138
( गेल्या भागात दोघांनी माधवकाकांना आणलेली भेट दिली. तिने हौसेनं त्याच्यासाठी झुणका भाकरीचा बेत केला.पण स्वयंपाक करताना तिच्या हाताला जखम झाली आणि तिला त्याचं ओरडणं ऐकाव लागलं. पाहुया पुढे)
दुपारी तिला त्याचं ओरडणं ऐकावं लागलं तरी दुपारचं जेवण मात्र तिच्या मनाजोग झालं. तिला समजावून तिचा रुसवा त्याने पळवून लावला आणि त्याच्या हाताने तिला भरवलंसुद्धा! सगळं तिने कल्पना रंगवल्या प्रमाणे झालं तशी ती खूश झाली. मग दुपारनंतरचा वेळ फार्महाऊस पाहण्यात गेला. बऱ्याच महिन्यानंतर ते तिकडे फिरकले होते मग नोकर माणसांशी बोलण्यात वेळ गेला.आजूबाजुच्या परिसरात चाललेली छोटी-मोठी कामे पाहून घेतली. फार्महाऊस तस जुनचं होतं. मुलं लहान असताना भाऊसाहेबांनी हौसेने बांधून घेतलेलं त्यामुळे अधुन मधुन छोटी-मोठी दुरुस्तीचे काम निघायची. सगळी देखरेख ठेवायला माधव काका असायचे त्यामुळे घरातील माणूस तिथं असल्यासारखं त्यांना वाटायचं. दुपारनंतरचा वेळ सगळ्यांसोबत मजेत गेला. आत्याचा फोन सुद्धा येऊन गेला. सगळे जेवलात का वगैरे जुजबी चौकशी आत्याने केली. संध्याकाळी मात्र दोघांचा 'कॉफी प्लॅन ' काही जमून आला नाही. थंडीचे दिवस आता सुरु झाले होते. दिवाळी अगदी येऊन ठेपलेली. संध्याकाळच्या गारव्यात आल्याचा गरमागरम चहाच बरा म्हणून काकांनी आग्रहाने दोघांसाठी चहा बनवला. दोघांना एकत्र हसत खेळत पाहून त्यांना इतकं बरं वाटलं होतं. त्यांना तर लग्नाच्या दिवसाची आज आठवण येत होती. वधु वराच्या वेषात सजलेले दोघं! काकांनी भरभरून दोघांचं कौतुक केलं तसं तिची अवस्था मात्र लाजून अगदी अवघडल्यासारखी झाली.
....................................................
रात्रीचे जेवण मात्र काकांनीच बनवलं. सुनबाईंनी दुपारी केलेला पराक्रम त्यांना समजला तेव्हा त्यांनीही तिला जरा धारेवर धरलं. मग तिने इकडची तिकडची मदत त्यांना केली. रात्रीचा स्वयंपाक त्यांनीच बनवला. दिवसभराचा वेळ शांत, निवांत घालवणं त्याच्यासाठी ' टाइमपास ' करणं होतंच. जेवणाआधीचा वेळ तो लॅपटॉप वरती काही ना काही वाचत बसला होता. त्याला 'बिझी ' पाहून मग ती हॉलमध्ये बसली. किचनमध्ये काका स्वयंपाक बनवत होते. आणि ती बसल्याबसल्या त्यांच्याशी गप्पा मारत होती. गप्पा मारता मारता तिचं ' काम ' सुरु होतं. एकदाचं रात्रीच जेवण आटोपलं. रात्री काहीतरी सरप्राईज प्लॅन असेल त्याचा असं तिला वाटत होतं पण तसं काही झालं नाही. रात्री जेवणानंतर दोघं बाहेर लॉन वरती बसले तेव्हा मात्र तिने आडून आडून विचारलच!
" थंडी चांगलीच पडणार आता." तो आकाशाकडे पाहत खाली बसला.
