भाग 129
( गेल्या भागात विशालने तिला समजावले त्यामुळे आपण विक्रमसोबत वाईट वागलो अशी बोचणी तिच्या मनाला लागून राहिली. त्याच्या चेहर्यावर पुर्वीचा आनंद पाहण्यासाठी तिने त्याला पुष्पगुच्छ भेट दिला आणि आपल्या मनातलं सगळ सांगितलं. ते ऐकून तोही खूश झाला. पाहूया पुढे)
ती दुपारी कॉलेजमधुन घरी परतली तीच खुशीत पण चेहऱ्यावरचा आनंद तिने कुमुद पासून लपवण्याचा प्रयत्न केला. आता लगेच तिला घरी काही कळू द्यायचं नव्हतं. आधी राजेशने नक्की काय काय उद्योग केले होते, तिला नेमकं त्याने काय आणि किती खरं आणि किती गोष्टी रचून सांगितल्या होत्या ते पाहायचं होतं. हे सगळं प्रकरण एकदा भाऊसाहेबांपर्यंत पोचलं की सगळ्याच गोष्टी सोप्या होतील. मग ते आई-बाबांशी बोलले की कसली चिंता नाही मग आपणही सांगू आपल्याला तिकडे कायमच जायचं या विचारातच ती तिच्या रूम मध्ये आली. आज खूप छान वाटत होतं तिला. तिने दोन्ही हात पसरून स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि आरशासमोर उभी राहिली. हसू चेहर्यावरून ओसंडत होतं तिच्या. तिने लगेच नीतुला फोन केला. ती काही बोलण्या आधीच पलीकडून उत्साहाने किंकाळी.
" इ......वैनुडी बोल्ला ना दाद्या तुझ्याशी! काय बोल्ला, काय बोल्ला ? "
" हो हो तुला कसं...." तिचा उत्साह पाहून अनघाला नवल वाटलं.
" I know त्यात काय! मला कळत सगळं."
" ओके ओके. बोलले माझ्याशी ते खुश."
" हो ग वैनुडी भारी झालं बघ. मी सांगितलं पण घरी सगळ्यांना."
" काय ?"
" हेच की तू येणार आता कायमची इकडे तुझ्या हिरो सोबत."
" चल काहीही काय!" तिच्या चेहऱ्यावर ती हसू पसरलं.
" अय्या तू लाजतेस! शट मी असायला हवी होती आता तुझ्यासमोर."
" का ग ? "
" हेच तुला लाजताना बघायला मला जाम मजा येते बघ." ती खी खी करून हसली.
" गप ग. ओके. ठेवू का तुझं झालं असेल तर."
" हो ठेव बाय बाय सी यु."
" हो बाय."
" ए तू झोप हा नीट रात्री." फोन ठेवता ठेवता तिने हळू आवाजात म्हटलं.
" का नी आता दुपार आहे. मध्येच काय हे !"
" असंच रात्री झोप नाही येणार आज! तो स्वप्नात येईल न."
" गप ग शहाणे बाय." तिने हसून फोन ठेवला.
तिने नीतुला झापलं खरं पण ती म्हणाली तसं तिला आता खरंच प्रतीक्षा होती रात्रीची !
................................................................
" आत्याबाई काय करता? येऊ का ? " अरुंधती स्वयंपाक घराच्या दारात उभी होती तशी आत्या मागे वळली.
" वैनीसायेब तुमी! इचारता काय आश्या येवा की समद तुमचं तर हाये." आत्याने परातीत पीठ मळता मळता म्हटलं.
" हो आहे माझं. तुम्ही सांभाळता ना तेव्हाही आणि आताही." अरुंधतीने आत्याच्या खांद्यावरती थोपटलं.
" त्येचात काय येवढं! म्या बी लागतीच की घरातल्या समद्यांची कुनीतर. आता रकताचं नातं न्हाय माझं नि भाऊंचं तरी बी." काहीश्या विचाराने आत्या म्हणाली. तिचे डोळे पाणावले ते अरुंधती च्या लक्षात आलं.
" आत्याबाई "
" हा बोला की." पुन्हा तिने अरुंधती कडे लक्ष देत म्हटलं.
" सॉरी " अरुंधतीने आत्या कडे पाहिलं.
" अार देवा ते कशापाई ?"
" मी मध्यंतरी तुम्हाला उगीच बोलले. खरं तर माझ्या भूतकाळामुळे आपल्यातलं नातं बदललं. किती छान जमायचं आपलं. पण माझी ती एक चूक आणि तुमच्या मनातली माझी जागाच गमावून बसले मी. अगदी आपल्या जितेंद्रच्या जन्मानंतरही मला सारखं वाटायचं तुम्ही माझ्यावरती लक्ष ठेवुन असता. अजूनही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही वगैरे किंवा मी कशी चांगली गृहिणी नाही होऊ शकत हे मला दाखवून तुम्ही घर ताब्यात ठेवलं. साहेबांना तुमच्या शब्दाशी बांधून ठेवलं असंच वाटत राहिलं मला. विक्रम मोठा झाला कळलंच नाही कधी मग काय त्याचं लग्न. सून मला माझ्या पसंतीची हवी होती आणि समिहा तुमच्या पसंतीला उतरणे शक्य नव्हतं. त्यातनं अनघा त्याच्या आयुष्यात आली आणि हे असं सगळं.... तुम्ही नी यांनी तर अगदी लग्नापर्यंत ची बोलणी करून टाकली. मला ते सगळं तेव्हा खटकलं होतं. कधीतरी उरलेला कडवटपणा कारण होताच. घ्या पुन्हा आत्या बाईंनी सुनेच्या निवडीबाबत ही स्वतःच खरं केलं अस वाटलं मला."
" अासू द्या ना तुमी नगा अास जीवाला लावून घेऊ." आत्या स्वतःवर ती हसली.
" नाही हो खरंच सॉरी. तुम्ही खूप केलंय आपल्या घरासाठी, मुलांसाठी. आताही विक्रमच्या या अशा वागण्याने मला काही सुद्धा सुधरत नव्हतं. तुम्ही सगळं पाहायला आहात म्हणून ठीक चाललं होतं सगळं."
" पुरे वयनी साब, आस कवतिक नगा करू माझं. मला आवडतया समद्यांसाठी करायला. तुमच्याबिगर दुसरं कुनी मला न्हाई. ना लेकरं बाळं. या पोरांमुळं जीव रमतो माझा."
" हो तेही खरंच म्हणा पण पुन्हा तुम्ही अशी डोळ्यात अासवं आणू नका. बुरुज ढासळून पडला तर बाकीच्यांनी काय करावं." ती म्हणाली तस आत्याचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.
...................... ..............................
बर्याच दिवसांनी ती संध्याकाळची खोलीतून खाली स्वयंपाक घरात आली होती. तिने ओट्यावरून एक नजर फिरवली तसा अंगात उत्साह संचारला. कॉलेजला जायला तिने नुकतीच जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाचे दिवस आठवले तिला. दुपारपर्यंत कॉलेजमधून येणं, दुपारचे जेवण, थोडी विश्रांती, संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या लेक्चर ची तयारी, बाहेर थोडा अंधार पडू लागला की खाली हॉल मध्ये येऊन आईशी गप्पा मारणं, रात्रीच्या जेवणाची तयारी. त्या घटनेनंतर मात्र सगळं बिघडून गेलेलं आणि त्यातच अनपेक्षितपणे विक्रम सोबत झालेलं लग्न. त्या घरी स्वयंपाक घरात आत्याच्या आजूबाजूला असण्याची सवय झालेली. क्षणभर वाटलं तिला, आता आत्या कुठून तरी येतील म्हणतील, काय सुनबाई काय करतायसा बरं.
" काय ग अनु , काय करतेस ?" मागून कुमुदची हाक आली तशी ती आठवणींमधून बाहेर आली.
" काही नाही." तिने तिच्या नजरेला नजर देणं टाळलं.
" मग काय बेत ! काही बनवतेस का ?" कुमुदने मिश्कीलपणे म्हणत शेल्फ वरचा पिठाचा डबा खाली काढायला घेतला.
" काय करतेस ?"
" तू करतेस तेच."
तसं तिने पटकन नजर वरती वळवली.
" अगं अशी काय भांबावून पाहतेस? रात्रीचा स्वयंपाक कोण करणार!"
" अ....हा हा "
कुमुदने डब्याचं झाकण उघडलं तसं ती पटकन म्हणाली,
"आई मी बनवू भाजी चपाती आज ? "
" हो..... पण काय ग आज काय विशेष ?" परातीत पीठ ओतून घेत कुमुदने विचारलं तसं ती भांबावली.
" असंच ते आज मी जरा बाहेर....."
" काय! आत्ता कुठे! अंधार पडला."
" नाही, आता नाही. स्वयंपाक झाल्यावरती." ती पुन्हा आईचा अंदाज घेत म्हणाली.
" म्हणजे रात्री! ना......ही." कुमुदने लांबलचक ' नाही ' म्हटलं तस तिचा चेहरा उतरला.
" हा.....आई अगं खंडारे मॅडम."
" त्यांचं काय आता मध्येच!"
" त्या... त्यांची तब्येत ठीक नाही.... बिचार्या एकट्याच राहतात ना घरी."
" हो ग खरंच बाई, त्यांचे मिस्टर पण वारलेले. बिचाऱ्या. पोर पण काळजी घ्यायला जवळ नाही." कुमुद हळहळली तसं तिने पटकन विचारून टाकलं.
" हो न ग. आई मी नेऊ का त्यांच्यासाठी डबा ?"
" हो खरच जा. आजारी माणसाला घरचं जेवलं की बरं वाटतं."
" हो ना ग." तिच्या बोलण्याला दुजोरा देत तिने आपला चेहरा साधाभोळा केला.
" थांब, मुगाचे लाडू बनवलेत. गेल्या आठवड्यात तुला पण बरं वाटत नव्हतं न. तू काही खाल्ले नाहीसच. त्यांच्यासाठी घेऊन जा. पौष्टीक असतं."
तिने पटकन लाडवांचा डबा शेल्फ वरुन काढला. एका छोट्या गोल डब्यात त्यातले पाच सहा लाडू स्वतःच्या हाताने भरले तसा अनघाचा चेहरा ते दृश्य बघून आनंदला.
" आठवणीने घेऊन जा हा." ती म्हणाली तसं तिने आनंदाने हो म्हटलं.
" हो नक्की." तिने आता उत्साहाने चपात्या बनवण्यासाठी पीठ मळायला घेतलं.
..................... . .....................................
त्याने मांडीवरील उघडलेले पुस्तक आळस देत डाव्या हाताने थोडं बाजूला केलं. भिंतीवरल्या घड्याळात पाहिलं तर साडेआठ वाजलेले. मघापासून तासभराचा वेळ भर्रकन निघून गेल्यासारखं वाटलं त्याला! मागे उशीला टेकुन छताकडे पाहत बसण्याचा त्याला कंटाळा यायचा. आता हाताची जखम बरी होत नाही तोपर्यंत इलाजच नव्हता. गेले काही महिने खाणं-पिणं, झोपणं, सगळंच चक्र त्याने बिघडवून घेतलेलं त्यामुळे अशक्तपणा आला आहे हे एक कारण डॉक्टरांना आपल्याला इथं डांबून ठेवायला मिळालं आहे असं त्याला वाटायचं. त्याने दाराकडे नजर टाकली जितेंद्र डबा घेऊन येईल याची वाट पाहणं हा शुद्धीवरती आल्या दिवसापासूनचा नित्यक्रम झाला होता. आत्याच्या हातचं खायला मिळतं हेच समाधान. त्यातल्या त्यात चमच्याने भरवता येतील असेच पदार्थ जितेंद्र डब्यातून कोंबून आणतो असं त्याला वाटायचं.
" अरे कुठे राहिला हा !" त्याने कंटाळून डोकं मागे टेकलं. थोड्याच वेळात दरवाजा उघडल्याची चाहूल लागली तस त्याने दरवाजाकडे लक्ष दिलं.
" या " त्याच्या चेहऱ्यावरती मणभर हसू पसरलं.
" काय मग सर, डिनर नाही झालं वाटतं तुमचं." त्याला चीडवत ती चालत पुढे आली.
" इतकं काही हा हा हु करायला नकोय. येईल तो."
" नाही येणार ते. त्यांना अर्जंट काम होतं सो गेले ते साहेबांसोबत." तिने सहजपणे म्हटलं.
" काय अरे काय माणूस आहे हा. मला..... थांब मला डबा न देता गेलाय. पुढचे चार दिवस भूकच नाही लागणार त्याला. बघ माझा शाप लागतो की नाही ते!" तो लटक्या रागाने म्हणाला.
" गप्प बस. काय हे असं बडबडतोस. हे असलं काही बडबडत जाऊ नकोस. कानाला जड जातं ते ऐकायला मला. काहीतरी छान बोल त्यापेक्षा." तिने हातातली पिशवी टेबल वरती टेकवली.
" छान...... खरच!"
" हो. " तिने टिफिन उघडायला घेतला. ती पाठमोरी उभी होती.
" अनु कालपासून हेच सांगतेस मला छान बोल पण म्हणजे काय ते नाही सांगितलं."
" हा.....आता तेही मीच सांगू का?" तिने प्लेटमध्ये भाजी चपाती वाढून घेतली. ग्लासात पाणी ओतून ठेवलं.
" हं राईट... बोलेन काही सुचलं तर." तो हसला. ती हातात प्लेट घेऊन त्याच्या समोर बसली.
" हे काय, तुला बरं येऊ दिलं सासूबाईंनी !"
" आले...... त्यात काय एवढं. आईला गुंडाळणं सोप असतं रे."
तिने चपातीचा तुकडा मोडत म्हटलं.
" छे! काय हे अनु, थापाडी झालीस तू माझ्या सोबत राहून."
" ए काही काय. खरं सांगितलं असतं तर येऊ दिलं असतं का? मग राहिला असतास उपाशी." तिने घास भरवला.
" ओह. तेही आहेच म्हणा."
तिने घास भरवला तसा क्षणभर तो पाहतच राहिला तिच्याकडे. तिने मान खाली वळवली. गालात हसत तिने विचारलं," आवडलं का जेवण?"
" मला भेटण्याच्या ओढीने बनवलस ना मग आवडणारच."
तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता.
" असं नाही काही....." तिने पटकन दुसरा घास भरवला.
" तू जेवलीस ?"
" मी..... घरी गेल्यानंतर." तिने पुन्हा घास भरवायला हात पुढे केला तस त्याने तिला थांबवलं.
" हा तुझ्यासाठी."
" बरं." त्याच्या आग्रहापोटी तिने तो एक घास खाल्ला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरती स्थिरावली ते तिच्या लक्षात आलं तस ती मनातून सुखावली.
" विक्रम लवकर जेवलास तर बरं होईल. माझ्याकडे बघून पोट नाही भरणारय." तिने खाली मानेनेच म्हटलं आणि पटकन दुसरा घास भरवला.
" हो हे काय जेवतोय मी. माझ्या हाताने खाल्लं असतं तर एव्हाना संपलं असतं. तो जीतू भसाभसा भरवून त्याचं काम उरकून टाकतो. आता इथे भरवणाऱ्या माणसाचंच लक्ष नाही ना! "
" काही पण...." ती थोडीशी लाजली. तिने पुन्हा खास भरवायला सुरुवात केली. तो ही गप्पपणे जेवत होता. थोडावेळ शांतता. तिने हळूच अंदाज घेत पुढे बोलायला सुरुवात केली.
" विक्रम एक विचारू ?"
" हा बोल." त्याचं लक्ष आता जेवणाकडे होतं.
" तू तू..... ते झोपेच्या गोळ्या."
" हुश्श ते होय! माझ्या पोटात गोळाच आला होता."
" का ?"
" हेच एक विचारू का म्हणालीस ना! वाटलं नवीन काही आरोप कैद्यावरती! आता एकच राहिलय, मला मवाली किंवा तळीराम असं काही म्हणायचं." त्याने तिची थट्टा केली.
" काही.... असं का वाटेल मला. I know कितीही प्रॉब्लेम्स असू देत, किती स्ट्रेस असू देत. काही झालं तरी ते आशिकी सारखं ड्रिकबिक..... तू कधीही वागणार नाहीस तस. स्ट्रेस झेपत नाही म्हणून त्या तसल्या कुबड्यांची तुला गरज नाही हो न...." तिने उठून टेबलवरचा पाण्याचा ग्लास हातात घेतला.
" का रे असा अचानक गप्प झालास?" तिने त्याला प्यायला पाणी दिलं.
" असंच. अनु या छोट्या-छोट्या बाबतीत इतका विश्वास आहे माझ्या वरती मग मी मी दुसऱ्या एखादीला..... तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला मी तुझ्यासारखं महत्व देईन का!"
तिने आपला हात त्याच्या हातावरती ठेवला.
" काय करणार खुप पझेसिव झाले न तुझ्या बाबतीत. पण मालकी हक्क गाजवायला माणूस म्हणजे वस्तू नाही ते लक्षातच नाही आलं." तिच्या पापण्या ओलावल्या.
" अनु अग.....मला तस नव्हतं म्ह...."
" I know थोडं चुकलंच माझं पण पझेसिव्ह असणं आणि संशय घेणं यातही फरक असतो. मी दुसऱ्या टप्प्यापर्यंत कधी पोचले कळलच नाही मला. सॉरी."
" इट्स ओके अग, कोणीही नाही आपल्यासाठी यापेक्षाही कोणीतरी आहे चिडणारं, भांडणारं, हक्क गाजवणारं ही भावनाच कधीकधी माणसाला जगवते."
" वाव! क्या बात सर..... चला आता तुमचं जेवण झालेलं आहे. मीही निघते नाहीतर तुम्ही असे लेक्चर देत राहिलात तर मी ऐकतच बसेन."
तिने रिकामी प्लेट टेबलवरती ठेवली. आईने दिलेल्या लाडवांच्या डब्याची आठवण झाली तस तिने पटकन डबा उघडला आणि त्याच्या समोर धरला.
" घ्या. तुमच्या सासूबाईंनी दिलेत लाडक्या जावईबापूंसाठी."
" खरंच !"
तिने समोर उघडलेल्या डब्यातले लाडू पाहून त्याचा चेहरा आनंदला.
" नाही रे असच." तिने डब्यातला एक लाडू त्याच्या ओठांसमोर धरला. त्याने थोडासा खाल्ला.
" आमच्या कडवट सासूबाईंच्या हाताला गोड चव आहे की." तो बोलला तस तिने रागाने डोळे वटारले.
" ओके ओके सॉरी हा... घे न तू पण."
" हा. खाल्लासुद्धा!" तिने उरलेला अर्धा लाडू पटकन तोंडात टाकला तसे दोघेही हसले.
.................................................................
तिने डोअर बेल वाजवण्यासाठी हात पुढे केला. दोन क्षण ती तशीच दारा कडे पाहत थांबली. स्तब्धपणे. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बेल वाजवली. समोरून दरवाजा उघडला गेला.
" नताशा तू ! आज सकाळीच माझी आठवण. स्ट्रेंज."
ती तशीच खाली मानेने उंबरठ्या बाहेर उभी होती.
" तू का आलीस इथं ? त्या दिवशी माझ्याच घरात येऊन मला सुनावून......." तो पुढे काही बोलणार तोच ती हुंदके देत रडायला लागली.
" राजेश "
त्याला काही कळण्याआधीच तिने रडत रडत त्याला मिठी मारली. ' अचानक काय झालं हिला ' अशी शंका मनात आली त्याच्या. तिचं मुसमुसणं पाहून त्याने स्वतःला शांत केलं.
" अरे Dear, What happened ? काय झालं ? Cool down. " तिच्या पाठीवरून त्याने थोपटलं तस ती शांत झाली.
" राजेश, I'm sorrry यार. मैंने कुछ उल्टा सीधा बोला तुम्हे. सॉरी "
" नताशा It's Ok, Don't cry baby काय झालं ?"
तिच्या अवस्थेचं त्याला हसू आलं आणि तिने शरणागती पत्करली याचा आनंद सुद्धा झाला.
" उस पब मालक ने मुझे नौकरी से निकाल दिया। राजेश मैं क्या करू ? कहा जाऊँ? मेरे पास पैसे भी नही हैं। मुझे कुछ समझ मे नही आ रहा है। एक तुम ही हो मुझे हेल्प कर सकते हो। मुझे पैसों की जरुरत है। प्लीज."
ती बोलता बोलता त्याच्या मिठीतून दुर झाली.
" Yeah, Don't worry, Come." तो दारातून बाजूला झाला. ती आत मध्ये आली.
" चलो, तुझ्या फोटोज च्या कामाचे पैसे बाकी आहेत. ते घेऊन जा. एक मिनिट मी येतो...."
तिने होकारार्थी मान हलवली. तिला बसायला सांगून तो त्याच्या रूममधे निघुन गेला. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. घरी नेहमीप्रमाणे कोणीही नाहीये ते तिच्या लक्षात आलं. ती पटकन दारापाशी गेली आणि दरवाजा आतून लॉक न करता फक्त हाताने ढकलून बंद केला. त्याच्या रुमकडे तिने नजर टाकली. अजून तो बाहेर आला नव्हता. तिने हँन्ड बॅग मधला मोबाईल बाहेर काढला आणि कॅमेरा ओपन केला. समोरच्या कॉर्नर पीस वरच्या फ्लॉवर पॉट कडे तिचं लक्ष गेलं. ती मंद पावलांनी चालत कॉर्नर पीस जवळ गेली आणि फ्लॉवर पॉटच्या लगतच कोणाच्या नजरेस पडणार नाही असा मोबाईल ठेवून दिला.
" नताशा " तो पायऱ्या उतरुन खाली आला.
" आ..... हा "
ती पटकन मागे वळली. त्याला समोर पाहून तिला धडधडायला लागलं.
" काय ग, अशी भूत बघितल्यासारखं काय बघतेस! बस ना इकडे."
" आ......वो वो शोकेस." तिने पटकन तिथून समोरच्या कोपर्यातल्या शोकेस कडे बोट दाखवलं.
" टेडी कितना क्युट है नही।" ती कसनुस म्हणाली.
" OMG तुम्ही मुली पण ना....."
तो पुढे आला तशी ती ही तिथून पटकन बाजूला झाली आणि त्याच्या मागून पुन्हा सोफासेट पर्यंत आली. त्याचं लक्ष तिला कॉर्नर पीस कडे पोचू द्यायचं नव्हतं.
" घे. तुझ्या कामाचा मोबदला." त्याने नोटांचं बंडल तिच्या हातात दिलं.
" थँक यु सो मच."
" Do you know, त्या दिवशी तुला याच्यासाठीच बोलावलं होतं. पण नक्की काय झालं होतं तुला God knows. काय बडबडत सुटलेलीस."
" I'm sorry मैने कहाँ न मेरा दिमाग ठीक नही था। ओके तेरा काम तो हो गया और मुझे मेरे पैसे भी मिल गये सो Let's celebrate. "
" Why not, तसही डॅड पण कॉलेजला गेलेत. तर Let's have a party."
त्याने अलगदपणे तिचे हात गळ्यातून बाजूला केले आणि तो किचनमध्ये गेला. तिने उभ्या उभ्याच कॉर्नरपीस कडे नजर टाकली. मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. ती सोफ्यावरती बसली इतक्यात तो आतून ट्रे घेऊन आला.
त्याने वाईनचा भरलेला ग्लास तिच्या हाती दिला.
" Thanks "
" सो चिअर्स !" तोही समोरच्या कोचावरती आरामात बसला. त्याचा मूड एकदम छान, आनंदी आहे हे तिच्या लक्षात आलं.
" सो राजेश अब क्या प्लॅन ?" तिने ग्लास ओठाला लावला. थोडासा विषयाला हात घातला.
" Now युके. मी म्हणालो होतो ना I've golden chance. आता जस्ट फोकस अॉन माय करियर."
" हं. नाईस. वेल डन."
" लेकिन राजेश अब तो तुम सब छोडकर जाने वाले हो तो फिर क्यू इतना कुछ......"
तिने आपल्याला काहीच कळत नसल्याच्या आविर्भावात म्हटलं.
" अरे नताशा, मला पण काही हौस नव्हती. यार इन फॅक्ट विक्रम माझा चांगला दोस्त होता. चांगलं पटायचं सुद्धा आमचं आणि तुला सांगू का माझ्या डॅड मुळे आमची ओळख झालेली. अशा पार्टीज, ट्रॅवलिंग या गोष्टी कॉमन होत्या आमच्यात. शिवाय I'm good at academics ते म्हणतात न हुशार मुलांची फ्रेंडशिप तशाच मुलांशी होते तसं काहीस झालं आमचं."
" तुम्हारे डॅड "
" हा अग ते गुरुकुल.... आयमीन विक्रमच्या कॉलेज मध्ये जॉबला आहेत म्हटलं होतं नाही का !"
" हा, अच्छा !"
" बट मी एक झूठ बोललो हा तुझ्याशी."
" क्या ?" तिने आपले कान टवकारले.
" माझे डॅड, त्यांना विक्रमच्या इलिगल गोष्टींची माहिती असायची. खरं तर डॅड पण त्याला सपोर्ट करायचे त्यात."
" What !" तिने चेहर्यावरचे आश्चर्य आवरत म्हटलं.
" फिर बी इस सब में तुम्हारे डॅडी फस सकते थे अगर विक्रम की करतुते उसके पिताजी तक पहुँच जाती।"
" हा, अग ती भीती होतीच म्हणून तर विक्रमला किती समजावलं मी त्या अनघा सोबत लग्न करू नकोस पण नाही त्याला आपलं तेच खरं करायचं होतं मग आमच्यात वाद व्हायला लागले. त्याला तिचा कळवळा वाटायला लागलेला. म्हणजे मी याला इतकी मदत केली त्याचं काहीच नाही. अरे मी होतो त्या गॅदरिंगच्या नाईटला म्हणून याचा प्लॅन सक्सेस झाला. तिला कॉलेजमधन बाहेर काढण्यापासून ते त्या गोडावूनला नेई पर्यंत सगळं मॅनेज केलं मी. माझ्या डॅडींना कळलं असतं ना तर काय झालं असतं God Knows. इतकं सगळं करून तिथे हा बादशहा सारखा नंतर पोचला आणि मला जायला सांगितलं त्याने! कामापुरता मित्र, याचं काम संपलं मित्र गेला उडत. तेव्हापासून... तेव्हापासूनच डोक्यात गेला तो माझ्या. ती त्याच्यापेक्षा डोईजड त्याची हिरोइन. तिनं माझ्यावरती हात उगारलेला तिला पण अद्दल घडवायची होती मला म्हणुन तीची एंगेजमेंन्ट मोडायला एक लेटरच पाठवलं तिच्या होणाऱ्या सासर्याला एंगेजमेंन्ट दिवशीच ! म्हटलं बसु दे रडत. एंगेजमेंट मोडली पण त्या भाऊसाहेबांना पुळका आला तिचा मग काय विक्रम सोबत लग्न लावून द्यायला निघाले ते! नी दुसरीकडे हा..... तिनं काय जादू केली ह्याच्यावर! तिच्या मागे मागेच पडला हा.... फायनली लग्न झालच. मला अजिबात इंटरेस्ट नव्हता तिथं जाण्यात. सो मी फॉर चेंन्ज मुंबईला आलो नी तू तिथे भेटलीस. तुझी थोडी इन्फोरमेशन काढली. म्हटलं, येस. तुझी हेल्प घेतली तर काहीतरी नक्कीच उलथापालथ होणार........."
" ह..." नताशा शांतपणे त्याचं ऐकत होती.
" त्यांचं प्रेम पण अगदी ओतू जात होत दोघांचं आणि मला त्याला असं सहजासहजी सुखी, हॅप्पी झालेला बघायचं नव्हतं. अरे यार इतके काळे धंदे करून हा माणूस कसा हॅपी होऊ शकतो. कस त्याचं लाईफ ब्युटीफुल असू शकतं नी हेच मला टोचत होतं. त्याचं सुख! त्याचा ओरा, ताठा, सगळ्यांच्या नजरेतली त्याची इमेज इस्पेशली तिच्या नजरेतली. सगळं नेस्तनाबूत करायचं होतं मला! यातनं त्यालाही त्रास झाला असता आणि तिलाही म्हणजे कसं दोघांचा बदल घेतला मी! म्हणून मी गप्प राहिलो. काय प्रेम करायचं , एंजॉय करायचे ते करु दिलं आणि करेक्ट टायमिंगला सगळं फिनिश....."
तो वाईनचे घोट घेत मोठ्याने हसला. त्याचं हास्य तिचे कान भेदून गेलं.
" नताशा " त्याने विचारात गढून गेलेल्या तिच्यासमोर एक टिचकी वाजवली.
" मग कसा वाटला माझा प्लॅन ?" त्याने गालात हसत म्हटलं. तसं मागून त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तो स्पर्श त्याला ओळखीचा वाटला. त्याने पटकन मागे वळून पाहिलं.
" डॅड तुम्ही !"
त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो पटकन उठून उभा राहिला. त्याला काही कळण्याआधीच सामंतांनी खाडकन त्याच्या कानशिलात लगावली.
क्रमशः
130 गुरुवार रात्री
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा