Login

बंधन भाग 126

Social, Love

भाग 126
( गेल्या भागात ती फार्महाऊसला जाते. त्याच्या जुन्या आठवणींसोबत वेळ घालवते. माधवकाका तिला समजावतात तस विक्रम बद्दलचा गैरसमज तिचा दूर होतो. पाहूया त्यांची भेट)

            माधव काकांशी बोलून तिला बरं वाटलं आणि आपण योग्य ठिकाणी मनाची शांती शोधत आलो याचं  खरंच चीज झाल्यासारखं वाटलं तिला! आपण याआधी इथं आलो असतो मागच्या काही दिवसांमध्ये तर कदाचित आपल्या मनातला एक गुंता तरी सुटला असता असही क्षणभरासाठी वाटलं. तो आणि नताशा, तो आणि समिहा असे समीकरण आपण डोक्यात कस भरून घेतलं याचं आता तिला नवल वाटत होतं. एकदा एखाद्यावरच्या विश्वासाला तडा गेला की पुन्हा जोडायला बराच काळ जातो तसंच काहीसं त्याच्या बाबतीत घडलेलं. ती एक घटना आणि त्याबद्दलचं त्याचं  खोटं बोलणं इथपासून सुरू झालेली घटनांची मालिका! मग त्या एका घटनेपायी पुढच्या सगळ्या घटना त्याला खोटं ठरवत गेल्या. तो एक खोटं बोलला म्हणून त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द खोटा असाच ग्रह आपण करून घेतला याचा तिला आता पश्चाताप वाटत होता. कधी कधी ऐकून घेणारे कानही महत्त्वाचे असतात ते नसतील तर कितपत कठीण परिस्थिती उद्भभवू शकते हे त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे तिला चांगलंच उमजलं होतं. पण जे झालं होतं ते काही मागे जाऊन बदलणं तर शक्य नव्हतं. आता फक्त एकच गोष्ट तिच्या हाती होती, पुढचा विचार करणे आणि पुढे आपल्याला जे वाटतं ते प्रत्यक्षात आणणे! याच विचारात ती संध्याकाळी तिकडून घरी परतली. ड्रायव्हरने वेळेत तिला घरी आणून सोडलं. ती अशी सकाळी बाहेर पडली तेही अचानक फार्महाऊसला निघून गेली त्यामुळे श्रीधर नी कुमुदला काही कळेना. ती घरी आल्यानंतर घरातल्यांच्या चेहर्‍यांवरची प्रश्नचिन्हं तिच्या लक्षात आली. पण तिने त्यावर बोलणं टाळलं. काकांची तब्येत बरी नव्हती. आता घरी सगळी धावपळ सुरू असणार, एवढ्या लांब वेळ काढून त्यांना पाहायला जायचं कोणाला सुधारायचं नाही असं तोंडाला येईल ते कारण ठोकून दिलं. कधी एकदा सकाळ उजाडते असं वाटत होतं तिला. आधी हॉस्पिटल ला जायचं, तिथून कॉलेज हेही ठरवून टाकलं तिने!
........................................................


          दुसऱ्या दिवशी सकाळी तिने लवकर कॉलेजला जाण्याची तयारी केली. हॉस्पिटलमधून कॉलेजलाही जायचं होतं त्यामुळे नेहमी सारखी सुती साडी, चेहऱ्याला हलकासा मेकअप आणि नेहमीप्रमाणे पाठीवरती मोकळे सोडलेले केस अशा पेहरावातच ती तयार होऊन निघाली. कुमुदने नाश्त्याला बोलावण्याआधी ती पटकन खाली आली आणि पटापट नाश्ता केला. बर्‍याच दिवसांनी तिने स्वतःहून मन लावून काहीतरी खाल्लं या आनंदात कुमुदलाही तिला काही विचारायचं सुचलं नाही. आईला बाय करून ती घराबाहेर पडली. कितीतरी दिवसांनी घराबाहेर पडताना उत्साही वाटत होतं तिला. तिने त्या आनंदातच ड्रायव्हरला फोन लावला आणि आपल्याला हॉस्पिटल ला यायचं असल्याचं सांगितलं.
..................................................

         आदल्या दिवशीपासून कोणी ना कोणी येऊन त्याला भेटत होतं. तोही सगळ्यांशी छान हसून खेळून बोलत होता. डॉक्टरांनी त्याची तब्येत ठीक असल्याचं जितेंद्र नी भाऊसाहेबांना सांगितलं तसं दोघांचा जीव भांड्यात पडला. भाऊसाहेबांना बरं वाटलं त्याला पुन्हा धडधाकटपणे पाहून. तो शुद्धीवरती आल्या आल्या आत्या, नीतू , अरुंधती त्याला भेटायला येऊन गेल्या. कॉलेज स्टाफपैकी अधून मधून कोणी ना कोणी भेटायला येत होतं. उगीच गर्दी करू नका इकडे असे त्याने सांगूनही प्राचार्य आदी मंडळी त्याला भेटून गेल्यानंतर पुन्हा शिवा, शंकर, दिनेश घोळक्याने भेटायला येऊन गेले. आदल्या दिवशी भेटून गेल्यानंतर सकाळी पुन्हा प्राचार्यांनी जितेंद्र ला फोन करून चौकशी केली. इतक्या दिवसानंतर जितेंद्रचं मनही जरा निर्धास्त झालं होतं. पण तरी अजूनही एका गोष्टीची कमतरता त्याला जाणवत होती. तो बाहेर वेटिंग चेअर वरती बसला होता इतक्यात समोरुन कुणीतरी येत असल्याची चाहुल लागली तसं त्याने समोर पाहिलं नि त्याचा चेहरा आनंदाने हसला.
.......................................................


          रूमचा दरवाजा तिने जड हातांनी लोटला आणि ती आत मध्ये आली. काही क्षण तिची पावले दारापाशी थबकली. त्याचे मिटलेले डोळे आणि शांत चेहरा. इतकं काय काय घडून गेलेलं असतानाही आज त्याचा चेहरा मात्र तिला शांत वाटला. गेल्या काही दिवसांमधला तो ताण,  खचल्यासारखी अवस्था, तो तिला काही दिवसांपूर्वी रात्री सोडायला घरी आला होता त्या रात्री पासून त्याला असं थकलेलं, खचलेलं पाहून तिच्या मनाला सतत वाटणारी एक अनामिक भीती. पण आज तसं काहीच त्याच्याकडे पाहताना तिला वाटलं नाही. तो म्हणाला होता तसच सूर्यालाही ग्रहण लागतं मग येतो डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश तसंच घडलं होतं. कदाचित  सगळं मळभ दूर झालय आता म्हणून आपल्याला जस आतून स्थिर आणि शांत वाटतय तसंच त्यालाही वाटत असेल का! ती हलक्या पावलांनी पुढे आली. तिने त्याच्या उजव्या हाताकडे पाहिलं. तिचे डोळे भरून आले.  हे असं कसं एखादा माणूस वागू शकतो! एखाद्या सिरीयल, फिल्म मध्ये पाहताना बरं वाटत हे पण असं खऱ्या आयुष्यात कोणी हाताची नस कापून घेतं, गळफास लावतं, विषारी औषध घेतं तेव्हा कुठून येतं हे असलं काही वागण्याचं धैर्य या लोकांमध्ये! एका क्षणासाठीही आपल्या माणसांचा विचार नसेल का मनात येत! काय सुरू असतं त्या शेवटच्या क्षणी मनात की हे असं काहीतरी करून आयुष्य संपवून टाकावं वाटतं. अनेक विचार तिच्या मनावर आदळत होते. तिने सलाईन च्या बॉटल कडे पाहिलं आणि  दोन सेकंद डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले. ती बेडवरती त्याच्या उजव्या हाताच्या शेजारी त्याच्या बाजूला बसली.

" सर कसे आहात? लवकर लवकर बरे व्हा आता. तुमचं कॉलेज वाट बघतय तुमची आणि आणि मी सुद्धा..... विक्रम खूप त्रास दिला ना मी! I know पण तू इतके सगळे प्रश्न माझ्यासमोर उभे केले मग माझ्यातल्या बाईने काय करायला हवं होतं. त्यातून तुझं हे सततच खोटं बोलणं, लपवाछपवी मग काय समजायचं होतं मी? हो, माझं चुकलं. गुन्हेगाराला ही एक बाजू मांडण्याची संधी दिली जाते तू तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची, जवळची व्यक्ती होतास ना. आपल्या जवळच्या माणसांनी आपला विश्वास तोडला तर त्रास होतो, राग येतो. त्यातून तू प्रत्येक बाबतीत मला गृहित धरल्या सारख वागत सुटलेला. मी कुठेही जाणार नाही हा तुझा माझ्यावरचा विश्वास कधी ओवर कॉन्फिडन्स पर्यंत पोहोचला ते कळलचं नाही तुला! पण कितीही काहीही असलं तरी तुझ्या आठवणी मोबाईल मधून डिलीट केल्या मी मनातून कश्या डिलीट करणार! तू , तुझं बोलणं, तुझं सोबत असणं लग्नानंतरही मला आवडायचं की! तेव्हा तर आपल्यात काही मनाने नातंही तयार झालेलं नव्हतं. विक्रम असं काही करून घेण्याआधी एकदाही मला काय वाटेल याचा विचार सुद्धा नाही करावा वाटला का? तुला काही झालं तर माझ्या आयुष्यातली तुझी कमतरता कशी भरून काढणार मी! तुझ्याजागी दुसरं कोणी कसं असेल!"

 तिचे डोळे भरून आले. तिने आपला हात हळुवारपणे त्याच्या कपाळावरून फिरवला. त्याच्याकडे पाहून ती छान हसली. तिच्या हाताच्या स्पर्शाने त्याला जाग आली. समोर ती!

" अ.....नघा "

" गुड मॉर्निंग सर! " तिने हसून म्हटलं.

" तुम्ही!"  त्याने आश्चर्याने म्हटलं.

" का? नको यायला हवं होतं! विक्रम हे असं तुझ्या वागण्यामुळे मला किती त्रास झाला..... तुला काही झालं असतं मग मी काय करायचं? तुझ्याशिवाय....."

 ती त्याच्या डोळ्यात पाहत केसातून हळुवार हात फिरवत बोलत होती.

" जस्ट शट अप..."    त्याने खांद्याने तिचा हात दूर झटकला.

" विक्रम "

" You may go now! आणि पुन्हा इथे येण्याची तसदी घेऊ नका."

" विक्रम ऐक ना प्लीज हे असं रागवतात का."  तिने पुन्हा आपला हात पुढे केला.

" मी म्हटलं ना, या तुम्ही आता आणि इतकी जवळीक करण्याची गरज नाहीये. तुम्ही सुद्धा कॉलेजच्या स्टाफमधल्या एक आहात माझ्यासाठी बस! आलात, भेटलात, तुमच्या शुभेच्छा पोचल्या.थँक्स. "

 त्याने नजर दुसरीकडे वळवली.

"बरं सर, पण  ऐका ना थोडंस......"   तिने मस्करीच्या सुरात त्याचा चेहरा आपल्याकडे वळवला.

" प्लीज तुम्ही या आता! तुमच्या सोबत बोलण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये."   तो म्हणाला तशी ती बेड वरून ताडकन उठली.

" ओके फाईन फाईन निघते मी!  इतकं सगळं झालेला आहे तरी तुमचा ताठा कमी झालेलं नाहीये. तुमचा हा जो अॅटीट्युड आहे ना त्यानेच माती करून घेतली तुम्ही स्वतःच्या आयुष्याची !"

" ते माझं मी बघेन. माझ्या लाइफ ची काळजी तुम्ही करू नका. माझ्या घरातली माणसं आहेत त्यासाठी. तुम्ही चिंता करण्याची गरज नाही."  त्याने कडक सुरात म्हटलं.

" वाव! ग्रेट. सगळं करून सवरून, चार माणसांना मनःस्ताप दिला हे जे काही करून घेतलं त्याने आणि आत्ता त्याबद्दल तिळमात्र काही वाटत नाहीये."

" का वाटावं?  माझं आयुष्य आहे मी बघेन काय करायचं ते! आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनःस्ताप झाला नं पण माझ्या घरच्यांना. माझ्या आई-वडिलांना आणि त्याबद्दल मला वाईट वाटतय. तुम्हाला मनःस्ताप झाला ते तुमचं तुम्ही पहा. मी का त्याबद्दल स्वतःला कोचत बसू!
हे जे काही मी वागलो ते तुमच्यासाठी नव्हे! मला माझ्या चुकांची जाणीव होती आणि त्यातून मी माझी मला दिलेली ती शिक्षा होती बस!"

" ओके, बरं मग रहा असेच एकटे आयुष्यभर!"

" हो राहीन मी! तुम्ही नका चिंता करू."

" छे! काही बोलण्याचा परिणाम होण्यापलीकडे आहे हा माणूस! गुड बाय."  ती चिडून दार उघडून तरातरा तिथून बाहेर पडली. आपल्याला काही देणेघेणे नाही अशा आविर्भावात त्याने डोळे मिटून घेतले.
...................................................


 ती रूममधून बाहेर आलेली पाहून जितेंद्र पुढे आला.

" वहिनी काय झालं ? काय बोलला तो?"

" त्यांच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नसतो!"  एवढं बोलून ती तशीच पुढे निघून गेली.

" अहो पण ऐका ना..... वहिनी.....ऐका.झालं तरी काय!"


तो काही बोलेपर्यंत ती निघून गेली होती. काय झालं ते त्याला काही कळलचं नाही.
.....................................................

ती दुपारी कॉलेजमधुन घरी आली. सकाळी उत्साहात बाहेर पडलेली ती घरी आली तीच कंटाळलेली. कुमुदने सहज विचारलं, लवकर आलीस आज त्यावरती ' हो, का! नको यायला हवं होतं.' असं म्हणून ती खोलीत गेली. फॅनचं बटन सुरू केलं आणि खुर्चीत बसली. विक्रमचा तिला राग आला होता. तो असं काहीतरी बोलेल हे तिच्यासाठी अनपेक्षित होतं . ती खुर्चीवरून उठली. मन स्वस्थ बसत नव्हतं. तिने पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन केली. फोन करू का नको या विचारात ती होती आणि पटकन तिने नंबर डायल केला.

" हॅलो."

" हॅलो, हा बोल ग  वैनुडी! कशी आहेस?"  समोरून उत्साही आवाज.

" हा ठीक."

" काय ग, तुझा आवाज का असा उदास! मग गेलेलीस ना आज भेटायला!"

" तुला कसं कळलं?"  तिने आश्चर्याने म्हटलं.

" हमारे जासूस चारो तरफ है।" ती हसली.

" नीतू "


" ओके ओके. तुझे भावोजी म्हणाले, चल ते राहू दे मग What happened ?"   तिने कुतूहलाने विचारले.

" नथिंग!"   ती मंद आवाजात बोलली.

" अरे, इतक्या महिन्यांनी भेटलात नी काही बोलला नाहीत!"

" त्यांना बोलण्यात इंटरेस्ट नाहीये म्हणे!"   ती जराशी चिडक्या सुरात म्हणाली.

" मग कशात इंन्टरेस्टय?"   तिने तिची थट्टा करायला सुरुवात केली.

" गप ग! मला सुचत नाहीये काय करू."

" ओके ओके. जस्ट चील. जाऊ की आपण ओके."

" ओके. बरं बाय."  ती उदास चेहऱ्याने म्हणाली आणि फोन ठेवला.
..............................................


" अहो मॅडम कशाला झीकझीक करताय! निघा ना तुम्ही असं आम्ही कोणालाही आत नाही सोडू शकत." रूम बाहेरच्या सुरक्षारक्षकाने म्हटलं. मघापासून तो समजावत होता पण ती काही ऐकूनच घेत नव्हती.

" प्लीज, मुझे एक बार मिलने दो उन्हें।" तिनं आर्जवी स्वरात म्हटलं.

" मॅडम, प्लीज आप जाओ यहाँ से। उनके घर वालों के सिवा उन्हें कोई मिल नही सकता।"  दुसर्‍या एकाने म्हटलं.

" लेकिन वो मुझे जानते हैं न।"

" मॅडम आप........."

" ए काय गोंधळ चाल्लाय?"  जितेंद्र आला तसे दोघं खाली मानेनं शांत राहिले.

" यांना आत जायचय. भेटायचय म्हणतात." 

 जितेंद्रने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.

" कोण तुम्ही ?"   त्याने शांतपणे विचारलं.

" मुझे उनसे मिलना है। प्लिज."

" हा, पण कोण तुम्ही? मी त्यांचा भाऊ!  तुमचा काही निरोप असेल तर द्या."

"  नही नही. मुझे उनसे मिलना जरूरी है। प्लीज मैं आपको बताती हूँ। प्लीज."  ती विनवण्या करू लागली.

