Login

बंधन भाग 130

Social Love

भाग 130
( गेल्या भागात अनघा घरी येणार असल्याचं सगळ्यांना कळतं. नीतू , जितेंद्र खूश आहेत. राजेशला मात्र कसलीच कल्पना नव्हती आणि अचानक नताशाने त्याच्या घरी जाऊन बोलण्याच्या ओघात सगळं त्याच्याकडून कबूल करुन घेतलं. पाहूया पुढे)

            
                नताशा मघाशी रडत रडत आली काय, आपण तिला घरात काय घेतलं आणि विक्रम ची मस्ती आपण कशी जिरवली या गेल्या काही दिवसांच्या आनंदाच्या भरात आपण सगळं असं बोलून मोकळे झालो. सामंत सरांना समोर पाहताच त्याच्या विचारांची चक्र गरगर फिरत होती. म्हणजे... म्हणजे नताशाने.... ती मुद्दामहून इथे आली होती तर..... या निष्कर्षाप्रत त्याचं मन येऊन पोचलं.

" नताशा  You..... Cheater माझ्या पैशांवर जगतेस इतके दिवस नी मलाच...."   दात - ओठ खात तो रागाने तिच्या दिशेने वळला.

" राजेश, बास. शट अप."   दंडाला धरून सामंतांनी त्याला बाजूला केलं.

" सर, तुमचा विश्वास बसत नव्हता ना आमच्या बोलण्यावरती."    मागून आवाज आला तस त्याने मान पुढे वळवली.

" या मॅडम तुमचीच कमी होती. तुमचंच डोकं वाटत या मागे. विक्रम सोबत राहून प्लॅनिंग आणि प्लॅन एक्झिक्युट करणं एवढं मात्र छान शिकलात हा......वाव! कमाल. वेल डन."

" राजेश, मला तुझ्या सोबत काही बोलण्यात रस नाही. तू हे जे वागलास त्यामुळे......"

ती बोलायला लागली तस तिला मध्येच थांबवत तो बोलायला लागला.

" काय, काय म्हणालात आपण! मी मी काय केलं. अहो, जे काही उद्योग केलेत ते तुमच्या नवऱ्याने केलेत. मी फक्त तुमच्या पर्यंत ते पोचवले इतकच."

" ये क्या कह रहे हो तुम! तुमने मेरे साथ झूठ बोलकर....."

" ओ माय गॉड, ए गप्प ग तुझी नेहमीची रेकॉर्ड पुन्हा वाजवू नको नी पुन्हा सांगतो मी काही केलेलं नाही. आणि काय ओ कारखानीस मॅडम, आधी विक्रम तुम्हाला विलन वाटत होता. आता त्याच्या बद्दलचं तुमचं मत बदललं तेव्हा मला टार्गेट करताय तुम्ही !"

" राजेश, तुला कोणी काही मुद्दामहून बोलत नाहीये."

" ओ पण डॅड...... मी काहीच....."

" डोन्ट टेल मी राजेश, तुमने कुछ भी गलत नही किया। Wait."


ती कॉर्नरपीस पाशी गेली. मोबाईल उचलला. तो आश्चर्याने तिच्या हातातल्या मोबाईल कडे पाहतच राहिला.

" ये देखो."  तिने मघाचा व्हिडिओ त्याच्यासमोर धरला. त्याच्या कपाळावरती घामाचे थेंब जमा झाले. त्याच्या घशाला कोरड पडली.

" हो, हो. नताशा नी त्याचं अफेयर, ते फोटोज हे खोट होतं पण म्हणून मी एकटाच चूक आणि विक्रम सत्पुरुष नाही ना ठरत."

" तो चांगला की वाईट हे मी ठरवीन. मी त्या दिवशीच तुला सांगितलं होतं, तो चूक की बरोबर, त्याचं काय करायचं ते माझं मी ठरवेन. सत्य कधी लपून राहत नाही. या ना त्या मार्गाने ते माझ्या समोर आलंच असतं. तू सांगितलं ओके पण हे असं वाढवून, चढवून खोटं काहीतरी सांगण्याची गरज नव्हती तुला."


ती भडाभडा बोलू लागली. सामंतांची मान शरमेने खाली झुकली.

" ए अनघा तू......."

" राजेश पुरे. मॅडम प्लीज, मी समजावतो त्याला. आपण....आपण बोलूया उद्या हा नताशा."

त्यांनी आर्जवी नजरेने दोघींकडे पाहिलं तसं तिने नजरेनेच हो म्हंटलं.  सगळं फत्ते झाल्याच्या आनंदात त्या दोघी ताठ मानेने तिथून बाहेर पडल्या. राजेशच्या अहंकाराला चिरडून!
.........................................................


                 अनघाने नताशा चे आभार मानले. नताशाला सुद्धा मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं आज! ज्या दिवशी ती राजेशच्या घरी अनघा समोर खोटं बोलली होती. त्या दिवसानंतर जे काही विक्रम च्या बाबतीत झालं होतं त्याची टोचणी तिला लागून राहिली होती. इतकं सगळं झाल्यानंतर राजेश बिथरेल आणि पुन्हा नताशाला किंवा इतर  कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न करेल अशी शक्यता कमीच होती. सामंत सरांना सगळं कळल्यामुळे तो घाबरलेला त्यांना जाणवलं. शिवाय विक्रमने कॉलेजमध्ये केलेल्या गैरव्यवहारां मध्ये  सामंतांचाही सहभाग होताच त्यामुळे त्यांच्या नोकरी करता आणि गुरुकुल मध्ये सामंतांची हुशार, अनुभवी, जुने प्राध्यापक ही प्रतिमा होती त्या करता तरी राजेश आता पुन्हा काही उलटसुलट करण्याच्या फंदात पडणार नाही याची अनघाला कल्पना होती. तरी नताशाची तिला काळजी होती. त्यातून नताशाची पार्श्वभूमी फार बरी नव्हती त्यामुळे तिच्या सुरक्षित राहण्याची व्यवस्था करण्याचं काम तिने जितेंद्र कडे आधीच सोपवलं होतं. या सगळ्या गोंधळात दुपारी मनात असूनही हॉस्पिटलला जाणे जमले नाही तिला. तिला विक्रमला सगळं स्वतः सांगायचं होतं. राजेशने मध्यंतरी त्याला बरंच ब्लॅकमेल केल्याचही नताशाने तिच्या कानावर घातलं होतं. त्या दोघांमधल्या भांडणबद्दलही तिला कळलं होतं. तिला त्याला सांगायचं होतं, कागदांवर शंभर टक्के गुण मिळवणारी सगळी माणसे 100% गुणवंत नसतात.
....................................................


                     दिवसभर ती खुशी होती. कुमुदने आणि नंतर श्रीधरनेही तिचा फुलून आलेला चेहरा पाहून काही अंदाज येतो का ते पाहिलं. रियानेही काही समजते का ते पाहण्याचा प्रयत्न केला. तिला विचारलं तर प्राचार्यांनी कसल्याशा कामाबद्दल तिला वाहवा दिली असं काहीतरी सांगून वेळ मारून नेली. संध्याकाळीही ती अभ्यास आटपून खाली स्वयंपाक घरात कुमुदला मदत करायला आली. कालच्या सारखं आजही तिने खंदारे मॅडमना आजारी पाडलं. आईकडून टिफिन भरून घेतला आणि वेळेत हॉस्पिटलला पोचली. त्याचं वाट पाहत राहणं पाहून जितेंद्रने ती येणार असल्याचे आधीच त्याला सांगितलं मग काय आठ साडेआठ पर्यंत तो तिची वाट पाहत बसला. आज दिवसभरात ती एकदाही आली नव्हती त्यामुळे त्याला काहीतरी मिसिंग वाटत होतं. दिवसभर तिला भेटण्याची हुरहूर लागली होती.

" हॅलो सर, कसे आहात ?"  ती आत मध्ये आली.

" या खूपच लवकर आलात.  लवकर आठवण आली नाही का!"

" अरे आत्ताच जस्ट आले ना आणि झाली का लगेच सुरुवात."    तिने हातातला टिफिन टेबलवरती ठेवला.

" कसली सुरुवात ?  सुरुवात तुम्ही करता. चिडण्याची, रुसण्याची, भांडण्याची. मी नाही !"

" अरे वा मग आता कोणी केली बरं सुरुवात!"  ती खुदकन हसली तसा तो गप्प बसला. तो गप्प झालेला बघून ती बोलायला लागली.

" विक्रम तू खूप हट्टी आहेस असं नाही का वाटत तुला!"  गालात हसत तिने प्लेटमध्ये वाढून घेतलं.

" What!  हे असं तुला वाटतं पण तसं नाहीये."

" हा काय, तसंही तू कुठे काही कबूल करतोस."  तिने ताट टेबल वरती ठेवलं. त्याच्यासमोर बसली.

" अरे मी काय "

" असंच म्हटलं. मस्करी पण नाही कळत तुला!" 

" हं. ओके "

" आता हे बघ!"   तिने हाताची मुठ त्याच्यासमोर उघडली.

तिच्या हातातलं लॉकेट बघुन त्याला आनंद झाला. पण क्षणात त्याचा चेहरा ओशाळला.

" अरे असा काय उदास झालास? भाऊसाहेबांनी तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने बनवून घेतलेलं ते."

" हो पण ते घालताना त्यांनी तेव्हा जे सांगितलं होतं त्याचा विसर पडला न मला. माझी योग्यता नाही तितकी त्यांनी दिलेलं गिफ्ट वापरण्याची. त्यांचे विचार, त्यांचा आशीर्वाद, त्यांची मुल्यं सगळं त्याच्याशी जोडलं गेलय. बघ ना त्या रात्री नेमकं ते माझ्याकडून हरवलं. मी वाईट कर्म करताना माझी साथ कसं देईल ते. ही जबाबदारी मला नाही जमली पेलायला."

" कोण म्हणतं असं !"  ती उठली आणि त्याच्या जवळ उभी राहिली.

" अग तू "

तिने तिच्या हाताने ते लॉकेट त्याच्या गळ्यात बांधलं.

" हा, looking nice ना."  त्यावरती तो नुसताच हसला.

" इट्स ओके. ज्या जबाबदार्‍या ओढवून घेतल्यास त्या निभावल्यास न."  तिने धीर देत त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवला.

" सो हॅप्पी. आज नताशाने मोठं काम केलं."

 तिने टेबलवरची प्लेट हातात घेतली आणि पुन्हा त्याच्या समोर बसली.

" हो तुमचे भावोजी बोलले मघाशी. पण राजेश काही...."

" डोन्ट वरी. नाही काही होणार. नी विक्रम, आता ती सगळ्यांतन बाहेर पडली आहेच तर तिचं आयुष्य मार्गी लागावं नाही का!"

" हं राईट. बघूया. नीतूच्या एन.जी.ओ. कडून काही मदत होते का तिला."

" नक्कीच. हे असं जगणं किती भयानक असतं ना कधी कधी वाटतं की, I'm lucky. "  तिने त्याला घास भरवत म्हटलं. ती खुश आहे पाहून तोही समाधानाने हसला.
......... . ................................................

                अनघा आणि नताशाने राजेशला कोंडीत पकडण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे सामंतांच्या घरी मात्र गहजब उडाला. आजवर कधीच राजेशला न ओरडणारे, त्याच्यावरती न चिडणारे सामंत सर आज त्याच्यावरती चांगलेच भडकले होते. लहानपणापासून आईविना पोरं म्हणून लाडाकोडात त्यांनी त्याला वाढवलं. त्याची काळजी घेणारं, त्याच्याकडे लक्ष पुरवणारं कोणी बाईमाणूस नाही, दुसरा भावंडं नाही म्हणून नेहमीच प्रत्येक बाबतीत ते वडिलांपेक्षा त्याचा मित्र बनून वागत गेले याचा असा काही परिणाम होईल हे त्यांना वाटलंही नव्हतं. अनघाने त्यांना दोन दिवसांपूर्वी कॉलेज सुटल्यानंतर बाहेर भेटलाण्या संबंधी विचारलं तेव्हा कॉलेजमधील जून्या गोष्टींबद्दल आपल्याला सुनवायचे असेल तिला असं वाटलं होतं त्यांना! ती राजेशबद्दल काही सांगेल याचा त्यांनी विचारही केला नव्हता. तिच्या सोबत नताशाने जे सांगितलं त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. पण तुम्ही त्याला काही विचारू नका अस अनघाने सांगितल्यावरती ते ऐकणं त्यांना भाग पडलं. आज अनघाने शिवाकडून लवकर घरी जायचा निरोप त्यांना पाठवला तो पर्यंतही त्यांना घरी आल्यानंतर असं काही समोर येईल याची कल्पनाही नव्हती. सगळा दिवस त्यांनी त्याच्याशी न बोलता घालवला.  समोर तो असूनही त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इतकी वर्षे एका घरात राहणारी, एकमेकांच्या आधाराने जगणारी ती दोन माणसं दोन दिशांना फेकल्या सारखी झाली . त्यांना अस चिडलेलं, शांत बसलेलं तो पहिल्यांदा पाहत होता. ते त्याला सहन होईना. रात्री जेवणाची वेळ झाली तसा तो त्यांच्या खोलीत गेला.

" डॅड जेवायचं नाही का?"

" नाही, भूक नाही. नंतर घेईन वाढून. जेव तू."

 त्यांनी हातातल्या पुस्तकाची पानं चाळत ते बाजूला केलं आणि शेल्फवरलं दुसरं पुस्तक हातात घेतलं.

" डॅड "

" हा." 

त्याच्याकडे न पाहताच ते उत्तर देत होते.

" डॅड, बोला ना तुम्ही प्लीज. प्लीज बोला."

 तो काकुळतीने म्हणाला. ते मागे वळले. त्याच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं.

" राजेश, काय आहे हे सगळं ?  ती नताशा, तो संदीप. अरे त्याला अभ्यासाचा कंटाळा म्हणून त्याचे बाबा त्याला इथं पाठवायचे. काही अडलं तर विचारावं त्याने. त्याचा अभ्यास व्हावा म्हणून अरे मी काय तोंड दाखवू त्याच्या बापाला. त्याच्या केट्या काही सुटत नाहीत. त्याला या नसत्या फंदात पाडलस. तो एक शतमूर्ख, पॉकेटमनी पुरत नाही म्हणून वरकमाई म्हणे आणि ती पोरं नताशा, कोण कुठली ती ढसाढसा रडून तुझे कारनामे सांगत होती."

" डॅड मी "

" गप्प बैस. राजेश, तू ती व्हिडीओ क्लिप दाखवली होतीस तेव्हाच तुला जाब विचारायला हवा होता असं वाटतंय आता. माझा त्याच्याशी काही संबंध नाही त्या आविर्भावात तेव्हा विक्रम किती खोटारडा आहे याच्या गप्पा हाकायचास तू!  विक्रम, तू ,  तो संदीप चांगल्या घरातली मुलं ना रे तुम्ही. हे असलं काही करताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला."

" पण डॅड, विक्रमचा तो प्लॅन." त्याने खाली मानेनं म्हटलं.

" अरे तो ढिग सांगेल, विहिरीत उडी मार. हे असं एखाद्या पोरीला किडनॅप करायचं, तिला धमकावायचं, तिच्यासोबत असलं काही..... हे आलं कसं तुमच्या डोक्यात आणि मित्र ना तो तुझा काय तर म्हणे बेस्ट फ्रेंड. तुझ्यासमोर तो चुकीचा वागला ते माहीत होतं ना तुला मग तो त्याची चूक सुधारतोय ते करून द्यायचं त्याला की सगळं अजून बिघडवायचं."

" डॅड, सॉरी."   तो खाली मानेनं बोलला.

" अरे व्हॉट सॉरी, या सगळ्यात जीव गेला असता त्याचा! हे असलं काही..... त्याने जीवाचं बरं-वाईट. तो आणि तू यात कधी दुजाभाव केला नव्हता मी! उलट नेहमी वाटायचं मला त्याच्या सारखं तुझं करिअर व्हावं. पण तू  I'm trying या नावाखाली हे असले उद्योग करत हिंडतोयस ते माहित नव्हतं मला.  छे! माझंच चुकलं, तुला काही कमी पडू नये म्हणून मीच काही वेळा चुकीचं वागत आलो. माझ्या कामापेक्षा, ज्ञानापेक्षा, निष्ठेपेक्षा पैशाला महत्त्व दिलं. का ? तर फक्त तत्त्वज्ञान झाडून पोट भरत नाही. पोटासाठी पैसा लागतो. म्हणून तुझ्यासाठी...... आणि तू याचा गैरफायदा घेतलास."

" I'm sorry डॅड. खरंच माझं. माझं चुकलं. नाही आता इथून पुढे कोणाला त्रास देणार खरंच पण तुम्ही अस नका ना बोलू."

" नाही द्यायचा. हे झालं हे शेवटचं. पुन्हा विक्रम अनघाच्या बाबतीत काहीही करण्याच्या फंदात पडायचं नाही. बस झालं . त्यांना त्यांचं आयुष्य आहे आणि तुला तुझं. आता युकेला जायचं अॅट एनी कॉस्ट. घरात बसून  तुझे हे असले उद्योग नकोयत मला."

" ओके मी मी जाईन. तुम्ही म्हणाल ते करेल. पण प्लीज माझ्याशी बोला. तुमच्याशिवाय कोणी नाहीये माझं."

 त्याचा रडवेला चेहरा पाहून त्यांनाही भरून आलं.

" चल, Let's have dinner. "   ते शांतपणे म्हणाले.

" थँक्स......या, मी वाट पाहतोय." 

ते त्याच्याशी बोलले तसा त्याचा जीव भांड्यात पडला. त्यांना मात्र आता भाऊसाहेबांसमोर गेल्यानंतर काय होईल याची चिंता वाटू लागली.
...................................................................


           तिने दारावरची बेल वाजवली. मनगटावरच्या घड्याळात पाहिलं तर पावणेदहा झालेले! काल रात्री आपण खंदारे मॅडमच्या तब्येत बिघडण्याचे कारण सांगून बाहेर पडलो. आजही तेच केलं. पण तिचं मन हळहळलं. आता बास, हे अस आई-बाबांना अंधारात ठेवून लपून-छपून प्रेमप्रकरण असणाऱ्या कॉलेज च्या मुली सारखं वागणं तिला कसंतरीच वाटत होतं. आपण खोटं बोलतोय आईबाबांशी याचं नवल वाटायचं तिला! लवकरात लवकर त्यांना सगळं सांगण्याचं तिने मनाशी पक्कं केलं. आज तर राजेशने स्वतःच्या तोंडूनच सगळं कबूल केलं होतं त्यामुळे तिला हायसं वाटत होतं. राजेशला सुनावून आणि त्याच्या वडिलांसमोर त्याचे उपद्व्याप उघड करून तिला समाधान मिळालं होतं. याच विचारात ती दारासमोर ताटकळत उभी होती. इतक्यात कुमुदने दरवाजा उघडला. ती आत मध्ये आली. श्रीधर सोफ्यावरती बसले होते. त्यांच्या बाजूला रिया उभी होती. कालच्या सारखं कुमुदने' मॅडम कश्या आहेत ग, जेवल्या का असं काहीही विचारलं नाही.
  

" काय.......काय झालं? जेवलात का तुम्ही? चला चला लवकर लवकर जेवू या. मला पण भूक लागलीय."

 तिने सगळ्यांचे चेहरे न्याहाळले नी उत्साही सुरात म्हटलं. ती खोलीकडे जायला निघाली.

" थांब "     श्रीधरच्या आवाजाने ती जागीच थबकली. धडधडत्या हृदयाने तिने मागे वळून पाहिलं.

" कुठं गेलेलीस ?"   पुन्हा प्रश्न. ती कुमुद समोर येऊन खाली मानेने उभी राहिली. दोन क्षण शांतता पसरली.

" अग बोल की, बाबा काय विचारतायत."   कुमुदने चढ्या आवाजात म्हटलं तसं ती दचकलीच.

" कसं बोलणार ?  कुमुद, आपल्याशी खोटं बोलायला लागली ती! आपण काही जेलर आहोत का की शत्रू आहोत हीचे."   श्रीधरचा स्वर गहिवरला.

"  असं नाही बाबा....."

" मग कसं ? अनु तू मॅडमचं कारण सांगून कालपासनं घराबाहेर जातेस तेही टिफिन घेऊन रात्रीची! आणि आम्ही मूर्खासारखे तुझ्या बोलण्याला हो हो करत सुटलोय. गेले गेले चार दिवस हेच सुरू आहे. आज काय मॅडम आजारी पडल्या, काल काय मीटिंग होती, परवा काय लेक्चर्स एक्स्ट्रा होती. "

"अग आई......"

" ताई,  तुला लेट झाला यायला म्हणून आईने मॅडम ना कॉल करायला सांगितलेलं. "  रिया चाचरतच म्हणाली तस आता लपवाछपवी करून काही उपयोग नाही हे तिच्या लक्षात आलं.


" आई-बाबा  "   तिने एक दिर्घ श्वास घेतला आणि निर्धाराने बोलायला सुरुवात केली.

" मला यांच्या घरी परत जायचंय."

" काय! अनु डोकं ठिकाणावरती आहे का तुझं."


 ते ऐकून कुमुद तडकलीच. ती घरी न सांगता विक्रम ला भेटायला गेली असेल तसा त्यांचा अंदाज होता. पण ती असं काही म्हणेल हे त्यांच्यासाठी अनपेक्षित होतं.

 " ताई अग तू पुन्हा तेच सुरू केलंस. तू त्यांच्या गोड बोलण्याला फसू नकोस गं."


" रिया तू गप्प बैस."   ती ताठ सुरात म्हणाली.

" अनु खरं तेच बोलतेय ती. तिच्या वरती ओरडून काही होणार नाही. हे असं कॉलेजच्या पोरींसारखं वागताना तुला काही वाटत नाही मग तिच्यावरती कशाला डाफरतेस."

" बाबा पण......."

" मी आधीच सांगितलय, त्या माणसाचं नाव मला या घरात नकोय. जावई म्हणून मी त्या माणसाला स्वीकारणार नाही."

" बाबा पण मला हवेत ते माझ्या सोबत. माझ्या आयुष्यात.  कायमस्वरूपी!"    ती आर्जवी स्वरात म्हणाली.

" काय बोलतेस! हे तुला सोपं वाटतय का सगळं. तुमच्या घरातला काही प्रोब्लेम असता, तु आणि अरुंधती ताईं मध्ये काही वाद असते तर ची गोष्ट वेगळी होती. वाद संपले. गैरसमज मिटले झालं सगळं पूर्वीसारखं."

" अग पण आई, माझेही काही गैरसमज झाले होते ना यांच्या बाबतीत. त्यांच्या मित्राने राजेशने दाखवलेले ते फोटोज खोटे होते. नताशाने सुद्धा सांगितलं मला, तिचा आणि यांचा काही संबंध नाही ग."

" तू म्हणतेस तसे इतकेच सज्जन असतील ते तर राजेशने तुला हे सगळं का सांगितलं आणि नसत्या गोष्टी तुझ्या डोक्यात का भरवल्या? मित्र होते ना ते दोघे. आपल्या मित्राचा संसार मोडायचं काय कारण ?"

" बाबा.......ते  ते त्या दिवशी रात्री राजेश सुद्धा...... म्हणजे त्याला सुद्धा त्या सगळ्याची कल्पना..."

ती खाली मानेने बोलत होती. त्यांना कसं समजवावं तेच तिला कळेना.

" छान ! मित्र पण एकमेकांना पूरक आहेत आणि अगदी डोकं लढवून एकही पुरावा मागे न ठेवता हे सगळं......शी! किती पाताळयंत्री माणूस आहे."

" बाबा असं नका ना बोलू. ते माणूस म्हणून नसतील ग्रेट अगदी सद्गुणी पुतळा पण......"

" सद्गुणांचं जाऊ दे गं. प्रत्येक आई बापाची इच्छा असते. आपला जावई राजकुमार असावा. त्याचं दिसणं, असणं, त्याच्यातले चांगले गुण. बर्‍याच अपेक्षा असतात ग कारण प्रत्येक आई बाप मग तो गरीब असो की श्रीमंत प्रत्येकालाच आपली लेक राजकुमारी वाटते त्यामुळे अपेक्षा काही संपत नाहीत. पण निदान तो भला माणूस असावा ही एक माफक अपेक्षा आधी असते आणि ती पूर्ण व्हावी.  विक्रमच्या बाबतीत मात्र तेच पूर्ण झालेलं नाही."

" आई I know. पण प्रत्येक माणूस कितीही गुणी असला, माणूस म्हणून चार चौघांना ग्रेट वाटला तरी तो चांगला नवरा असतोच असं नाही ना! चार भिंतीत तो बायकोशी कसं वागतो ते फक्त तिलाच ठाऊक असतं. तुम्हाला ते अयोग्य, पाताळयंत्री, खोटारडे, अहंकारी वाटत असतील इन फॅक्ट वाटतात. पण मी नवरा म्हणून त्यांना ओळखते ना! काळजी घेणारे, मला काय आवडतं, काय नाही हे पक्कं माहीत असणारे, मला मी काही करायचं ठरवलं तर सपोर्ट करणारे, मी कुठे थांबले, अडले, चुकूले माझ्या आयुष्यात तर दिशा दाखवणारे, त्यांच्या नजरेतून मला जग दाखवणारे. त्यांना नाही असं पटकन एक्सप्रेस होणं जमतं, इमोशन्सचं प्रदर्शन चारचौघात करणं जमत. तुमच्यासमोरही नाही आणि घरीही नाही. बघा मी बायकोच्या किती प्रेमात आहे हे सतत दाखवत राहणं नाही जमत. आणि त्यांचं दिसणं, त्यांची पर्सनॅलिटी याची भुरळ पडलीय मला असं नाही ग. मला त्यांचं बोलणं आवडतं. कान तृप्त होतात. त्यांचा अभ्यास, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यातून आलेला अभिमान. हा आता कधी कधी त्याचं एॅटीट्यूड मध्ये रूपांतर होतं. मीच बेस्ट किंवा माझच बरोबर असं होतं त्यांचं. पण कोणतीही बुद्धिमान, ज्ञानी व्यक्ती पुर्णपणे नम्र असू शकत नाही. 
थोडा अभिमान असतोच कारण ज्ञानी माणूस स्वयंप्रकाशित असतो. इतरांच्या आधाराची, कुबड्यांची गरज नसते त्याला! काहीही झालं तरी आपण तरुन जाऊ हे माहित असतं. अहंकाराचं म्हणशील तर पुरुष अहंकारी असतातच ना. त्यामुळे आशिष सारख्या कुणाचा अहंकार कुरवाळत बसण्यापेक्षा आणि दुसरे लग्न करून दुःखी होण्यापेक्षा मी विक्रम कडे जाईन. आई मला दुसरं लग्न करून दुःखी नाही व्हायचं तसच माझ्यावरती अन्याय झाला. मी त्यांना धडा शिकवणार यापायी लग्न, प्रेम याबद्दल कडवटपणा मनात साठवून उभ आयुष्य नाही काढायचं. वयाची साठी येईल तेव्हा अनुभवांनी पोक्त झालेली, केस पिकलेली, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेली, सगळे कटू अनुभव झेलून उभी असलेली, कडक इस्त्रीच्या साड्या नेसून मनही दगडासारखं कडक बनलेली. मॅनेजमेंटचे धडे गिरवता गिरवता नातं नी संसाराचं मॅनेजमेंट फसलेली प्राध्यापक बाई नाही व्हायचं मला! आयुष्य संपताना मला सोबतीचा हात हवाय. पंचवीस तीस वर्षांच्या सहजीवनाचं समाधान माझ्या सुरकुतल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायला हवय मला. मला काही मी क्षमाशील, सोशीक व्हायचं नाहीये आणि मोठ्या मनाची ही मी नाही. मला माझं सगळं आयुष्य फक्त प्रेमाच्या माणसासोबत आनंदी जगायचय. तेव्हा त्यांच्याकडे परत जाण्यात माझा स्वार्थ आहेच की!"


 इतकं बोलून तिने पाणावले डोळे पुसले आणि ती तरातरा तिच्या खोलीत निघून गेली. ते तिघे मात्र आ वासून तिच्याकडे पाहतच राहिले.

क्रमशः

131 रविवारी रात्री

🎭 Series Post

View all