" हो ना. ए आपण जायचं ना ' शांत रात्र ' पाहायला!" तिने त्याच्या खांद्यावरती डोकं टेकून आकाशाकडे पाहत म्हटलं.
" हो.....जाऊया ना." त्याने आपला उजवा हात तिच्या खांद्याभोवती लपेटून घेतला. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
" इतकं काय टक लावून पाहतोयस आभाळाकडे?"
" असच ग....... चांदण्या." त्याने सहज सुरात म्हटलं.
" हं........ मी जाऊ त्यांच्यात?" तिने निरागसपणे आभाळाकडे पाहत म्हटलं तसा तो दचकला.
" ए..... असं नाही बोलायचं ग." तिच्या खांद्याभोवतीचा आपला हात त्याने अजूनच घट्ट केल्याचं तिला जाणवलं.
" मग तुझं लक्षच नसतं माझ्याकडे!" ती नाक फुरगटून म्हणाली.
" अरे! कोण म्हणतं असं!"
" असच..... मी म्हणते म्हणून!" लॉनवरच्या गवतात ती बोटं फिरवत बोलत होती.
" हं......" त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.
" अरेवा! मेंदी! कधी काढलीस? छानय." तिच्या हाताच्या तळव्यांवरून अलगद हात फिरवला त्याने.
तिने स्वतःच्या हाताने काढलेली! फार काही देखणी डिजाईन जमली नव्हती. पण तिच्या हातावरती उठून दिसत होती अगदी. त्यात छोटूसा 'v ' सुद्धा होता. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित पसरलं. क्षणभर लग्नाचा दिवस डोळ्यांसमोर उभा राहिला. हिरवा शालू नेसलेली, दागिन्यांनी सजलेली ती, कपाळावरल्या मोत्याच्या नाजूक मुंडावळ्या, काजळी डोळे, फिकट गुलाबी पापण्या. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ अगदी अविस्मरणीय. बेड वरती पसरलेल्या पाकळ्या आणि शांतपणे झोपलेली ती. त्या दिवशी सुद्धा तो असाच पाहत राहिलेला. ती शांत झोपली होती पण हातावरली मेंदी त्याच्या नजरेतुन सुटली नव्हती.
" काय...... असा काय पहातोयस?" तिनं नजर किंचित दुसरीकडे वळवली.
" अनु " त्याने तिचा चेहरा आपल्या कडे वळवला.
व्हाइट रंगाचा चुडीदार ड्रेस, दोन्ही खांद्यांवरती पुढे झुकलेले केस, भांगेतलं छोटूसं कुंकू, त्याच्या आवडत्या डिजाईनचं मंगळसूत्र, त्याच्या हातामुळे किंचित उजव्या खांद्यावरून सरकलेली ड्रेसची ओढणी, मेंदींच्या ओल्या हाताचे पांढर्या ओढणी वरती पडलेले ठिपके. त्याच्या डोळ्यातली अधिरता तिने वाचली.
" आपण.......आपण......निघूयात का!" ती थोडीशी त्याच्यापासून बाजूला सरकली.
" आ......हा....... ओके." तो कसंनुसं हसत उठला. तिला उठवण्यासाठी म्हणून त्याने हात पुढे केला. तिची नजर खाली झुकली होती. त्याच्या हातात हात देत ती वरती उठली. खांद्यावरचा सरकलेला दुपट्टा तिने हाताने ठीक केला आणि चालू लागली. आता दोघांमध्ये हातभराचं अंतर होतं!
" अनु........" त्याने म्हटलं तसं तिने त्याच्या कडे नजर वळवली. ती वाट पाहत होती तो काहीतरी बोलेल! मग प्रश्न होता त्याला उत्तर कसं द्यायचं हा! ती शांतच होती.
" मी......मी काही म्हटलं तर ऐकणार का?" ती त्यावर क्षणभर थबकली. क्षणभरच फक्त....... आणि चालत पुढे निघून गेली काहीही न सांगता, न बोलता! तो पाठमोर्या तिच्याकडे पाहातच राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.
" अनु मला माफ कधी करणार ग तू ?"
................................................
ती खिडकी समोर उभी होती आभाळातल्या चांदण्या न्याहाळत! तो एकटाच बाहेर बसून राहिला की त्याला उत्तर मिळालं असं वाटून आलाच नाही! तिच्या मनात शंका आली. मनातले सगळे सगळे विचार निकराने बाजूला सारले. वर्तमानाचे, भविष्याचे आणि अधूनमधून डोकावणार्या भूतकाळाचे सुद्धा! फक्त आभाळातल्या चांदण्यांवरती नजर खिळली होती तिची.
तो मागे उभा राहिला. तो आल्याची चाहूल लागली तसं ती मागे वळली. त्याने आपल्या हाताची मूठ तिच्या समोर उघडली. त्या सोन्याच्या साखळ्या! ते अँकलेट्स पाहून तिचं मन सुखावलं.
" It's ok as you wish. अनु, माझ्या मताप्रमाणे आपलं नातं पुढे जायला हवं असा अट्टाहास नाही ग माझा. तू महत्त्वाची आहेस माझ्यासाठी. आणि तू माझ्या सोबत आहेस बस...."
चेहऱ्यावरती हसू आणत त्याने म्हटलं आणि खाली गुडघे टेकले साखळ्या तिच्या पायात बांधण्यासाठी! त्याने अलगदपणे त्या नाजुकश्या साखळ्या तिच्या पायात बांधल्या.
" हं.......डन! छान आहेत न." तो उठुन समोर उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तिने पाहिलं तस तिचं मन गलबलून गेलं.
" विक्रम....." त्याला काही कळण्याआधीच तिने त्याला मिठी मारली.
" अनु काय ग अस मुसू मुसू रडताना फनी वाटतेस तू !" तिच्याभोवती आपले दोन्ही हात गुंफत त्याने म्हटलं.
" मग किती वेळ वाट पाहायची तुझी!"
" अरे मी जस्ट बाहेर..... बरं वाटतं कधी कधी एकटं बसलं की!" तिच्या पाठीवर थोपटत त्याने म्हटलं.
" हं........ माझं उत्तर कधी ऐकणार मग?"
" अनु अग....."
" विक्रम तूच म्हणतोस न सगळ्या गोष्टी शब्दात नाही सांगता येत आणि तुला सोडून नाही रे जाऊ शकत मी.... आणि आणि माझ्या पासुन तुला दूरसुद्धा नाही पाहू शकतं."
तिच्या शब्दांनी त्याला आभाळाला हात टेकल्याचा आनंद झाला.
ती लाजून त्याच्या मिठीत शिरली.
" अनु......किती लाजतेस...." तो हसला.
त्याने दोन्ही हात तिच्या चेहर्याभोवती टेकवले. तिची लाजरी नजर फरशीवरती खिळली होती. त्याने आपले ओठ अलगद तिच्या कपाळावरती टेकवले. तिच्या लाजर्या डोळ्यांत, तिखट नजरेत आणि गोड स्पर्शात तो हरवून गेला...........
...............................................................
तिने कूस बदलली. कानांना थंडी बोजली तसं डोळे न उघडताच तिने झोपेतच ब्लँकेट कानापाशी ओढून घेतलं. तिच्या केसातून हळुवार हात फिरवल्यासारखं वाटलं तिला! तिने डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप केली. कॉर्नरपिसवरच्या टेबलक्लॉककडे तिचं लक्ष गेलं. सकाळचे सव्वा आठ वाजलेले! घड्याळ पाहताच तिने डोळे खाडकन उघडले. ती उठून बसणार इतक्यात हाताला चेनचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं तिला! तिने हाताची मुठ उघडली तर त्याचं लॉकेट! हसून तिने हाताची मुठ बंद केली. कॉर्नर पीस वरचा मोबाईल घेण्यासाठी तिनं किंचित हात पुढे केला तोच आकाशी रंगाचा चुडीदार ड्रेस, गुलाबी रंगाचा बाथरोब व्यवस्थित घडी करून ठेवला होता. तिने ड्रेस हातात घेतला त्यावर छोटुसं कार्ड ठेवलेलं होतं. ' Good Morning Sweetheart ' आणि सोबत छोटुसं स्माईली.
तिने मोबाईल स्वीचअॉन केला. वॉलपेपरला त्याचा फॉर्मल ड्रेसमधला फोटो! हल्लीच कॉलेजला तो निघताना हौसेने त्याला कारसमोर हात टेकून उभं राहायला लावून तिनं काढलेला!
रात्रीचा तो लॉनवरचा प्रसंग तिला आठवला. ती न बोलता आत निघून आली तरी तो एकटा बाहेर थांबलेला.
" विक्रम वेडायस तू खूप! " वॉलपेपर पाहताना तिच्या चेहर्यावर हास्याचं चांदणं पसरलं.
' अनु तू काही मला खूप आवडतेस अस नाही बोलणार हा..... But Do you know मला तुझ्याशिवाय कुणीच आवडत नाही.... पण तू रडलेलं नाही आवडत मला... माझ्या वरती ओरडलेलं आवडतं.' त्याचं बोलणं आठवून तिने हसत मोबाईल बाजूला ठेवून दिला.
............................................
तिने नेहमीप्रमाणे भांगेत कुंकू भरलं. आकाशी रंगाचा कॉटनचा पंजाबी ड्रेस, गळ्यात ते मंगळसूत्र, कानातले झुमके, चेहऱ्याला हलकासा मेकअप, पाठीवरल्या मोकळ्या केसांना तिने बटरफ्लाय क्लीप लावला आणि एकवार आरशात स्वतःला न्याहाळलं. अचानक तो मागे येऊन उभा राहिल आणि आपल्याला त्याचं आरशातील प्रतिबिंब दिसेल अस क्षणभर मनात येऊन गेलं. तिने मागे वळून पाहिलं. तिचं सहज लक्ष तिच्या हातावरच्या मेंदी कडे गेलं. मेंदी काढल्या काढल्या रियाला हौसेने तिने मेंदीच्या हाताचा फोटो पाठवला त्यावर तिने ' काय ग ताई मेंदी पण नाही जमत तुला! कसे खूश होणार जिजू!' आणि सोबत खिदळणारे स्माईली पाठवले. ती रागवली रियावरती मनातून पण त्याला मात्र किती कौतुक त्या मेंदीचं! काल आपण अक्षरशः हळद ओतल्यासारखी वाटत होती झुणक्यात तरी तो आवडीने दुपारी जेवला. तिला पहिल्यांदा ते फार्महाऊसला आले होते तो दिवस आठवला. त्या दिवशी सुद्धा तिने कांदे पोहे बनवलेले ते थोडे खारट पोहे सुद्धा त्याने आवडीने खाल्ले होते. ती तिथून दोन पावलं पुढे आली. नवीन ड्रेस तिला खूप आवडला होता. तिने एकदा कधीतरी त्याला शॉपिंग करताना सांगितलेलं, तिला वेस्टर्न कपडे फारसे आवडत नाही. त्यानंतर मात्र तिने वनपिस वापरावा असा हट्ट त्याने कधीच केला नाही. त्याने आजवर तिला दिलेल्या भेटवस्तू तिला आठवू लागल्या अगदी त्या दुपट्ट्या पासुन ते आजच्या ड्रेस पर्यंत! सगळ्या वस्तू तिला जीवापाड जपाव्या वाटायच्या. काल दुपारी सहज तिने त्याचा मोबाईल हातात घेतलेला. गॅलरी ओपन करताच तिला तिचे कितीतरी फोटोज दिसले. तिचे, त्या दोघांचे. त्याचं घर सोडून आई बाबांच्या घरी आल्यानंतर रागाच्या भरात तिने सगळ्या आठवणी मोबाईल मधून डिलीट करून टाकल्या. त्याने मात्र सगळ्या आठवणी जपून ठेवलेल्या. काल रात्री चांदण्या पाहताना किती सहज बोलून गेलो आपण ' मी जाऊ का त्यांच्यात....' त्यावर किंचित दचकलेला तो आणि आपल्या खांद्याभोवतीचा किंचीत थरथरलेला त्याचा हात..... आपण नसलो तर ही कल्पनाच त्याच्यासाठी किती भयंकर आहे ते पुन्हा एकदा तिला जाणवलं होतं.
..............................................
ती त्याच्याच विचारांमध्ये बुडाली होती. इतक्यात दरवाज्यावरती टकटक झाली. तिने उत्साही चेहऱ्याने पटकन दरवाजा उघडला.
" या सर." तिची नजर किंचित खाली झुकली. तिने पटकन त्याच्याकडे पाहून घेतलं. ती मनातून खुश झाली. त्याच्या हातातल्या ट्रे मध्ये कॉफीमग आणि सोबत गुलाबाची लाल फुलं होती! तिने पटकन हात पुढे करून कॉपीमग उचलला. तरी तो तसाच गप्प उभा होता. ती थोडीशी हसली नी बेडवरती जाऊन बसली. कॉफीचा पहिला घोट घेताच तिने हातातल्या मग कडे पाहत म्हटलं,
" अरेवा! आमच्या सरांच्या हातची कॉफी! छानय. as usual."
ती बेडवरती बसली होती. पायावर पाय ठेवून अगदी राणीसारखी! समोर तो उभा होता हातात ट्रे घेऊन! तिने दुसऱ्या हाताची मुठ उघडली.
" विक्रम लॉकेट कुठेय? हरवलं वाटतं!" तिच्या प्रश्नासरशी त्याने स्वतःच्या गळ्या कडे पाहिलं.
" असू दे..... आता पुन्हा माझ्याकडे आलं हे! आता माझ्याकडेच ठेवणार मी!" ती त्याची थट्टा करीत म्हणाली.
" सर होतात कुठे तुम्ही मघापासून? इतका वेळ कॉफी बनवत होतात की काय!" ती स्वतःच्या बोलण्यावरती स्वतःच हसली.
" अा...... नाही. ते लवकर जाग आली सकाळी!"
त्याने तिच्या नजरेला नजर देणं टाळलं. हातातला ट्रे कॉर्नर पीस वरती ठेवला.
" जाग! जाग यायला झोप यावी लागते. सरांना झोपच येत नव्हती ना!" ती हसून त्याची मस्करी करत होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
' तुम जैसे व्हाईट कॉलर वाले.... तुम लोगों को लगता है पैसो से तुम लोग कुछ भी खरीद सकते हो! तुम सिर्फ जिस्म खरीद सकते हो। प्यार नहीं। खुशिया नही।'
नताशाचे कधीतरी बोललेले ते शब्द त्याला पुन्हा आठवले. स्वतःच्या सुखाच्या हव्यासापायी एखादीचं शरीर खरेदी करणं किंवा मग स्वतःच्या अहंकाराला सुखावण्यासाठी, आपलं कुठेतरी असलेलं वर्चस्व दाखवून एखादीला क्षुल्लक भासवण्यासाठी तिचं शरीर ओरबाडणं. काय मिळवतो आपण पुरुष इतकं क्रूर वागून! काय सिद्ध करायचं असतं आपल्याला! बाई कितीही आपल्याशी बरोबरी करत असली तरी ती कशी दुर्बल आहे हेच ना..... कारण तिचं शरीर आणि त्याच्यासोबत जोडलेलं तिचं चारित्र्य, तिचं सर्वस्व.....त्याचा हत्यार म्हणून वापर करतो आपण तिच्या विरूद्ध उभं राहण्यासाठी पण आपल्या हे लक्षातच येत नाही, तिचं सर्वस्व ती आपल्या हातात अगदी निःसंकोचपणे सुपुर्त करते तेव्हा आपणच खऱ्या अर्थाने सुखी होतो.... आपल्या मनाच्या, शरीराच्या सार्या इच्छा, जाणिवा त्या शक्ती पाशी येऊन थांबतात......' त्याच्या मनात बरंच काही सुरु होतं.
" विक्रम गप्प का असा! पाहुण्यासारखा उभा का असा? बस ना." ती कॉफी पित म्हणाली. तो कॉर्नरपिस जवळून मागे वळला.
" अनु एक सांगू का ?"
" हं......बोल ना...." त्याने ट्रेमधली फुलं हातात घेतली.
" अनु माझ्या सोबत रहा वगैरे....हो न. तोंडपाठ झालं ते मला." तिने हातातला मग बाजूला ठेवला.
" नाही....I just want to say thank you. Thank you. माझ्या आयुष्यात मला इतके सुंदर क्षण दिल्याबद्दल...."
" अरे! थँक्यू काय आणि समर्पणाच्या भावनेसाठी अशी फॉर्मॅलिटी कुठून आली! नवरा-बायकोच्या बंधनात समर्पण असतच अरे. बायको म्हणून कर्तव्य सुद्धा. त्यात औपचारिकता नसते अरे. प्रेमळ कर्तव्य मग अस थँक्यू का!"
ती उठून त्याच्या पाशी आली.
" नाही ग फॉर्मॅलिटी अजिबात नाही. कुणी आपल्या आयुष्यात आनंद दिला, छान आठवणी दिल्या तर आपण आयुष्यात अगदी घरातल्यांपासून ते फ्रेंड्सपर्यंत सगळ्यांना थॅंक्यु म्हणत असतो मग आपल्या सगळ्यात जवळच्या माणसासाठी थँक्यू का नको! त्या......त्या वाईट घटनेनं मला एक कळलं अनु, की बाईच्या शरीरावरती फक्त तिचा हक्क असतो...... कसही वागायला तिचं शरीर म्हणजे आमची वैयक्तीक प्रोपर्टी नव्हे लग्नाआधीही आणि नंतरही......फॉरमॅलिटी म्हणून नाही ग तुझा रिसपेक्ट म्हणून....बायको इतक काही आपल्यासाठी करत असते मग तिच्यासाठी थँक्यु का नको! सो मॅडम माझं ' थँक्यु ' अॅक्सेप्ट करा ना."
" विक्रम कसा आहेस ना तू! so sweet of you." ती गोड हसत त्याच्या मिठीत शिरली.
" हा.......मग Same to you....." तो हसला.
तिने त्याच्या हातातल्या फुलांवरुन हात फिरवला. तिच्या मिठीने गुलाबाच्या पाकळ्या मात्र विखुरल्या आणि त्याच्या पायांवरती पडल्या.
क्रमशः
139 अंतिम भाग सोमवार/ मंगळवार ला येईल. ज्या घटनेनं त्यांचा प्रवास सुरु झाला.....पार्ट 28. त्या बिंदूला जोडणाराच शेवटचा भाग असेल. त्याचं प्रायश्चित्त, पश्चात्ताप या सगळ्या चक्राची परिपुर्ती शेवटच्या भागात होईल जे पुन्हा तिच्यापाशी येऊन थांबेल.....अर्थात सुखांन्त आहेच पण वेगळा पार्ट असेल.....वाचल्यानंतर अजून काही पार्ट व्हायला हवे होते असही वाटु शकतं पण सुरुवातीपासूनचा कथेचा सुर आणि त्यांच्या दोघांपेक्षाही विषय महत्त्वाचा त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन शेवट सुरुवात होण्याआधीच ठरला होता त्याप्रमाणे असेल......
भेटुया निरोपाच्या भागात......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा