बंधन भाग 134

Social, Love

भाग 134

( गेल्या भागात विक्रम तिच्या घरी पोचतो. श्रीधर, कुमुदशी बोलून ते दोघं घरी येतात. पाहूया पुढे)

                  ती घरी आली आणि तिच्या येण्याने घर पुन्हा हसू लागलं. आपल्या घरच्या मुलामुळे एका मुलीचं भविष्य आणि वर्तमान उद्ध्वस्त झालं. तिचं जगणं दयनीय बनलं.हे अपराधाचं ओझं गेलं एक वर्ष त्या घराने वाहिलं. आपल्या घरामुळे दुसर्‍या कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होण्याचं दुःख त्या घराने पाहिलं तस हळुवार फुलणारं प्रेम, एकमेकांच्या घट्ट बंधनात अडकलेली आई, भाऊ, बहीण, वहिनी, नवरा, बायको या नात्यातला ओलावा सुद्धा त्या भिंतींनी कधीतरी पाहिला होता. आता कितीतरी दिवसानंतर पुन्हा हसण्या- खिदळण्याचे आवाज आणि एकमेकांना समजून घेणारे एकमेकांची काळजी घेणारे शब्द ऐकून घरं तृप्त झालं. ती आली आणि आपल्या माणसांमध्ये पुन्हा विरघळून गेली. आत्या, अरुंधती, भाऊसाहेबांचं तिला समजून घेणं, कौतुक करणं होतं. नीतू , जितेंद्रचं उगीचच थट्टा करणं होतं आणि तिला सगळ्यात जास्त जे हवं होतं ते त्याच सोबत असणं  सुद्धा होतं. ती घरी आल्यानंतर रियाचं तिच्याशी बोलणं सुरू असायचं. अधून मधून श्रीधर, कुमुदचा एखाद दुसरा फोन असायचा चौकशीचा. ती घरी राहायला आल्यानंतर सामंतसर  पुन्हा त्यांना भेटून गेले. विक्रम बरा झाल्याचा आनंद त्यांना ही होताच. राजेश मात्र भाऊ साहेबांना भेटून गेल्यानंतर पुन्हा त्या घराची पायरी चढला नाही. पुन्हा तिथं येण त्याला अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्याने तो विषय डोक्यातून बाजूलाच केला आणि यु.के.ला जाण्याची तयारी सुरू केली. सामंतांनी म्हटल्याप्रमाणे दिवाळीनंतर लगेचच त्याला युके ला जायचं होतं. दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली होती. या दिवाळी पाडव्याला शांत मनाने तिच्यासोबत तिच्या घरी जायचं त्याने ठरवलं. सगळ्यांसाठी कोणती गिफ्ट्स घ्यायची ते सुद्धा त्याच्या डोक्यात सुरू होतं. सगळं सुरळीत होताना विशालची आठवण त्यांना होतीच. त्याचे फोन अधून-मधून असायचे. नताशा सुद्धा त्यांच्या संपर्कात होती. अनघा घरी आल्यानंतर त्यांनी नताशाला घरी बोलावलं.  तिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी काही करता येईल का याची चाचपणी केली. नितुसोबत तिची ओळख करून दिली. तिच्यासाठी आता एक आशेचा किरण दिसू लागला. त्या भयंकर जगातून बाहेर पडल्या नंतर पुढे काय? आयुष्य कसं सुरु करावं हा प्रश्न होता. त्याचं उत्तर नितूच्या एन.जी.ओ. मुळे तिला मिळू शकणार होतं.

                 अनघा घरी आल्यानंतर पुढच्या एक-दोन दिवसात त्यानेसुद्धा कॉलेजला जायला सुरुवात केली. दोन-तीन आठवड्यानंतर त्याला नेहमी सारख्या प्रसन्न चेहऱ्याने कॉलेजमध्ये पाहून सगळ्यांना बरं वाटलं. त्याने आल्या आल्याच सगळ्या स्टॉफची मीटिंग सुद्धा बोलावली. सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या आणि स्वागत सुद्धा केलं. ऑफिसस्टाफ ची मंडळी खूश होती. कामात दिरंगाई नको, व्यवहारात पारदर्शकता असु दे अशा सुचना सुध्दा त्याने ऑफिसमधल्या सीनियर मंडळींना दिल्या. कामात लक्ष घाल अशी सामंतांनी शिवाची कानउघडणी केली त्यामुळे दिनेश आणि शंकर सारखा तोही आळस झटकून कामाला लागला. प्राध्यापकांच्या पर्सनल गोष्टींची चर्चा कॉलेजमध्ये नको. पर्सनल लाईफ गेटच्या बाहेर ठेवूनच यावं अस त्याने मीटिंगमध्ये सांगितल्यामुळे कार्ले मॅडम, रेगे मॅडम, वरदे मॅडम चे कान टवकारले गेले. अनघाला सुद्धा हा नियम लागू होता. तिनेही कामात लक्ष घालायला सुरुवात केली. एम.बी.ए., एमस्सी सारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मुलांना मुंबईला जावं लागतं. त्याची सोय गुरुकुलमध्ये सवलतीच्या दरात असावी या हेतूने नवीन वर्गखोल्या बांधण्याचं काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होतं. नव्या इमारतीमुळे गुरुकुल दिमाखात उभं असल्यासारखं वाटायचं. इमारतीचं प्लास्टर, रंगकाम सुद्धा आता पूर्ण झालं होतं. विक्रम हॉस्पिटलला असल्यामुळे कॉलेजला जाऊन हे सगळं पाहणं भाऊसाहेबांना जमलं नाही. आणि त्या दोघांशिवाय घरातलं कोणी कॉलेजच्या कामांमध्ये हस्तक्षेप करायचा देखील नाही.तो  असं हॉस्पिटलमध्ये असताना कॉलेजमधल्या गोष्टींचं  कौतुक करण्याचं मन कोणाला होईना. पण आता त्याला पूर्णपणे बरं वाटत होतं. पहाटे उठणं, जीमला जाणं, तिच्यासोबत कॉलेजला जाणं आता पुन्हा सुरू झालं तस प्राचार्यांनी भाऊसाहेबांकडे नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा विषय काढला. घरी तर आता सगळं सुरळीत झालं होतं त्यामुळे त्यांनीही हो म्हटलं. मग प्राचार्यांनी विक्रम सोबत बोलून उद्घाटनाची तारीख पक्की केली अगदी पाच सहा दिवसानंतरची! शहरातल्या कॉलेजचे प्राचार्य, विक्रमच्या ओळखीतले प्राध्यापक,  इतर कॉलेजेसचे डायरेक्टर्स राजेशिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक सगळ्यांना फोन, इमेल द्वारे कळविण्यात आलं. भाऊसाहेबांनी त्यांच्या वर्तुळातल्या राजकारणी मंडळींना निमंत्रित करायचं नाही असं ठरवलं.  राजकारणापासून कॉलेजला त्यांनी इतके वर्षे लांब ठेवलं होतं. याहीवेळी त्याप्रमाणे ते वागले. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी रात्री जेवण आटोपल्यानंतर त्यांनी विक्रम ला बोलावून घेतलं. बऱ्याच दिवसानंतर कॉलेजबद्दल बोलण्यासाठी त्यांनी आपल्याला बोलावून घेतलं याचं अप्रूप होतं पण ते काय बोलतील याचं थोडंसं दडपणही आलं होतं.


" येऊ का साहेब ?"   त्याने त्यांच्या खोलीचा दरवाजा थोडासा लोटत विचारलं.

" या सर."    अरुंधतीने वॉर्डरोब बंद करत म्हटलं. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच तो कॉलेज बद्दल त्यांच्याशी बोलायला आलेला असताना त्याने अरुंधतीला ही खोलीत पाहिलं होतं. कामाबद्दल काहीही बोलायचं असलं तरी जितेंद्र किंवा विक्रम सोबत ते बोलताना अरुंधती तिथं नसायची. तिला कामाच्या गोष्टींमध्ये रस नसायचा पण आज मम्माला समोर पाहून त्याला थोडं नवल वाटलं.

" मम्मा "   तो आत मध्ये आला.

" तुमच्या मॅडमना वाटेत सोडून आलात की काय!"  अरुंधती थट्टेनं म्हणाली.

" नाही, येतायत ना त्या!"  तिच्या मस्करीने तो अवघडून गेला. इतक्यात ती आतमध्ये आली.

" या सुनबाई."   ते दोघांकडे पाहत म्हणाले. दोघं त्यांच्या समोर येऊन उभी राहिली.

" काय झालं ? मम्मा तुम्ही पण इकडे!"  ती गोंधळात पडली.

" काही नाही. उद्या आपल्या कॉलेजमध्ये उद्घाटन समारंभ आहे तर म्हटलं बोलावं तुमच्याशी थोडं." 

 ते शांतपणे म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरती कसलीच नाराजी नव्हती. विक्रम वरचा त्यांचा रागही आता निवळला होता.

" बोला ना."   तो सहजपणे म्हणाला.

" गेल्या काही वर्षात आपल्या गुरुकुल ची प्रगती उत्तम झाली. खरं सांगायचं तर विक्रम तुम्ही विदेशातून आलात आणि कॉलेजची सगळी जबाबदारी घेतलीत. त्यानंतर ची तीन वर्ष तुम्ही अगदी झटुन काम केलत फक्त.......


"  हो I know पण पुन्हा असं नाही होणार."

 तो त्यांचं बोलणं तोडत म्हणाला.

" होऊ देखील नये. विक्रम, अपेक्षेने, आशेनं मूलं आपल्याकडे येतात. कॉलेज साठी तुम्ही खूप काही केलं आणि कॉलेजचं नाव मोठं व्हावं, ते अजून सुसज्ज असावं अशी तुमची आकांक्षा असणे सहाजिक आहे. शेवटी काय तुम्ही नव्या पिढीची माणसं..... तुमच्या आशा, स्वप्नांना मर्यादा नसतात...... पण लाखो मुलांची स्वप्नंसुद्धा आपल्यासारख्या कॉलेजांच्यापाशी असतात हेही लक्षात ठेवायला हवं. ती तुटता नयेत. आपल्यामुळे त्यांची शिकण्याची इच्छा मरून गेली तर मोठमोठ्या इमारतींना काय अर्थ!" 

 ते बोलत होते. ती दोघं शांतपणे ऐकत होती.

" साहेब, आपल्या इथे येणार्‍या कोणाची स्वप्न तुटणार नाहीत . बर्वेसरांच्या बाबतीत जे झालं ते पुन्हा इथे येणाऱ्या कोणत्याच प्राध्यापकांच्या नि विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होणार नाही."  तो निर्धाराने म्हणाला तशी ती कौतुकाने हसली.

" हो तुम्ही बोलताय म्हणजे तसं कराल याची खात्री आहेच."

" त्यांनी त्यांना जे वाटलं ते सांगितलं. तुमचे कान पिळणं किंवा सूचना देणं अजिबात नाही." अरुंधती त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणली.

" हो मम्मा."

" बरं, शुभेच्छा तुम्हाला उद्या साठी आणि पुन्हा कॉलेजच्या कामाला लागा. तसही सुनबाईंची मदत होईलच तुम्हाला आणि तुमच्या नव्या आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा."

 नेहमीच्या मृदु आवाजात ते म्हणाले. त्यांना दोघांनी वाकून नमस्कार केला.

" असेच राहा नेहमी एकमेकांसोबत. आयुष्यमान भव."

 त्या दोघांना कितीतरी महिन्यानंतर एकत्र पाहताना त्यांना बरं वाटत होतं. त्या दोघांना एकत्र पाहण्याचं  दृश्य कधी पाहायला मिळेल, मिळेल की नाही मिळणार असा विचारही त्यांच्या मनात यायचा. एक बाप म्हणून, सासरा म्हणून ते दोघे एकत्र यावेत हीच इच्छा मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी तग धरुन होती. पण त्यांच्यातल्या समाजकारणी, राजकारणी माणसाला विक्रमचं वागण पटत नव्हतं आणि त्यासाठी त्याला शिक्षा व्हावी हे सुद्धा वाटत होतं. पण आता मात्र त्यांची मनापासूनची इच्छा पूर्ण झाली होती. त्यांनी समाधानाने आशीर्वादाचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला.
.................................................

             गाडी कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर येऊन थांबली. लग्न झाल्यापासून ते आजतागायत कितीतरी वेळा ते दोघं कॉलेजला गाडीतून एकत्र आले होते. पण आज कॉलेजला  येताना काहीतरी वेगळं वाटत होतं नेहमीपेक्षा! एकच वास्तू आणि दोन भिन्न विचार घेऊन तिथं वावरणारी, काम करणारी माणसं आता एकमेकांचे जिवलग होऊन स्वप्नं पाहणार होती. जनसेवा आणि व्यवसाय, दान आणि पैसा, एका बाजूला मूल्यं आणि दुसर्‍या बाजूला टोकाची बुद्धिमत्ता, लहानशी स्वप्नं आणि बलाढ्य महत्त्वाकांक्षा यांच्यातला संघर्ष त्या वास्तूने पाहिला जो आता संपला होता. डोळ्यातली मोठी स्वप्नं आणि त्यांना साकार करण्यासाठीची बुद्धी, धनशक्ती यासोबत मातीशी नाळ जोडून ठेवणारी मुल्यं जेव्हा एकजीव होतात तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होतं जे आता इथून पुढे घडणार होतं. घर ते कॉलेज या पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरामध्ये तिचं मन किती मागे जाऊन फेरफटका मारून आलं तिलाही कळलं नाही. आज गाडीत तोही जरा शांतच होता कदाचित आपल्या मनात जे सुरू आहे ते त्याच्याही मनात घोळत असेल असं वाटलं तिला . शांततेचा जसा त्रास होतो तसा कधी-कधी शांततेलाही शब्दांचा त्रास होतो कारण मनातले तरंग कधीकधी आपसूक निवळतात न बोलता! म्हणून ती गप्पच राहिली. गाडी थांबली तसे दोघं खाली उतरले. 

          दोघांची नजर पहिल्यांदा वळली ती प्रवेशद्वारावरच्या मोठ्या ठळक अक्षरांकडे! गुरुकुलचं झळकणारं नाव पाहून तिच्या नजरेसमोर कॉलेजचा तो मुलाखतीचा दिवस उभा राहिला. भाऊसाहेबांचा तो प्रश्न, ' तू प्राध्यापिका म्हणून येथे रुजू झालीस तर तुझं स्वप्न पूर्ण होईल पण तुझं स्वप्न पूर्ण झाल्यावरती आपल्या विद्यार्थ्यांसाठी तू काय करशील ? ' तेव्हा त्यांना दिलेलं उत्तर अंमलात आणण्याची वेळ आली होती. सुदैवाने वा दुर्दैवाने जे काही घडलं त्यातून ती त्यांच्या घरची थोरली सुनबाई झाली. आता बर्‍याचश्या गोष्टी तिच्या हातातही होत्याच.


" विक्रम, चार वर्ष पूर्ण होतील नाही मी इकडे जॉईन होऊन आता!"    तिच्या तोंडून आपसूक शब्द निघाले.

" हो ग. खरंच! वर्ष कशी भरभर निघून गेली ना!" 

 त्याच्या मनात बर्‍याच जुन्या घटनांचा कल्लोळ माजला. तिची भाऊसाहेबांनी घेतलेली मुलाखत, त्याच दिवशी दुपारच्या इंटरव्ह्यू घेणार्‍या पॅनेलमध्ये आपण होतो. त्यातल्या दोघा- तिघांना जॉब ची गरज होती म्हणून सामंतसरांकरवी आपण पैशांचा व्यवहार केला आणि आपण सिलेक्ट केलेल्या नव्या प्राध्यापकांची लिस्ट भाऊसाहेबांना त्या दिवशी रात्री दाखवलेली. त्यांनी डोळे झाकून सह्या केल्या....... त्या नंतरच्या वर्षी मात्र जूनच्या अॅडमिशन मध्ये घोळ झाला आणि या मॅडमनी भाऊसाहेबांसमोर सगळं बिंग फोडलं. करंबेळकर सर, निंबाळकर सर बिचारे अडकले त्यात.  भाऊसाहेबांनी त्यांना आधी फैलावरती घेतलं. आपल्याला इतका राग आलेला अनुचा! त्यामुळेच खुश होऊन तिला साहेबांनी डिसेंबर मध्ये ते बेस्ट टीचर अॅवॉर्ड  दिलं.  नी त्याच महिन्यामध्ये गॅदरिंग च्या दिवशी रात्री...... मात्र त्यानंतरचं वर्ष किती कठीण होतं. कल्पनेपलीकडचं. आपलं तिच्याशी लग्न होईल ही कल्पनाच आपण केली नव्हती. त्यानंतर तिची मानसिक अवस्था, आपण तिची काळजी घेणं, तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी विशालची मदत घेणं. रिग्रेट म्हणता म्हणता किती गुंतत गेलो आपण तिच्यात कळलच नाही. त्या वर्षीच  सप्टेंबरच्या दरम्याने आपण तिला आपल्या मनातलं सांगितलं आणि त्यानंतर सगळं किती सुंदर होतं अगदी डिसेंबर पर्यंत! कडाक्याच्या थंडीत रात्री तिच्यासोबत किती भटकलेलो आपण,  किती प्रोमिसेस दिलेली एकमेकांना. हे नववर्ष खूप सारा आनंद घेऊन येईल असं वाटलेलं. पण फेब्रुवारीत ती घर सोडून गेली....... त्यानंतरचे ते दिवस पुन्हा न येवो!  हे वर्ष संपत आलं आता. इतके महिने कसे जगलो आपण ती नसताना! '

" जाऊया आत?"   तिने त्याच्याकडे पाहत म्हटलं.

" हो चला." 

 मनातले सगळे विचार दूर झटकत त्याने आत मध्ये पाऊल टाकलं.


क्रमशः

135 रविवारी रात्री

🎭 Series Post

View all