Login

बंधन भाग 137

Social, Love

137
( गेल्या भागात तिच्या आग्रहाखातर शनिवार, रविवारच्या सुटीसाठी ते फार्महाऊसला जायचं ठरवतात. निघताना ती माधवकाकांसाठी भेटवस्तू घेते. त्याच्या आवडीचे झुमकेसुद्धा खरेदी करते. पाहू पुढे)

                    दोघं गाडीतून उतरले. उतरल्या उतरल्या तिने सबंध परिसरावरून एक नजर फिरवली. ती शेवटची इथं येऊन गेली होती तो दिवस तिला आठवला. त्या दिवशी किती काही डोक्यात घेऊन अस्वस्थ मनाने आपण इथे आलो होतो. काकांनी समजावलं तेव्हा कुठे मन जरा शांत झालं. तो हॉस्पिटलला असताना त्याला भेटण्याची, एकदा तरी पाहण्याची इच्छा असणारी ती. तिला तेव्हा वाटलंही नव्हतं पुन्हा कधी आपण एकत्र असु. तिने त्याच्याकडे पाहिलं.

" किती दिवसांनी आलो नाही आपण इकडे!"

" हं......अॅक्च्युअली पुन्हा कधी तू माझ्या सोबत असशील असं वाटलंही नव्हतं."  तो उसासे टाकत म्हणाला तसं तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

" काही काय.... कुठे जाणार तुला सोडून मी."

इतक्यात कोल्हापुरी चपलांचा आवाज कानावर पडला तशी त्यांनी नजर वळवली. समोरून  माधवकाका हसत पुढे आले.  त्यांच्या कपाळावरल्या हसर्‍या सुरकुत्या आणि प्रेमळ नजर पाहून त्यांना बरं वाटलं.

" या...... बरं झालं लवकर निघाला घरुन नायतर पोचेस्तोवर उन्हं डोक्यावर आली आसती."

" हो, यांच्यामुळे लवकर निघावं लागलं!"  त्याने तिच्याकडे पाहत म्हटलं तस तिने डोळे वटारले.

" बरं......या."    काका पुढे जायला वळले.

" काका थांबा न." ती म्हणाली तसं त्यांना काही कळण्याआधी दोघांनी वाकून नमस्कार केला.

" आरं असु द्या. सुखी र्‍हावा."

" हे तुमच्यासाठी आमच्याकडून!"  तिने हातातली पिशवी त्यांच्यासमोर धरली.

" कशासाठी येवढं."

" घ्या नाहीतर आम्ही रागावून जाऊ माघारी." ती पून्हा म्हणाली.

तिच्या आग्रहापोटी त्यांनी पिशवी हातात घेतली आणि उघडून पाहिलं. त्यांच्यासाठी आणलेली शाल पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

" सुंदरय. तुमच्या दोघांवानी! चला माझ कवतिक पुरं....या आत." 

दोघांनीही ' हो ' म्हटलं आणि काकांच्या मागून ते चालू लागले.
.............................................................


" काय करताय ? अरेवा! आज स्पेशल बेत वाटतं!"  ती किचनमध्ये डोकावत म्हणाली.

" या सुनबाई."  आवाजासरशी हसून मागे वळून त्यांनी पाहिलं.  ती ओट्यावरल्या भांड्यांचं निरीक्षण करतच आतमध्ये आली.

" काका अहो काय हे सगळं!"  मोठ्या परातीत ते पीठ मळत होते. बाजूच्या काचेच्या बाऊलमध्ये कांदा, हिरव्या मिरच्या चिरून ठेवलेल्या होत्या. त्या बाजूलाच लंबगोलाकृती डबाही होता.

" हा डबा कसला ?"  तिनं आश्चर्याने विचारलं.

" बेसनाचं पीठ ग."  परातीतला पिठाचा गोळा घट्ट मळून झाला होता. 

" म्हणजे! काय बनवताय?" तिनं प्रफुल्लित चेहर्‍यानं म्हटलं.

" ओळखा पाहू."

" झुणका...... मग झुणका भाकरी."  ती अंदाजाने म्हणाली.

" एकदम बराबर!"  ते हसले तसं तिने पटकन डबा उघडला.

" मग भाकऱ्या तुम्ही......"  तिच्या चेहऱ्यावरती मोठसं प्रश्नचिन्ह!

" मग मला जमत्यात बरं!"   त्यांनी गॅस शेगडी पेटवण्यासाठी  तिच्या हातात  लायटर दिला.

" खरच!  पण हे सगळं ज्याच्यासाठी बनवताय त्यांना आवडतं का! "   ती गॅस पेटवत हसून म्हणाली.

" हो.....आगदी अधाश्यासारखा खाईल. त्येचा आवडीचा बेत."

" अच्छा! मला नव्हतं माहित. आत्या बोल्ल्याच नाहीत कधी."  ती स्वतःशीच पुटपुटली.

" आगं अासु दे. कधी बोलायची येळ नसल आली. बरं आता हे एक काम फत्ते झालं!"   ते परातीतल्या पिठाकडे तिचं लक्ष वेधत बोलले.

" चला सुनबाई तुम्ही बोलत बसा भायेर. जेवनाचं बघतोया मी..."     त्यांनी तवा गॅस वरती ठेवला.

" आ.......नाही नाही. मी आता इथंच थांबणार. मला पण शिकवा आता भाकरी थापायला."

" आर देवा! र्‍हाऊ दे. तु जा बरं निवान्त बसा भायेर."

" नाही. मी थांबणार! थट्टा करता माझी. मला नाही जमत असं वाटतं का! जमेल मला. आज माझ्या हातचं खाऊन पहा."

" अग पन तुमच्या चपात्या लाटायच्या असत्यात. आमी हातान भाकर्‍या....." 

 काका तिला समजावत म्हणाले तस तिने पदर खोचला. 


" माहितीये मला. फक्त जमत नाही इतकच. असुद्या. आज जमवेन."    तिने पाठीवरचे मोकळे केस पटकन वरती टांगून घेतले.

" बर. हट्टी हायेस अगदी."

 काकांनी मळलेल्या पिठाचा मोठा गोळा हातात घेतला. ती अगदी डोळे लावून त्यांच्या हातांकडे पाहत होती. आजचा सगळा स्वयंपाक आपणच बनवायचा या निर्धाराने.
................ ...................... ................

           
              तिने किचन मधून दोन प्लेट्स आणून डायनिंग टेबल वरती ठेवल्या. आज कितीतरी महिन्यानंतर आपण दोघंच लन्च घेणार! बाकी कोणी नाही आजूबाजूला सारखं चिडवणारं, आपल्या दोघांकडे पाहून खाणाखुणा करणारं, गालात हसणारं असा विचार मनात आला तस घरच्या सगळ्यांची आठवण आली तिला! नीतू, जितेंद्र, आत्या, मम्ना सगळे. सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवण्यातही किती गम्मत असते नाही! दुसरं मन लगेच म्हणालं. कपाळावरचा घाम हाताने पुसला. हातांची थोडी जळजळ होत होती. माधव काकांच्या स्पेशल मेजवानीच्या बेतपायी तासाभराचा वेळ स्वयंपाकात गेलेला. काकांनी ठरवलेला जेवणाचा बेत आणि किचन तिनं कधी ताब्यात घेतलं ते त्यांनाही कळलं नाही. मी करते सगळं म्हणून काकांना तिने थोड्या वेळाने किचनमधून पळवूनच लावलं. तिने एक दीर्घ श्वास घेत अभिमानाने वाटीतल्या झणझणीत झुणक्याकडे आणि बऱ्यापैकी गोलाकार भाजलेला भाकऱ्यांवरुन नजर फिरवली.

" हं......जमल्यात बऱ्यापैकी." 

 ती स्वतःची पाठ थोपटल्याच्या आविर्भावात म्हणाली. मघापासून बराच वेळ किचनमध्ये थांबल्याने अंगाची लाही लाही झाल्या सारख वाटत होतं तिला. जाऊन फ्रेश होऊन यावंसही वाटत होतं. पण तिला त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहायचा होता. आपण चक्क झुणका-भाकरी बनवली याचा किती आनंद होईल त्याला! आपली थट्टा नाही करणार तो याची तिला खात्री होती. त्याच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य पाहण्यासाठी ती उतावीळ होती.

" सर लवकर या. लन्च नको का!"   ती त्याला हाका मारीत पुन्हा किचन मध्ये गेली.

" हो.... आलो Wait...."   तो पायऱ्या उतरत खाली आला. डायनिंग टेबल कडे पाहताच त्याचा चेहरा आनंदला.

" वाव! काका ग्रेट."    त्याने उत्साहाने खुर्ची सरकवली.

" विक्रम लवकर पहिला घास खा....." 

 तिने हातातली पाण्याची बॉटल टेबलवर ठेवली तस तिच्या उजव्या हाताकडे त्याचं लक्ष गेलं. तो क्षणभर थबकला.  त्याने पटकन नजर वरती वळवली. तिचा  घामेजलेला चेहरा, मानेवरती टांगलेले विस्कटलेले केस, चेहऱ्याला लागलेल्या ओल्या पिठाचे ठिपके, कमरेला खोचलेला साडीचा पदर. त्याने नखशिखांन्त न्याहाळलं तिला.

" हॅलो.... काय अरे असा पहा.." ती त्याच्या नजरेसमोर हात हलवत म्हणाली.

" काय चाललंय हे?"

" काय! कुठे काय! तुझ्यासोबत चाललय तेच बाकी कोणासोबत नाहीये माझं काही हा...." ती थट्टेच्या सुरात म्हणाली  तसा तो ताडकन उठला.

" शट अप.... मी काय विचारतोय आणि तू थट्टा.... इट्स ओके. एकदा सांगून, समजावून तुला समजत नाहीच. नाही का! मूर्खपणा सगळा. काय आहे हे... कानात शिरत नाही तुझ्या का डोक्यात घुसत नाही."

 त्याचा रुद्रावतार बघून तिच्या हाता पायातलं त्राणच निघून गेलं.

" विक्रम....."

" काही बोलू नकोस तू."

तो निर्वाणीच्या सुरात म्हणाला तसे तिचे डोळे भरून आले. ती तशीच किचनमध्ये निघून गेली.
.........................................


                तो रागाच्या भरात खुर्ची सरकवून बसला. ताटात वाढलेल्या भाकरीचा तुकडा मोडला.

" बस झालं आता.... मी जेवण टाकून येणार नाहीये. पुष्कळ रडून घे काय ते!"  त्याने तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हटलं.

            ती ओट्यासमोर उभी होती. गेल्या एक दोन तासांपासून किती काय कल्पना रंगवत रंगवत तिने सगळा स्वयंपाक केला होता अगदी तनमन हरपून! तिने ओट्याकडे पाहिलं.  ओटा अजून तसाच होता. भांड्यांची आवराआवर करायची होती. गॅसवरचा गरम तवा तिने मघाशी बाजूच्या कोपऱ्यात ठेवला होता. कढईतला पिवळाधम्मक झुणका वाट पाहत होता कोणीतरी त्याला ' टेस्टी, लाजवाब ' म्हणण्याची! त्यामागच्या बनवणाऱ्या हातांचं कौतुक करण्याची. बुट्टीतल्या नरम, उबदार भाकर्‍यांकडे पाहताना तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पाहता पाहता गालांवरून अश्रू ओघळू लागले.
...........................................

त्याने मोडलेला भाकरीचा तुकडा वाटीतल्या झुणक्यात बुडवला आणि पहिला घास खाणार तोच किचनच्या दिशेने त्याने मान वळवली. तोंडाजवळ नेलेला घास हातातच राहिला. दोन क्षण असेच गेले. त्याने हातातला भाकरीचा तुकडा ताटात टाकला आणि तो खुर्चीतून उठला. कॉर्नरपिसच्या ड्रॉवरमधून कैलास जीवन ची क्रीम बाहेर काढली.
................................................

               तिने गालांवरुन ओघळणारे अश्रू पुसले. ती तशीच स्तब्ध उभी होती. सकाळपासूनचं तिच्यावरती दुसऱ्यांदा ओरडणं त्याचं! तिला सकाळचा घरून निघण्याआधीचा प्रसंग आठवला तस अजूनच रडू फुटलं. क्षणभरासाठी वाटलं, आपण घरी नव्हतो तेव्हा काय काय केलं याने! आपल्यासाठी जीव कासावीस व्हायचा. आधी आपण धड दोन शब्द सुद्धा बोलायचो नाही  तेव्हा तर किती छोट्या छोट्या गोष्टी करायचा आपल्याला खूष करण्यासाठी. पण आता.....आता आपण आहोत तर कदर नाही आपली! काही कोणी वेगळं नाही....सगळे पुरुष असेच! ' ती गॅसशेगडीकडे पाहत एकटक उभी होती.

इतक्यात मागून खांद्यावरती हात ठेवल्याची चाहूल लागली. तिने तिरप्या नजरेने मागे पाहिलं.

" का आलायस तू? प्लीज....."  ती मागे वळली देखील नाही.

त्याने तिच्या दोन्ही खांद्यांवरती आपले हात ठेवून तिला मागे वळायला लावलं.

"  What !"  ती चिडक्या सुरात म्हणाली.

 त्याने तिच्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डाव्या हातावरती घेतला.  भाजलेल्या हातावरती हळूच फुंकर मारली.


" बघेन मी काय ते....." ती घुश्श्यातच बोलली. त्याने काहीही न बोलता हातातलं कैलासजीवन दोन बोटांवरती घेतलं आणि हळुवारपणे तिच्या भाजलेल्या हातावरती लावलं. पिवळसर लोण्यासारख्या थंडगार स्पर्शाने तिला शांत वाटलं. हाताची जळजळ थोडी कमी झाली. त्याने आता तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं.

" अनु काय.... काय हे. काळजी घ्यावी जेवण बनवताना ग. एवढा स्वयंपाकाचा घाट कश्यासाठी!"  त्याने मृदु शब्दात हळुवारपणे विचारलं.

"  ते मी..... काकांनी ठरवला मेन्यु. मी फक्त...."  ती खाली मानेनं म्हणाली.

" हो. पण सगळं स्वतःवरती घेऊन का बनवायचं असं काही. मी हेल्प करते त्यांना एवढं सांगून इकडे आलीस तू आणि हे सगळं...... सवय नसते आपल्याला तेव्हा मदत घ्यावी. उगीच स्वतः सगळं करुन ' सुगरण ' म्हणून कौतुक करून घेण्याचा अट्टाहास का!"

" अट्टाहास नाही..... ते तुझी फेवरेट डिश म्हणून."

" काय ग. हे असं स्वतःच्या जीवाला ताप देऊन दहा डिश बनवल्यास तरी माझ्या घशाखाली जाईल का ते जेवण! "

" अरे पण मी फर्स्ट टाइम.. मी असं भाकऱ्या वगेरे म्हणून झालं ते!"   ती स्पष्टीकरण द्यावं तस म्हणाली.

" तेच फर्स्ट टाइम बनवलस ना मग सगळ अगदी परफेक्ट कसं जमेल. थोडस ठिकय. हे सगळं करण्याची काही गरज नव्हती. काकांना सवय आहे ग."

" मग मला होईल सवय. सवय व्हायला सुरुवात तर करायला हवी ना!"

" धन्य..... मला नाही माहित. पण साग्रसंगीत स्वयंपाक करून वाढला म्हणजे समोरचा माणूस खुश नाहीतर नाही असं नाही ग. साधी भाजी चपाती तुझ्या हातांनी बनवली असती तरी चाललं असतं."

" सॉरी....."    ती म्हणाली तसं त्याने अलगदपणे तिचे डोळे पुसले. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं. त्याने आपल्या हाताने तिच्या पाठीवरून हळुवारपणे थोपटत म्हटलं,

" तुला माहितीय, सकाळी बागेतलं गुलाब भेटलेलं मला! गोड दिसत होतं. पण दुपारपर्यंत कोमेजून गेलं ते! माहित आहे का ?" 

" हं.........."    ती त्याच्या मिठीतच गोड हसली.


क्रमशः

138 गुरुवार

🎭 Series Post

View all