बंधन भाग 13

Love, Social Issues

भाग 13
( गेल्या भागात अरुंधती ज्वेलरी शॉप मध्ये समिहाला भेटते. जी समिहा 'चंद्रकांत ज्वेलर्स ' च्या मालकांची एकुलती एक मुलगी आहे. तिला पाहुन अरुंधतीला ही मुलगी आपली सुन व्हावी असं तिला वाटतं. घरी गेल्यानंतर ती हा विषय जितेंद्रकडे बोलते. तो तिला विक्रमशी बोलायला सांगतो. मात्र गंगाआत्याला अरुंधतीचं हे वागणं आवडतं नाही) 

सोमवारी सकाळी अनघा लवकर उठली आणि पटापट तयारी करुन कॉलेजला गेली. दोन दिवसांची सुट्टी खूपच कंटाळवाणी गेली होती. त्यामुळे तिला कधी एकदा कॉलेजला जातो असं वाटतं होतं. सकाळचं पहिलं लेक्चर मस्त उत्साहात संपलं आणि ती लायब्ररीमध्ये गेली. त्यांची मॅनेजमेंन्टची काही पुस्तक पाहत होती.एक दोन पुस्तक घेऊन ती रिडिंग सेक्शनला जाऊन बसली. पण पेनच हातात नव्हतं. इतक्यात समोरच्या डेस्कवरती तिला बर्वेसर दिसले. तिने पटकन त्यांना हाक मारली.
" शार्दुल सर, पेन " सरांच्या पटकन लक्षात आलं. त्यांनी खिश्याचं पेन काढून अनघाकडे दिलं. तिने उभ्या उभ्यानेच पुस्तकातल्या चॅप्टर्सची काही नावं कागदावर लिहायला सुरुवात केली.
" मॅडम काय म्हणतं तुमचं डिपार्टमेंन्ट ?" बर्वेसरांनी विचारलं "अर्थात खंदारे मॅडम एच.ओ.डी. आहेत म्हटल्यावर चांगलंच असेल " त्यांनीच पुढे असं म्हटलं त्यावर ती हसली.
" हो मॅडम छानच आहेत बरं सद्या नवीन पाहुणे काय म्हणतात तुमचे?" तिनेही बोलायला सुरुवात केली.
" कोण ओ ? " त्यांनी न कळून विचारलं.
" तुमचे कंप्युटर्स अजून कोण ?" ती खळखळून हसत म्हणाली.
" ओ ते होय मस्तच लेटेस्ट मॉडेल्स आहेत ना मग मुलंही खुश "  ते म्हणाले.
" बरं तुम्ही नाही आलात लॅबला. बरेचजण येऊन गेले प्रिंन्टआऊट्स काढल्या काही तर मुद्दाम बघायला आलेले." बर्वेसर हसत म्हणाले.
" हा, मी पाहिलं पण माझी काही अजून फार ओळख नाही कुणाशी "  ती संकोचून म्हणाली.
" ओळखीचं काय हो बोलायला लागलात सगळ्यांशी कि होईलच, ते समोर बघा " बर्वेसरांनी दाराकडे बोट दाखवलं.
" ते बावधनकर सर बी.एस.स्सी चे आहेत तुमच्यासोबतच जॉईन झालेत अहो सगळ्यांशी बोलत राहतात परवा तर एम.सी.ए. च्या प्रोफेसरांसोबत होते कँन्टिनमध्ये ! " बर्वेसर हसत त्यांचं उदाहरण देत अनघाला म्हणाले त्यावर तीही हसली.
" मग तुमचा इंन्टरव्हियु कसा होता ? " त्यांनी विचारलं.
" मस्त एकदम सगळ्यांनी छान प्रश्न विचारले आणि भाऊसाहेब स्वतः होते ना मग काय छान झाली मुलाखत." ती म्हणाली.
" हो का मग अजून बाकी काही नाही! " त्यांनी पुन्हा विचारलं.
" हा सगळा इंन्टिरव्हियु झाल्यानंतर साहेबांनी विचारलं, इथे जॉब मिळाला तर कॉलेजसाठी काय करणार ?" 
" मग ! " बर्वेसर आता कान देऊन तिचं उत्तर ऐकु लागले.
" काही नाही मुलांसाठी काय करता येईल प्रोग्रेससाठी म्हणून त्याच्या काही आयडीया सांगितल्या मग खूश झाले." तिने सांगितलं.
" ओ गुड " बर्वे सर शांतपणे म्हणाले.
" ओके चला मला लेक्चर आहे मी निघते "  ती पुस्तकं उचलून एका हातात घेत म्हणाली.
" चला ओके " ते म्हणाले.
अनघा तिथुन खाली लेक्चरसाठी निघून गेली. शार्दुलला मात्र अनघाचं इथं जॉबला लागणं म्हणजे लकी असणं असं वाटु लागलं. त्याचं पेपरवाचनाकडे लक्ष लागेना आणि त्याला दिड वर्षापुर्वीचा इथं इंन्टिरव्हियुला आल्याचा तो प्रसंग आठवू लागला.
       शार्दुल एका शेतकरी कुटुंबातला मुलगा. वडिलोपार्जीत शेती होती आईवडिल तीच सांभाळत आलेले पण शार्दुल लहानपणापासुनच फार जिद्दी आपण शिकलो तर चांगली नोकरी मिळेल घराला हातभार लागेल म्हणून त्याने अभ्यासाकडे लहानपणापासुन अजिबात दुर्लक्ष केलं नाही. बारावीत चांगले गुण मिळवून कंप्युटर सायन्सला अॅडमिशन घेतली. बाहेर शिकायला जाणं खिश्याला परवडणारं नव्हतं शिवाय आईबाबांच्या मदतीलाही अापण असावं म्हणून पदव्युत्तर होईपर्यंतच सगळं शिक्षण त्याने सांगलीतच पुर्ण केलं. एखादी प्रतिष्ठेची नोकरी असावी म्हणून त्याने एम.एस्सी. नंतर प्राध्यापकीच्या सेट पात्रता परिक्षेची तयारी सुरु केली आणी पुढच्या एका वर्षात परिक्षेत पासही झाला. त्याचदरम्याने गुरुकुल ला काही व्हकेंन्सी आहेत याच्या जाहिराती पेपरमधून येत होत्या. त्याने इथं अप्लाय केलं. अखेर मुलाखतीचा दिवस उजाडला. प्राचार्य, त्यावेळचे उपप्राचार्य जाधव सर, सामंत सर आणि स्वतः विक्रम हे पॅनल इंन्टिरव्हियुला होतं. त्याचा इंन्टिरव्हियु एकदम त्याच्यामनाजोगा झाला. घरी गेल्यानंतर तो आतुरतेनं कॉलची वाट पाहत होता आणि इंन्टिरव्हियुच्या दुसर्‍याच दिवशी व्हाइसप्रिन्सिपलचा कॉल आला आणि त्यांनी त्याला कॉलेजला यायला सांगितलं. त्या फोनमुळे तर त्याच्या आशा अजुन पल्लवीत झाल्या. तो उत्साहात दुसर्‍या दिवशी जाधवसरांना भेटायला गेला.
जाधवसरांच्या केबिनमध्ये ते स्वतः आणि सामंतसर बसले होते. शार्दुलने त्यांना आत येऊ का विचारलं. त्यांनी त्याला बसायला सांगितलं. मनातून त्याला आनंद होत होता की आता आपल्याला अपॉंइन्टमेंन्ट लेटर मिळणार पण जाधवसरांनी तितक्यात बोलायला सुरुवात केली.
" तर शार्दुल बर्वे, We know तुला इथे काम करण्याची इच्छा आहे आणि तुझी हुशारीही आम्हाला इंन्टिरव्हियुतुन समजली " त्यांच्या या बोलण्यावर तो खुश झाला.
" थँक्यु सर "
" पण काय आहे ना आमच्याकडे आता सीएस डिपार्टमेंन्टसाठी दोनच जागा खाली होत्या त्यातली एक अॉलरेडी भरली गेलीय सो आता एकच जागा शिल्लक आहे आणि You know कालच्या इंन्टिरव्हियुला एम.एस्सी. कंप्युटर चे पाच सहा कँन्डिडेट्स होते आता एवढ्या सगळ्यांना तर घेणं शक्य नाही ना "  जाधवसर सामंतसरांकडे पाहत म्हणाले. त्यावर शार्दुलला वाईट वाटलं तो कळकळीने म्हणाला,
" सर प्लीज असं नका म्हणू मी म्हटलं होतं मला या नोकरीची खुप गरज आहे प्लीज काहीही करुन हा जॉब मला द्या."
" हो पण सर आता म्हणाले काय ते तुला !"  सामंतसर आता बोलायला लागले.
" ओके हा जॉब तुला मिळेल पण तुलाही कॉलेजसाठी काहीतरी करावं लागेल."  जाधवसर म्हणाले.
" काय ? मी काय करु शकतो हा मी विद्यार्थ्यांना तक्रारीची अजिबात संधी देणार नाही." तो काकुळतीने बोलला.
" हं ते आहेच रे पण तुला माहितीच आहे आम्ही मुलांना सवलती देतो वेगवेगळ्या शिष्यवृत्या देतो तर थोडी आर्थिक मदत......."  सामंतसरांनी हळूहळू विषयाला हात घातला. यावर शार्दुलला काही सुचेना तरि तो कपाळावरचा घाम टिपत म्हणाला," आर्थिक मदत ! क किती ? "
" हं फार नाही दोन अडीज लाख " या वाक्याने त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.
" काय ! सर एवढे पैसे कुठुन आणू मी तुम्हाला घरची परिस्थिती माहितीय "  तो अजुन विनवण्या करित म्हणाला.
" हो रे पण विचार कर आणि हे पैसे काही आमच्या घरात थोडी जाणारयत ट्रस्टकडेच जाणार ना !"  जाधवसर म्हणाले.
