भाग 135
( गेल्या भागात भाऊसाहेबांनी विक्रमला कॉलेजबद्दल पुन्हा सुचना दिल्या. कोणतेही गैरप्रकार कॉलेजमध्ये होणार नाहीत अस त्याने वचन दिलं. पाहूया उद्गाटनाचा समारंभ कसा पार पडतो.)
कॉलेजमध्ये वातावरणात अगदी उत्साह संचारला होता. उद्गाटनाच्या घाईगडबडीमुळे सकाळची लेक्चर होणार नव्हती. काही डिपार्टमेंट्स बंद होती. प्राध्यापक हळूहळू यायला सुरुवात झाली होती. बाहेरच्या कॉलेजेस मधून येणारे प्राचार्य आदी मंडळी हळूहळू येऊ लागली तशी शिपायांची त्यांच्या स्वागतासाठी पळापळ सुरू झाली. विद्यार्थ्यांची तुरळक गर्दी होतीच. प्रवेशद्वाराच्या बाहेर कट्ट्यावरती घोळक्याने असलेले विद्यार्थी, कँन्टीनमध्ये सकाळीच टाईमपास करणारी मुलं होती, लायब्ररी आणि प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू होती. बऱ्याच दिवसानंतर कॉलेजमध्ये एखादा कार्यक्रम होता. हे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण गेले काही महिने हरवून गेलं होतं. ते दोघ प्राचार्यांच्या केबिन मध्ये पोहोचले. त्याने केबिनचा दरवाजा लोटला.
" May I come in sir ! "
" या ना सर." प्राचार्य खुर्चीवरून उठले.
" Come सर." प्राचार्यांच्या समोरच्या खुर्चीवरती बसलेली व्यक्ती उठून उभी राहिली.
" Oh, What a pleasant surprise! मल्होत्रा सर."
ती पाठमोरे असलेली व्यक्ती खुर्चीतून उठली तसा त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
" तुम्ही इन्व्हाईट केलं आणि येणार नाही असं कसं होईल!"
" Thank You So Much." तो कृतज्ञतेने म्हणाला.
" Don't say thanks सर. मी येणार होतो..... तुमची तब्येत....आणि मध्यंतरी कॉलेजबद्दलही... ओके Now, How's everything? "
" Yeah, absolutely fine."
" हं... and I wish you both every happiness."
" Thanks Sir."
" Congratulations. तुमच्या कॉलेजची अशीच प्रगती पाहायला आवडेल आम्हाला हा."
" हो सर नक्कीच." त्यांचं शेकहँन्ड स्वीकारत तो म्हणाला.
" बरं निघुयात का? भाऊसाहेब आले असतील." करंबेळकर सर घड्याळ्यात पाहत म्हणाले.
" हो...प्लीज."
त्याने हातानेच औपचारिकपणे मल्होत्रा सरांना पुढे होण्यास दर्शवलं तसे त्यांच्यासह सगळे केबिन मधून बाहेर पडले.
...........................................
एव्हाना सगळे प्राध्यापक, कॉलेजच्या आवारात मघापासून रेंगाळणारे विद्यार्थी, ऑफिसचे कर्मचारी, शिपाई सगळे गोळा झाले होते. निंबाळकर सरांसोबत भाऊसाहेब चालत पुढे आले तशी गर्दी पांगली. सगळे शिस्तीत एका बाजूला उभे राहिले. भाऊसाहेबांनी कॉलेजच्या सगळ्या परिसरावरुन एक नजर फिरवली. दोन खोल्यांमध्ये सुरू केलेली शाळा..... ती शाळा आपल्याला मोठी करावीशी वाटली. शाळा का फक्त म्हणून युवकांसाठी सवलतीत मॅनेजमेंट, आयटी कोर्सेसचं शिक्षण मिळावं म्हणून गुरुकुलची उभारणी झाली. एवढुसं बीज आईबाबांनी रुजवलेलं त्याचा इतका मोठा वृक्ष बनला. पंचवीस वर्षानंतर आज गुरुकुलचा अजून विस्तार होणार.... त्यांच्या मनात क्षणभरासाठी विचार आला, हे सगळं पाहायला आई-बाबा असायला हवे होते. पण दुसर्या क्षणी मन उत्तरलं, त्यांना मध्यंतरी जे घडलं ते पाहावलच नसतं. विक्रमचं वागणं, कॉलेजची बदनामी, घराची बदनामी हे सगळं पचवणं जड गेलं असतं.
" साहेब विक्रम सर येतील इतक्यात." निंबाळकर सर म्हणाले.
" हो, मल्होत्रा सर सुद्धा मघाशी आलेत." खंदारे मॅडम म्हणाल्या तस निकम सर हसत बोलले,
" हो, ते येणारच. त्यांना आवडत आपलं गुरुकुल." तसं काळेसर भाऊसाहेबांना उद्देशून म्हणाले,
" होय साहेब, आपलं गुरुकुल आहेच सगळ्यांना आवडण्यासारखं. कोणाचाही जीव रमेल इथं!"
" हो न जसा अनघा मॅडमचा रमला तसं!"
खंदारे मॅडम थट्टेनं म्हणाल्या तसं एकमेकींसोबत उभं असणारं त्रिकूट, कार्ले मॅडम, वरदे मॅडम, रेगे मॅडम नी चेहरे हसरे ठेवत हो हो म्हटलं.
" हो. पण आपल्या कॉलेजच्या नावाला डाग लागणर नाही याची जबाबदारी सुद्धा आपणच घ्यायला हवी." बर्वे सर म्हणाले तसे सामंतसरांनी पटकन नजर वरती वळवली.
" नक्की. इन फॅक्ट ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे नी आम्हा सिनियर मंडळींची जास्त."
सामंतांच्या बोलण्यावरती काळेसरांनी नजरेनेच 'येस ' म्हटलं.
" हो आणि फक्त प्राध्यापकांची नव्हे बरं. सगळ्यांचीच काय रे शिवा." निंबाळकर सर पुढे उभ्या असणार्या शिपायांना उद्देशून म्हणाले.
" व्हय सर पन हा शिवा..." शंकर त्याच्याकडे बोट दाखवून तत्परतेने म्हणाला.
" ए गप्प बस. मी काम करतो आता!" शिवा त्याला हातानेच गप्प बसायला सांगितलं.
" म्हणजे आधी करत नव्हतास तर!" दिनेश मध्येच बोलला तसा शंकरने त्याला टाळी दिली.
" नायी हो साहेब असं कायी नायी." शिवा भाऊ साहेबांकडे रडवेला चेहरा करून पाहायला लागला.
" असू द्या हो सर. आज कोणावरती डाफरु नका."
निंबाळकर हसून ओके म्हणाले. ते दोघे प्राचार्य आणि मल्होत्रासरांसोबत खाली आले. तश्या सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आपापसात कुजबुजणारी मुलं शांत झाली.
" वेलकम मल्होत्रा सर." निंबाळकर सर हसून म्हणाले.
" Don't be so formal. आगत-स्वागत मघाशी झालं. पुन्हा पुन्हा नको."
" OK. तर सगळे जमले तेव्हा इनोगरेशन करून घेऊ." प्राचार्य भाऊ साहेबांकडे पाहत म्हणाले.
" हो, या विक्रम सर." त्यांनी त्या दोघांना नजरेने पुढे येण्याची खूण केली.
" साहेब पण तुम्ही."
" असु द्या हो, हे सगळं जे रूपडे पालटलय कॉलेजचं ते तुमच्यामुळे! इथून पुढेही तुम्हालाच सगळं पाहचय तेव्हा श्री गणेशा करा तुमच्या हातांनी."
ते म्हणाले तसं त्याने होकारार्थी मान हलवली. त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं.
" प्लीज." तो पुटपुटला. त्याने रिबन कापण्यासाठी हात पुढे केला तसा तिने आपला हात त्याच्या हातापाशी नेला. रिबन कापली गेली तस भाऊसाहेबांसह सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. शिपायापासून ते बाहेरून आलेल्या पाहुण्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता. आपलेपणाचा भाव होता. त्या वास्तूशी, जागेशी, वातावरणाशी प्रत्येक जण बांधला गेला होता. टाळ्या वाजवणारे, चैतन्याने रसरसणारे हात आता इथून पुढे त्या वास्तूसोबत असणार होते. तिच्यासाठी झटणार होते.
..........................................
सकाळचा उद्गाटन समारंभ सुरळीत पार पडला. कार्यक्रमाकरिता आलेले पाहुणे ही खुश होऊन परतले. मल्होत्रासरांनी देखील या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि लवकरच त्यांच्या कॉलेजातील एका कार्यक्रमासाठी येण्याचं आमंत्रण त्यांनी विक्रमला दिलं. सकाळी उद्गाटनावेळी सगळ्यांची कॉलेजप्रती असणारी आस्था, प्रेम पाहून भाऊसाहेबांना भरुन आलं. कॉलेजमध्ये हीच एकी आणि एकमेकांसोबत वैचारिक मतभेद न घालता मुलांसाठी झटणारी मंडळी असावीत ती त्यांची इच्छा असायची. पण गेल्या काही वर्षांमध्ये तसं काही घडत नव्हतं. सगळ्यांनाच कॉलेजबद्दल, आपल्याबद्दल आदर आहे हे भाऊसाहेबांना माहीत होतं. पण इथं काम करणार्या चार माणसांचे चेहरे, चार दिशांना! चार जणांच्या चार तर्हा हे सगळं चालू असायचं. प्राध्यापक मंडळी अनुभवी, उच्चशिक्षित ऑफिसातले कर्मचारी आपल्यामुळे कॉलेज चाललंय आपणच कामाचा डोलारा हाकतो अश्या अविर्भावात! सफाई कर्मचाऱ्यांची तर त्याही पेक्षा वेगळी तर्हा, शिवा सारखे नमुने तर जितकं सांगणार तितकच काम करणारे! हाताची पाची बोटं सारखी नसतात याची कल्पना भाऊसाहेबांना होती पण बोटं वेगवेगळी असली तरी त्यात एकी असते ती एकजूटच त्यांना इतके वर्ष दिसत नव्हती जी मध्यंतरीच्या काही घटनांमुळे दिसली आणि आज सगळ्यांचं बोलणं ऐकून त्यांना समाधान वाटलं.
.....................................................
भाऊसाहेबांनी पुन्हा एकदा आपल्या वरती विश्वास ठेवला तेही अगदी सगळ्यांसमोर! या आनंदाने त्याला आभाळ ठेंगणं झालं. ते त्याच्यासोबत आता पुन्हा पहिल्यासारखे वागू लागलेत आणि कॉलेजच्या बाबतीत आता सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवली. पुन्हा त्याच्या कडून पूर्वीच्या चुका होणार नाहीत असा विश्वास आपल्या सारखा त्यांनाही वाटतो याचा आनंद झाला होता तिला. शाळेत असताना आपल्या जिवलग मित्र मैत्रिणीला बक्षीस मिळतं, त्यांचं कौतुक होतं तेव्हा जसा आनंद व्हायचा तसाच आनंद आज त्याचं कौतुक सगळ्यांकडून होताना पाहून तिला झाला. मग तिच्या आग्रहाखातर दुपारचे जेवण त्याने बाहेर रेस्टॉरंटमध्ये घेतलं. घरी आल्यानंतर मात्र जितेंद्र, नीतू दोघांनीही त्यावरुन त्यांना भंडावून सोडलं म्हणा! पण तिला आजच्या समारंभामुळे छान वाटत होतं. कॉलेजमधलं गढूळ झालेलं वातावरण पुन्हा पूर्वीसारखं होईल याची खात्री वाटू लागली. आनंद वाटून घ्यावा असं म्हणतात मग सकाळच्या कार्यक्रमाचे फोटोज तिने रियालाही पाठवून दिले. ' सुपर्ब... आईला दाखवते ' असा तिचा रिप्लायही आला त्यावर!
संध्याकाळीही तिने आत्याला रात्रीच्या स्वयंपाकासाठी मदत केली. ती घरी आल्यापासून पुन्हा नेहमीप्रमाणे सगळं सुरू झालं. गेले काही महिने किचनमध्ये वावरताना आत्याला चुकल्यासारखं वाटायचं. ती किचनमध्ये असल्यामुळे नितुची किंवा जितेंद्र ची लुडबूड सुरू असायची. तिथंही मग हसणं खिदळणं सुरू व्हायचं. तिच्यामुळे जुने दिवस परत आल्या सारखं आत्याला वाटायचं. अरुंधतीलाही ती हे सांगायची. तिच्या येण्यानं घर इतकं खुश आहे आणि लेकाला नी सुनेला एकत्र पाहून भाऊसाहेब मनातून अगदी आनंदात आहेत याची अरुंधतीला कल्पना होती. तिला भाऊसाहेब नी विक्रममधला दुरावा इतके दिवस अस्वस्थ करत होता. आणि तो मिटला यामुळे तिचा जीव भांड्यात पडला. आज खऱ्या अर्थाने पुन्हा त्याच्या हातात त्यांनी सगळं सोपवलेलं पाहून ती खुश होती मग आत्याने रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायला जमायचं अशी ताकीदच दिली सगळ्यांना!
.......................................
" वा! काय मस्त मस्त घमघमाट सुटलाय किचन मध्ये! काय ग ठमे काय चाललंय ?" जितेंद्र आत्याने सांगितल्या वेळात खाली डायनिंग टेबल पाशी आला.
" Don't know ए मी बघू ?" नीतू पटकन लक्षात आल्यासारखी खुर्चीतून उठणार तोच तिला हाताने थांबवत तो खुर्ची ओढून बसला.
" बस ट्यूबलाईट! लवकर सुचलं!"
" ए गप हा जित्या... देईन ना एक अशी उजव्या हाताची."
" हा.....जा ग."
" आत्ये बघ ग हा....ए ह्याला कुणी बोलावलं खाली! हावरट कुठला."
" हं.... गप तू. नी काय ग सगळ्यांच्या आधी जागा अडवून बसलीस एरवी वहिनी वहिनी करत असतेस तू! आज कशी आलीस ग!"
" ए असू दे......ते मी जस्ट म्हटलं बघुया आत्या काय बनवते." ती चाचरत म्हणाली.
" हो का मग मी पण त्यासाठी आलोय हा!"
" ए जरा गप बसा की रं. काय चाललय मघापास्नं. कशापाई भांडतायसा?"
आत्या दोघांवरती ओरडत बाहेर आली तसे दोघं शांत बसले.
" आत्या, आज काय एकदम स्पेशल वाटतं!"
त्याने किचनच्या दिशेनं नजर टाकत म्हटलं. आतमधून दोन-तीन नोकर मंडळी हातात जेवणाची भांडी घेऊन बाहेर आली. त्यांनी सगळं जेवण डायनींग टेबलवरती व्यवस्थित मांडलं.
टोपातला शिगोशिग भरलेला वाफाळता पुलाव, कढईतल्या टम्म फुगलेल्या पुर्या, हरभर्याची उसळ आणि वाडग्यातले टक लावून सगळ्यांची प्रतीक्षा करणारे गोड गुलाबजाम पाहून तिचे डोळे चमकले.
" वाव! पुलाव."
" ए भैसाट, मी काय तिला विचारतोय. हीचं काहीतरी भलतचं."
" आत्ये."
" गप र. का पिडतोयास तिला. तुमचं दोनीबी सायेब इतकं खुश हायेत म्हनून समदा थाट ह्यो."
" हं. अच्छा....." खूप काहीतरी कळल्याच्या अविर्भावात त्याच्या तोंडून एक लांबलचक अच्छा आला तसं नीतू हसली.
" तसं बी तुमची वैनी आल्या पास्नं कायतरी चांगलंचुंगलं तुमास्नी खाऊ घालायचं मनात व्हतं बघ."
" अग आत्ये, तु जे बनवतेस ते सगळ खमंग असतच अगदी लाजवाब."
" हो रे अगदी खरं." ती त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली.
" हं खरंय. मी म्हटलं तेव्हा नायतर तुझं लक्ष...."
तो पुन्हा तिला चिडवायला लागला इतक्यात भाऊसाहेब नी अरुंधती समोरुन आले तसा तो गप्प!
" बापरे! नाही ओ फार म्हणता म्हणता किती केलंत हे." अरुंधती कौतुकमिश्रित आश्चर्याने बोलली.
" अास काय न्हाई. तुमी मदत केलीत नंतर सुनबाई बी आलीच व्हती की."
" पण सगळे पदार्थ अगदी चविष्ट झाले असतील." भाऊसाहेब खुर्ची सरकुन बसले. अरुंधतीही बाजूच्या खुर्चीत बसली.
" काय ग तुझा दाद्या कुठं र्हायला?" त्याने पुन्हा नीतूकडे मोर्चा वळवला.
" ते बघा आलेच." ती दोघं पायर्या उतरून खाली आली.
सगळे जमलेत आणि आपण उगीच वरती थांबलो असं वाटलं त्यांना. सगळे आपल्याकडे पाहून मनातल्या मनात हसतायत असंही वाटलं.
" या बसा." भाऊ साहेब म्हणाले तसं दोघांनी खुर्च्या सरकवून बसून घेतलं.
बसल्या बसल्या त्याची नजर डायनिंग टेबल वरती मांडलेल्या जेवणावरुन फिरली.
" काय आहे आज ? आज काय स्पेशल. आत्या तू बनवलस हे सगळं." तो आश्चर्याने म्हणाला.
" हो. आत्या खुशय आज." जितेंद्र हसत म्हणाला.
" चल काय बी काय सांगतोयास. तुमी समदी खूश मग म्या बी खुश."
" हो. ताई माहित आहे मला. पण तू असतेस सगळ पाहायला खंबीर पणे उभी म्हणून चिंता नसते." ते कृतार्थ स्वरात म्हणाले.
" बरं माज कवतिक पुरं. आता जेवा बरं. न या दोघांचं बी कवतिक करा की!" आत्या दोघांकडे पाहत म्हणाली.
" हो. करुयात की! पण आपण कश्याला न वैनींचं कौतुक करायचं. कोणी तरी करेलच की!" ती डोळे मिचकावत म्हणाली.
" नीतूभाई जेव शांतपणे!" तो दटावल्यासारखं करत म्हणाला.
" आत्ये बघ ग...... आणि काय ग सारखं बरं याचं कौतुक. आम्ही पण आहोत हो की नाही जित्या!" ती नाक फुरगटून म्हणाली.
" अगं तसं काही नाही ग." अनघा समजावत म्हणाली. भाऊसाहेब म्हणाले,
" नीतू, मला तुम्ही तिघही जवळची आहात. तू इतकं छान काम करतेस तुमच्या एन.जी.ओ.मार्फत. जितेंद्र कारखान्याचं काम उत्तम सांभाळतात. विक्रम तुमच्या काही गोष्टींमुळे आम्ही नाराज होतो तुमच्या वरती. पण म्हणून तुम्ही परके नाही न होऊ शकतं आमच्यासाठी! आईबापाचं मुलांशी नातं तुटत नाही ओ आणि सगळी मुलं सारखीच कोणी जवळचं कुणी लांबचं अस नसतं."
" हं....." हसत नीतूने समजूतदारपणे मान हलवली.
" बरं नीतूबाई जेवा आता." अरुंधती म्हणाली तसं काहीतरी सुचल्यासारखं करीत ती म्हणाली,
" ए थांबा सुरुवात करूच या पण गुलाबजामने!"
" म्हन्जी ?"
" ए दाद्या भरव तिला! तसही सगळ्यांच्या नजरा चुकवून तुझ्या वाटीतले तिच्या वाटीत टाकणारच न तू!"
" ए काही काय....." तिला गप्प बसवता येईना त्याला!
" अग नको......" ती कसनुसं हसत म्हणाली.
" बरं बाई." त्याने वाटीतला एक गुलाबजाम उचलला आणि तिच्या समोर धरला. ती जराशी लाजत हसली.
"थँक्स." त्याच्या हातून तिने गुलाबजाम खाल्ला तस सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
..............................................
ती दरवाजा उघडून आत मध्ये आली. तो बेड वरती वाचत बसला होता. ती आल्याचं त्याच्या लक्षातही आलं नाही. ती हलक्या पावलांनी त्याच्यासमोर येऊन बसली.
" सर, पुरे झोपा आता !" तिने त्याच्या हातातले पुस्तक आपल्या बोटांच्या चिमटीत पकडला आणि बाजूच्या कॉर्नर पीस वरती ठेवलं.
" काय मग तुमच्या नितुनं सोडलं वाटतं तुम्हाला! का तुम्हीच सुटून आलात तिच्या तावडीतून." तो पाठीला टेकलेली उशी व्यवस्थित ठेवता ठेवता म्हणाला.
" काही काय! तिच्या तावडीतून सुटण्या सारखं का.....ही नाही. तु नी भावोजी उगीच पिडत असता तिला!"
तिने केसांचा क्लिप बाजूला काढत म्हटलं तस चेहऱ्यावरती मोठ्ठ आश्चर्य दाखवत त्याने म्हटलं,
" हो का! कोणी पिडत नाही तिला! राहू दे, तुम्ही काही आमची बाजू घेणार नाही म्हणा!"
" काही काय अरे. पण आज सगळे किती खूश होते न." बोलतानाही तिचा चेहरा आज दिवसभरातलं सगळं आठवून आनंदाने चमकला.
" हो न. चला आता आपलं कॉलेज पुन्हा पहिल्यासारखं होईल. मध्ये जे सगळं झालं त्यामुळे कॉलेजचं सगळं वातावरण बिघडून गेलं होतं."
त्याने डोकं उशीला टेकलं. आजचे भाऊसाहेबांचे उद्घाटनावेळचे शब्द कानात साठवून ठेवले होते त्याने! आज कितीतरी दिवसांनी त्यांच्या डोळ्यात त्याने त्याच्या विषयी विश्वास पाहिला होता. आज शांत झोप येणार!
" काय रे गप्प का झालास अचानक?" ती त्याच्या कुशीत आली तसं तिच्या केसांचा स्पर्श त्याच्या हनुवटीला झाला. त्याच्या चेहर्यावर स्मितहास्य पसरलं.
" काही नाही गं. सगळ्यांनी इतका विश्वास ठेवून पुन्हा नव्यानं सगळं सुरु करायची संधी दिली त्याचं चीज करायला हवं. तुला, तुमच्या सासरेबुवांना, माझ्या सासूबाईंना तुम्हाला कोणाला तक्रारीची संधी नाही द्यायची मला !"
" होईल अरे सगळं ठीक आणि तू सगळ्यांना खुश करशील. काही कुणी तक्रार करत नाही." ती लहान मुलासारखं भाबडेपणाने म्हणाली तसा तो तिच्या पाठीवरती हलकेच थोपटत किंचित हसला.
" विक्रम, तू अजिबात तुझ्या कॅपॅबिलीटीज बद्दल, तुझ्या हुशारी बद्दल शंका नको घेऊस. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होतील बघ!
" हं. तू आहेस ना!" तिच्या पाठीवरच्या मोकळ्या केसात हात फिरवत तो म्हणाला तशी ती त्याच्या कुशीतून थोडी बाजूला झाली आणि त्याच्या नजरेत पाहत बोलू लागली.
" हो अरे मी असेन नेहमी तुझ्या सोबत. You know मला काय वाटतं माहितीय." त्याच्या शर्टवरती आपली बोटं नाचवत ती सहजपणे बोलत होती.
" काय ?"
" हेच की तू मोठा हो. खूप सक्सेसफुल हो. आपलं कॉलेज पण मोठं व्हावं आणि नेहमी मी तुझ्या सोबत असावं. तुझ्या मागे मागे अगदी चोवीस तास तुझ्या सेवेत! सकाळी निघताना तुझ्यासाठी रोज वेगळा नाश्ता बनवावा. तुझ्या हातात कारच्या कीज, मोबाईल, वॉलेट द्यावं ते सिरीयल मध्ये दाखवतात ना तसं! मग तू मला ' बाय ' करणार खरंतर तुला घराबाहेर जावसं वाटणार नाही पण वर्क फर्स्ट! मग मी तुझी वाट बघत बसणार. तुझ्यासोबत डिनर. पुन्हा नवा दिवस, नवी सकाळ.
तो शांतपणे ऐकत होता.
" हं.....पण पण तुमचा जॉब आहे ना मॅडम!"
" हं.....ते तर आहेच. बघू........" ती स्वतःच्याच विचारात असल्यासारखी म्हणाली. उद्या कॉलेज आहे हे लक्षात आलं तसं ती पटकन उत्तरली.
" चला उद्या उठायचेय लवकर. गुड नाईट."
त्याच्या मिठीतून ती बाजूला झाली. तिने उशीला डोकं टेकलं. कुस बदलली. तो पाठमोर्या तिच्याकडे पाहत राहिला. त्याने डोळे मिटण्याचा प्रयत्न केला पण झोप येईना. थोडसं अस्वस्थ झालं त्याचं मन! हातभर अंतरावरती ती झोपली होती. त्याने पुन्हा तिच्याकडे नजर टाकली. आपला हात त्याने तिच्या खांद्यावरती टेकवला.
" अनु......"
" काय ?"
" असच......."
त्याने असच म्हटल्यावर तिने चेहरा त्याच्याकडे फिरवला.
" काय ओ सर झोप येत नाही का ?"
" असं नाही काही." त्याच्या उत्तरावर ती फसकन हसली.
" मला एक सांगायचं होतं." तो धीरगंभीरपणे म्हणाला.
" आत्ता! उद्या सांग. झोप शांतपणे."
" नाही.... विसरलो मग!" यावरती ती अजून मोठ्याने हसली आणि त्याच्या जवळ सरकली.
" असा कसा विसरशील? इतका जीनियस मेंदू."
" मस्करी पुरे." तो थोडासा रागवला.
" बरं बोल." त्याच्या केसातून हात फिरवत ती बोलत होती.
" तू मघाशी जे बोललीस ते......."
" काय?"
" तेच तुला काय करावं वाटतं दिवसभर ते!"
" हा.......ते होय! त्याचं काय?" तिने सहज विचारलं.
" तसं काही होणार नाही! आत्ताही नाही. पुढेही नाही."
तो जरा ताठ सुरात बोलायला लागला. तिने कान टवकारले.
" हे बघू अनु. हे अस घरी बसून माझी सेवा करत राहिलेलं मला नाही चालणार. You've your dreams and you've to work for it. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणून मोठं होण्यासाठी तू माझ्या मागे सावली सारखी राहायला नको मला! त्यापेक्षा तू माझ्या सोबत राहा. माझ्यासोबत माझ्यासारखी खूप मोठी झालीस तर मला आवडेल. मला पण तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला, तुझं कौतुक पाहायला आवडेल. मला सांगायला आवडेल ' ' 'I'm her husband.'
" हं.......पण...." ती खाली मानेनं बोलली.
" पण काय ?"
" मी मोठं होण्याच्या नादात तुझ्याकडे दुर्लक्ष झालं मग. तुला पुन्हा एकटं नाही पाडायचं मला!"
" अग वेडीयस का? असं का होईल. मी तुला विसरू नाही देणार! तुझं दुर्लक्ष झालं तरी माझं लक्ष असणार तुझ्याकडे."
तिच्या कानापाशी आलेल्या केसांच्या बटा कानामागे सारत तो म्हणाला.
" हं. ओके." तिने शाळेतल्या मुलासारखी मान हलवली.
" ओके मग पुन्हा असले विचार नको. जॉब नाही सोडायचा तू आणि माझ्या मागे मागे नाही माझ्या सोबत राहायचं नेहमी!"
" हं..... कळलं कळलं. लेक्चर पुरे झोपा आता. गुड नाईट."
" गुड नाईट. स्वीट ड्रिम्स. झोप लवकर तूही." तिला गूडनाईट म्हणून त्याने आता शांत मनाने डोळे मिटून घेते. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याचं बोलण आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
" गुड नाईट." त्याच्या कपाळावर तिने ओठ टेकवले.
क्रमशः
136 गुरुवार रात्री
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा