Login

बंधन भाग 139 अंतिम

Social Love

भाग 139 अंतिम

                              दोन वर्षांनंतर

           

                   भूतकाळाचे दरवाजे त्या दिवशी तिने कायमचे बंद करून घेतले आणि एकमेकांसाठी, एकमेकांच्या साथीने त्यांनी नवी सुरुवात केली. जुन्या नात्याची नवी ओळख करून घेतली. फार्महाउसवरच्या त्या दोन दिवसांमध्ये तिला पुन्हा एकदा जाणीव झाली या गोष्टीची की, तो आपल्या शिवाय त्याचं आयुष्य जगू शकत नाही आणि तिचा आता या गोष्टीवरती पूर्ण विश्वास बसला, प्रत्येक गुन्हेगार वाईट नसतो! माणसाला वाईट वागायला भाग पडतात, माणसाला विनाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते म्हणजे माणसाचे शत्रू त्याचा अहंकार, अभिमान, हटवादीपणा, बुद्धी, पैसा, प्रतिष्ठेचा गर्व पण तिला त्याच्यातला माणूस आवडला जो आधीही आवडायचा. तिला माहित होतं तो जसा आहे तसा आहे. त्याला बदलणं कठीण..... कठीण म्हणण्यापेक्षा तिलाही तो आहे तसाच आवडायचा. त्या दिवसापासून त्याला मात्र पुन्हा वाटू लागलं, ती आपल्यासाठी वेडी आहे.  आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे किंवा आपण कसे तिच्याशिवाय जगू शकत नाही वगैरे तिला सांगणं किंवा सतत तिला तस दाखवून देणं त्याला जमायचं नाही. त्याच्या छोट्या छोट्या कृतींमधून, नेहमीच्या वागण्यामधून तिला ते जाणवतं राहायचं. तिच्या मागेमागे रोमँटिक अंदाजात तो फिरायचा  नाही. पण त्याचं मन चोवीस तास तिच्या विचारांनी व्यापलेलं असायचं. प्रपोज करताना सुद्धा 'आय लव यू '  न बोललेला तो! त्यांच्या नात्याची नवीन सुरवात झाल्यानंतर ही कधी असे शब्द त्याच्याकडून तिला ऐकायला मिळाले नाहीत. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे बोलण्यापेक्षाही कृती महत्त्वाची! चारचौघांत तिचं कौतुक करणं त्याला जमायचं नाही. पण चारचौघात तिचा आदर ठेवण्यात तो कमी पडायचा नाही. तिच्यासाठी हातातलं काम सोडून वेळ देणे त्याला जमायचं नाही.पण तिच्या हक्काच्या वेळेवरती दुसऱ्या कोणाचा हक्क नसायचा. तिच्यासाठी  सरप्राइज प्लॅन करणं त्याच्या बुद्धीला जमायचं नाही. पण तिला समजून घेणे नक्कीच जमायचं. ती मात्र या सगळ्यात खुश होती आणि त्या दोघांना आयुष्यात स्थिरस्थावर होत असताना पाहून घरातले सगळे खुश होते.

               त्या दिवसानंतरचा प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना आनंदाचा, उत्साहाचा होता. एकमेकांच्या साथीने मंतरलेला होता. ज्या वर्षी त्यांचं लग्न झालं ते वर्ष आणि दुसरं वर्ष ती दोन्ही वर्ष त्यांची, दोन्ही कुटुंबांची परीक्षा पाहणारी होती. विक्रम बरा झाल्यानंतर मात्र गोष्टी सुरळीत होऊ लागलेल्या. गुरुकुलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले आणि नव्या वर्षात इमारत विद्यार्थ्यांना वापरासाठी खुली झाली. व्यवहारातील पारदर्शकता, त्याची पहिल्यासारखी शिस्त, कॉलेज कडे लक्ष देणे, कॉलेज संबंधी काही ठरवताना भाऊ साहेबांसोबत तिची मतं विचारात घेणे आणि कॉलेजच्या प्राध्यापकांची मेहनत, त्यांची साथ यामुळे पुन्हा गुरुकुल नव्यानं उभं राहिलं. विक्रमच्या वागण्याने कॉलेजची कधीकाळी डागाळलेली प्रतिमा पुन्हा उत्तम बनली. त्यामुळे कॉलेज आणि विक्रमवरचे आरोप-प्रत्यारोप दिवसागणिक मागे पडले. पण बापूसाहेबांच्या छोट्या-छोट्या कुरबुरी नंतरही सुरूच राहिल्या अर्थात पहिल्यासारखं आता देखील फक्त भाऊसाहेब! जितेंद्र, कारखाना किंवा गुरुकुल हे विषय बापूसाहेबांनी कायमचे बंद करून टाकले. दुसरीकडे कारखान्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे जितेंद्र सांभाळत होता. नीतूची एनजीओची सेवाही सुरू होती. आणि चिडवणार्‍या जितेंद्रलाही तिने एकदाच उत्तर सुद्धा दिलं अविनाश सोबत लग्न करून! सधन घरातला, मनमेळाऊ साध्या स्वभावाचा अविनाश घरी सगळ्यांना आवडला. आपल्याला कस यातलं काहीच माहिती नाही म्हणून नेहमीप्रमाणे विक्रमने ताठा दाखवून दादागिरी केली पण अनघासमोर त्याचं काही चाललं नाही! शेवटी दोन्ही घरांच्या सामंजस्याने नितुचं शुभमंगल सावधान पार पडलं आणि जितेंद्र बिचारा एकटा पडला! नीतूसोबतच्या ओळखीमुळे मात्र नताशाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. दुसरी तिसरी पर्यंत जेमतेम शिक्षण घेतलेली ती मोठ्या लोकांच्या सान्निध्यात राहून थोडं फार इंग्रजी, मराठी बोलायची. नीतूच्या मदतीने तिने पुन्हा शिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि मुंबई चा नाद सोडून ती सांगलीत परतली ती कायमचीच! स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता तोही सुटला. तिला छोटी-मोठी कामं करता करता एका ज्वेलरी शॉप मध्ये जॉब मिळाला. आता तिला प्रतीक्षा होती तिच्या आयुष्यातही कुणीतरी ' खरा माणूस ' येण्याची. तिच्या अनघा- विक्रम सोबतच्या मैत्रीमुळे राजेशसोबतचा तिचा संपर्क कायमचा तुटला.  त्या वर्षीच्या दिवाळीनंतर राजेश यु.के.ला निघून गेला तरी अधून मधून सुट्टीतून तो सांगलीला यायचा. तो सांगलीला आला की जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या. कधीतरी विक्रमची सुद्धा आठवण यायची! कधीतरी वाटायचं जाऊन त्याला भेटावं, त्याची माफी मागावी एकदा समोरासमोर. पण त्याच्यासमोर जाण्याइतकी हिंम्मत त्याच्याकडे नसायची.  दुसरीकडे विक्रम आणि सामंतसरांचं आजही तितकच पटायचं. त्याचं काही वाईट व्हावं असं त्यांनी कधी चिंतलं नव्हतं आणि सामंत सरांनी गुरुकुल साठी आयुष्यभर केलेल्या कामाची ही विक्रम नी भाऊसाहेबांना कल्पना होतीच. भाऊसाहेब आता खऱ्या अर्थाने निर्धास्त झाले. त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे तो वागत होता. गुरुकुल ची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्याचा निर्णय त्यांना योग्य वाटू लागला आणि अरुंधतीला भाऊसाहेबांनी केलेली सुनबाईंची निवड सुद्धा! अरुंधती आणि राजेश्वरी मध्ये बोलणं व्हायचं. त्यांची मैत्री अजूनही होतीच. पण आपण राजेश्वरीला समीहाच्याबाबतीत उगीच नसती स्वप्नं दाखवली याचं  शल्यही अरुंधतीला होतं. समिहा मात्र विक्रम सोबतच्या त्या भेटी नंतर पुन्हा मुंबईला निघून गेली आणि कामात तिने स्वतःला झोकून दिलं. तिला सांगलीचा विषयच नको होता. राजेश्वरी ने तिला एक- दोनदा समजावण्याचा प्रयत्न केला. मी बाबा म्हणतील त्या मुलाशी लग्न करेन असे उत्तर देऊन तिने राजेश्वरीचं तोंड बंद केलं. विक्रमच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने तिला सुद्धा तेव्हा धक्का बसला होता. तिला वाटलं त्याला येऊन सांगलीला भेटावं पण प्रश्न होता कोणत्या अधिकाराने! आणि अनघा पुन्हा त्याच्या आयुष्यात आली तर काय..... पुन्हा गुंता जो तिला नको होता. त्याचदरम्याने मुंबईतल्या एका फॅशन शो दरम्यान प्रोग्रॅम स्पॉन्सरर असणार्‍या एका कंपनीच्या बॉसशी तिची ओळख झाली. हळूहळू ओळख वाढली. मैत्री झाली आणि प्रेमसुद्धा! पंजाबी कुटुंबातला हुशार, देखणा मुलगा. त्याचं पूर्ण कुटुंबच बिजनेसमध्ये होतं. त्याचे वडील, काका मिळून कंपनीचं काम पाहायचे. तोही काही वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करू लागला होता. त्याची एकुलती एक बहीण लग्न होऊन मुंबईतच राहत होती.  मोठाल्या  बंगल्यात तो, त्याचे आई-वडील आणि काकांची फॅमिली दुसरीकडे!  न आवडण्यासारखं काही नव्हतं आणि एक दिवस त्याने तिला विचारलं. तिनेही आनंदाने पटकन होकार दिला. समिहाच्या लग्नाने अरुंधतीच्या मनावरचं ओझं हलकं झालं. तिने मागचं सगळं विसरून तिच्या आयुष्यात ती पुढे गेल्यामुळे विक्रमलाही बरं वाटलं. त्याने अनघालाही ते बोलून दाखवलं. अनघाने समिहाचा द्वेष कधी केला नव्हता पण ' समिहा नी विक्रम ' हे समीकरण डोळ्यांसमोर आलं तरी तिच्या मनात उगीच 'जेलसी ' निर्माण व्हायची जी आता कायमची संपली.

                अनघाचं मन शांत, समाधानी, आनंदी असायचं. दुसरीकडे तिच्या घरी मात्र हळूहळू का होईना विक्रम चा खरा स्वभाव, अनघा बद्दलची त्याची काळजी, आदर, कौतुक सगळंच कुमुद आणि रियाला जाणवत गेलं. सणासुदीला, रियाच्या वाढदिवसाला तो घरी तिच्या सोबत यायचा. तीही दोन-तीन दिवसांसाठी म्हणून घरी येऊन जायची. आणि हळूहळू रिया, कुमुदसोबत बोलताना त्यांच्यात मोकळेपणा आला आणि एकमेकाचे चेहरेही न पाहणारे सासूबाई आणि जावई बापू यांची गट्टी जमली. विक्रम म्हणजे लाखात एक जावई वाटू लागला कुमूदला! आता मात्र विक्रमचं कौतुक करताना दोघी थकायच्या नाहीत.  श्रीधरला त्यांचं वागणं दिसत होतं, समजत होतं तरीही त्यांचं मन अजूनही त्याला माफ करायला तयार नव्हतं अर्थातच तो समोर आला की वाद घालायचे किंवा बोलणं टाळायचे अस अजिबात  नाही. थोरले जावई म्हणून विक्रमचा मान ते राखायचे. हो थोरले जावई कारण लवकरच धाकटे जावईबापूही असणार होते!  तो घरी आला की जुजबी बोलणं त्यांच्यामध्ये व्हायचं. त्याची विचारपूस ते करायचे. भाऊसाहेब, आत्या, अरुंधती, जितेंद्र सोबतचं त्यांचं बोलणं पहिल्यासारखं होतं. विक्रम सोबत मात्र बोलूनही न बोलल्यासारखं! दोन वर्षांत बरंच काही बदललं. सगळ्यांची आयुष्य पुढं गेली.  पण दोन वर्षात श्रीधर आणि त्याच्या मधलं अंतर काही मिटलं नाही. पण लवकरच ते ठिक होईल असा अनघाला विश्वास होता!
......................

               तिने बेसिनच्या आरश्यामध्ये स्वतःला काही क्षण न्याहाळलं. नळ सुरू करताच थंडगार पाण्याचा झोत हातांवर ती पडला. तिने दोन्ही हात पाण्याच्या धारेखाली किंचित अंतरावरती धरले आणि हाताच्या तळव्यावरती टपटपणारे पाण्याचे थेंब चेंडू उडवावा तसे उडवले. अस खेळताना तिला मजा वाटायची हल्ली! हल्ली असंच व्हायचं कधीही, काही करण्यात मजा वाटायची. खूप नाचावं, बागडावं,ओरडावं वाटायचं.

" अनु आटोपलं का? जास्त वेळ उभी राहू नकोस....."

 त्याची हाक आली तसं तिने पाण्याशी खेळणं बंद केलं.


" हा......आले."   तिथूनच त्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हटलं. पाण्याचे हबकारे चेहऱ्यावरती मारले तस थोडं बरं वाटलं. ओलेत्या चेहऱ्याकडे तिने टक लावून पाहिलं. गोबरे गोबरे गाल, हाता - पायावरती चढलेली सूज  पाहून तिला आपला एक हात, एक पाय हत्तीसारखा झाल्यासारखं वाटायचं! कधीतरी गंमत वाटायची, एवढ्या बेढब, वजनदार शरिरातलं मन मोरपीस व्हायचं तेव्हा!  तो खूश असला की तिला काही कळायच्या आत पटकन दोन्ही हातांनी तिला उचलून सुद्धा घ्यायचा! ते जुने दिवस आठवले की तिला अजून गंमत वाटायची. आता एवढ्या वजनदार देहाला कसं बरं कोण उचलू शकणार! मग तिचं तिलाच वाटायचं आपण बेढब दिसतो आता!

" अनु "   त्याने मागून येऊन अलगदपणे दोन्ही हात तिच्या खांद्यांवरती ठेवले. आरशात पाहत छानसं हसला.

" चलो चलो. असं उभं नाही राहायचं पायावर ताण येतो मग."  त्याने हातातल्या नॅपकीनने तिचा ओला चेहरा पुसला.

" हं.....गुड."

" विक्रम, मी छान नाही दिसत!"  तिने आरशात पाहत आपल्या गालांवर हात फिरवला. त्याने दोन्ही हात तिच्या खांद्याभोवती लपेटले. आपला गाल किंचित तिच्या गालाला घासत हसत म्हटलं,

" अरे कोण म्हणतं असं! जगातली प्रत्येक आई सुंदरच असते. कळलं?"

" हं."    त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

" चला...."   त्याने आपल्या एका हातात तिचा हात धरला. दुसरा हात तिच्या खांद्याभोवती धरला. त्याच्या आधाराने हळूहळू चालत ती बेसिन जवळून बेड पाशी आली.

" हळू....."   ती शांतपणे बेडवरती एकदाची बसली. थोडासा दम लागल्यासारख वाटलं तिला.

"ओके. बरं वाटतंय का ?"  त्याने तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हटलं.

" हा..... थोडस. एकदम रेस्टलेस वाटलं..."

" असु दे असु दे. Don't Worry  काही विचारू नको करुस आता."     एक बार्बी डॉल तिच्या हातात दिली त्याने.

" हे काय रे! विक्रम, कशाला इतकी खेळणी..... ती पण मुलींची! या डॉल्स, ते टेडी..."  


उश्यांच्या जागी थपकल मारून बसलेल्या दोन गुलाबी टेडिबेअर कडे बोट दाखवलं तिने. कॉर्नर पीसवरती, तिच्या स्टडी टेबल वरती वेगवेगळ्या रंगाच्या, छान छान बाहुल्या ठेवलेल्या होत्या. आईच्या डोळ्यांसमोर बाळांची छान छान चित्रं असली की होणारं बाळसुद्धा त्या चित्रांतल्या बाळांसारखं दिसतं. हे कुठे तरी वाचलेलं, ऐकलेलं त्याच्या डोक्यात आलं आणि बेडसमोरच्या भिंतीवरती सुद्धा त्याने बाळांची हसरी चित्रं लावली पण त्यातही गंमत म्हणजे ती बाळं सुद्धा मुली होत्या!

" असु दे. आपल्याला छोटी अनु असली तर..."  त्याने ड्रेसिंग टेबलवरच्या हेअर ब्रश हातात घेतला.

" हा......मग छोटा विक्रम असला तर..."  ती म्हणाली तसं तिच्या केसांवरून हेयरब्रश फिरवत तो बोलायला लागला.

" हा ते पण आहेच. मग नितूला देऊ."

" गप रे....... तुला बरी मामा व्हायची घाई." 

ती त्याला दटावत म्हणाली. " नी विक्रम सगळे घरी आहेत आणि तू तिला कश्याला इकडे बोलवत होतास राहायला?"

" असच ग....  तुझ्या सोबत गप्पा मारायला! टाईमपास म्हणून....."

" काही काय..... त्यांचं नवीन लग्न झालंय. तिला त्रास नको देऊ हा..."

" ओके. ओके. भावना पोचल्या तुमच्या!"  त्याने तिचे केस विंचरले आणि रबरने बांधले.

" तसही मी घरी होते. नसते बोअर झाले. रिया, आई होत्या तिकडे. तू इकडे घेऊन आलास म्हणून!"

" अरे! इकडे खूप माणसं आहेत गं शिवाय डिलीव्हरी डेट पण जवळ आली न मला भीती वाटते....... आणि तसही रियाची एंन्गेजमेंन्ट जवळ आलीय. तिकडे आधीच सगळी गडबड सो....." 

" ओके कळला उदात्त हेतू तुमचा."  ती हसत म्हणाली. त्याने हेयरब्रश ड्रेसिंग टेबल वरती नेऊन ठेवला.

" अरे, हा मिल्कचा ग्लास भरलेलाच!"  कॉर्नरपीस वरच्या दुधाने भरलेला काचेचा ग्लास त्याने तिच्यासमोर धरला.

" अॅ.....नको मला."  ती तोंड वेंगाडत म्हणाली.

" अनु घे ग. काय रोज रोज काय हे असं! इतक्या महिन्यात स्वतःहून एकदाही हा ग्लास रिकामा नाही केला तू!"

" मग आज पण..... बाळाचा बाबा पण स्ट्राँग व्हायला हवा न"  

तिने तिच्या हातात ग्लास घेतला आणि त्याच्या समोर धरला. त्याने तिच्या आग्रहाखातर नेहमीप्रमाणे घोटभर दूध घेतलं आणि उरलेला ग्लास तिच्यासमोर धरला जो ती गटागटा प्यायली. त्याने हसून तिच्या ओठांवरती आलेली मिशी हाताने पुसली.

" OK.... That's like a good girl." 

" हो का. ओके. सर कुठे जाताय असे मग नटून-थटून एकदम!"     त्याच्या ब्लॅक जॅकेट कडे पाहत तिने डोळे मिचकावत म्हटलं.

" असंच..... आहे कोणीतरी स्पेशल! चार्मिंग लेडी."

 आरशात पाहते त्याने रिस्टवॉच मनगटावर बांधत म्हटलं.

" हो का बरं."   तिचा एक हात पोटावरती अलगदपणे फिरत होता. तो मागे वळला आणि तिच्या समोर येऊन बसला.

" काय रे."    त्याचा थोडासा गंभीर चेहरा पाहून ती हसून म्हणाली. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.

" थांबू का मी?"

" नको रे. तू तू जा मिटींगला..... आय एम फाईन."

 तिने म्हटलं तस त्याने तिच्या गालांवरून हात फिरवला.

" ओके अस्सा जातो नी पटकन येतो. टेक रेस्ट. मम्माला पाठवतो."    त्यावर तिने हसून शहाण्या मुलीसारखं ओके म्हटलं. तो उठला आणि दरवाजा उघडून बाहेर आला.
...............,,.,..............................


" आई ग वि.....क्रम.......आ....ई...." तिच्या किंकाळ्या कानावरती पडल्या तसा तो धावत खोलीत आला. दोन्ही हात पोटावरती धरुन ती मोठ्याने कण्हत होती. तिचा श्वासोच्छवासाचा वेग वाढला.

" अनु....... थांब......Calm down. "   त्याने तिचा हात हातात घेतला.

" आ.......ई....."

" मम्मा.....आत्या.....मम्मा लवकर ये ग...." त्याच्या आवाजाने अरुंधती धावत वरती आली.

" म.....म्मा....मला...." ती बोलण्याचा प्रयत्न करु लागली.

" लवकर चला हॉस्पिटलला...."  अरुंधती तिचा हात हातात घेऊन तिथं थांबली. 
तिचं कण्हनं वाढत गेलं. तो धावत पायर्‍या उतरत खाली गेला.


.........................................

                       तो अस्वस्थ होऊन येरझार्‍या घालत होता.  जितेंद्र खुर्चीवरून उठला. हॉस्पिटलला येईपर्यंत गाडीत तिचं कण्हनं, ओरडणं सुरु होतं. सोबत आत्या, अरुंधती देखील होत्या तरी त्याचा जीव कासावीस झाला. जितेंद्र ड्रायव्हिंग सीटला बसला होता आणि नजरेनेच त्याला धीर देत होता. हॉस्पिटलला पोचेस्तोवर त्याच्या जीवात जीव नव्हता. हॉस्पिटल काही फार लांब नव्हतं तरीही त्याला ते अंतर मोठं वाटलं.

" विक्रम तू बस जरा शांतपणे."

" नको......."

" तू असा उभा राहून काही होणार आहे का? Wait डॉक्टर येतील आता."  जितेंद्रने  म्हटलं तसा तो वेटिंगचेअरवरती बसला.

" विक्रम किती रे टेन्शन घेतोस...... Just Don't Worry  होईल ठिक सगळं."

" व्हय र नग चिंता करुस." 

 आत्या आणि अरुंधती समोरच्या खुर्च्यांवरती डॉक्टरांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या. अरुंधतीची बोटांची चाळवाचाळव पाहून विक्रमच्या जन्माच्या वेळची आठवण झाली अात्याला! तिने धीराने अरुंधतीच्या हातावरती थोपटलं. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले तसे सगळे उठून उभे राहिले.

" Heartiest Congratulations!" 

 डॉक्टर हसर्‍या चेहर्‍याने म्हणाले.

" राजेशिर्केंच्या घरी राजकुमार आली छोटीशी!" सोबतच्या नर्स हसत बोलल्या.

" वाव! म्हणजे दुसऱ्या मॅडम आल्या म्हणायच्या!"  जितेंद्रने आनंदाने विक्रमला आलिंगन देत म्हटलं.

" चला वैनीसाब नीतू गेली म्हनून एवडुसा चेरा झाल्लता तुमचा. बगा नातीच्या पावलानं लेक आली...."

" हो ना खरंच की!"

" डॉक्टर त्यांना डिस्चार्ज....."  त्याने उत्साहाने म्हटलं तस डॉक्टर म्हणाले, 

" हो हो पण त्यांना जरा आराम करू द्या मग पाहू डिस्चार्जचं."

"Ok "

" मग मी मी तिला बघू शकतो का ?"  त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून जितेंद्र मोठ्याने आत्याला म्हणाला,

" आत्ये बघ ग लेकीला भेटायची घाई बघ."

" गप र...... तुला नाही समजायचं बापाचं मन..." आत्याने त्याला दटावलं तसा हसत तो कान धरुन ओके म्हणाला.
........................................................


                    " या....."  मघाच्या नर्ससोबत तो आत मध्ये आला. कधी एकदा तिला पाहतो असं वाटत होतं त्याला! नर्स एका पाळण्यापाशी आली. तिच्या मागोमाग तोही आला.  नर्सने हसतच त्याला पाळण्यात शांतपणे पहुडलेल्या तिच्याकडे पाहायची हाताने खूण केली. त्याने हळूच पाळण्यात डोकावून पाहिलं. मोत्यांएवढे छोटुसे डोळे मिटून ती झोपली होती. मऊसुत कापडात तिचं मूटकुळं गुंडाळल्यामुळे तिचे छोटुसे हात- पाय काही त्याला दिसले नाहीत फक्त चेहरा दिसला. गोरे गोरे गाल, बटणाएवढं सरळ नाक, रुंद कपाळ बघून त्याला अनघाची आठवण आली! तिला जाग आली तर  टुकटुक बघेल न ती आपल्याकडे अगदी आपण कोणी अनोळखी असल्यासारखी! मग आपण सांगू तिला आपल्याला ' बाबा ' म्हणायला! ती आपल्याकडे ज्या प्रेमळ नजरेनं पाहते त्यापेक्षाही हिने आपल्याला पाहिलेलं आपल्याला जास्त आवडेल नाही! किती वाट बघावी लागेल तिच्याकडून बाबा ऐकण्यासाठी! त्याला राहवेना. तिच्या गालांवरुन हात फिरवावासा वाटला त्याला. त्याने हळूच हात पुढे केला तस तो थबकला, ' नको! झोपमोड व्हायची ' असा विचार आला तसा त्याने हात मागे घेतला.

" थँक्स सिस्टर."  त्याने म्हटलं.

" इट्स ओके. बरं, तुम्ही थांबा बाहेर आता."  नर्स म्हणाल्या तस त्याने समाधानाने होकारार्थी मान हलवली.
............................................

" हो हो नक्की...... बरं श्रीधरराव तुम्ही आणि कुमुदताई लवकर या  नातीला भेटायला. हो अच्छा."

समोरुन विक्रम मोबाईल वरती मेसेज टाईप करत आला तस अरुंधतीने श्रीधरचा फोन असल्साचं हळू आवाजात म्हटलं. ' बोलणार का ' अस नजरेनच विचारताच त्याने हातानेच ' नको ' म्हटलं.

" हो तुमचं सुद्धा अभिनंदन पुन्हा एकदा. बरं ठेवते हा."  म्हणून अरुंधतीने फोन ठेवून दिला.

" काय अरे बोलायचंस ना."

" आता येतील तेव्हा भेटूच आणि तसंही मी मी उत्साहाने काही बोलत बसेन त्यांना आवडेल न आवडेल." तो निराशेच्या स्वरात म्हणाला.

" बरं बरं राहिलं.... असो मग नवे बाबा कळवलं का सगळ्यांना?"  अरुंधतीने खुशीत विचारलं.

" हो.... विशालशी बोलत होतो. माधवकाकांना पण केला कॉल."  

 इतक्यात डॉक्टर आले.

" शुद्धीवरती आल्या त्या. मी चेक केलं. Everything is normal. Don't Worry. काही हेल्थ सप्लीमेंट्स देतो ती चालू ठेवा."

" ओके."  

 मघाची तिची अवस्था, तिचं विव्हळणं पाहिल्यानंतर आता डॉक्टरांनी काळजीचं कारण नाही म्हटलं तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला.

" डॉक्टर डॉक्टर."   एक नर्स धावत आली.

" डॉक्टर ते मघाचं बाळ......"  ती घाबरल्या चेहऱ्याने बोलत होती.

" का... काय झालं?"    त्याने धडधडत्या हृदयाने विचारलं.

" डॉक्टर ते बाळ नाहीय पाळण्यात. म्हणजे...."

" अहो कस शक्यय. मी आता अर्ध्या तासापूर्वी भेटून आलो. त्या लीनाताई होत्या सोबत." तो घाबरलेल्या नजरेनं म्हणाला.

" नर्स काय झालंय? "  डॉक्टरनांही आता घाम फुटायची वेळ आली.

" विक्रम तू शांत हो. नर्स बोला ना...."  अरुंधतीने विचारलं.

" मॅडम ते मघाशी होतं पाळण्यात आता नाहीये...."

" काय!"   जितेंद्र गडबड पाहून पुढे आला.

" अरे नाहीय म्हणजे What do you mean नाहीये. काही रेस्पोंसिबिलिटी आहे की नाही."

" विक्रम तू प्लीज Don't panic यार."

"  जित्या काय हे.......डॉक्टर What's this. माझ्या मुलीला काही झालं ना, हॉस्पिटल जागेवर दिसणार नाही लक्षात ठेवा डॉक्टर."

" च्च.....विक्रम."  अरुंधती त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करत होती.

" विक्रम अरे असेल इथेच. कुठे जाणार आहे ती? चालत तर कुठे जाऊ शकत नाही."


" Come on, ती नाही जगू शकत तिच्यापर्यंत कोणीही पोचू शकता ना. हल्ली काय काय ऐकायला मिळतं. भुकेल्यांना लहान-मोठी असं काही नसतं फक्त या नालायकांचे हात शिवशिवतात. डॉक्टर प्लिज तिला बघा ना...." 

तो रडवेला झाला.

" अरे काय झालं?  सगळे का असे उभे ?" बाजूने जाणार्‍या लीनाताई हसर्‍या चेहर्‍याने सहजपणे म्हणाल्या.

" नर्स  यांची मुलगी....."   डॉक्टर पटकन म्हणाले.

"अहो.....एकटी किती वेळ राहणार ती! आणि आई शुद्धीवर आली मग तिला बाळ दाखवायला नको का!"

" ओह........डॉक्टर सो सॉरी." त्या घाबरलेल्या नर्सचा धांदरटपणा लक्षात येताच तिचा चेहरा ओशाळला.

" It's ok.....You may go now."   डॉक्टर ताठ सुरात म्हणाले तश्या त्या डॉक्टर ओरडतील या भितीनं पटकन तिथून सटकल्या.

" डॉक्टर आय एम सॉरी मी जरा जास्तच रिऍक्ट...." तो आता शांतपणे म्हणाला तसं डॉक्टरांनी स्मितहास्य केलं.

"इट्स ओके सर. बाबा होण्याची फिलिंग वेगळी असते आणि त्यातून मुलीचा बाबा म्हटलं की..... असो आता रिलॅक्स."

" डॉक्टर थँक्यू."    डॉक्टर निघताना अरूंधती म्हणाली.

" नवीनय ती. ओके चला सर तुम्ही दोघींना भेटा म्हणजे तुमचं डोकं जरा शांत होईल."  लीनाताई म्हणाल्या तसे सगळे मोठ्यानं हसले.
. ...................................... ...........

                 त्याने दरवाजा किंचित ढकलला. आत पाऊल टाकणार तोच समोरचं दृश्य पाहून त्याच्या चेहऱ्यावरती नकळतच स्मित पसरलं. तिने दोन्ही हातात तिला घट्ट धरलं होतं आणि तिच्या सोबत खेळत होती किंवा काही बोलत असावी असं त्याला वाटलं. त्यांना गंमत वाटली कशा असतात ना आया! बाळ फक्त असतं. बोलत नाही, चालत नाही, नवजात बाळ तर खाऊ पिऊही शकत नाही तरी ते हसतं रडतं एवढ्या दोन गोष्टींवरून आयांना सगळं समजतं. त्याला काही दुखतय का, त्याला भूक लागलीये का, झोप आली आहे का, खेळायचेय का सगळं...... आणि अशी बाळासोबत खेळणारी आई सुंदर दिसते. मांजर आणि तिची पिल्लं, गाय आणि तिचे वासरु. बापरे! फारच फिलॉसॉपी सुचतेय.... मग आपल्याला मनाला गप्प बसवत हलक्या पावलांनी तो पुढे आला.

" Congrats मॅडम."  तिच्या समोर येऊन तो बसला.  


तो आत आल्याची चाहूलही तिला लागली नव्हती! ती छोटी सोबत रमलेली.

" अरे कधी आलास? बाबा आला.... काय म्हणते अन्वी..बब्बा...."  

ती हातातल्या बाळाकडे पाहून हसत बोलत होती. त्याने दोन्ही हात पुढे केले.

" चला चला बाबाकडे जाऊया."  तिने तिचं मुटकुळं अलगदपणे त्याच्या हातावरती ठेवलं.

" ए अन्वी..." 

 तिच्या गोंडस स्पर्श हातांना झाला आणि त्याचं मन अगदी भरुन आलं. आपल्या छातीशी कवटाळलं तस ती खुदकन हसली त्याच्याकडे पाहून!

" अनु ए हसली बघ.. She's so cute ना."  हातातल्या  तिच्याकडे पाहत तो बोलत होता.

" हा ना सर तुमच्यासारखी!"  ती म्हणाली तसा तो हसला.

" हो.... आम्ही बाबासारखे हो ना.."  त्याने आपला गाल तिच्या गालावर ती टेकवला.

" अन्वी लवकर घरी जाऊ हा आपण. मग बाबा नी अन्वी खूप मस्ती करणार. हो की नाही. अन्वी नी बाबा ची टीम!"

त्याच्याकडे लुक लुक डोळ्यांनी पाहणार्‍या तिला तो खेळवत खेळवत उठला.

" हो का बरं बघूया ना!"

" आम्ही नाही घाबरत आईला हो की नाही!" 

 त्याने अलगदपणे तिला पाळण्यात ठेवून दिलं. ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती. आपण बोललो की ती हसते ते त्याच्या लक्षात आलं तसं त्याला मजा वाटू लागली तिला खेळवण्यात! तिला पाळण्यात ठेवून तो मागे वळला आणि पुन्हा अनघा समोर येऊन बसला.

" माझ्याकडे लक्षच नाही!"  ती लटक्या रागाने म्हणाली आणि त्याच्या मिठीत आली.

" अरे! अनु थँक्यू वेडाबाई. Thank you so much for the beautiful gift." 

तिच्या पाठीवरून हळूवार थोपटत त्याने म्हटलं.

" बरं वाटतंय ना ?"  त्याने तिच्या थकल्या चेहर्‍यावरून हात फिरवला.

" हा......"    तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

" बघ आता खेळणी वाया नाही जाणार! अनु आपल्या अन्वी ला आपण खूप मोठा करायचं. तिला खूप शिकवायचं. तिला जे करायचय ते करून द्यायचं. मुलगी म्हणून जसं साहेबांनी  नीतुला मोठं केलं तसं...."

" हो हो आधी तिला रांगू तर दे. तेवढ्यात कुठे शाळा-कॉलेज करिअर."     त्याचं बोलणं तिला वेडेपणा वाटला.

"असु दे. असंच ग हा पण तिला नाही मी कुठे पाठवणार. सांगलीबाहेर हा.... माझी अन्वी तिच्या बाबा सोबतच राहणार...."    तो तिच्या पाळण्याकडे पाहत सहज म्हणाला. आता मात्र अनघा मोठ्याने हसली. 

" काही ही..... साहेब कुठल्या विश्वात आहात! ती जाणार एक दिवस तिच्या घरी तुमची नीतू गेली तश्शीच."

" हा.... असू दे हा पण मी नाही तिला सांगली बाहेर जाऊ देणार."

" तु ना भाऊसाहेब, आमचे बाबा यांच्या ' फादर कॅटेगिरी ' त जाऊन पोचलास म्हणायचा!"

" अरे हे काय नवीन! अनु काहीही सुचतं तुला." तिचं चिडवणं ऐकून तो उठला.

" चला रेस्ट घ्या तुम्ही....."

" हा.....ते नताशा नी प्रिन्सिपलसरांना रिप्लाय दिला. बाकींच्यांना सवडीने..."

" विक्रम..."    तो जायला वळला तसा तिने मागून त्याचा हात धरला.

" काय ग ?"

तिने नजरेने ' काही नाही ' म्हटलं आणि त्याचा हात दोन क्षण आपल्या हातात घेतला तसा तो तिच्या जवळ येउन उभा राहिला. त्याने आपला दुसरा हात तिने घट्ट धरलेल्या त्याच्या हातांवरती ठेवून किंचित थोपटल्यासारखं केलं.

' मी आहे ना सोबत ' हेच ऐकायचं होतं तिला जे त्याने न बोलताही तिने ऐकलं.
.....................................................


                   हॉस्पिटलच्या आवारातील बेंन्च वरती तो बसला होता. सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेजेस व्हॉट्सअप वरती आदळत होते. प्राध्यापकांच्या ग्रुप वरती त्याने थँक्यूचा फॉर्मल मेसेज पाठवून दिला नी सगळ्यांचे आभार मानले. आणि मोबाईल ठेवून दिला. विश्वासच बसत नव्हता आपण  बाबा झालो आहोत त्यावर!  त्याचं समोर लक्ष गेलं. गाडीतून त्याच्याच वयाचा एकजण आणि  तीन एक वर्षांची मुलगी बाहेर आले. अर्थात ती त्याच्याकडे कडेवरती ऐटीत बसली होती. मग त्याने तिला जमिनीवरती उभी केली. ड्रायविंग सीटजवळ तो गेला न तिचे बूट बाहेर काढले. ती तोंडात बोट घालून भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहत होती. तो खाली वाकून तिच्या पायात बुट घालत होता. इकडे तिकडे बोट दाखवत त्याला ती काही सांगत होती. तो बोलत होता आणि बोलता बोलता तिच्या पायात बूट घालून देत होता. त्याने तिचा हात पकडला आणि ती दोघं आत येण्यासाठी चालू लागले. त्याच्या हातात असलेला तिचा छोटुसा हात त्याने घट्ट पकडला होता. त्याला बसल्या बसल्या मोठी झालेली अन्वी दिसू लागली. असाच त्याचा हात घट्ट पकडून चालणारी..... मघाशी ती सापडत नाही म्हटल्यावरती क्षणभर काहीच सुचेना नाही! कुठे गेली असेल, काय झालं असेल तिचं, तिला कोणी काही केलं नसेल ना  शंभर शंका. आणि सेकंदात विचार आला. तासाभरापूर्वी जन्मलेल्या आपल्या लेकीच्या काळजीणे इतका जीव कासावीस झाला आपला! मग....... त्याने क्षणभर डोळे मिटून घेतले.

 डोळ्यांपुढे अंधारी. अंधारातल्या आर्त किंकाळ्या....

' मला घरी जाऊ द्या... सोडा मला.... काय करणार तुला मारून मी! माझे हात कशाला रक्ताने लाल करून घेऊ हा पण तुला असच उडायला सोडणार नाहीये मी.... अजून मस्ती नाही उतरली तुझी..... काळजी घ्या पोरीची.... बापाचं दुःख नाही कळणार तुम्हाला ओ...... या घरात तुम्हाला थारा नाही..... तुम्ही निघा इथनं अनुच्या बाबांना नाही आवडणार हे......पुन्हा त्या माणसाचं नावही नकोय मला या घरात.....बाबा मला त्यांच्याकडे परत जायचंय.....बाबा तुम्हाला वाटतात तसे नाहीत ते..... आई बाबा मी निघू? 


दोन वर्षापुर्वीचे सगळे प्रसंग नजरेसमोर उभे राहिले. आणि आपल्या जन्मदात्या बापा समोरून आपल्यावरती विश्वास ठेवून दोन वर्षांपूर्वी घराबाहेर पडलेली ती..... त्याने डोळे उघडले.

समोरुन श्रीधर येताना दिसले हातात पेढ्यांचा बॉक्स घेऊन! त्यांचा थकलेला, सुरकुतलेला चेहरा समाधानी वाटला. त्याने धीर एकटवून हाक मारली.

" बाबा "

ते मागे वळले. त्याला समोर पाहताच ते चालत त्याच्या पाशी आले. त्याने दोन क्षण त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना काही कळण्याआधीच त्याने खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला.

" अरे ! आयुष्यमान भव."  त्यांनी समाधानाने आशीर्वादाचा हात त्याच्या पाठीवरती ठेवला.

" बाबा माझं चुकलं. मला माफ करा. मी तुमच्या मुलीला खुप त्रास दिला. माझ्यामुळे...... खूप निर्दयपणे मी तुमच्या लेकीला...... तिच्या त्या अवस्थेला मी जबाबदार होतो.  काही अपेक्षा नाही तुमच्याकडून आता फक्त शक्य झालं तर मला क्षमा करा....."

 त्यांनी गहिवरून पेढ्यांचा बॉक्स बेंन्चवरती ठेवला.

" सर......अस काय हो बोलता. उठा आधी तुम्ही आणि बाबा झालात आता तुम्ही. आम्हाला आजोबा बनवलंत. लेकीच्या बापानं आतापासूनच हताश होऊन कसं चालायचं. मोठं करायचं लेकीला अजून."  ते पाणावल्या डोळ्यांनी म्हणाले आणि त्यांनी त्याला आलिंगन दिलं.

" अभिनंदन तुमचं. चला आता असे उदास नका होऊ. तुमच्या सासूबाईंनी पाहिलं तर त्यांना वाटेल म्हाताऱ्या सासऱ्यांनं जावईबापूंचा छळ केला. तिचे लाडके जावईबापू तुम्ही!"  त्यांनी हसतच पेढ्यांचा बॉक्स उघडून त्याला पेढा भरवला.


" थँक्यु बाबा......"

" चला आता सॉरी, धन्यवाद पुरे. तुम्ही भेटलात तुमच्या लेकीला. मला पण भेटू द्या माझ्या लेकीला. चला.."

 त्यांच्या बोलण्यावरती तो हसला. दोघे चालू लागले. त्याला  खर्‍या अर्थाने शांत वाटत होतं. त्या घटनेनंतर इतक्या वर्षांनी त्याने पहिल्यांदा त्यांच्यासमोर मन मोकळं केलं आणि माफी मागितली होती. त्यांनी एकवार त्याच्याकडे पाहिलं.आज पहिल्यांदाच त्यांना त्याच्यामध्ये भाऊसाहेबांचा भास झाला आणि त्यांच्या लेकीची निवड योग्य होती मनातून कुठेतरी जाणवत होतं इतके दिवस पण मन मानत नव्हतं आज मात्र खात्री पटली!
..............................................................

                  ते दोघं आतमध्ये येईपर्यंत सगळ्यांनी बाळाला पाहायला गर्दी केलेली. अरुंधती, आत्या, जितेंद्र, नीतू ,अविनाश, भाऊसाहेब. ती बेडवर बसली होती आणि अरुंधती च्या हातात बाळ होतं. आत येताच नीतू उड्या मारत पुढे आली.

" ए दाद्या आला..... "

"अभिनंदन सर खूप खूप..... मला पार्टी."   आनंदाने तिने त्याला मिठी मारली.

" हो ग नक्की....." तो खुशीने म्हणाला.

" अग देतील ते पार्टी. तुला दुसरं काही सुचत नाही वाटतं." तिची मस्करी करित अविनाश पुढे आला.

" गप रे अवी."

" अवि तशीच आहे ती. सांभाळ रे बाबा स्वतःला." जितेंद्र आत्याच्या बाजूलाच उभा होता.

बाळाचं सगळ्यांकडून चाललेलं कौतुक ती पाहत होती. तिचं लक्ष दारापाशी गेलं.

" बाबा "

श्रीधर तिच्यापाशी आले.

" बगा तुमची नातं.."   अरुंधती च्या हातातल्या अन्वी कडे पाहत आत्या कौतुकानं म्हणाली.

" श्रीधरराव तुमची लेक आई झाली आता."  भाऊसाहेबांनी श्रीधर कडे पाहिलं. 


श्रीधरनी कौतुकाने अनघाच्या डोक्यावरुन हात फिरवला तसे सगळे भावूक झाले. त्यांचे पाणावलेले डोळे, किंचित जडावलेला हात पाहून कुमुद आणि रिया आत मध्ये आल्या.

" अहो.... "   कुमुदच्या आवाजासरशी त्यांनी डोळ्यातलं पाणी डोळ्यातच थांबवलं.

" बघा तर कुमुदताई.....आज लेक खूश आहे तुमची. आज डोळ्यांत पाणी नको.."   अरुंधती बोलली तस कुमुदने अन्वीकडे कौतुकाने पाहिलं.

" होय ओ....तुम्ही खूप केलत गेल्या काही महिन्यांत तिचं.." अरुंधतीचे तिने आभार मानले.

" अासु द्या ओ....." आत्याने सहजपणे म्हटलं.

" हो ग आई.....नो ड्रामा प्लीज...." रिया अरुंधतीला दुजोरा देत बोलली.

" ए रियु.....आईला अस बोलतात धपाटा देईन हा एक."  अनघाने तिला दटावलं.

" ओह......सॉरी मम्मा.."  तिने ताईचेच कान पकडले.

" वाव! पण मी मावशी झाले फिलिंग एक्सायटेड." रिया आता अरुंधतीपाशी आली.

" ए क्युट आहे ना...जिजूंसारखी दिसते अगदी. हो की नाही ताई!"    रियाने अन्वीच्या गालाला हळूच बोट लावलं.

" मग माझा दाद्या आहेच बेस्ट."

" आणि मी ग."   जितेंद्रने अविनाश कडे पाहत डोळे मिचकावले.

" हो.....तू पण रे."

" बरं पेढे......"   रियाने श्रीधरच्या हातातला बॉक्स उघडला आणि एक पेढा विक्रम समोर धरला.

" चला नवे बाबा ताईला भरवायचा पहिला मान तुमचा."

 मग सगळ्यांनी आग्रह केला तसा त्याने तिला पेढा भरवला. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.

" थँक्यू सर."    ती गालात हसली.

" वेलकम " तिच्या डोळ्यात पाहत त्याने म्हटलं.

" ए वैनुडी फोटो."

" सगळे एकत्र दिसायला हवे ग....."

 भाऊसाहेब म्हणाले तस तिने लांबलचक हो म्हटलं. अरुंधतीने अन्वीला भाऊसाहेबांच्या हातात सुपूर्त केलं. नितुने सगळ्यांकडे एकदा नजर फिरवली. तिच्यासोबत अविनाश, बेडवरती बसलेली अनघा, तिच्या बाजूला उभा विक्रम, त्याच्या खांद्यावर हात टाकून उभा जितेंद्र, आत्या, अरुंधती, अरुंधती सोबत रिया, कुमुद उभ्या राहिल्या. त्यांच्यासमोर श्रीधरराव आणि बाजूला उभे अन्वी सोबत भाऊसाहेब. विक्रमने एकदा तिच्याकडे पाहिलं. डोळे भरून सगळ्यांच्या नकळत! त्या नजरेत खूप काही होतं. तो, त्याचा स्वभाव, त्याचा पश्चाताप, त्याच्या चुका, त्या दोघांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची ढिगभर स्वप्नं! ती त्याच्याकडे पाहून हसली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, समाधान होतं आणि त्यांच्यातला बंधन अतूट आहे हा विश्वास सुद्धा! तिने फोटो क्लिक केला. तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचा, सुंदर माणसांचा सुंदर फोटो. तुमच्या आमच्या सारख्या माणसांच्या प्रवासातला एक सुंदर क्षण.....