भाग 132
( गेल्या भागात विशालने विक्रमच्या घरी जाऊन भाऊसाहेबांची भेट घेतली. राजेश आणि सामंतसरांनी भाऊसाहेबांसमोर आपल्या चूकांची कबुली दिली. त्यांनी सामंतसरांना माफही केलं. श्रीधर आणि कुमुदने अनघाला तिच्या म्हणण्याप्रमाणे विक्रमच्या घरी जाऊ द्यायचं ठरवलय.)
ती हॉस्पिटलमधून रात्री थोडी उशिरानेच घरी परतली. घरी कोणी विचारणारं नाही किंवा उघडपणे ओरडणारं नाही हे आता तिला माहीत होतं. घरी आल्यानंतर ती आनंदाने पोटभर जेवली. श्रीधर, कुमुद, रिया तिच्या वागण्या वरती नाराज असले तरीही तिच्यासाठी जेवायचे थांबले होते. मग तिनेही विक्रमचा विषय न काढता जेवून घेतलं. खरं तर त्याला उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याचे डॉक्टरांकडून कळलं तेव्हा ती आणि जितेंद्र खूश झाले. तिला त्यांना सांगावंसं वाटलं, की आता त्याला हॉस्पिटलमधून घरी जाता येईल मग थोडे दिवस आराम केला की बरं वाटेल त्याला मग मीही त्या घरी जाईन कायमसाठी! पण तिने तूर्तास काही बोलणे टाळले. आजचा दिवस आपल्याला हवा तसा गेला आणि राजेश आता पुन्हा विक्रम आणि आपल्या मध्ये काही गैरसमज निर्माण करणार नाही. त्याच्या सगळ्या वागण्याला आता भाऊसाहेब आणि सामंत सरांनी चाप बसवला. आता कसलीच चिंता नाही. त्या आनंदात ती शांतपणे झोपी गेली.
.........................................................
सकाळी तिला पहाटेच जाग आली. आज साडे दहा- अकरा पर्यंत त्याला डिस्चार्ज मिळेल या कल्पनेनेच आळस झटकून प्रसन्न मनाने ती अंथरुणातून उठली. कॉलेजला जाण्यासाठी पटापट तयारी केली. आज सकाळची दोन लेक्चरचा आपण घेणार असल्याचे तिने खंदारे मॅडमना कळवलं होतं. तिला हॉस्पिटल ला जायचं होतं आणि घरी सुद्धा!
...................... ............... .....
" गुड मॉर्निंग सर."
उषाताई नेहमीच्या प्रसन्न मुद्रेने दरवाजा लोटून आत मध्ये आल्या.
" Very good morning." तो छानसं हसला.
" काय बुआ आज खुश दिसताय एकदम." त्या चालत पुढे आल्या.
" हो, फायनली आज घरी......" सुटकेचा निःश्वास टाकत तो म्हणाला.
" हो, हो अजून वेळ आहे थोडा. इतके एक्साईट नका होऊ नाहीतर डॉक्टरांना सांगेन हा तुम्ही मेडिसिन घेत नाहीत वेळेवर मग नो डिस्चार्ज."
" ओ असं नका ओ काही करू." त्याचा खट्टू झालेला चेहरा पाहून त्या गमतीने हसल्या.
" नाही करणार, या गोळ्या घ्या आधी." त्यांनी नेहमीप्रमाणे त्याला गोळ्या दिल्या.
" थँक्स " तो पाणी प्यायला. त्या पटकन उत्तरल्या.
" थँक्स काय, आमची ड्युटीच आहे ती!"
" हो पण तुम्ही होतात म्हणून फार बोअरींग नाही वाटलं इकडे नाहीतर हा इतका आराम झेपलाच नसता मला!"
" हो, पण घरी गेल्यानंतरही टेक रेस्ट. लगेच कॉलेजला नका जाऊ." त्यांनी सुचना द्यायला सुरुवात केली.
" हो नक्की."
" बाकी फॉर्मॅलिटीज जितेंद्र आले की कम्प्लीट करतील ते.चला मग घरी जायची तयारी करा."
" हो आणि थँक्यू तुम्हाला."
" इट्स ओके. नका इतकं फॉर्मल बोलू." त्या पुन्हा खळखळून हसल्या.
इतके दिवस घरी जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या त्याला मात्र आता निघण्याची वेळ आली तसं थोडं उदास वाटू लागलं. इथे आलो होतो आपण तेव्हा काय परिस्थिती होती, आपली काय अवस्था झालेली होती. आज निघताना फक्त आनंद सोबत घेऊन चाललोय इथून! या भावनेने त्याला गहिवरल्या सारखं वाटलं आणि इथे आल्यापासूनच्या सगळ्या घटनांचा पट नजरेसमोर तरळला. भाऊसाहेबांनी ऐनवेळी येऊन रक्तदान करणं, शुद्धीवरती आल्यानंतर पहिल्यांदा भाऊसाहेब भेटायला आले होते तेव्हा त्यांचं भावूक होणं, जितेंद्रचं ओरडणं, आत्याने घरून डबा पाठवणं, नताशा आणि विशालने धावत मदतीला येणं, कॉलेजमधल्या कुणी न कुणी आठवणीने चौकशी करायला येणं, उषाताईंचं काळजी घेणं, पहिल्यांदा तिचं भेटायला येणं, तिच्यासोबतची लुटूपुटूची भांडणं, तिचं समजावणं, घरच्यांना न सांगता चोरून भेटायला येणं. ते सगळं आठवलं. हॉस्पिटलच्या एका रूम मध्ये काय काय घडून गेलं होतं. त्याने उषा ताईं कडे पाहिलं. एक पेशंट बरा होऊन घरी चाललाय या कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती
होता. भाऊसाहेबांचे शब्द त्याला आठवले, सेवेतला आनंद वेगळाच असतो.
........... ..................... ................
तो बरा होऊन घरी येणार याचा आनंद अख्ख्या घराला होता. बंगल्यावरती सकाळपासून नेहमीची लगबग सुरू होतीच. पण घरातल्या सगळ्यांची घाई गडबड जास्त होती. त्या दोघांची, त्यांना एकत्र पाहण्याची, त्यांच्या हसण्या- खिदळण्याची सवय झाली होती सगळ्यांनाच. ती नव्हती तर इतके महिने घराला अवकळा आल्यासारखं वाटत होतं. ती लग्न करून घरी आली तेव्हा तिच्या वर ओढावलेल्या परिस्थितीने तिच्या आयुष्यातला तयार झालेला एक प्रश्न आपण सोडवू शकलो याचा आनंद आत्या, भाऊ साहेबांना होता. पण ती घर सोडून जाताना मात्र अनेक प्रश्न मागे सोडून गेली होती. बाईच्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं साधी-सोपी नसतात याची प्रचिती अख्ख्या घराला आली. पण आता सगळा गुंता सुटला होता. किंबहुना तिने तिच्या पुरती उत्तरं शोधून गुंता सोडवला होता. नीतू, आत्या, अरुंधती सगळ्या जणींना तिचा अभिमानही वाटत होता. विक्रम पेक्षाही कणभर जास्तच तिच्यावरती जीव जडला होता. इतकी मोठी घटना घडूनही तिचा कणखरपणा, तिचा निश्चयी स्वभाव, तिचं प्रामाणिक असणं, कुठल्याही परिस्थितीत आपण बाई आहोत म्हणून न झुकणं या गोष्टींनी विक्रमला त्याच्या चुकांची जाणीव व्हायला भाग पाडलं होतं याची त्यांना कल्पना होती. पण त्या दोघांना एकत्र पाहून सगळे खुश होते. ते हॉस्पिटलमधून निघाले तस जितेंद्रने नीतुला कळवलं. तोपर्यंत आत्याने ओवाळणीसाठीचं तबक तयार ठेवलं. त्यांची खोली आवरून टापटीप करण्याची गरज नव्हतीच. ती घर सोडून गेल्या दिवसापासून त्याने खोली जशीच्या तशीच ठेवली होती. ते पोचतील आता घरी कोणत्याही क्षणी म्हणून नीतू हॉलमध्ये सोफ्यावरती बसून राहिली. गाडी प्रवेशद्वारातून आत मध्ये आली तशी ती दरवाजापाशी येऊन उभी राहिली.
" आत्ये ये की लवकर लवकर." नीतू दरवाजाला टेकून उभी होती.
" व्हय ग. काय घाई आसतीय तुला. येऊ तर दे की त्यास्नी."
आत्या देवघरातून तिच्यावरती डाफरत बाहेर आली.
" काही एक्साइटमेंट वगैरे नाही हो आत्या बाई. त्याला पिडायचं असतं फक्त तिला. बाकी काही नाही."
" असं काही नाही आत्ये. तू नको ऐकु मम्माचं."
" मला कुनी बी काय बी सांगायची गरज न्हाई. तुमी तिग बी किती बेरकी हायेसा ठाव हाय मला."
" हा......ही ही ही." ती आत्याला वेडावून दाखवायला लागली.
" बघा आले ते!" अरुंधती म्हणाली तसं दोघींच्या नजरा समोर वळल्या.
" Welcome Home." ती मोठ्याने टाळ्या पिटत म्हणाली.
" नीतू बस झालं हा. पुरे आता." त्या दोघांच्या मागे जितेंद्र उभा होता.
" भावोजी का ओरडता तिला." तिने लगेच नीतूची बाजु घेतली.
" घ्या, आला यांना पुळका! तुम्हाला वाटते तितकी साधी भोळी नाही ती!" विक्रमने म्हटलं तसं नीतूने नाक फुरगटून त्याच्याकडे पाहिलं.
" दाद्या माझ्या विरुद्ध बोलायचं नाही हा. महागात पडेल."
" ए जा ग. काय करणार तू ?" जितेंद्र बोलला तशी ती फिदीफिदी हसली.
" मी हिला माझ्या सोबत घेऊन जाईन." तिने अनघाचा हात ओढून तिला आपल्या बाजूला घेतलं.
" कशाला उगीच ह्याला त्रास." विशाल हसत म्हणाला.
" हो का मी बघतो ना मग तुझी रवानगी कुठं करायची ते! मी सांगेन हा त्या अ....." जितेंद्र मोठ्यानं म्हणाला तसं तिने त्याला हातानेच गप्प बसवलं.
" ए चुप "
" काय म्हणतोस ? " विक्रमने मागे मान वळवित त्याच्याकडे पाहिलं.
" म्या माझं काम करती मंग चालू द्या तुमचं."
" हो, तुम्ही घ्या ओवाळून." अरुंधतीने सुद्धा आत्याला दुजोरा दिला.
" हा तू पण." नीतूने तिला खांद्याला धरून त्याच्या बाजूला उभं केलं. आत्याने दोघांना ओवाळलं. दोघांनी आत्याला वाकून नमस्कार केला.
" आसच र्हावा हासत."
" आयुष्यमान भव." अरुंधतीने दोघांना हसर्या, समाधानी चेहऱ्याने आशीर्वाद दिला.
" चला सर, तुम्ही आराम करा थोडा." विशालने त्याच्या खांद्यावरती हात ठेवत म्हटलं.
" तुम्ही....." तो तिच्याकडे वळला तसा जितेंद्र पुढे आला.
"हो रे बाबा येतील हा त्या!" जितेंद्रच्या बोलण्यावरती ती मान वेडावून हसली. जितेंद्र, विशाल त्याच्यासोबत त्याच्या खोलीत निघून गेले. अरुंधती ओवाळणीचं तबक घेऊन
देवघरापाशी गेली आणि नीतू दुपार साठी काय स्पेशल मेन्यू असणार ते पाहायला किचन मध्ये!
...................................................
सगळी गर्दी पांगली. तिने सगळ्या घरावरुन एक नजर फिरवली.
" काय, आशी काय बघतीयास? खूश हायेस न्हवं?"
" हो. खूप." तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
"म्या म्हनलं व्हतं, सोताच्या आनंदाचा इचार करायचा. अख्ख्या बाईच्या जातीचं भलं करनं कुना एकीला न्हाई जमत ग. परतेकीनं आपल्यापुरती आपली उत्तरं सोधायची मग जगनं सोप व्हतया."
" हं आत्या, खरंच मी माझ्या परिने उत्तरं शोधायला हवी होती!"
" आसु दे, झालं ते झालं. चला म्या जेवनाचं बघती." आत्या जायला वळली. तिने काहिश्या विचाराने पटकन म्हटलं,
" मी येऊ का ?"
" व्हय चला सुनबाई." आत्या उत्साहाने म्हणाली.
..........................................
" काय मग राजे हॅप्पी ना!" विशाल आर्मचेअर सरकवून त्यावरती निवांत टेकला. विक्रम बेड वरती बसला आणि सकाळपासून आळसावलेला जितेंद्र आल्या आल्या बेडवरती पसरला.
" अरे हॅप्पी का नसेल! आता काय बुवा आपली गरज संपली. आता त्याच्या मागे मागे फिरणारं, गोड गोड आवाजात सर, सर म्हणणारं कोणीतरी आलं ना!"
" अरे जित्या अस काही नाही." बोलताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य पसरलं.
" हो, दिसतय ना ते! किती आनंदाच्या उकळ्या फुटतात." विशालने सुद्धा त्याची थट्टा करायला सुरुवात केली.
" अरे विशाल अशीच सेम रिअक्शन होती. माहितीय, भाऊसाहेबांना परस्पर ' हो ' म्हटलं यानं वहिनीं साठी. अरे आपल्याला एक भाऊ आहे. चिवचिवत असली तरी बहीण सुद्धा आहे. आम्हाला काही सांगायची पद्धत. अरे आमच्या लाडक्या मम्माच्या हातावरपण तुरी दिली यानं."
" काय सांगतोस, म्हणजे सगळं यानेच ठरवलं तर!" विशालने मोठं आश्चर्य चेहऱ्यावरती दाखवत म्हटलं.
" असं काही नाही तू काय रे ऐकतोस या जित्याचं."
" मग नी काय करणार रे आमच्या वहिनी पण काय कमी आहेत का!"
" हो रे बाबा साष्टांग दंडवत." विशालने जितेंद्रला टाळी देत म्हटलं.
" ए एवढं फिदीफिदी करण्यासारखं काही नाहीये. घेतात त्या मला समजून..."
" हो, हो फक्त कधीकधी जराश्या चिडून बसतात नाही!" त्याच्या बोलण्यावर ती दोघेही फिदीफिदी हसले.
" ए पुरे आता. पिडूया नको ह्याला नाहीतर मॅडम यायच्या नी म्हणायच्या, हे काय सर, आराम कर आता."
" हो, जित्या चलो निघूया आपण." विशाल चेअर वरून उठला.
" अरे थांबा ना." इतक्यात रुमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. ती हातात ट्रे घेऊन उत्साहाने आत मध्ये आली.
" चला पुरे गप्पा, सर You should take rest हा."
तिच्या बोलण्यावर दोघे तोंडावरती हात धरून हसायला लागले. तिने हातातला ट्रे कॉर्नर पीस वरती ठेवला.
" अरे वा! आज शीरा, चला चला खाऊन टाकू."
" हावरट जित्या आपल्यासाठी नाहीय. आपली सेवा कोण करणार रे अशी! आपल्याला किचन मध्ये जाऊनच खावं लागणार." विशालने पुन्हा मस्करीत म्हटलं.
" असं काही नाही डॉक्टर, तुमच्या साठी पण प्लेट्स मागू का?"
" नको ओ थँक्स. आम्ही खाली जातोय. बरं, उद्या निघतोय मी."
" का? थांबा न, असे घाई घाईत आलात नी...." अनघा त्याला थांबण्याचा आग्रह करू लागली.
" हो रे विशाल, थांब न आलायस तर. पुन्हा कधी येणार तू असा इतक्या दिवसांसाठी!" विक्रमने म्हटलं.
" अरे येईन की एकदा सवडीने. मी नाही येऊ शकलो तरी तुम्ही या ना कॉलेजला मोठी सुट्टी असते तेव्हा.... जयपूर फिरुन या."
" हो येऊ की नक्की." अनघा म्हणाली.
" बरं सर आराम करा. छान राहा दोघेही आणि नेक्स टाईम अस धावत यायला लावू नका मला! आता मस्त निवांत भेटू पुन्हा. काय."
" हो रे नक्की. विशाल थँक यु सो मच."
" It's Ok थँक्स काय. आपण फ्रेंड्स होतो आणि पुढेही असू फक्त या माझ्या छोटुश्या हेल्पमुळे आपली फ्रेंडशिप अजून घट्ट झाली बाकी नथिंग. and I'm always proud of you. आणि अनघा मॅडम टेक केअर. तुम्ही सुद्धा काळजी घ्या." तो तिच्याकडे पाहत तो म्हणाला.
" हो डॉक्टर."
" चलो जित्या खाली बघूया काय शिजतय ते!" जितेंद्रच्या खांद्यावरती हात टाकत तो म्हणाला.
" हो डॉक्टर साहेब चला." दोघेही थट्टा मस्करीत खाली निघून गेले.
.................................................
मघापासूनचा हसण्या- खिदळण्याचा आवाज थांबला तशी खोली एकदम शांत झाली. विशाल निघुन गेला तसा त्याच्या नजरेसमोर तो जयपूरला पहिल्यांदा त्याला भेटायला, अनघा बद्दल बोलायला गेला होता तो प्रसंग नजरेसमोर उभा राहिला. आपल्या मित्राकडे कधी तो मनाचा डॉक्टर आहे म्हणून त्याला भेटण्याची गरज पडेल असं त्याला वाटलंही नव्हतं. त्या दिवसापासून ते आजतागायत विशालने त्याच्या परीने मित्र म्हणून, डॉक्टर म्हणून शक्य ती मदत केली होती. त्याला नवल वाटलं, ज्या मित्राला जिगरी दोस्त म्हणून इतकं डोक्यावरती घेतलं त्याने फक्त अडचणी समोर उभ्या केल्या आणि दूर असूनही, आपल्या कसल्याच पार्टी, सेलिब्रेशनमध्ये सामील नसणाऱ्या मित्राने अडचणीतून मार्ग काढायला हात दिला.
" विक्रम......" ती शिर्याची प्लेट हातात घेऊन त्याच्यासमोर बसली.
" काय..... लक्ष कुठय?"
" नथिंग." त्याने मान हलवून म्हटलं. त्याच्या चेहऱ्यावरली उदासी तिच्या लक्षात आली.
" विक्रम इट्स ओके. असं सारखं भूतकाळात डोकावून असा त्रास करून घेणार का तू ?"
" नाही ग. जस्ट असच."
" Ok, See." तिने हातातली प्लेट कौतुकाने त्याला दाखवली.
" अरे वा! आज शिरा! का बुवा."
" असच." तिने गालात हसत एक घास त्याच्यासमोर धरला.
" आता मी माझ्या हाताने खाऊ शकतो. हे अस चिऊमाऊसारखं सारखं खायला किती वेळ जातो. Time is money. आण इकडे." त्याने शिर्याची प्लेट स्वतःच्या हातात घेतली.
" Ok, Bye मग." ती रागावून उठली. त्याने तोपर्यंत शिरा खायला सुरुवात सुद्धा केली.
" ए बाय का?" खाता खाता त्याने विचारलं.
" मी घरी जातेय तसही आई वाट बघत असेल." ती जायला वळली.
" अनु " त्याने तिचा हात धरला तशी ती मागे वळली.
" निघालीस सुद्धा! थांब न थोडा वेळ."
" का......ही नको मी बडबड करत बसेन न Time is money नाही का!" ती दोन्ही हातांची घडी घालत म्हणाली.
" हो का बस मग " त्याने तिचा हात खाली खेचला तशी ती समोर बसली. त्याने प्लेटमधला चमचा तिच्यासमोर धरला.
" हे एवढं गोड कोण खाईल!" त्याने तिच्या डोळ्यात पाहात म्हटलं तसं तिच्या चेहऱ्यावरती हसू पसरलं. त्याने इतक्या दिवसांनी घास भरवला. तिने रुमवरुन एक नजर फिरवली.
" कितीतरी महिन्यांनी असे आपण बसलोय नाही गप्पा मारत!"
" पण मला यायची न आठवण पण एक माणूस विसरलेलं मला!"
" नाही काहीही काय!" ती पटकन म्हणाली तसं तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मोठ्याने हसला.
" अग गंमत केली! हे असे मोठे डोळे करून नको बघू. भीती वाटते न मला."
" हो का गप्प बस. खाऊन घे पटकन."
" ओके बॉस." प्लेटमधला उरलेला शिरा त्याने संपवला. तिने ग्लासात पाणी ओतून दिलं.
" हं, चला सर निघते मी आता." ती बेडवरुन उठली तसा तोही लगोलग उठला.
" ओके बाय टेक केअर." ती दरवाजापाशी जाताना म्हणाली.
" हं, बाय." तो उदास चेहऱ्याने म्हणाला. तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं.
" हसून बाय म्हणायचं असतं. हे असा चेहरा पाडून नाही. विक्रम तूच म्हणालेलास न तू स्वतःहून आई-बाबांशी बोलशील आणि मला त्यांच्या समोरून इकडे घेऊन येशील हो न मग." ती त्याच्या मिठीत आली.
" हं. I know आहे लक्षात."
" मग "
" भीती वाटते एकटेपणाची."
" काहीही मी आहे ना आणि दोन-तीन दिवसाचा तर प्रश्न आहे. भर्रकन दिवस संपतील आणि तुला भेटायला येणारी माणसं पण असतीलच ना."
" हं. Ok." तिच्या नजरेत पाहत तो म्हणाला. ती त्याच्या मिठीतून दूर झाली आणि चालत कॉर्नरपीसपाशी आली.
" आणि कॉल असतील न माझे. मेसेज सुद्धा.... तुला हवा तितका वेळ बोलू आणि कॉलेज सुटल्यावरती येईन न मी. ओके. "
तिने ड्रॉवर उघडला आणि आतली कीचेन हातात घेतली. त्याला कळलं नाही ती ड्रॉवरमध्ये काय शोधतेय!
" काही हवय का ?" तो दारापाशी उभा होता. ती पुन्हा त्याच्या समोर उभी राहिली. तिने हसत हाताची मुठ उघडली.
" खूप खूप आठवण आली तर हे सोबतीला....."
तिनं ते हार्टवालं किचेन आपल्या हाताच्या तळव्यावरती ठेवलं. हात आपल्या हनुवटी समोर धरला.
" हे काय ?" त्याने न कळून विचारलं.
तिने आपले ओठ त्या लाल रंगाच्या छोट्याश्या हृदयावरती टेकवले.
" अनु काही सुचतं तुला !" तो छानसं हसला. तिने त्याच्या हातावरती किचेन ठेवलं.
" बघा, किती छान हसता सर. तुमचं हसू माझ्यासाठी प्रेशियस आहे म्हणून खटपटी कराव्या लागतात."
" थँक्यू." त्याने ते आपल्या हातात घेतलं. त्याच्या शांत,हसर्या चेहऱ्याकडे ती डोळे भरून पाहत राहिली.
.............................................
