बंधन भाग 125

Social Love

भाग 125
( गेल्या भागात नितु विक्रमला भेटायला जाते. त्याची माफी मागते नी तोही तिला माफ करतो. नताशा राजेशच्या घरुन अनघाला भेटायला निघते. ती सगळं खरं बोलते तिच्यासोबत पाहूया पुढे)

                नताशा आली बोलली आणि निघून गेली पण तिची हे भेट मात्र अनघाचं स्वतःभोवतीच विश्व हादरवून टाकणारी होती. नताशाला इतक्या दिवसांपासून तिच्या सोबत बोलायचं होतं पण ते असं काही असेल इतकं भयानक  याची तिने कधी कल्पना केली नव्हती. ती छान ड्रेसेस वापरते ,चेहऱ्याला मेकअप करते, चारचौघींसारखी राहते, वावरते. पण हा फक्त मुखवटा होता आणि त्यामागे इतकं काही दडलेलं असेल हे अनघाला पचवणं जड जात होतं. हे सगळं तिच्या तोंडून तिनं ऐकलं म्हणून दुसर्‍या कोणी तिला हे सांगितलं असतं तर तिचा विश्वासच बसला नसता. इतके महिने माझ्यावरती कसा आणि किती अन्याय झाला, मी कशी दुर्दैवी आहे, मी कशी फसवली गेली आहे याचा विचार करून आपण रडत होतो. परिस्थितीला दोष देत होतो.  आपण त्यातही कशा तग धरुन उभ्या आहोत म्हणजे आपण किती खंबीर आहोत अगदी स्ट्रोंग वुमन वगैरे बिरुदं स्वतःला लावून स्वतःच्या मनाचं समाधान करून घेत होतो. आपण हे विसरलो होतो की आपल्या पेक्षा ही दयनीय परिस्थितीत बायका जगतात. सहन करतात. आपल्यापेक्षाही भयंकर काही ना काही त्यांच्या बाबतीत घडलेलं असतं तरीही त्या जगतात. उभ्या राहतात, रडत नाही बसत. नाही माझ्यावर अन्याय झाला अशी ओरड करून स्वतःचे आयुष्य थांबवत!   अन्याय करणारे वेगवेगळे, अत्याचाराची रूपं वेगळी पण त्याची वेदना एकच असते ना! आपण विचारच नाही केला या गोष्टीचा कधी. खरंय, आपल्या बाबतीत घडलं ते वाईट होतं. पण पण म्हणून आपण दुर्दैवी नव्हतो! आपल्या पाठीशी आई, बाबा होते. भाऊसाहेब होते सगळेच तर होते. आपल्याकडे उत्तम शिक्षण आहे. आर्थिक स्थिती चांगली आहे. आपल्या डोक्यावरती हक्काचे छप्पर आहे. अन्न, वस्त्र निवार्‍या साठी म्हणून वणवण करण्याइतकी बेकार परिस्थिती नाही आपली तरीही आपण रडत बसलो. किती तरी पर्याय होते आपल्याकडे! नोकरी सोडणं, हे शहर सोडणं, त्याला घटस्फोट देणं नी नव्या ठिकाणी जाऊन नवा जॉब सुरू करणे, आपल्या करिअरवर लक्ष देणे पण आपण आपण यातला एकही पर्याय स्वीकारला नाही. का? कारण आपल्याला त्याला सोडून जायचं नव्हतं का! आपल्याला त्याला शिक्षा तर द्यायची होती पण समोरही हवा होता तो!आपल्याला आपल्याला त्याच्या सोबत राहायचं तर होतं. पण त्याला सहज माफ करून त्याच्या चुकांना सोडूनही द्यायचं नव्हतं. आपल्यातली स्वाभिमानी बाई म्हणून तशीच राहिली लढत किंवा स्तब्धपणे जे होतं ते पाहत. त्याच्या खरेपणाची परीक्षा घेत राहिली. पण आता बास झालं. त्याला व्हायच्या तितक्या वेदना झाल्या. त्याच्या आत्ताचा या अवस्थेला मीही थोडीफार जबाबदार आहेच ना! विचारांचे चक्र काही थांबता थांबेना. श्रीधर, कुमुद, रिया घरी नव्हते त्यामुळे तिला जरा शांत वाटत होतं. घरी आले की आपल्याला दहा प्रश्न विचारतील ते. तिला आता शांततेची गरज होती. तिला वाटलं उठावं आणि एखाद्या शांत ठिकाणी जाऊन थोडा वेळ एकट्याने बसावं. मनातला कोलाहल शांत करावा जिथे  प्रश्न विचारणारं कुणी नसेल, कोणी पाळत ठेवणारं नसेल की सल्ले देणार नसेल या विचारातच बंगल्यावरच्या ड्रायव्हर काकांना तिने फोन केला.
...........................................................


" यायचं का आम्ही ?" ओळखीच्या आवाजासरशी त्याने दारा कडे नजर टाकली. मघाशी उषाताईंच्या मदतीने त्याने मागे भिंतीला टेकून बसण्याचा प्रयत्न केला तसं बरं वाटलं. मग थोडा वेळ तसाच तो बसून राहिला. सकाळपासून कोणी ना कोणी भेटायला येत होतं. आत्या, अरुंधती येऊन रडून अगदी त्याची कानउघडणी करून गेल्या. जितेंद्र ही चार शब्द ऐकवून गेला आणि नंतर नीतू आली आणि आता समोर गुरुकुल ची सेना!

" करंबेळकर सर तुम्ही!  या ना." प्राचार्य हसतच आत मध्ये आले आणि त्यांच्यासोबत निंबाळकर सर, खंदारे मॅडम, काळे सर, निकम सर. सगळ्यांना पाहून त्याला छान वाटत होतं. तीन-चार दिवसांपूर्वी अनघाला त्याने दिलेलं ते पत्र आणि त्या नंतरच्या दिवशी तिचं उत्तर ऐकण्यासाठी म्हणून शेवटचं कॉलेजला गेलेला तो आणि आजची ही अवस्था! हा गेल्या चार-पाच दिवसांचा काळ ही त्याला महिन्याभरा सारखा वाटला.

" हाऊ आर यु ?  काय म्हणते तब्येत तुमची?"  प्राचार्यांसह सगळे आत मध्ये आले. प्राचार्यांनी हातातला पुष्पगुच्छ त्याच्या बेड लगतच्या टेबलवरती ठेवला.

" मस्त एकदम. ॲप्सलुटली फाईन." त्याच्या चेहऱ्यावर ती स्मितहास्य पसरलं.

" अरे वा! विक्रम फ्रेश वाटताय तुम्ही."  खंदारे मॅडम म्हणाल्या तसे निकम सर त्यांना दुजोरा देत म्हणाले,

" हो आणि कोण म्हणेल तुम्हाला पेशंट! खरं तर तुम्ही असं काही...... हे ऐकून आम्हाला ॲडमिट व्हायची वेळ आलेली."

" Really It was shocking for us." निंबाळकर सर म्हणाले तसं हं म्हणून त्याने होकारार्थी मान हलवली. त्याचा चेहरा थोडासा उतरल्याचं काळे सरांच्या लक्षात आलं.

" असो, झालेल्या गोष्टींवरती डिस्कशन कशाला!  Now, think positive नी तसंही सर लवकर बरे होतील हो ना सर."    काळे सरांनी जरासा अंदाज घेत त्याच्याकडे पाहत म्हटलं.

" तुम्हा सगळ्यांच्या बेस्ट विशेस आहेत मग होणारच." तो हसून उत्तरला.

" बरं मॅडम, कुठे दिसत नाहीत."   प्राचार्यांनी विचारलं तस तो गोंधळला.

" आ.....हा त्या ना.....आलेल्या मघाशीच. थांबते म्हणत होत्या. ऐकायलाच तयार नव्हत्या मग बळेबळेच पाठवलं त्यांना घरी! त्या कॉलेजला........"

तो पुढे बोलणार तोच प्राचार्य म्हणाले,

" Don't Worry.  त्यांना हव तर रजा वाढवून देऊ. उगीच कॉलेज आणि हॉस्पिटल अशी धावाधाव नको! गेल्या तीन-चार दिवसांपासून रजेवरतीच आहेत त्या. अजून चार-पाच दिवस अॅड होतील."

प्राचार्य सहजपणे म्हणाले तसं तो ऐकतच राहिला. गेल्या तीन-चार दिवसांपासून रजेवरती म्हणजे ते पत्र मिळाल्यापासून ती कॉलेजला गेलीच नव्हती तर! त्यावरून त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आलेच. काय झालं असेल? ती पत्र वाचून कनव्हिन्स झालीच नाही कि तिचा आशिष सोबत जाण्याचा निर्णय पक्का झालाय आणि जॉब सोडण्यासाठी ती विचार करत असेल का? की आपण हे असं...... बाहेर दहा लोक दहा तोंडांनी प्रश्न विचारतील म्हणून तिच्या घरातल्यांना तर काही निर्णय घेतला नसेल ना! एकामागोमाग शंका त्याच्या मनात येऊ लागल्या.' असो, जे काय असेल ते. तिचं आयुष्य आहे! काय करायचं ते करु दे '  या उत्तरा पाशी येऊन त्याचं मन थांबलं.

" सर "

" आ....हा त्यांच्या रजेचं. पहा त्यांना विचारून. हवी असेल तर द्या वाढवून. मी काय बोलणार!"   तो म्हणाला तसं प्राचार्यांनी हो म्हटलं.

" बरं, सर टेक केअर. लवकर या आम्हाला भेटायला."  निकम सर म्हणाले तसं तो मानेनेच हो म्हणाला आणि हसला.

" बरं, निघतो आम्ही."  हसून प्राचार्य पुन्हा म्हणाले तस त्यांच्यासह बाकी सगळे त्याला बाय म्हणून निघाले. सगळ्यांना भेटून त्याला बरं वाटलं नी कॉलेजची आठवण सुद्धा आली.
.............................................................


               तिने रूमच्या भिंती वरून हात फिरवला नी सभोवार एक कटाक्ष टाकला. आज बर्‍याच दिवसांनी खरंतर महिन्यांनी ती ही खोली डोळे भरून पाहत होती. तिच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर आठवण इथे होती! कधी आपण असे एकटे असू या खोलीत याची कल्पना  तिने कधी केली नव्हती. त्या चार भिंतींनी  फक्त त्यांच्या दोघांच्या आयुष्यातील सुंदर क्षणच पहावेत असं तिला वाटायचं. मटकन फरशीवर ती  गुडघे टेकून बसली. आज किती न काय काय आठवत होतं नताशा भेटल्यापासुन. त्याच्या विचारांनी तिचं सगळं मन व्यापून गेलं होतं. सगळे जुने दिवस तिथे पोहोचेपर्यंत सर सर नजरेसमोर तरळून गेले होते. भाऊसाहेबांनी विक्रम साठी तिचा हात मागितल्यानंतर आई-बाबांच्या आग्रहासाठी विक्रम ला भेटायला तयार झालेली ती. कॅफेशॉप मधील ती पहिली भेट! ' मॅडम काही झालं तरी या लग्नाला माझा होकारच असेल ' असं ठामपणे बोलून गेलेला तो. त्यानंतर घाईत ठरलेला त्यांचा साखरपुडा, तिने बोटातल्या अंगठीकडे पाहिलं. कसलाही विचार न करता न गोंधळता, न घाबरता किती सहजपणे त्याने तिच्या बोटात ती अंगठी घातलेली! साखरपुड्याचा दिवसही नजरेसमोर उभा राहिला.' ही एवढी फ्लॉवर्स!' ' हा, ती छोटी मुलगी आली गाडी जवळ, घ्या ना प्लीज ',   त्याने पहिल्यांदा गाडीत दिलेली ती गुलाबाची फुलं. एक दोन नव्हे चांगली गुच्छ भर! त्या आठवणीने नकळत तिचा चेहरा हसला.' शी इज प्रोफेसर अनघा कारखानीस, यांचीच आयडीया होती ही न्यु डिपार्टमेंटची ',   कॉलेजमध्ये तिच्या संकल्पनेमुळे सुरू झालेलं ते स्किल डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट. त्याच्या उद्घाटनासाठी सगळे प्रोफेसर जमलेले असतानाही आपण येण्याची वाट पाहत थांबणारा तो! पाहुण्यांसमोर 'We're going to engaged soon ' अस छान हसून सगळ्यांना सांगणारा तो. त्या विज्ञान दिवसाच्या सेमिनार मधल्या त्याच्या भाषणानंतर आपण त्याच्यापुढे किती कमी आहोत असं आपल्याला वाटलं काय नी आपण फोनवरुन त्याच्यावर चिडलो तरी दुसऱ्या दिवशी आपण रस्त्यात चक्कर येऊन पडलो म्हणून अख्खा दिवस हॉस्पिटलमध्ये आपल्या उशाशी बसून राहणारा तो! लग्ना दिवशीच्या रात्री आपल्या मनाचा विचार करून...... तो फरशी वरती बिछाना.....

 तिच्या डोळ्यातले थेंब हातांवरती पडले. आपल्यासाठी रूम मध्ये नवं वॉर्डरोब, महागडं ड्रेसिंग टेबल,  स्टडी टेबल सुद्धा बसवून घेतलं त्याने! त्याने दिलेलं पहिलं गिफ्ट, तो रंगीबेरंगी दुपट्टा. आजही त्याला कोणी हात लावला तरी आपल्याला राग येतो. लग्नानंतरची पहिली मोठी सुट्टी आणि गोव्यातले ते दिवस. त्या व्हिडीओ क्लिप ला घाबरून आपण मूर्खासारखे समुद्रावर जीव द्यायला गेलेलो आणि तो आपल्यासाठी धावाधाव करून तिथं पोहोचला. आपल्याला समजावलं, आपण चिडलो होतो तेव्हाही त्याच्या वरती.

' मॅडम नका ना अशा रडु नी पुन्हा असा विचार नका करू प्लीज.'   किती कळकळीने बोललेला तो. त्यानंतर मात्र आपण इतकं काही पाहिलं. इतकी कठीण परिस्थिती आजवर आली पण तसा पुन्हा विचार नाही केला. खर्‍या सावित्री दाखवल्या त्याने आपल्याला! त्याचं ते पावसात भिजून रात्री घरी येणं, काय झालं होतं असेल त्या दिवशी काय माहित. पण किती अस्वस्थ होता तो. दुसऱ्या दिवशी किती ताप चढलेला. मम्मांना काय उत्तर देऊ असं झालेलं आपल्याला. त्या दिवशी मात्र त्याला काही झालं तर आपल्याला जास्त त्रास होईल. त्याच्या शिवाय जगणं कल्पनाच नाही करू शकत ते जाणवलं आणि आमच्यातल्या  फॉर्मॅलिटीज गळून पडल्या. अवघडलेपणा कमी झाला. आणि तो सगळ्यात सुंदर दिवस. या खोलीत त्याने असे गुडघे टेकून आपल्याला त्याच्या मनातलं सांगितल. आपल्या पायात स्वतःच्या हाताने त्या साखळ्या बांधल्या. बापरे !त्यादिवशी आभाळाला हात टेकल्या सारखं काहीतरी वाटत होतं. आणि त्या दिवसापासून सगळं किती बदललं अगदी आपण सुद्धा! त्याच्या नजरेतून आपण जगाकडे पाहायला लागलो. त्याच्या नजरेतून दिसणारं जग खूप सुंदर होतं. तो आयुष्यातून थोडा बाजूला काय झाला, पुन्हा तेच ते सगळं जग विद्रूप, भयंकर वाटायला लागलं.  बापूसाहेबांचं राजकारण, त्यानंतर तो मनस्ताप संपतो न संपतो तोच आशिषचं आपल्या आयुष्यात येणं, काय माणूस होता तो! त्यानंतर राजेशचं सगळं वागणं, नताशाचं सगळं बोलणं, किती भयंकर आहे हे! बसल्याजागी तिचं मन भूतकाळात जाऊन आठवणींची दार उघडून हिंडून आलं. हातातला मोबाईल मघापासून वाजत होता तशी ती भानावरती आली.

" हॅलो "

" हॅलो अग आहेस कुठे तू ? बाबाही नाहीयेत घरी नी तू पण गायब! त्यांचा मोबाइल बंद आहे. तुम्ही एकत्र आहात का? दाराला कुलूप लावून गेलात कुठे ?"

" अग आई,  बाबा लायब्ररीत गेलेत म्हणून मोबाईल......"

" मग तू कुठेयस? "  तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच कुमुदने आश्चर्याने विचारलं.

" अगं मी इकडे आले फार्म हाऊसला!"

" काय, ताई तू तू वेडी आहेस का ग? आत्ता तू तिकडे कशाला गेलीस एवढ्या लांब! नी बाहेर मिडीयावाले....." कुमुदने फोन स्पीकर वरती ठेवलेला तस रियाचं बोलणं ऐकुन ती उत्तरली.

" नका काळजी करू. रिया आय एम फाईन. मी मी येते संध्याकाळपर्यंत....."   ती कसबस म्हणाली. अजून त्यांना उत्तर देण्याइतकं तिच्यात त्राण नव्हतं.

" हा, अग पण तू का तिकडे?"

" आई ऐक ना मी येते. डोन्ट वरी."   त्रासिक सुरात बोलून तिने फोन कट केला.


चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवले. फरशीवरुन उठणार इतक्यात मागून कुणीतरी आत आल्याची चाहुल लागली.

" काय ग पोरी अशी का बसली इथं!"   तिने मागे वळून पाहिलं तर माधव काका उभे!

" नाही, असंच."   ती खाली मानेनं म्हणाली तसे ते तिच्या समोर आले आणि खाली बसले.

" काय सुनबाई का बरं अश्या उदास?"  त्यांनी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं.

" काही नाही असंच......"

" असच, इतक्या दिवसांनी इथं आलीस ती काय अशी  उगीच. आठवण येते तर जा की भेटायला...."

" काका, मी...... माझ्यामुळे त्यांना त्रास झाला न खूप." तिने त्यांच्या नजरेला नजर देणं टाळलं.  त्यांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला.

" असं नाही ग, आमच्या विक्रम मुळे तुला पण त्रास झाला की. त्यांच्या चुका अक्षम्यच होत्या."   ते शांतपणे बोलले तस तिची नजर पटकन वरती वळली.

"हं,   तुमच्या साहेबांनी सांगितलं सगळं...... मध्यंतरी विक्रम  आलेले इथं...... नंतर साहेबांना फोन केलेला मी तेव्हा कळलं."

ते काय बोलत आहेत तिच्या लक्षात आलं.

" हं. सोबत कोणीतरी होत असेल......."  तिने उपहासाने म्हटलं तसं काका किंचित हसले.

" का?  हसलात का असे?"

" तसं नाही ग. सोबत असं नाही म्हणता यायचं फक्त सोबतीचा हात द्यायचा प्रयत्न केला कोणीतरी....."   तसे तिचे डोळे भरून आले ते ऐकून!

" मग?"   तिने कुतूहलाने विचारलं.

" हो पण अस एखाद्याच्या मनात नसताना आपण त्याच्या सोबत असण्याचा अट्टहास करून उपयोग नसतो ते कळलं तिला आणि तिच्या रस्त्यानं पुढं निघून गेली."

" म्हणजे ? ते....."

" अग, तुझ्या सोबतीची सवय झालली असताना दुसरा कोणाचा विचार करतील का ते?"  तसं तिच्या नजरेतलं हसू त्यांनी ओळखलं.

" काका मी खरच चुकीचा विचार केला त्यांच्याबद्दल."  अपराधी भावनेनं ती म्हणाली.

" माणूस वाईट नसतो. सगळी माणसं चांगली पण परिस्थिती माणसाला वाईट बनवते हे असलं काही तत्वज्ञान मी नाही सांगणार! हा पण कुठलाच माणूस पूर्णपणे चांगला नसतो तसा पूर्णतः वाईटही नसतो. हा पशूला ही लाजवेल इतकी दुष्कृत्य करणारी, निगरगट्टपणे वागणारे  मनुष्यप्राणी असतातच पण माझ्या लेखी ते फक्त प्राणी, मनुष्य नव्हे!  खरं तर अशा लोकांना पशूची उपमा देणं म्हणजे मुक्या जिवांचा अपमान."

" पण काका अशी कितीतरी लोक आजूबाजूला असतात न कसं ओळखायचं कोण भलं कोण वाइट?" ती हताशपणे बोलली.

" सोपय. चुकीचं वागून त्यानंतर आपण जे वागलो त्याबद्दल दुःख वाटणं, अपराधी वाटणं संवेदनशील असण्याचं लक्षण. आणि ज्या व्यक्तीकडे संवेदनशीलता असते तो माणूस वाईट कसा असेल? प्रत्येक माणसाचा आपल्याला येणारा अनुभव यावर ही बरंच अवलंबून असतं. आता तुला ते माणूस म्हणून कितपत माहित आहे त्यावरून तुझं तू ठरवायचं."

" किती सोपं करून सांगितलं काका तुम्ही! थँक्यू. खरच थँक्यु. "  ती आनंदाने म्हणाली.

" चल आभार कसले त्यात? "  त्यांनी तिच्या डोक्यावरती मायेने थोपटल्यासारखं केलं.
 तिच्यासाठी आता सगळा गुंता सुटला होता. सगळं छान वाटत होतं. मनातली सगळी चलबिचल थांबली होती. आता फक्त तिच्या डोळ्यांना त्याच्या भेटीची आस होती.

क्रमशः

टीप- कथेतले दिवस नी वेळ लक्षात घ्या. पुढच्या भागात ते भेटतील. आजच्या भागातल्या घटना या एका दिवसातल्या घटना आहेत. घाईत पार्टच्या शेवटी भेटीचा सिन नको म्हणून नव्या दिवसातल्या घटना नी त्यांची भेट पुढच्या भागात...


कवर इमेज बदललेली आहे. कथेतलं नवीन वळण आणि अनायासे व्हॅलेंटाईनडेचा महिना आहे. त्यात हार्टमध्ये कथेचं नाव दिसतय, कथेतली पात्र वाचकांच्या हृदयात कायम राहतील म्हणून नाव हार्टमध्ये लिहलेलं आहे. त्यासोबतच बरिचशी छोटी  छोटी हार्ट्स दिसतायत ती तुमची हृदयं आहेत.......लाल रंग प्रेमासोबतच रक्ताचाही असतो....इथला संघर्ष संपलाय त्यामुळे मुद्दामहून रेड कलर न वापरता गुलाबी वापरलेला आहे....भेटूया नव्या भागात

126- गुरुवारी रात्री

🎭 Series Post

View all