बंधन भाग 127

Social Love


भाग 127

( गेल्या भागात अनघा त्याला भेटायला हॉस्पिटलला गेली पण तो तिच्याशी नेहमीप्रमाणे बोलत नाही. नताशा सुद्धा त्याला भेटून आपण अनघाला सगळं खरं सांगितल्याचं त्याच्या कानावरती घालते. पाहूया पुढे)


             दुसऱ्या दिवशी नितुने ठरल्याप्रमाणे अनघाला सकाळीच मेसेज केला. ती हॉस्पिटलला जाणार होती आणि तिथून एन.जी.ओ.ला मग अनघानेही कॉलेजला जाण्याआधी हॉस्पिटलला जायचं ठरवलं. नीतू सोबत असेल तर त्याला आपल्या सोबत बोलावंच लागेल या कल्पनेनेच तिचं तिलाच हसू आलं. नेहमीप्रमाणे ती कॉलेजला निघण्यासाठी तयार झाली. काल त्याला भेटून आल्यापासून तिला छान वाटत होतं. उत्साही वाटत होतं. इतक्या महिन्यांपासून आपल्या मनात साचलेलं सगळं आपण बोललो. त्याने ऐकलं की नाही ऐकलं की ऐकुनही न ऐकल्यासारखं केलं ते त्याचं त्यालाच ठाऊक. पण आपल्या मनाला बरं वाटलय या विचाराने तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पसरली. तिने नेहमीप्रमाणे कुंकू लावलं. आरशात पहात छानसं हसली.
.........................................................

" साहेब येऊ काय?"  नीतू दरवाजा लोटून आत मध्ये आली आणि मागून अरुंधती सुद्धा !

" अरे या या...... आज तुम्ही दोघी चक्क एकत्र! काही खरं नाही मग."    तो तिची थट्टा करत म्हणाला. आता त्याला उशीच्या आधाराने बेडवरती टेकून बसायला जमत होतं. हाताच्या जखमेची ठणक ही थोडी कमी झाली होती.

" हो,  मग आणि आश्चर्य काय त्यात आम्ही एकत्र असलो की नेहमी भांडतो असं काही नाही!"  ती आत आली आणि धपकन बेडवरती टेकली.

" हो ना...."  तो हसला.

" मम्मा बघ ना सारखा चिडवतो मला."

" तू पण काय कमी नाहीस."  अरुंधती म्हणाली तर तिने नाक फुरगटुन तिच्याकडे पाहिलं.

" तसंही हा काय लाडका बुवा तुझा!"

" असं काही नाही ग......."  अरुंधती तिच्या खांद्यावरती चापट मारत म्हणाली. नीतूची बडबड सुरू होती इतक्यात अरुंधती चा मोबाईल वाजला.

" थांब हा....." ती  त्यांच्या गप्पांमधून बाजूला झाली. जितेंद्र चा फोन होता. ती रूमचा दरवाजा उघडून बाहेर आली. दोन पावलं जाणार तोच समोरून अनघा येताना दिसली.

अरुंधती तिथेच थांबली. ती पुढे आली तर समोर अरुंधती उभी!

" मम्मा तुम्ही!"   ती मनातून थोडी घाबरली. अरुंधती अचानक समोर येईल असं तिला वाटलं नव्हतं. विक्रम आपल्याशी एकदा नीट बोलायला लागला की आपण घरी जाऊन आत्या आणि अरुंधती ची गाठ घ्यायची अस तिच्या मनात सुरू होतं. पण आता अरुंधतीला समोर पाहून तिला काही सुचेना.

" काय सुनबाई कुठे हरवलात?"   तिने नजरेसमोर टिचकी वाजवली तशी ती भानावरती आली.

" आ......काही नाही."

" मग अशा कावऱ्याबावऱ्या का झालेल्या ?"  तिने तिच्या नजरेत पाहत म्हटलं. अनघाने एक दीर्घ श्वास घेतला.

" मम्मा, आय ऍम सॉरी."  ती म्हणाली तस अरुंधती किंचित हसली.

" सॉरी कश्याकरता! हे पहा, तुम्ही काही एवढ्या तेवढ्या कारणावरून घर सोडून गेला नव्हतात त्यामागे तसच ठोस कारण होतं आणि ते बरोबरच होतं. इतका शारीरिक अत्याचार सहन करुन, त्यानंतर तुमच्या आई वडिलांना झालेला मनःस्ताप सहन करून, मानहानी सहन करून,  ज्याच्यावरती विश्वास ठेवला त्यानेच खोटं बोलणं..... मग अजून काय करणं अपेक्षित होतं तुम्ही! मन मारून, समाजाला काय वाटेल, कोण काय म्हणेल या दबावाखाली कुढत राहून काय होणार होतं!"

अरुंधती म्हणाली तसं तिने पटकन नजर वरती वळवली.

" पण मी त्यांचं एकदा तरी ऐकून घ्यायला हवं होतं ना!"

" हो, ते चुकलं तुमचं. पण प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीत सगळचं सुचतं असं नाही ना. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य वाटेल ते केलतं तुम्ही आणि प्रत्येक माणूस असाच वागतो. एखाद्या सिच्युएशनमध्ये  त्या क्षणी योग्य वाटतं ते करून मोकळी होतात माणसं. फक्त बाईकडून अवाजवी अपेक्षा का? तुम्ही पण हाडामासाच्या माणूसच आहात."


" मम्मा."   तिने अरुंधतीला पाणावल्या डोळ्यांनी मिठी मारली.

" अरे, अश्या रडता काय! म्हणून मी नाही समजावायला आले तुम्हाला. मला एक मुलगी असताना तुमच्याकडून नको त्या अपेक्षा का कराव्यात. तिच्या बाबतीत असं काही दुर्दैवी..... ती तिचं घर सोडून जर आली असती तर मी तिची बाजू घेतली असतीच ना." ती शांतपणे बोलली.

तिच्या बोलण्याने तिला धीर आला. अनघाने हाताने अश्रू पुसले.

" पण ते बघा ना, माझ्याशी बोलायचं नाही त्यांना."

" असु द्या....... होईल ठीक सगळं. जा भेटुन या."  अरुंधतीने हसत तिच्या खांद्यावरती आश्वासकपणे थोपटलं तसं तिला बरं वाटलं.
.......................................................


" दाद्या एक गंमत आणलीय मी!"  नीतू दात मिचकावत म्हणाली.

" हा काय ते!"  त्याने कुतूहलाने म्हटलं आणि ती दरवाजा ढकलून आत मध्ये आली. तिला पाहताच तो म्हणाला,

" नकोय मला तुझी गंमत."  ती आत येताच त्याने नीतुकडे पाहत म्हटलं.

" ढॅनटढॅन... हे घे!"  तिने खिश्यातून कॅडबरी काढली. त्याच्या नजरे समोर तिने लहान मुलांसारखी हातातली कॅडबरी नाचवत म्हटलं.

" अरे तू कसा खाणार न!  असू दे भरवू आपण मग तर खाणारच ना!"   तिनं अनघाकडे लक्ष दिलं.

" मला कोणाकडून काही नकोय....." तो पुन्हा फरशी कडे पाहत म्हणाला. तिच्याकडे पाहणही त्याने टाळलं.

" बरं इथे ठेवते रे....."  ती स्टुलावरून उठली आणि बेड लगतच्या टेबलवरती औषधांच्या बाजूला कॅडबरी ठेवून दिली. अनघा गप्पपणे नीतू कडे पाहत उभी होती.

" बरं, दाद्या  मी येते हा जरा मम्मा कडे जाऊन....."  तिने अनघाला ऐकू जाईल अशा सुरात म्हटलं.

" हं."

" बाय...."   वहिनी कडे पाहून पुटपुटत गालात हसत ती दरवाजा उघडून बाहेर गेली.
.......................................

त्याने ती समोर पाहून नजर दुसरीकडे वळवली. ती टेबलापाशी गेली. तिथे त्याची औषधं, फळं, पाण्याच्या बॉटल्स असं काही ना काही होतं.

" तुम्ही काय खाणार का?"  ती पाठमोरी उभी होती.

" नको.... नाश्ता केला."

" ओके, फ्रुट्स देऊ का की ज्यूस मागवू?  सकाळी ज्युस घेता ना तुम्ही."   तिने बास्केटमधली सफरचंद डिशमध्ये कापायला घेतली.

" सांगितलं ना एकदा I don't want anything. Why are you wasting your time? कॉलेज नाहीये वाटतं तुम्हाला का तेही सोडून दिलंत." तो तिरकसपणे म्हणाला.

" तेही म्हणजे What do you mean?  अजून काय सोडलेलं मी! तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की की नीट बोलायचंच नाहीय." ती चिडली.

" मला कसलाच प्रॉब्लेम नसतो..... निट बोलायचं म्हणजे नक्की कसं Explain it. काय बोलणं अपेक्षित आहे मी!"

" असो, मी कितीही काही म्हटलं तरी तुमच्या मेंदूपर्यंत नाही पोचणार ते! झोपी गेलेल्याला जागं करता येतं. पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना नाही."   चिडून तिने हातातली सुरी ताटावरती आपटली नी ती त्याच्याकडे वळूनही न पाहता बाहेर पडली.
............................... .................

         विक्रमला बरं वाटेल, त्याची तब्येत सुधारेल, तो घरी येईल या आनंदात भाऊसाहेब होते. त्याला हॉस्पिटलला पहिल्यांदा त्यांनी पाहिलं तेव्हा त्याची ती अवस्था त्यांना पाहावत नव्हती. आपण खूपच तुटकपणे वागलो त्याच्याशी गेल्या काही महिन्यांमध्ये याचे त्यांना वाईट वाटू लागलं. डॉक्टरांनी त्याला बरं वाटेल असं सांगितलं, पण काही गोष्टींविषयी डॉक्टरांनी नाराजी दर्शवली होती. ते भाऊसाहेबांच्या मनात घोळत राहिलं. एका अर्थाने आपलं आपल्या मुलाकडे दुर्लक्ष झाले की काय असे त्यांना वाटू लागले. आत्या चहाचा ट्रे घेऊन आत मध्ये आली तसे ते विचारांच्या गर्तेतून बाहेर आले.

" सायेब,  काय झालय?  आस इचारात हायसा." आत्याने हातातला ट्रे टीपॉयवर ठेवला.

" काही नाही. असंच."

" काय झालया?"   आत्याने  कप उचलून त्यांच्या हाती दिला.

" ताई आपलं विक्रम कडे दुर्लक्ष झालं का ग आमचं?"

" अासं का म्हनतायसा?"

" आपल्या ट्रस्ट ची जबाबदारी काढून घेतली मी त्यांच्याकडून. अलीकडेच आपल्या गुरुकुल मधून पण त्यांना ....... उगीच इतक्या टोकाचा निर्णय घेतला आम्ही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी हे असं......  सुनबाई नाहीत त्यांच्या आयुष्यात त्याचा त्यांना त्रास झाला असेल तस मग आमच्या या निर्णयांचा सुद्धा झाला असेल ना."

"  व्हय पन जे झालया त्येला काय इलाज बी न्हाई. आता न्हाई व्हनार आसं. तसबी सुनबाई बी आल्यानं त्यांस्नी भेटाया. व्हईल आता समदं ठीक."

" हं, जितेंद्र म्हणाले तसं. बघू काय होतं ते."  त्यांनी चहाचा घोट घेत म्हटलं. अनघा त्याला भेटायला आली याचा त्यांना जास्त आनंद होता.
.........................................................

               त्याने टोमणे मारल्यानंतर ती रागातच तिथून बाहेर पडली आणि कॉलेजला पोहोचली. नेहमीप्रमाणे तिने लेक्चर्स घेतली. पण शिकवण्यात मनच लागत नव्हतं. त्याचं सकाळचं बोलणं तिच्या डोक्यात घोळत राहिलं.' काय बोलणं अपेक्षित आहे मी!'  असं तिरसटा सारखं त्याने विचारलं तेव्हा मोठ्याने  त्याला ओरडून सांगावसं वाटलं तिला, बोल ना माझ्याशी. काहीतरी विचार, मी कशी आहे? कशी होते इतके दिवस तुझ्याशिवाय..... काहीतरी बोल पण बोल पहिल्यासारखं! '  सकाळच्या विचारांमध्ये ती कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडली. जितेंद्रला सांगितल्याप्रमाणे त्याने ड्रायव्हरला पाठवून दिलं होतं. सकाळी कडाक्याचं वाजल्यानंतर आता पुन्हा वाद नको होते तिला! पण घरी नव्हतं जायचं तिला! पाहूया मूड बदलला असला तर या आशेने ती गाडीत बसली.
.........................................................

            ' असा कसा याचा मूड देव जाणे! काही ऐकूनच घ्यायचं नसतं त्याला. कितीही काहीही होवो याचं नाक नेहमी तोऱ्यात. एकतर आई-बाबांना न कळू देता इकडे येतेय मी कालपासून. घरी कळलं तर उगीच वाद..... घरी याच्या बाजूने मी काही बोलायला माझ्याशी हा तरी नीट बोलायला हवा ना!  नाही बोलला तर घरी तरी मी कसं सांगणार की मला  त्यांच्या घरी जायचं आणि त्याच्या सोबतच राहायचय. हा असा तिरसटा सारखा वागत राहिला तर अवघड होऊन बसेल सगळं..... कळत कसं नाही याला. याच्या या अशा मनमानी कारभारामुळे असं होऊन बसलय. सगळं नेहमी स्वतःला पाहिजे तेच करायचं असतं त्याला. आधी भाऊसाहेबांचं वागणं पटेना म्हणून स्वतःला हवे ते उद्योग केले नंतर...... असो ते सगळं पुन्हा उगाळत बसायला नको. आता बास झाली याची नाटक बाजी. आज काय तो सोक्षमोक्ष लागू दे. आता सरळ जायचं नी विचारायचं, माझ्या सोबत राहायचं की नाही. हो का नाही ते आत्ताच सांग असं सरळ बोलून टाकायचं.' हो '  म्हणाला तर ठीक आणि अजुन अकड असेल आणि नाहीच म्हणाला तर तर.... मी बघतेच मग कसा हो म्हणत नाही ते! ' ती याच विचारात भराभरा पायऱ्या चढत होती आणि अचानक ती थबकली. मागे वळून पाहिलं. तिच्या मागून एक साधारण तिशीच्या वयाचा एक जण पायऱ्या चढताना तिला दिसला. तो मघापासून याच मार्गाने येतोय असं तिला वाटलं. तिने मगाशी लिफ्टमधून येतानाही त्याला पाहिलं होतं. हॉस्पिटलमध्ये इतक्या रूम्स, इतके विभाग असताना याच दिशेला त्याचं काय काम ते तिला कळेना. हॉस्पिटलच्या इमारतीचा दुसरा मजला खास व्हिआयपी रुग्णांसाठी होता. ती थोडीशी मनातून चरकली. आणि दुर्लक्ष करत पुन्हा चालू लागली. चार पाच पायर्‍या चढल्या नंतर तिने डोळ्यांच्या कोनातून पुन्हा मागे पाहण्याचा प्रयत्न केला. तो तिथेच होता! तिच्या मागोमाग. ब्राऊन कलरचा शर्ट, महागडी ट्राऊजर, डोळ्यांवर गॉगल. त्याच्याकडे पाहून तो वेषांतर करून आलेला एखादा पत्रकार किंवा विरोधी पक्षाचा एखादा खबरही वाटेना. त्याच्याकडे पाहून तरी तो तिला सज्जन वाटला.  ती मनात शंका घेऊन पायऱ्या चढत वरती आली. तो समोरून पुढे निघूनही गेला. रूम कडे जाणाऱ्या मधल्या पॅसेजच्या तोंडाशी उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांशी तो काहीतरी बोलला तशी ती धावत पुढे आली.


" ओ, हू आर यू ?  कोण तुम्ही नी कुठे चाल्लात?" त्या आवाजासरशी तो मागे वळला आणि क्षणभर तिच्याकडे पाहातच राहिला.

"  I can ask you the same question. Who're you?  तुम्ही मला अडवणाऱ्या कोण?"  त्याने डोळ्यांवरचा गॉगल बाजूला केला.

" कुठे जायचे तुम्हाला? आत नाही जाता येणार."  तिने कडक सुरात म्हटलं तसा तो हसून पुढे आला.

" तुम्ही अडवणार का मला!"  त्याने गालात हसत तिच्याकडे पाहिलं आणि तिची थट्टा केली.

" हो........"

" हो, पण  मी कुठेही जाईन. हॉस्पिटल काय तुमच्या मालकीचं आहे का?"

" नाही, तुम्ही कुठेही जा ओ. इथे महिनाभर राहिला तरी मला काही घेणं देणं नाही, फक्त तिकडे त्या रूममध्ये जायची परमिशन नाही."   तिने हाताची घडी घालत म्हटलं.

" Why ?  तुम्ही कोण मला सांगणार्‍या?  असो."   तो जायला वळला.

" His wife "   ती टेचात म्हणाली. पाठमोरा तो क्षणभर थबकला.

" What! "

" का ? शॉक बसला का?"   ती त्याची कशी जिरवली या आविर्भावात हसली. क्षणभर त्याचे डोळे पाणावले तो तसाच पुढे चालू लागला.

" ओ मिस्टर एक मिनिट तुम्ही कोण?"  तिने त्याला मागुन पुन्हा आवाज दिला.

" मला उत्तर देण्याची गरज नाही वाटत तुम्हाला!"  तसाच तरातरा चालत तो पुढे गेला.

" तुम्ही....."    तिने त्या दोघांकडे पाहिलं. ते खाली माना घालून उभे होते.

" मॅडम सॉरी, ते जितेंद्र साहेबांनी मगाशी सांगून ठेवलेलं त्यांना सोडायचं."

" काय!"   तिला काही कळलं नाही. कोण असेल हा. त्याच्या अशा वागण्याने ती चक्रावून गेली.
........ ............................................


                       तो शांतपणे डोळे मिटून उशीला टेकुन बसला होता. मघाशी उषाताई येऊन गोळ्या देऊन गेल्या. सकाळ, दुपार, रात्री झोपण्यापूर्वी घ्यायच्या गोळ्या, तो मधल्या वेळेत काही खातो का नाही या सगळ्याकडे त्या लक्ष द्यायच्या. सलाईन संपलं की नाही ते पाहणं, त्याच्या शरीराचे तापमान तपासणं अश्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे  त्यांचे लक्ष असायचं. त्या आजूबाजूला असल्या की आत्या भोवती असल्यासारखं वाटायचं त्याला. अरुंधती, नीतू, आत्या दिवसातून एकदा तरी कोणी ना कोणी भेटायला यायचं. भाऊसाहेब रात्री घरी जाण्याआधी हॉस्पिटलला येऊन जायचे . जितेंद्रला तर इकडे ड्युटी लागल्या सारखं होतं. पण कितीही कोणी भेटायला आले तरी एक कमी असायची....... आणि काल ती पहिल्यांदा भेटायला आली. त्याच्या डोळ्यातले थेंब त्याच्या हातांवरती पडले तेवढ्यात दरवाजा उघडून कुणीतरी आत येण्याची चाहूल लागली तसे त्याने डोळे उघडले.

" विक्रम "

त्या आवाजासरशी त्याच्या चेहऱ्यावरती हसू फुललं.

" विशाल तू!" 

" अरे, मग काय How're you Sir ?"  तो पटकन पुढे आला आणि सॅक बेड वरती फेकली.

" विक्रम यार कसा आहेस तू? आत्ता जीवात जिवात आला माझ्या."    त्याला बरं वाटतय हे पाहून त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं.

" कधी आलास? सरप्राईस व्हिजिट."

" हो रे, दोन दिवसांपूर्वीच आलो इंडियात. इकडे आलो तर सोशल मीडियावर आपल्या नेहमीच्या पॉलिटिक्स च्या न्यूज त्यात तुझ्याबद्दलच्या न्यूज पाहिल्या. I was shocked.  फोन केला तर कोणाकडे चौकशी करावी काही कळत नव्हतं .त्यात मी कोणाला ओळखत नाही कोणी मला ओळखत नाही, शेवटी तुमच्या बंगल्या वरती कॉल केला. एका सर्वंटनं जितेंद्र चा नंबर दिला. त्याला कॉल केला तेव्हा सगळं फायनली क्लियर झालं."

" बापरे लॉंग स्टोरी आहे!"    तो हसला तसा विशाल क्षणभर शांत झाला.

" विक्रम, जितेंद्र ने सांगितलं सगळं. सगळं म्हणजे सगळंच..... तू एक मेल, एक कॉल तरी करायचास. मी आलो असतो ना. आपण बोललो असतो साहेबांशी. सगळ्यांशी नी तिच्याशी सुद्धा....."    विशाल म्हणाला तसं तो उपहासाने हसला.

" काय नी किती समजावणार? सगळं हाता बाहेर गेलं होतं. मी त्यादिवशी जयपुरहून येण्याआधीच राजेशने..."

" Yeah, I know that everything. जितेंद्र बोलला. पण अरे तू असं काही करायची गरज होती का! अरे ती खचली होती. तिची मेंटल कंडीशन खराब होती. एखाद्याला अश्या अवस्थेतून बाहेर काढणारा माणूस तू. तू असं काही करू शकतोस! माझा विश्वासच बसला नाही आधी."

" विशाल मी काही ग्रेट नाही. कर्तव्य होतं ते माझं. माझ्या चुकीमुळे..... मग मीच सावरायला हवं होतं सगळं. नंतर हे सगळं प्रेमबीम मग तर अजून जबाबदारी वाढली रे तिला सुखी ठेवायची."

" विक्रम तू असो...... Now, What?  फायनली जिंकलास तू दोस्ता! असं एखाद्या तलवारीला जिंकणं नॉट इझी. पाहिलं मी मघाशी. looking pretty हा पण सॉल्लीड तिखटय."   

 विशालने जरा थट्टेचा सूर आळवला तसा तो हसला आणि हसता हसता उदासी पसरली त्याच्या चेहर्‍यावर.

" विक्रम काय झालय? " विशाल त्याच्या समोर बसला.

" नथिंग."   त्याने मान हलवली पण त्याचे डोळे भरून आले होते.

" झुट मत बोल यार अरे तुला प्रेमात पडताना पाहिलेला एकमेव साक्षीदार आहे मी!"

" मी मी चुकलो. मी  गुन्हा केलाय I know  मी माणूस म्हणून नसेन ग्रेट किंवा गुड मॅन वगैरे.... पण नवरा म्हणून  मी कुठे चुकलो हे त्यांनी मला एकदा दाखवाव! माझ्या चुका होत्याच  रे पण म्हणजे वाट्टेल ते आरोप करावे अस नाही ना. एखादी शी नाव जोडायचं काय तर म्हणे अफेयर होतं!  मी राक्षस, मी समाजाला लागलेली कीड, मी निगरगट्ट सगळं सगळं मान्य मला. पण मी बाहेरख्यालीपणा कधीच केला नव्हता. कोणाला फसवलं नव्हतं ना. त्यांना ना दुसऱ्या कोणाला. ह्या आता काल आल्या नी पॅचअप करायच्या गोष्टी करतात. इथे येऊन तीन दिवस झाले हॉस्पिटलला नी या मॅडमना आता मला बघावसं वाटलं..... मेसेजेस, कॉल इव्हन पत्र कशालाही नो रिस्पॉन्स. इतका बिनमहत्त्वाचा झालो का मी! इतके महिने माझ्या शिवाय जगू शकतात मग आता का पिच्छा पुरवतात माझा. विशाल मी कधीच त्यांना आवडलो नव्हतो का रे! ते सगळं क्षणभंगुर होतं का! तू म्हणतोस तस अश्या एखाद्या इन्सिडंटने मुलगी एकटी पडते, आधार हवा असतो मानसिक म्हणुन त्या गुंतत गेल्या काय माझ्यात! नी म्हणून तेव्हा मी आवडायचो रादर सोबत पाहिजे असायची माझी."

" विक्रम तु Calm down."   विशालने त्याचे डोळे पुसले.

" विशाल त्यांनी परमेश्वर म्हणून माझी पूजा करावी I didn't expect that because I know I'm not good. भाऊसाहेबांसारखा बापमाणूस मी नाही. मी एक सामान्य माणूस आहे. मला त्यांच्यासारखं ग्रेट व्हायचही नाही. त्यांच्या सारखं वागावं हा कुठला अट्टाहास रे! बाप ग्रेट म्हणजे मुलाला चुका करण्याचा हक्कच नाही का! का सतत अपेक्षा अमिताभ ग्रेट मग अभिषेकनही तसच असावं! सतत तेच भाऊसाहेब वडिल असूनही तू मात्र...... पण मी चांगला नवरा बनण्याचा प्रयत्न केला ना. माझ्या समोर दुसऱ्या कुणाच्या हातात त्यांनी हात...I can't forget that." 

" प्लीज शांत हो रे जस्ट रिलॅक्स. You're good human being.  अस एखाद्याला उद्वस्त  करणं सोपं असतं. उभं करणं कठीण असतं जे तू केलस रे. त्यांना ते नाही जाणवलं त्यांचं बॅड लक तुझ नव्हे. Just relax and I'm always with you. या मित्राच्या घराचा आणि मनाचा दरवाजा तुझ्यासाठी नेहमी खुलाय लक्षात ठेव." विशालने त्याच्या खांद्यावरती आश्वासकपणे थोपटलं.

" ओके चल मी फ्रेश होतो जरा आणि मी आहे सांगलीत. आता तुला ठणठणीत बरा करूनच जाणार मी." विशालने उत्साहाने बॅग उचलली.
...............................

        तो बाहेर आला तर तिच्या हातून लोटलेला दरवाजा तसाच. ती स्तब्धपणे दारात उभी होती. विक्रमचे शब्द ऐकून ती स्तब्धच झाली. विशालने एकवार तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि तिच्या समोरून चालत तो बाहेर आला . ती  त्याच्या मागोमाग आली.

" तुम्ही डॉक्टर.... " तिचा गळा दाटून आला.

" हं."    तिच्याशी बोलण्याची त्याची इच्छा नव्हती.

" तू तुम्हाला थँक्स...  भावोजींना कॉल केला मी. त्यांनी सांगितलं तुमच्याविषयी. थँक्यु तुम्ही जे माझ्यासाठी केलत.... सॉरी मघाशी मी..." ती खाली मानेनं म्हणाली तसा तो बोलला,

" मॅडम, Don't say sorry. ज्या माणसाला म्हणण्याची गरज आहे त्याला म्हणा ते!"   त्याने कुत्सिकपणे म्हटलं.

" विशाल मला त्यांना दुखवायचं नव्हतं. ते इतके मनातून.... खरच नव्हतं वाटलं ते असे खचून जातील." 

"मॅडम तो खोटं बोलला पण खोटा कधीच नव्हता! फक्त तुम्हाला ते कळलं नाही. तुम्ही खूप यातना सहन केल्या.  अशा घटनेने मुलींचं आयुष्य कोसळून जातं. त्या गोष्टीसाठी तुमचं चिडणं, तुमचा राग सहाजिकच आहे आणि ती गोष्ट क्षमा करण्यासारखीही नाही. पण तुम्ही एकदा ऐकून घेतलं असतं तर...... निदान त्या तथाकथित अफेअर बद्दलची त्याची बाजू तरी पडताळून पाहायला हवी होती. मॅडम एकच सांगेन तुमच्या हाताने तुमचं सुख तुम्ही दूर नका लोटू."  इतकं बोलून तो पुढे जाऊ लागला.

" कुठे चाललात?" 

" डॉक्टरांना भेटायला. तुम्हाला गरज वाटत नसली तरी मला वाटते."

तो तसाच निघून गेला. ती तशीच स्तब्धपणे उभी राहिली. मन म्हणालं, आपण ओळखूच शकलो नाही का त्याला!

क्रमशः

भाग  128-  गुरुवारी रात्री

🎭 Series Post

View all