" ओके या तुम्ही जाऊन. बोलू आपण नंतर." तो म्हणाला तसं तिने होकारार्थी मान हलवली.
..............................................

      ती दरवाजा ढकलून आत मध्ये आली. त्याला या अशा अवस्थेत पाहून तिला वाईट वाटलं. आपल्या एका खोट्या बोलण्यामुळे दोन माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली याचं शल्य मनात घेऊन ती चालत पुढे आली.

" विक्रम."   तिनं त्याच्याकडे पाहत म्हटलं. त्याने बळेबळेच डोळे मिटून घेतलेले डोळे उघडले.

" नताशा." त्याच्या चेहऱ्यावरती हसू पसरलं.

" कैसे हो तुम?"  ती पटकन समोरच्या स्टुलावरती बसली.

" ठीक आहे. कशीयस तू ? अचानक इकडे आलीस. राजेशने बोलावलं वाटतं."  तो किंचित उपहासाने हसला.

" हं. उसका कॉल आया था। तुमने ऐसा.... कुछ समझ में नहीं आ रहा था तो जल्दी यहाँ आयी।"   

तो पुढे काही बोलणार तोच ती पुन्हा म्हणाली,

" इसके लिये मैं भी जिम्मेदार हूँ।  मैनें अनघा को सब अगर जल्दी बताया होता तो......"  अपराधी भाव तिच्या चेहर्‍यावरती होते.

" अरे, असं काही नको डोक्यात घेऊस प्लीज आणि ती त्या फोटोज मुळे घर सोडून गेली आणि पुढे हे असं सगळं झालं असं नाहीये ना! ते जस्ट एक निमित्त ठरलं. बाकी ती ऑडिओ क्लिप तर खरी होती आणि माझ्या आधीच्या मिस्टेक्सही रिस्पॉन्सिबल होत्याच."

" हा लेकिन,  यु डोन्ट वरी। मैं उसे मिली कल और उसको सब बताया है।" ती  म्हणाली तसं त्याने पटकन नजर वरती वळवली.

" अच्छा! म्हणजे तू भेटल्यानंतर उपरती झाली वाटतं इथे येण्याची."

" विक्रम, छोड ना. ऐसा क्यो बोलते हो? आयी ना वो तुम्हारे लिए वापस यही अच्छी बात हैं।"

" हं......"   तो काहीश्या विचारी चेहऱ्याने म्हणाला.  अनघा त्याला भेटून गेली या आनंदात ती होती.
............................................... ..

       त्याला भेटल्यानंतर ती बाहेर येऊन जितेंद्र ला भेटली. ते दोघं बाहेर गॅलरीत चालत आले. तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय असं तिने त्याला सांगितलं. त्यालाही ती कोण आणि विक्रम सोबत ती अनघालाही कशी ओळखते ते जाणून घ्यायचं होतं. तिने काहीही न लपवता राजेश सोबतच्या मुंबईमधल्या भेटीपासून ते आत्तापर्यंत सगळं काही त्याला सांगितलं. इतकं सगळं ऐकून त्याला धक्काच बसला. राजेश विक्रमच्या मित्रांपैकी एक आहे किंबहुना त्याचं नी राजेशचं चांगलं पटतंय याची जितेंद्रला कल्पना होती. पण राजेश असं काही वागेल याची कल्पना त्याने केली नव्हती. आतापर्यंत विक्रम जे अनघासोबत चुकीचा वागला ते सगळ्यांना माहीत होतं. पण राजेशने त्या सगळ्याचा वापर करून मुद्दामहून काही गैरसमज निर्माण केले आणि त्यामुळे त्या दोघांमधलं अंतर अजून वाढत गेलं याची कल्पना कोणालाच नव्हती. त्याला लगेच सामंत सरांना फोन करून याचा जाब विचारावासा वाटला. पण नताशाच्या सांगण्याप्रमाणे त्यांना यातली काही कल्पना नसली तर उगीच गोंधळ नको  त्यामुळे तो शांत राहिला. तिचं सगळं बोलणं त्याने ऐकून घेतलं. आता मात्र त्याची एकच इच्छा होती, लवकरात लवकर हे सगळं सगळ्यांसमोर यायला हवं.


क्रमशः

127- सोमवार सकाळ

🎭 Series Post

View all