुर्तास भाऊसाहेबांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.पण आताच्या घडीची ही धक्कादायक बातमी. यातून सांगली आणि पर्यायाने प.महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार आहे कारण ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरलाय ते पाहता आता पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कॅमेरामन प्रसाद, व्हिडीओ जर्नालिस्ट अमीतसह मी ऋत्विक साळवे, सांगली एम न्यूज."
राजेश आणि सामंत सर संमोहित केल्यासारखे टी.व्ही.च्या स्क्रीनकडे पाहत होते. राजेशला मनातून आनंद होत होता पण सामंतांच्या समोर त्याने आपल्याला धक्का बसल्याचं भासवलं.
" बापरे! कोणी ही बातमी लिक केली असेल? This's not right ! हे असं व्हायला नको होतं. गुरुकुलचं नाव खराब व्हायला नको."
त्यांनी पुन्हा पुन्हा दोन - तीन न्यूज चॅनेल्स पाहिले. सगळीकडे तीच बातमी ' ब्रेकिंग न्यूज ' म्हणून पुन्हा पुन्हा दाखवली जात होती. न्यूजअँकर ओरडून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत होते. सामंतांना ते ऐकवेना. त्यांनी टीव्ही बंद केला. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. निकम सरांचा फोन होता! एव्हाना सगळ्यापर्यंत ही बातमी पोहोचली होती. प्राध्यापकांची फोनाफोनी सुरु झाली. असं व्हायला नको होतं हाच सूर प्रत्येकाच्या बोलण्यात होता. सामंतसर यात स्वतः गुंतले होते. कॉलेजच्या गैरव्यवहारात त्यांचाही हात होताच. पण कधीतरी हे सगळं प्रकरण अश्याप्रकारे बाहेर येईल आणि कॉलेजची बदनामी होईल अशी कल्पनादेखील त्यांनी कधी केली नव्हती. तेही कॉलेजचे प्राध्यापक होते. इतकी वर्षे त्यांनी तिथं काम केलं होतं. आपण इतक्या मोठ्या कॉलेजचे प्राध्यापक आहोत याचा अभिमान इतर प्राध्यापकांसारखा त्यांनाही होता. त्यामुळे या बातमीने त्यांनाही चांगलाच धक्का बसला होता. राजेश मात्र आता या ठिणगीची पुढे आग कशी होईल याकडे लक्ष देत होता. कोणत्याही पद्धतीने का होईना त्याला विक्रमची बदनामी झाली याचा आनंदच जास्त होता.
..........................................................
एव्हाना ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. राजकारणातल्या लोकांचे एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप हे काही राजेशिर्केंच्या घरासाठी नवीन नव्हतं. विरोधी पक्ष त्यातून बापूसाहेब अधून मधून काही ना काही कारणं काढून भाऊ साहेबांवरती टीका करायचे. ते आणि बापूसाहेब यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या तीन दशकांपासून सुरू होता आणि जिल्ह्यातील जनतेसाठी भाऊसाहेबांच्या, पक्षासाठी हे सवयीचं होत. पण जी टीका व्हायची ती आजवर नेहमीच राजकारणापुरती मर्यादित असायची. आज पहिल्यांदाच घरातल्या गोष्टींवरून बाहेर राजकारण सुरू झालं होतं. ज्याचं भाऊसाहेबांना वाईट वाटत होतं. ठणकावून सगळं नाकारता येईल असेही हे आरोप नव्हते. बापूसाहेब पत्रकारांसोबत बोलले होते ते नाही म्हटलं तरी गुरुकुलच्या बाबतीत घडलेलं होतं त्यामुळे माध्यमांशी बोलण्यापूर्वी भाऊसाहेब शांत होते. त्यांनी घाईने कोणतीही प्रतिक्रिया देणे तूर्तास टाळलं. आपल्या कोणत्याही वक्तव्यामुळे बापूसाहेबांना पुन्हा बोलण्याची संधी त्यांना द्यायची नव्हती.
..................................................
दुपारी ही बातमी प्राचार्यांच्या पर्यंत पोहोचली तस त्यांनी आधी विक्रमला फोन लावला. प्राचार्यांना काय करावं, सगळ्यांना काय उत्तर द्यावं काही सुचत नव्हतं. प्राध्यापकांचे एकामागोमाग एक फोन येत होते. व्हाट्सअप वर मेसेजेसचा खच पडला होता. तेच तेच बघून त्यांचं डोकं अक्षरशः बधीर झालं होतं. म्हणून त्यांनी धीर एकवटून विक्रमलाच फोन केला.
" हॅलो, विक्रमसर, अहो ती न्यूज........"
ते काळजीच्या सुरात बोलायला लागले.
" Yeah, I know. मी पण पाहिलं ते! " तो शांतपणे बोलला.
" सर, पण हे असं व्हायला नको होतं. This is not right. आपल्या कॉलेजची सगळी प्रेसटीज अशी धुळीला मिळाली."
प्राचार्यांना घडलेल्या गोष्टीचा धक्का बसला होताच शिवाय त्रासही झाला होता. त्यांच्या आवाजातून ते विक्रमला जाणवत होतं.
" करंबेळकर सर, जस्ट रिलॅक्स आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला किंवा निंबाळकर सरांना या सगळ्याचा दोष नाही देणार कोणी. तुमची यात काही चूक नाही."
तो त्यांना समजावत बोलला.
" माझ्यावर ठपका येतो की नाही हा प्रश्नच नाही सर. पण गेली पंधरा वर्ष अगदी कॉलेजच्या स्थापनेपासून आम्ही इथे काम करतोय. गुरुकुल जितकं भाऊसाहेबांचं आहे तितकंच आमचं सुद्धा आहे ना! त्यांचं स्वप्न मोठं करणं हे आम्हा कुटुंबियांचं काम आहे. असं काही घडलं तर आम्हाला तरी सुखाची झोप लागेल का!"
प्राचार्य पोटतिडकीने बोलत होते.
" सर, मला तुमचा कन्सरन समजतोय. तुम्ही शांत व्हा."
" विक्रम, गुरुकुल ला आम्ही काम करतो मान्य. पण हे काही कॉर्पोरेट ऑफिस नव्हे. टार्गेट पुर्ण केली, कामाचे तास संपले घरी गेलं. विद्यादान करणारी वास्तू आहे ही! आपण मुलांची भविष्य घडवतो आणि हे असं काही घडलं की मग त्रास होतो ."
त्याचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं. किती साध्या शब्दात सर बोलून गेले. आपल्याला मात्र बिजनेस आणि शिक्षण यात फरक असतो हे समजायला तीन वर्ष लागली! गुरुकुलची सूत्र हातात घेतल्यापासूनची तीन - चार वर्ष तर आपण शिक्षणाचा व्यवसायच करून टाकला होता. पण अनघा.....ती गुरुकुलला जॉईन झाली आणि त्या वर्षापासून असं सगळंच बदललं.
" सर, सर ऐकताय ना." प्राचार्य अजून फोनवरती बोलत होते. तो विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला.
" हा.....सर Don't Worry. मी बघतो काय करता येईल ते!"
इतकं बोलून त्याने फोन ठेवला.
.........................................................
दुपारी डायनिंग टेबल ला जितेंद्र, नीतू बसले होते. या सगळ्या बातम्या ऐकून त्यांनाही धक्का बसला होता. आत्याने स्वयंपाकघरातून जेवणाची भांडी आणून डायनिंग टेबलवरती ठेवली. आत्याकडे लक्ष देत जितेंद्रने विचारलं,
" आत्या, ते बापूसाहेब काहीही काय ग बरळतात! काय तर म्हणे कौटुंबिक हिंसाचार!"
जितेंद्र रागाने म्हणाला.
" आरं, तेची जुनी खोड हाय ती. बेरकी मानूस त्यो."
आत्यालाही बापूसाहेबांनी भाऊ साहेबांच्या विरोधात बोलणं काही नवं नव्हतं. भाऊसाहेब पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभे होते तेव्हापासून ती बापूलाही त्यांच्या विरोधात पाहत होती.
" जित्या, ते बोलले ते चूक पण शंभर टक्के चुकीचं नाहीय ते! We know that. कौटुंबिक हिंसाचारापेक्षा भयंकर वागलाय तो वहिनी सोबत. नी भ्रष्टाचाराचे आरोपही खरेच आहेत की."
नीतू जेवता - जेवता म्हणाली. या दोघात पुन्हा विक्रमवरून वाद होईल हे आत्याच्या लक्षात आलं.
" नीतू मान्य आहे हे मला. पण अग याचा वापर राजकारणासाठी करून घेतायत ते." जितेंद्र पाणी पीत म्हणाला.
" अरे हो की. पण समोरच्याला बोलायची आपण संधीच का द्या. बाय द वे ज्या माणसामुळे हा सगळा तमाशा झालाय त्याला काही फरक पडतोय का ? नाही. मग आपण का डिस्कस करतोय यावर!"
नीतू रागात बोलली.
"ए बाबांनो तुमी आता उगा भांडू नका बरं." आत्या दोघांना शांत करीत म्हणाली. इतक्यात अरुंधती खाली आली.
" चला, आत्तु झालं माझं जेवण."
अरुंधतीला समोर पाहून नीतू खुर्चीतून उठली. अरुंधतीने विक्रमची बाजू घेणं नीतूला आवडत नव्हतं. आताही आई जितेंद्रला विक्रम कसा डिस्टरब आहे हेच सांगेल असा नीतूला अंदाज आला तशी ती उठून निघून गेली. अरुंधती खुर्ची ओढून बसली. आत्या नीतूचं रिकामी ताट उचलून स्वयंपाक घरात गेली. आता ते दोघंच उरले.
" मम्मा, साहेब......" जितेंद्रने हळूच विषय काढला.
" ठीक आहेत. त्यांना बसू देत थोडावेळ शांतपणे." अरुंधती म्हणाली.
" हर्ट झाले असतील ना ग ते खूप! आणि मम्मा या सगळ्याला कुठे ना कुठे तरी विक्रमच जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यांना अजूनच वाईट वाटत असेल."
जितेंद्र शहाण्या मुलासारखा बोलत होता.
" हो, ते इमोशनल आहेत तसे आणि आपली शाळा, गुरुकुल या बाबतीत तर खूपच. तुमच्या आजी- आजोबांचं स्वप्न आहे ते."
अरुंधती श्रीपाद - शारदाच्या आठवणीत बोलत होती.
" हे काय अशीच का बसलीस. जेव की!" जितेंद्र तिच्या रिकामी ताटाकडे पाहत म्हणाला. तिने अजून जेवण वाढून घेतलं नव्हतं.
" नको, त्यांच्यासोबत जेवीन नंतर." ती सहज म्हणाली तसं जितेंद्र च्या चेहेऱ्यावर हसू आलं.
" मम्मा, तू पण ना! अग हे काही नवीन आहे का त्यांच्यासाठी ! राजकारण म्हटलं की हे सगळं होतच असतं."
" असो....... काहीही. तू जेव लवकर." ती त्याला समजावत म्हणाली. भाऊसाहेब विक्रम मधला संवाद अजून बिघडेल का याची चिंता तिला सतावत होती. लवकरात लवकर हे न्यूजप्रकरण संपावं हीच प्रार्थना ती करत होती.
....................................................
टी.व्ही.वरुन ज्या बातम्या येत होत्या ते सगळं पाहून अनघाचे आई-बाबा काळजीत पडले होते. त्यांच्यासाठी हे सगळं धक्कादायक आणि नवीन होतं. घरात बोलतानाही आपला आवाज चार भिंतींबाहेर जाणार नाही याची काळजी घेऊन बोलणारी आणि बाहेरची चार लोक आपल्या कडे बोट दाखवून बोलणार नाहीत याचं भान ठेवून चार चौघात वागणारी अशी साध्या कुटुंबातली माणसं होती ती! हे सगळं जरी अनघाच्या बाजूने बोललं गेलं असलं तरी ही त्यांच्यासाठी हे सगळं बदनामी पेक्षा कमी नव्हतं आणि या सगळ्याला त्यांच्यालेखी जबाबदार असणारी व्यक्ती एकच होती विक्रम. ती बातमी पसरल्यानंतर भाऊसाहेबांनी आधी श्रीधररावांना फोन केला होता. तुम्ही नका चिंता करू. यामुळे तिला त्रास होणार नाही असा धीर दिला तेव्हा कुठे श्रीधर रावांच्या जीवात जीव आला तरीही उद्या सकाळी ती बाहेर कशी जाणार आणि बाहेर दहा लोकं दहा तोंडाने बोलणारी भेटतील. या सगळ्यात बापूसाहेबांनी अप्रत्यक्षपणे तिलाही ओढलं होतं त्यामुळे नक्की काय झालं, खरंच विक्रम तुझ्याशी बापूसाहेब म्हणतायत असं वागले का? त्रास दिला म्हणजे शारीरिक की मानसिक ? तू का गप्प बसलीस असे शंभर प्रश्न विचारणारे ओळखीपाळखीचे लोक भेटतील. कॉलेजमध्ये कुणी ताळतंत्र सोडून कुचाळक्या करणार नाही तरीदेखील सगळ्यांच्या नजरेत प्रश्नचिन्ह असतीलच. या सगळ्याचा विचार करून श्रीधर अस्वस्थ झाले. रात्री त्यांनी अनघाकडे हा विषय काढला.
" तू काय करायचं ठरवलयस? म्हणजे उद्या जाणार आहेस का कॉलेजला ?"
ती जेवायला खोलीतून खाली डायनिंग टेबलला आली तसा श्रीधरनी विषय काढला.
" हो बाबा जाईन उद्या. घरी बसून प्रश्न सुटणार आहेत का ?"
ती खुर्ची वरती बसली.
" अनु बरोबर आहे तुझं. पण या सगळ्याचा नाही म्हटलं तरी त्रास होणारचं." कुमुद काळजीने बोलली.
" आई हे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे. त्यांच्यामुळे ताईच सगळं लाइफ स्पॉईल झालंय. छे! का आले ते ताईच्या लाईफमध्ये." रिया समोरच्या खुर्चीवर बसली होती आणि रागाने बोलत होती.
" हो, बरोबर आहे तुझं. पण काय बोलणार आता. त्या वेळी जराशी जरी कल्पना असती तरी हे लग्न होऊ दिलं नसतं आम्ही." कुमुद बोलली तसं अनघाने पटकन नजर वरती वळवली.
" असला जावई असण्यापेक्षा नसलेला बरा. ज्या दिवशी तो माणूस हिच्या आयुष्यात आला आहे त्या दिवसापासून दुःखाशिवाय काहीही मिळालं नाही. असो. मला तर त्यांच्याविषयी काही बोलायचीही इच्छा उरलेली नाही."
श्रीधरच्या शब्दातून विक्रमबद्दलची त्यांची नाराजी तिला दिसत होती.
" बाबा, आई तुम्ही नका विचार करत बसू. होईल ठीक सगळं .आणि मी..... मी ठीक आहे. डोन्ट वरी."
आई-बाबांना धीर देत ती म्हणाली. आता प्रश्न होता उद्या घराबाहेर पडल्यानंतरचा. तिने ठरवलं आता जे समोर येईल त्याला सामोरं जायचं. रडत - कुढत बसण्याची ही वेळ नाही. आणि रडलं तरी आता डोळे पुसणारं, मी आहे न सोबत म्हणून हातात हात देऊन समजावणारही कोणी नाही. आपण एकटे आहोत. आपण आपल्याला खंबीर बनवायला हवं. उभं राहायला हवं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा