बंधन भाग 12

Love, Social Issues

भाग 12
( गेल्या भागात विकेंन्डच्या निमित्ताने विक्रम आणि त्याचे मित्र फार्महाऊसला जातात. त्यांच्यातल्या गप्पा,चेष्टामस्करीतून विक्रमचा स्वभाव तुमच्या बर्‍यापैकी लक्षात आला असेल. स्वतःच्या बुद्धीमत्तेचा आणि व्यक्तीमत्वाचा अभिमान त्याला आहे. त्यासोबतच कुठल्याही परिस्थितीत जे हवं ते मिळवायचं असा त्याचा अॅटिट्युड आहे. प्रॅक्टिकली विचार करणारा,कामाच्याबाबतीत चोख असणारा असा त्याचा स्वभाव यासोबतच होणार्‍या लाईफपार्टनरविषयीची त्याची मतंही तुम्हाला गेल्या भागात समजली आणि एक नेहमी ही कथा वाचताना लक्षात ठेवा विक्रम या पात्रालाच मुळात इर्ष्या ,द्वेष ,अभिमान, जेलसी, प्रेम अशी माणसाच्या स्वभावाची सगळी वैशिष्ट्य आहेत त्यामुळे टिपिकल रोमँन्टिक स्टोरीमधला हा गोड गोड नायक नाही आहे आणि या कथेच्या पहिल्या भागापासुनच कथेला असणारी एक डार्क साईड ( सतत काहीतरी चुकीचं वा वाईट घडतंय अशी छाया) आहे जी सतत वाचताना तुम्हाला जाणवत असेल आणि हि डार्क छाया सबंध कथेभर असेल आणि जेव्हा ती संपेल तेव्हाच कथा संपेल पण त्याला अजून खूप वेळ आहे आत्तापासुनच निरोपाच्या गोष्टी नको करुयात आणि गेल्या भागाच्या शेवटी तुम्हाला भेटलेली समिहा कोण हे पाहुयात.)

समीहाच्या अश्या मोठ्याने किंचाळण्याने अरुंधतीने मागे वळून पाहिलं. ग्रे कलरचा गुडघ्यापर्यंत असणारा स्व्कायर नेकचा स्लिवलेस वनपिस, कलरिंग केलेले मानेपर्यंत रुळणारे हेअर, व्यवस्थित केलेला चेहर्‍याला साजेसा मेकअप, ड्रेसला मॅचिंग अॅक्सेसरीज, हातात ग्रे कलरची क्लच कुठल्याही बॉलीवूडच्या अभिनेत्रीला साजेसा लुक होता तिचा. तिच्यासमोर ज्वेलरी स्टोअरमधला एक नोकर खाली मान घालून उभा होता. तिची आई राजेश्वरी गल्ल्यावरुन उठून तिच्या दिशेने जात म्हणाली," समी काय झालं ?"
" मम्मी हा बघ ना ! याला एक कॉफी आणायला सांगितली. हा गेला आणि मी जस्ट कॉलवर बोलत होते इतक्यात हा आला आणि मी बोलतेय कॉलवर ते दिसतंय आणि म्हणतो मॅम कॉफी कॉफी घेऊन माझ्यासमोर नाचवत राहिला मग काय बोलताना माझा हात लागला आणि सगळी कॉफी पायावर !" ती हायहिल्स सँडल्स घातलेले आपले पाय राजेश्वरीला दाखवत म्हणाली.
" मुर्ख , मम्मी मला फ्रेंन्डस सोबत बाहेर जायचं होतं आणि हे काय सगळा मूड अॉफ झाला." ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. तो अजूनही सॉरी मॅम म्हणत उभा होता. दुरुन अरूंधती हे सगळं पाहत होती. तीही पुढे येत म्हणाली,
" काय झालं गं ?"
" लुक ना अॉन्टी, ह्या मुर्खाने सगळी कॉफी सांडली पायावर" समिहा अरुंधतीला मघाचसा प्रसंग सांगत म्हणाली.
" It's ok, ए तु निघ आणि आता कॉफीमग नीट पकडायला शिक जा "  अरुंधती तिच्या नेहमीच्या शैलीत त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. बिच्चारा तो खाली मानेनं निघून गेला. 
" O God ! ई काय हे ! छे! आता मला पुन्हा घरी जावं लागेल." ती आपल्या पायांकडे पाहत स्वतःशीच बोलत होती.
" I tell you aunti या नोकर माणसांनाना कश्याची किंमतच नसते आणि मॅनर्स तर यांना सारखे शिकवायला लागतात."  ती पुन्हा अरुंधतीला म्हणाली.
" हम्म आमच्याकडेपण हिच परिस्थिती " अरुंधती नाराजीनेच म्हणाली.
" ओके ओके समी जा तू घरी चेंन्ज कर आणि जा कुठे ते नाहितर लेट झाला म्हणून पुन्हा चीडचीड करशील." राजेश्वरी तिला समजावित म्हणाली.
" या, माझंचं चुकलं तुला ड्रॉप करायला इथे आले आणि चल ओके आता निघते मी बाय अॉन्टी." समिहा म्हणाली तसं अरुंधती आपल्या विचारांतून बाहेर येत मानेनच तिला हो म्हणाली. 
समिहा निघुन गेली.
" चल अरुंधती तू सिलेक्ट केलास का नेकलेस?" 
" नाही आयमीन तेच बघतेय "  अरुंधती रागात शॉपबाहेर पडलेल्या समीहाकडे अजुन पाहत होती. ती पुन्हा आत गेली आणि मघाचे नेकलेस हातात घेऊन पुन्हा पाहू लागली. 
' आमची नोकरीमंडळी पण फार शेफारलीत त्यांना पण अशी समिहासारखी मालकीणबाई मिळाली असती की समजलं असतं ' ती मनातल्या मनात म्हणत होती. मग तिच्या मनात त्याही पुढचा विचार सुरु झाला,' समिहासारखी कश्याला समिहाच का नाही! खरंच समिहा सुंदर आहे, आपल्यासारख्या मोठ्या घरातली आहे, हुशार आहे, मॉडर्न आहे आणि स्वतः फॅशन डिझायनर आहे तिच्या प्रोफेशनमुळे हाय कल्चरमध्ये कसं रहावं वावरावं तेही तिला चांगलं कळतं  शिवाय आपलं तिच्याशी चांगलं जमतं मग विक्रमसाठी तिचा विचार करायला काय हरकत आहे! खरंच विक्रमच्या आयुष्यात समिहा आली तर किती बरं होईल! ' तिच्या मनात हा विचार सुरु होता. काउंटरवरच्या मुलीने मॅडम हा नेकलेस आवडला का तुम्हाला ? असं विचारलं तेव्हा ती भानावर आली. आधीच वेळ झाला होता आणि लग्नसमारंभालाही पोहचायचं होतं. तिने हातातलाच नेकलेस तिला पॅक करायला सांगितला आणि बील पे करुन ती तिथून बाहेर पडली.
..................
" काय मम्मा झालं का फंक्शन ? "  अरुंधती मैत्रीणीच्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम अटेंन्ड करून दुपारी नुकतीच आली होती आणि सोफ्यावर बसली होती. इतक्यात जितेंद्र हातपाय धुवून जेवण्यासाठी म्हणून डायनींगटेबलपाशी आला होता. त्याने आईला पाहताच विचारलं. अरुंधती सोफ्याला मागे टेकत म्हणाली," हो छान झाला कार्यक्रम ?" 
" बरं तु जेवणार का कि आज मी एकटाच ?" त्याने डायनींगटेबलची खूर्ची ओढत तिला विचारलं.
" नाही रे तू जेव माझं झालंय जेवण तिकडे."
" बरं, ए आत्या वाढ गं मला "  त्याने आत्याला हाक मारली. गंगा आत्या गरमागरम जेवणाची भांडी घेऊन बाहेर आली.
" ए जितू तुला ती समीहा कशी वाटते रे ?"  अरुंधतीच्या डोक्यातून अजूनही तो सकाळचा ज्वेलरी शॉपमधला प्रसंग गेला नव्हता.
" कोण समिहा आणि कशी वाटते म्हणजे मला काही समजलं नाही."  जितेंद्र जेवायला सुरुवात करित म्हणाला.
" अरे समिहा आपले ' चंद्रकांत ज्वेलर्स ' वाले त्यांची मुलगी 
रे " तिने खुलासा केला.
" हा आता लक्षात आलं हा ती होय तिचं काय ?" त्याने विचारलं.
" अरे ती कशी वाटते तुला म्हणजे आपली सुन म्हणून रे!" 
जितेंद्र घास उचलता उचलता थांबला. आत्या त्याला आमटी वाढत होती तीही पाच मिनिटं स्तब्ध झाली. जितेंद्रने आत्याला नजरेने हे काय म्हणतेय असं विचारलं. आत्याने खांदे झटकत काय माहित म्हटलं.
" मम्मा, माझा नाही पण लग्नाचा विचार वगैरे अजुन" तो म्हणाला.
" च्चक तुझ्यासाठी नाही रे बाबा विक्रमविषयी म्हणतेय!" 
" हा मग ठिक आहे बघ तू आणि त्याला विचार की मला सांगून काय होणार " तो म्हणाला.
" हम्म विचारायला हवं पण तुला कशी वाटते ?"
" ठिक आहे म्हणजे त्याच्यासारखी असेल असं बघून तरी वाटतं तिच्याकडे." तो म्हणाला आणि अरुंधतीला मनातून तिचा विचार बरोबर असल्याचा आनंद झाला आणि तिने आरामात डोकं सोफ्याला टेकलं. गंगा आत्या मात्र या विचाराने अस्वस्थ झाली. विक्रमसाठी बाईसाहेबांनी भाऊसाहेबांच्या अपरोक्ष स्थळं पहायला सुरुवात केली की काय भाऊंच्या कानावर घालायला हवं असं तिला वाटलं.
...............
" काय अनघा मॅडम वाचन चाललंय वाटतं " झोपाळ्यावर बसुन शांतपणे पुस्तक वाचणार्‍या अनघाला आईने विचारलं.
"काय गं आई तू पण रियाची कॉपी करतेस !" अनघा म्हणाली.
" असच गं, बरं वाटतं बरं कॉलेज काय म्हणतय तुमचं म्हणजे कॉलेज जुनचं आहे गं तुझ्यासाठी पण आता तुम्ही विद्यार्थी नाही ना म्हणून म्हटलं! " आई तिला पुन्हा चिडवित म्हणाली.
" हम् मस्तय खंदारे मॅडम छान कॉपरेट करतात आम्हाला आणि अगं तुला माहितीय आमचे विक्रम सर तर कामाच्या बाबतीत किती स्ट्रिक्ट आहेत. सगळे जण ऐकतात त्यांचं" 
" कोण विक्रम गं ?" आईने विचारलं.
" अगं भाऊसाहेबांचा मोठा मुलगा आता तेच बघतात कॉलेजमधलं सगळं " मग तिने आईला तो कंप्युटर्सचा किस्सा पण सांगितला.
" हो का बरं चला म्हणजे एकदंरीतच कॉलेजचा तुमचा जॉब व्यवस्थित सुरु झाला म्हणायचा." आई म्हणाली.
"हो अगदीच पण बघ ना आई चार पाच दिवस झालेत जॉईन होऊन नी लगेच एवढी मोठ्ठी सुटी आली." ती मांडीवरचं पुस्तक बंद करित म्हणाली.
" मोठी सुटी कुठे आज शनिवार तो पण आता संपत आला झाली की संध्याकाळ उद्या रविवार " आई हसत म्हणाली.
" हम्म करेक्ट पण बोअर व्हायला झालं" ती पुन्हा म्हणाली.
" आता उद्या रिया आणि तू बाहेर जा पिक्चरला वगैरे मस्त " आईने आयडिआ सुचवली.
" हो पण कधी एकदाचा सोमवार येतोय असं वाटतंय " ती कंटाळत म्हणाली.
" हम्म नवीन जॉब म्हटलं की होतं असं " आई पुन्हा तिच्या कंटाळलेल्या दिनवाण्या चेहर्‍याकडे पाहत हसत म्हणाली आणि आत गेली. तिने पुन्हा हातातलं पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली.
क्रमशः

🎭 Series Post

View all