" बघ विचार कर तू म्हणत असशील तर ही व्हेकन्सी आम्ही लगेच भरत नाही दोन दिवस विचार कर काही जमवाजमव होते का बघ आणि कळव आम्हाला." ते पुन्हा बोलले तसा ओके म्हणत तो जाधवसरांच्या केबीनबाहेर पडला. काय करावं ते सुचेना पण कुठल्याही परिस्थितीत हा जॉब त्याला हवाच होता. तसंच उठुन भाऊसाहेबांनकडे जावंसं त्याला वाटलं पण त्यामुळे गोष्टी अजून चिघळल्या असत्या आणि त्या नोकरीलाच टाटा करायची वेळ आली असती. लहानपणापासुन खस्ता खात घेतलेलं एवढं शिक्षण, आईवडिलांचे हाल आणि आता कुठे एक आशा दिसत होती तीही संपलेली. त्या क्षणी त्या डिग्र्या, ती सर्टिफिकेट्स त्याला रद्दीतल्या कागदासारखी वाटु लागली. घरी गेल्यावर आईबाबांना त्याने हे सांगितलं. आईला पोराचे हाल पाहवेनात मरु दे गेले दोन तीन लाख तर काय होतंय आमचं आम्ही रेटु दिवस हवं तर अजून मोलमजूरी करु पण आयुष्यभर पोराला नोकरी करता येईल म्हणून आईने होते नव्हते ते सगळे दागिने बँकेत गहाण ठेवून शार्दूलला दीडलाख रुपये दिले. त्याने कसेबसे ते पैसे घेतले आणि दोन दिवसातच सामंतांना फोन केला आणि पैसे त्यांच्या हवाली केले. त्याच्याच दुसर्‍या दिवशी त्याच्या हातात अपॉइंन्टमेंन्ट लेटर पडलं. गुरुकुलमध्ये त्याचा जॉब सुरु झाला पण त्या कॉलेजविषयी वाटणारा आदर आपुलकी सगळचं तोपर्यंत संपलेलं होतं. हळूहळू भाऊसाहेबांना शार्दुल मेहनती आहे हुशार आहे हे लक्षात आलं मग त्यांनीच स्वतः लक्ष घालून त्याच्या महिन्याच्या पगारात थोडी वाढ केली. त्यामुळे त्याला बरं वाटलं बाकी कुणी कसेही असो भाऊसाहेबांचा मायेचा हात पाठीशी आहे असं वाटु लागलं. 
" ओ बर्वे सर प्रॅक्टिकलची मुलं आलीत खाली लॅबला " दिनेश त्याच्यासमोर येऊन निरोप देत म्हणाला तसा तो भानावर आला.
...............
येत्या शैक्षणिक वर्षात नवं काय काय करता येईल याचा आढावा घेण्यासाठी भाऊसाहेबांनी मिटिंग बोलावली होती. प्राचार्य करंबेळकरांसह उपप्राचार्य हजर होते. दोघांनीही विक्रमची नक्षत्रवाटिकेची कल्पना पुढे केली. विक्रमचा भर कॉलेज केवळ भौतिक सुविधांनी सुसज्ज बनवण्याकडे नव्हता तर कॉलेजचा परिसर, हॉस्टेल, वाचनालय हे कॉलेजचे घटकही उत्तम बनावेत खासकरुन कॉलेजचा परिसर विद्यार्थ्यांची मनं रमवणारा असावा आणि बाहेरुन व्हिजिटसाठी येणार्‍या पाहुण्यांना आकर्षित करणारा असावा याकडेही त्याचं लक्ष असायचं. यातुनच नक्षत्रवाटिकेची संकल्पना त्याने प्राचार्यांना सांगितली आणि ती भाऊसाहेबांनाही आवडली. जन्मनक्षत्रानुसार असणारे त्या त्या नक्षत्रांचे आराध्य वृक्ष ज्या वृक्षांच्या पासुन तयार होणार्‍या आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यास प्रकृतीला आराम मिळतो. प्रत्येक नक्षत्राचे आराध्य वृक्ष भारतीय संस्कृतीत पूजनीय आहेत आणि सत्तावीस नक्षत्रांच्या सत्तावीस आराध्य वृक्षांमध्ये विविध प्रकारचे जुने वृक्ष येतात जे वृक्ष मुलांना माहित नाहित, त्यांची नावं,उपयोग माहित नाही म्हणूनच ह्या सर्व प्रकारच्या वृक्षांची रोपटी असणारा एक भाग आपल्या कॉलेज गार्डनमध्ये असावा ज्याचं नाव 'नक्षत्रवाटिका ' असेल अशी एक भन्नाट कल्पना विक्रमच्या मनात आली आणि त्याप्रमाणे वृक्षारोपणाचं कामही सुरु झालं होतं. भाऊसाहेब यावर खुश होते पण अजून काही करता येईल का याची त्यांनी विचारणा केली तेवढ्यात त्यांना अनघाची आठवण झाली आणि त्यांनी शिवाला केबिनमध्ये बोलावून अनघाला भेटायला येण्याचा निरोप द्यायला सांगितल.
क्रमशः

🎭 Series Post

View all