ती घरी परतली ती खूप आनंदात. तिच्या आनंदाला आलेलं उधाण पाहून घरच्यांच्या लक्षात आलं. तरीही तिने सांगितलं त्याला डिस्चार्ज मिळाल्याचं आणि दोन- तीन दिवसानंतर तो आपल्याला घ्यायला येणार असल्याचेही. गेल्या काही दिवसांमध्ये तिचं वागणं अगदी आशिष ला भेटून ' नाही ' म्हणण्यापासून ते विक्रमला भेटून ' 'हो ' म्हणण्यापर्यंत सगळं तिने ठरवलेलं. घरच्यांना काहीही न सांगता, न विचारता आपल्यापेक्षाही दीड-दोन वर्षांपूर्वी आयुष्यात आलेला माणूस तो हि इतकी अवगुण असणारा तिच्यासाठी इतका प्रिय आहे असंही श्रीधर कुमुदला वाटुन गेलं. विक्रमच्या घरी मात्र सगळी मंडळी ती घरी येणार म्हणून खूश होती. तिच्या स्वागताला सज्ज होती. आत्या भाऊसाहेबांशी तिच्या आई-वडिलांना भेटण्याविषयी बोलली. तिच्या घरच्यांच्या मनातला कडवटपणा सगळ्यांना ठाऊक होता. आत्या गेल्या वेळी तिच्या घरी गेली होती तेव्हाचं कुमुदचं तुटकपणे वागणं तिच्या लक्षात होतं. आपणही तिच्या आई-वडिलांशी बोलून घ्यावं म्हणून रात्री भाऊसाहेबांनी श्रीधरला फोन केला.
" हॅलो श्रीधरराव."
" साहेब तुम्ही! कसे आहात?" त्यांचा फोन येणं श्रीधरसाठी अनपेक्षित होतं. पण विक्रम विषयी बोलण्यासाठी त्यांनी फोन केला असेल याचा अंदाज त्यांना होता.
" आम्ही ठीक तुम्ही आणि कुमुदताई कसे आहात?"
" हो ठीक." श्रीधर उत्तरले तशी दोन क्षण शांतता पसरली. त्यांनी फोन केला नी औपचारिकता म्हणून तरी विक्रम बद्दल, त्याच्या तब्येतीबद्दल चौकशी करावी वाटली त्यांना! त्या दिवशी जितेंद्र चा फोन आल्यानंतर त्यांना ती बातमी कळली पण त्यानंतरही आत्या, अरुंधती किंवा जितेंद्र कोणाकडेही त्याच्या तब्येतीची चौकशी करण्याचे श्रीधरने टाळलं होतं.
" कसेयत विक्रम आता ?" श्रीधरने विचारलं.
" हो ठिकयत. सकाळी डिस्चार्ज मिळाला. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल." ते धीरगंभीर स्वरात म्हणाले.
" हं."
" श्रीधरराव सुनबाई आल्या होत्या घरी."
" हं, म्हणाली ती."
" तुम्हाला काय वाटतं ?"
"आम्ही काय बोलणार साहेब. तिने तिचा निर्णय घेतला आहे. ती सज्ञान आहे शिवाय सुशिक्षित आहे." श्रीधर तटस्थपणे म्हणाले.
" हो तेही आहेच तरी तुम्हाला हे पटणं थोडं अवघड आहे. समजू शकतो आम्ही. आपल्या लेकी सोबत कोणी गैर वागतं तेव्हा संताप होणे साहजिक आहे. पण इथून पुढे तुमच्या लेकीला काही त्रास होणार नाही. पुन्हा अशी रडत तुमच्या घरी यायची वेळ नाही येणार तिच्यावरती."
ते ठामपणे बोलत होते आणि श्रीधर शांतपणे ऐकून घेत होते.
" हा ठिकय. तुम्ही म्हणताय तर होऊ द्या तिच्या मनाप्रमाणे!"
श्रीधर शांतपणे उदगारले. ते ऐकून भाऊसाहेबांना मात्र बरं वाटलं.
" श्रीधर तुमचे आभार कसे मानू."
" असं काही नका बोलू. आभार कसले! तुमच्या वरती विश्वास आहे आमचा."
" हो, तुम्ही निर्धास्त राहा. बरं ठेवू का?"
" हो." पलीकडून त्यांनी फोन ठेवला. श्रीधर तसेच स्तब्ध उभे होते. सगळं सुरळीत होईल का याची चिंता त्यांना सतावत होती.
क्रमशः
133 सोमवार सकाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा