भाग 131
( गेल्या भागात राजेशला सामंतसर सुनावतात आणि सगळ्यांची त्याने माफी मागावी असही त्याला सुचवतात.
दुसरीकडे अनघा आईबाबांना आपण घरी परत जाणार असल्याचं सांगते. तिची बाजू ते ऐकून तर घेतात पाहूया पुढे)
सामंत सर राजेशवरती कितीही ओरडले असले आणि त्यानंतर त्याचा रडवेला चेहरा पाहून त्यांनी त्याला माफ केलं असलं तरीही जे काही घडलं होतं. जे काही त्यांच्यासमोर उघडकीस आलं होतं त्यामुळे त्यांच्या जिवाला चैन नव्हती. आधीच भाऊसाहेब आपल्यावरती नाराज होते. त्यापायी आपल्याला मॅनेजमेंट विभागाच्या एच.ओ.डी पदावरूनही दूर व्हावे लागले आता विक्रमने जे काही उपद्व्याप कॉलेजमध्ये केले त्या सगळ्याला आपलाही छुपा पाठिंबा होता हे भाऊसाहेबांना कळल्यानंतर काय होईल. ते चिडतील की बोलून त्यांची नाराजी दर्शवतील का काहीच न बोलता सरळ आपल्या बाबतीत काही निर्णय घेऊन मोकळे होतील या सगळ्या विचारांनी त्यांची झोप उडाली. दुसरीकडे राजेश मात्र बाबांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांची माफी मागून मोकळे व्हायचं नी एकदाचं या प्रकरणातून सुटायचं. गप्पपणे युकेला जॉब साठी निघून जायचं या विचारातच तो झोपी गेला. इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदा तिने निर्णय घेतला आणि आपली बाजू समोर मांडली त्यामुळे तिच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं होतं. ती निर्धास्तपणे झोपी गेली.
.............................................................
नेहमीप्रमाणे उषाताईंनी त्याला गोळ्या दिल्या. त्याची विचारपूस केली. त्याला लवकरच घरी जाता येईल असे त्या म्हणाल्या तसा त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेला. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून उषाताई त्यांच्या नेहमीच्या कामासाठी निघून गेल्या. घरी जायला मिळणार या कल्पनेने त्याला सकाळ प्रसन्न वाटू लागली. हॉस्पिटल ला आल्यानंतर घराचं महत्व कळतं असं वाटलं त्याला. पण आता सगळं सुरळीत होईल याचा आनंद जास्त होता. आत्या, मम्मा, नीतू, जितेंद्र, भाऊसाहेब सगळे सगळे जण आपल्या सोबत आहेत या भावनेने त्याला हुरुप आला. आता सगळं सगळ्यांसमोर स्पष्ट होतं. कसली लपवाछपवी नाही. सततचं खोटं बोलणं नाही. आपल्या चुका कोणाला कळल्या तर कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल विशेषतः तिला काय वाटेल याची टांगती तलवार नाही. आता सगळं स्पष्ट आहे तिच्या समोर हा विचार मनात आला की तिच्या आई बाबांचे चेहरे डोळ्यासमोर यायचे आणि पुन्हा त्याचं मन खट्टू व्हायचं. आपण त्यांच्यासमोर गेल्यानंतर काय होईल याच विचारात तो होता इतक्यात समोरून कुणीतरी आत आल्याची चाहूल लागली.
" गुड मॉर्निंग. हॅलो, काय म्हणतो पेशंट." विशाल समोरून चालत आत आला.
" What a pleasant surprise! या डॉक्टर."
त्याचा प्रफुल्लित चेहरा पाहून विशालला बरं वाटलं. तो समोरच्या स्टुलावरती बसला.
" काय मग सकाळी इकडे व्हीजिट!"
" हो रे, नाही. व्हिजीट इकडे नाही! तुझ्या घरी."
विशालने हसत म्हटलं.
" What! तू घरी गेला होतास. काय सांगतोस. असा अचानक!" विक्रमला आश्चर्य वाटलं.
" का रे मी जाऊ शकत नाही!" मस्करीत त्याने डोळे मिचकावत म्हटलं.
" तसं नाही रे "
" ओके ओके सांगतो. तुझी सेक्रेटरी... त्यांनी जरा घरी जाऊन यायला सांगितलं."
" कोण! मला नाही कोणी सेक्रेटरी."
गोंधळल्या चेहऱ्याने तो म्हणाला.
" अरे यार काय बोलतोस! बघ हा लावू फोन."
त्याने खिशातला मोबाईल बाहेर काढला.
" ए गप रे, तू पण ना..... त्या नीतू पेक्षा वरताण आहेस."
विक्रम म्हणाला तसा तो हा हा करून हसला.
" ओके ओके सांगतो. असच. अरे आज राजेश भाऊसाहेबांची माफी वगैरे मागणार आहे. तो काय बोलेल ते बोलेल. जितेंद्रने त्यांच्या कानावरती घातलय आधी सगळं. आणि आमच्या वहिनी बाई पण त्यांच्या सासरेबुवांना बर्याच दिवसांनी भेटणार होत्या. त्या नी जीतू घरी जाणार तर तो म्हणाला तू पण चल. मला भाऊसाहेबांना भेटायचच होतं. मी जितका तुला ओळखतो, जेवढं मला माहीत होतं या सगळ्या बाबतीत ते मी माझ्याकडून सांगितलं.
" थँक्स रे "
" चल थँक्स काय रे आणि तुझी काहीतरी हेल्प करू दे रे मला. इथं सांगलीत येऊन बसलोय मी!"
" खरंच, थँक्स. विशाल अॉलरेडी इतकी मदत केलीयस तू!"
" छोड रे, एवढं काय त्यात! तुमच्या लव्हस्टोरीत माझाही थोडा हातभार."
तो मस्करीच्या अंदाजात म्हणाला. विशालने घरी जाऊन सगळ्यांना भेटल्यामुळे विक्रमला बरं वाटलं. आपण अनघासाठी विशाल ची मदत घेऊन तिला त्या सगळ्या धक्क्यातून बाहेर काढलं याचा अर्थ तिच्याबद्दल काहितरी तरी प्रेम वाटत होतं. ती आपल्यासाठी महत्त्वाची होती तेव्हा हे तरी सगळ्यांना जाणवेल या कल्पनेने त्याला छान वाटत होतं आणि आता घरी काय सुरू असेल याची उत्सुकताही वाटू लागली.
.........................................................
" आय.....आय ऍम सॉरी. माझं माझं चुकलं साहेब!"
गॅदरिंगच्या रात्री पासून ते आजतागायत केलेले सगळे उपद्व्याप त्याने खाली मानेने त्यांना सांगितले. डोळ्यांच्या कोनातून बाजूला उभ्या असणाऱ्या सामंतांच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं. त्यांच्या कपाळावरती त्याच्याबद्दलची कालची नाराजी पुन्हा उफाळून आलेली दिसली त्याला! नताशाला मात्र त्याचा उतरलेला चेहरा पाहून मनापासून आनंद झाला होता. तिने जितेंद्र च्या बाजूला उभ्या असणाऱ्या अनघाकडे एक कटाक्ष टाकला. तिने नजरेनेच तिला डोन्ट वरी ची खूण केली. सामंतांनी जितेंद्र कडे पाहत हळुच बोलायला सुरुवात केली.
" साहेब खरं तर माझं चुकलंच आहे याच्या बाबतीत, कॉलेज च्या बाबतीत."
सामंत सर बोलायला लागले तसं भाऊसाहेबांनी नजर वरती वळवली. ते खुर्चीतून उठून दोन पावलं पुढे आले तसा राजेश दोन पावलं मागे सरकला. खाडकन आपल्या कानाखाली वाजेल आता असं वाटलं त्याला! अनघाला तो आठ- नऊ महिन्यांपूर्वी चा प्रसंग आठवला जेव्हा विक्रमने सगळ्यांसमोर त्याच्या उद्योगांचा असा पाढा वाचला होता. तेव्हा ते चिडले होते. पण स्वतःच्या मुलानेच अशी फसवणूक केली याचं दुःखही झालं होतं शिवाय तो कॉलेजच्या बाबतीत चुकीचं वागला होता हे दुसरं कारण. आजही तेच झालं. राजेशच्या विक्रम बाबतच्या करतुतींपेक्षाही सामंत सरांनी विक्रमला नको त्या बाबतीत पाठिंबा देऊन गुरुकुल मध्ये जो गोंधळ घातला त्याचं त्यांना जास्त वाईट वाटेल हे तिला माहित होतं.
" राजेश तू चुकीचा वागलास. जितेंद्रने आम्हाला सगळ्याची कल्पना दिली होती. आमची माफी मागून काय उपयोग आहे. माफी मागायची असेल तर ज्यांना त्रास दिलास त्यांची माग. आमच्या सुनबाई, ही मुलगी नताशा, तुझे वडील."
ते म्हणाले तस त्यांनी पुन्हा सामंतांकडे पाहिलं.
" स........सॉरी सगळ्यांनाच!" खाली मानेनं तो म्हणाला.
" आणि हो पुन्हा असं व्हायला नको. एखादा माणूस दुष्कृत्य करतो. तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर अक्षरशः सगळ्याची माती करून घेतो आणि सुदैवाने वेळीच त्याला आपण कुठे चुकलो हे जाणवतं आणि तो व्यक्ती विस्कटलेलं सगळं होईल तस उभारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला मदत करावी. ते जमत नसेल तर निदान काही बिघडवू तरी नये. एखादा माणूस स्वतःच्या चुका सुधारत असतो तेव्हा त्या मुद्दामहून चव्हाट्यावर आणून त्याची निंदा नालस्ती करण्याचा आनंद घेणारी माणसं असतातच. आपण ठरवावं आपल्याला कोण व्हायचे ते सावरणारं की बिघडवणारं!"
त्यांचं बोलणं सगळे खाली मानेने ऐकत होते.
" खरंच माफ करा मला. पुन्हा असं कुणाच्या बाबतीत नाही होणार माझ्याकडन."
" ठीक आहे निघा तुम्ही. सर तुम्ही थांबा."
त्यांनी जितेंद्र सहित सगळ्यांना निघण्याची खूण केली. राजेशने एकवार त्यांच्याकडे पाहिलं. तोही जितेंद्र, नताशा अनघाच्या मागोमाग बाहेर पडला. ते काही बोलण्या आधीच सामंतांनी बोलण्यास सुरुवात केली.
" क्षमा करा मला. या सगळ्याला मी देखील जबाबदार आहेच. राजेशचे अती लाड भोवले. तो हे असं..... खरंच माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं. खरंतर, माझ्यामुळे त्याची आणि विक्रम सरांची ओळख झाली. ती झाली नसती तर त्यांची मैत्रीच झाली नसती आणि हे असं काही.... साहेब राजेशच्या या वागण्यामुळे, आगाऊपणा मुळे गुरुकुल ची बदनामी झाली. बापूसाहेबांनी केलेले आरोप आणि त्यातून सगळ्यांना मनःस्ताप झाला."
सामंतसर नजर झुकवून बोलत होते. त्यांनी सामंतांच्या खांद्यावरती धीराने हात ठेवला.
" असू द्या. आता जे घडलं त्याबद्दल वारंवार बोलून ते काही बदलणार नाही. अहो जे घडायचं ते घडतचं माणूस केवळ निमित्त. राजेश यात गुंतला नसता तरी या ना त्या प्रकारे विक्रम च्या हातून घडायचं ते घडलंच असतं आणि तसंही यात राजेशची तशी काही चूक नाही! हा जे सत्य त्याला माहीत होतं. त्याचा वितुष्ट निर्माण करण्यासाठी वापर करून ते त्याने चुकीच्या पद्धतीने समोर आणलं हीच काय ती त्याची चुक बाकी राजेशला शिक्षा करून विक्रमने कॉलेजमध्ये केलेला गोंधळ, सुनबाईंशी केलेलं वर्तन या गोष्टी तर बिनमहत्त्वाच्या ठरत नाहीत न! त्यामुळे पुन्हा असं त्याच्याकडून काही घडायला नको याची दक्षता घ्या."
" हं "
" आणि सर, तुम्ही विक्रमच्या वागण्याला पाठिंबा द्यायला नको होता. शिक्षण संस्था चालवणे आणि एखादी व्यावसायिक कंपनी चालवणे यात फरक असतो ना! तुम्ही लोकांनी व्यवसायाचे नियम सेवेला लावलेत. हा, आता आपल्याला देखील कॉलेज चालवायचं तर आर्थिक बाबींकडे लक्ष द्यायला हवं अगदीच उदार होऊन नाही चालायचं मान्य. पण त्याचा अतिरेक नको. पालकांना, विद्यार्थ्यांना त्रास नको."
" हो, पुन्हा पुन्हा असं नाही होणार पण......"
ते पुन्हा आर्जवी सुरात बोलू लागले तसं भाऊसाहेबांनी त्यांच्याकडे पाहत शांतपणे म्हटलं,
" तुम्ही इतकी वर्ष गुरुकुल ची सेवा केलीयत. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांपासून जे कोणी सोबत होते त्यापैकी एक तुम्ही आहात तेव्हा पुढेही आपण सेवेत राहण्यासाठी सदिच्छा."
त्यांचे शब्द कानावर पडताच सामंतांची नजर वरती वळली.
" खरंच! खरंच थँक यु साहेब. मी मी पुन्हा तक्रारीची संधी नाही देणार तुम्हाला."
सरांनी ठामपणे म्हटलं. त्यांनी आपल्याला अडचणीत आणणारा कोणताच निर्णय घेतला नाही, इतक्या शांतपणे त्यांनी समजून घेतलं सगळं याचा त्यांना आनंद झाला आणि विक्रमच्या बरोबरीने आपणही त्यांना आजवर फसवत आलो याचं शल्यही मनातून वाटलं.
...........................................................
.
नाश्त्याच्या प्लेट्स कुमुदने डायनिंग टेबल वरती उचलून किचन मध्ये नेऊन ठेवल्या. बेसिनचा नळ सुरू केला. पण कामात लक्षच लागत नव्हतं. काल अनघा जे बोलली होती त्याचाच विचार तिच्या मनात घोळत होता. काय करावं, तिच्याशी काय बोलावं, समजवावं तरी काय नी कसं काहीच तिला कळत नव्हतं कारण तिच्या बोलण्यावरून तरी ती आता कोणाचं ऐकणार नाही याचा अंदाज कुमुदला आला होता. इतकं सगळं घडल्यानंतर आता तिच्यासोबत विक्रम ला पाहून कुमुदच्या मनाला अवघड वाटत होतं. त्या गॅदरिंग च्या दिवशी रात्री ती ज्या अवस्थेत घरी पोचली होती ते आजही नुसतं आठवलं तरी कुमुदचा थरकाप उडायचा. मागचं सगळं पुसून टाकून त्याच माणसाला ही मुलगी कसं स्वीकारणार या प्रश्नाने कुमुदचं डोकं भंडावून गेलं. विक्रमला पुन्हा पहिल्यासारखा आदर, कौतुक आपण देऊ शकू का याची तिला शंका वाटू लागली. ती तशीच बाहेर हॉलमध्ये आली. श्रीधर सोफ्यावरती पेपर चाळत बसले होते.
" श्रीधर, तुम्ही तुम्ही काय ठरवलंत?" तिने बोटांची चाळवाचाळव करीत विचारलं.
" हं, कुमुदबाई तुम्ही सांगा तर काय करावं?"
त्यांनी हातातला पेपर समोरच्या टिपॉयवर ठेवला.
" मी काय सांगणार! मला तरी काही कळत नाहीये. आपण नाही म्हणून ती ऐकणार आहे का!"
" हं तेही आहेच म्हणा! काल पाहिलंस न कसं लेक्चर दिलं ते." श्रीधर हताशपणे म्हणाले.
" मग काय करायचं आता."
" काय करणार. ती सुज्ञ आहे आणि इतकीही लहान नाही की आपण तिला काही सांगावं किंवा कान धरुन हे नको, तेच कर अस सगळ सांगत राहावं. आणि तिला जर खात्री वाटते सगळं नीट होईल पुन्हा याची मग आपल्या शंकांना काय आधार उरला."
" हा बरोबरय तुमचं. बघू आज पर्यंत आपण तिच्या बाबतीत सगळं ठरवत गेलो. यावेळी तिचे तिनच ठरवलं तर पाहू काय होतं ते!"
कुमुद म्हणाली तस हा म्हणत श्रीधरने दुजोरा दिला. पण त्यांच्या चेहर्यावरचे भाव तिला वेगळे वाटले.
" काय हो कसला विचार करताय ?"
" काही नाही ग. त्यांच्यावरती विश्वास ठेवायला माझं मन नाही धजावत आहे. ते येतील. तुझ्याशी, रियाशी गोड
बोलतील. नाही, काही झालं तरी पोरी च्या आईने कितीही म्हटलं तरी जावयारती फार चिडणं, त्यांचा अनादर करणं नाही जमत आईला! रिया सुद्धा कितीही चिडली असली तरी शेवटी जिजू आहेत तिचे. पण पण मला नाही खात्री वाटत मी त्यांना स्विकारु शकेन."
दोन क्षण काय बोलावं काही समजेना तिला.
" हं...."
फार न बोलता ती जायला वळली. श्रीधरचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले.
...........................................................
सगळा दिवस तिच्यासाठी आनंदाचा होता. इतक्या महिन्यानंतर आज घरी येऊन भाऊसाहेबांना भेटून छान वाटले तिला. किती दिवसानंतर ते घर तिनं डोळे भरून पाहिलं. आत्या, अरुंधती, नीतू, जितेंद्र, घरातली नोकर मंडळी सगळ्यांचे चेहरे असे एकत्र बऱ्याच दिवसानंतर तिने पाहिले. हॉस्पिटलला सगळ्यांशी भेटणं व्हायचं पण आज घरी येऊन सगळ्यांना भेटून तिला वेगळं वाटत होतं. जे कधीतरी हरवलेलं ते पुन्हा सापडावं तसं काहीसं वाटत होतं मनाला. त्यातून राजेशने भाऊसाहेबांसमोर फार कचकच न करता सगळं कबूल केलं. सामंत सरांनाही त्यांची चूक उमगली आणि भाऊसाहेबांनी त्यांच्या स्वभावाला साजेसा शांतपणे निर्णय घेऊन त्या दोघांची कानउघडणी केली आणि माफही केलं. कदाचित विक्रमने स्वतःच्या चुका मान्य करूनही त्यांनी त्याच्याशी अबोला धरला, तुटकपणे वागले त्यानंतरचा झालेला परिणाम पाहिला म्हणून कदाचित यावेळी त्यांनी ही गोष्ट फार न ताणता त्या दोघांना नाराज केलं नाही. त्यांना माफ केलं असेल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला. पण जे काही सध्या घडत होतं त्याने ती खुश होती. घरी आल्यानंतर हे सगळं तिला कोणाशी तरी भरभरून बोलावं वाटत होतं. पण कालच आई बाबां समोर आपण एवढा मोठा प्रश्न निर्माण केलाय ते आठवलं तसं तिने स्वतःच्या उत्साहाला आवर घातला. काल रात्रीच्या प्रसंगावरून पुन्हा बोलणं टाळलं मात्र रात्र होत आली तसं कुमुदनेच विचारलं, डबा नेणारयस का तसा तिला मनातून इतका आनंद झाला घरभर नाचावसं वाटलं. पण आईने परवानगी दिली असली तरी नाराजी दोघांच्या चेहऱ्यावरती तिला दिसत होतीच मग तिने शांत राहणंच पसंत केलं. हळूहळू होईल ठिक सगळं असं मनाला समजावत राहिली. रात्री मात्र ती वेळेत हॉस्पिटलला पोहोचली. आज खोटं बोलून घरुन निसटायचं कारण नव्हतं त्यामुळे तिला हलकं वाटत होतं.
" या आज लवकर आलात! आमच्या सासूबाई प्रसन्न झाल्या वाटतं."
ती आत मध्ये येताच विक्रम हसत म्हणाला. तिने नेहमीप्रमाणे टिफिनबॉक्स टेबलवरती ठेवला. त्याच्यासमोर येऊन बसली.
" हं, होणारच मी सांगितलं काल."
तिने उत्साहाने बोलायला सुरुवात केली.
"काय ?"
" हेच सगळं खरं "
" मग त्यांनी परमिशन दिली!" त्याला आश्चर्य वाटलं.
" हा त्यात काय परमिशन! राजे, परमिशन घ्यायला आपल्याला थोडी लग्न करायचेय." त्याच्या बोलण्यावर ती फिदीफिदी हसायला लागली.
" जोक्स पुरे सिरीयसली म्हटलं मी."
त्याने चिडक्या आवाजात म्हटलं तशी ती पुन्हा हसली.
" अरे चिडतोस काय असा! खरंच. आणि आई-बाबा अजून तरी शांत आहेत. थोडेसे नाराज आहेत. पाहूया. Let's hope for the best." ती आशावादी नजरेने बोलली.
" हं पण.... पण ते अचानक नाही म्हणाले मग ग."
तो चिंताग्रस्त चेहऱ्याने म्हणाला.
" मग काय? ने पळवून मला." ती पुन्हा हसायला लागली.
" अरे " तिला काहीही विचारण्यात अर्थच नाही अश्या नजरेने चिडून त्याने चेहरा दुसरीकडे वळवला.
" विक्रम अरे इतकं टेन्शन नको घ्यायला आणि दोन माणसांना जेव्हा एकत्र जगायचं असतं ना तेव्हा काय महत्वाचं असतं माहित आहे ?" तिने तिच्या हाताने त्याचा चेहरा आपल्या समोर वळवला.
" काय ?" तिच्या डोळ्यात पाहात त्याने विचारलं.
" त्या दोन माणसांची एकमेकांसोबत राहण्याची, जगण्याची इच्छा असायला हवी बास की बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. आणि जर एकत्र राहायचं नसेलच न तर मग काहीही कारण पुरतं दुरावायला."
" हं.....राईट मॅडम." तो हसला. तिने त्याच्या हाताच्या तळव्यावरती आपला हात ठेवला. त्याच्याकडे पाहत ती उद्गारली.
" मी आहे......."
क्रमशः
132 गुरुवारी रात्री
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा