बंधन भाग 14

Love, Social Issues

भाग 14
( गेल्या भागात आपण पाहिलं अनघा तिचा इंन्टिरव्हियु कसा झाला हे बोलण्याच्या ओघात बर्वेसरांना सांगते ते ऐकुन त्यांना वाईट वाटतं कारण जो जॉब अनघाला तिच्या हुशारीच्या जोरावर मिळालेला असतो त्याच जॉबसाठी दिडवर्षापुर्वी जेव्हा तो येतो तेव्हाच्या इंन्टरव्हियु पॅनलमुळे त्याला आईचे दागिने गहाण ठेवून पैसे देऊन ती नोकरी पदरात पाडुन घ्यावी लागते आणि तो प्रसंग पुन्हा आठवून त्याला वाईट वाटतं. गेल्या भागाच्या शेवटी भाऊसाहेब एक मिटिंगही बोलावतात पाहुया काय होतंय)

" May I come in Sir ? " अनघाने भाऊसाहेबांच्या केबिनचं दार ढकलत विचारलं.
" या कारखानीस मॅडम "  भाऊसाहेबांच्या बोलण्यावर ती आत आली.
" या बसा " 
" काही काम होतं का ? " ती खुर्चीत अवघडून बसत म्हणाली. 
" हो म्हणजे या चालू वर्षात अजून काय नवीन उपक्रम कॉलेजमध्ये करता येतील त्याच्याविषयीच आम्ही बोलत होतो. अात्तासा अॉगस्ट संपतोय अध्यापनही व्यवस्थित सुरु झालंय तर आता इतर उपक्रमांविषयी बोलायला काहीच हरकत नाही तुम्हाला काय वाटतं?"  भाऊसाहेब म्हणाले.
" मी काय सांगू शकते मी हल्लीच जॉईन झालीय "  ती म्हणाली.
" हो पण तुम्ही मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या होत्यात व्यक्तीमत्व विकास वगैरे " त्यांनी म्हटलं.
" हो हो तर साहेब आपण " ती बोलायला सुरुवात करणार इतक्यात भाऊसाहेब हसत म्हणाले.
" अहो मॅडम थांबा थांबा मला  हे सगळं सांगू नका तुम्ही एक काम करा तुम्ही विक्रमसरांसोबत बोलून घ्या "  या अनपेक्षित उत्तराने ती गप्पच झाली आणि गोंधळून कसंबसं हो म्हणाली.
" बरं, बोला तुम्ही मग बघु आपण बरं या तुम्ही " ते म्हणाले.
मानेनच हो म्हणत ती तिथून बाहेर पडली. ती गेल्यावर भाऊ म्हणाले.
" करंबेळकर सर हुशार आहे हो मुलगी आपलीच माजी विद्यार्थीनी आहे "  ते समाधानाने म्हणाले.त्यावर प्राचार्यांनीही दुजोरा देत अनघाची स्तुती केली.
..................
भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिला विक्रमला भेटावं लागणार होतं आणि त्यांनी स्वतः बोलावून आपल्याला नव्या उपक्रमांविषयीच्या आपल्या आयडीआज विचारल्या याचा आनंद होताच तिला पण त्यांच्यासोबत बोलणं वेगळं होतं आणि विक्रमसोबत बोलणं वेगळं. तिने तर त्याला अजून पाहिलेलंसुद्धा नव्हतं पण कॉलेजमध्ये इतर प्राध्यापक, कर्मचारी यांच्याकडून तिने जे जे ऐकलं होतं त्यावरुन तरी तिला त्याला जाऊन भेटायची डेरिंग होत नव्हती तरी तिने अॉफिसमध्ये चौकशी केली. पण आज त्यांच्याच ट्रस्टच्या शाळेत कसलातरी कार्यक्रम होता आणि त्याकरिता त्याला प्रमुख पाहुण्यांमध्ये बोलावलं होतं. दुसर्‍या दिवशी तो कॉलेजला येणार नव्हता आता परवाशिवाय तिला भेटता येणार नव्हतं त्यामुळे वाट पाहण्यापेक्षा एकदाचं बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं असं तिला वाटु लागलं. 
.....................
शेवटी बुधवारचा दिवस उजाडला. सकाळी उठल्यावर आज विक्रमसरांना भेटायचं आहे हा विचार पहिला तिच्या डोक्यात आला. लवकर आटोपून ती कॉलेजला पोहचली. सकाळचं पहिलं लेक्चर संपलं आता दुसर्‍या लेक्चरला अजुन वेळ होता. ती विक्रमला भेटण्यासाठी त्याच्या केबिनच्या फ्लोरवर  जाऊन पोहचली. तिथं कुणीतरी सिनिअर प्रोफेसर भेटावे निदान एखादा शिपाई तरी आजुबाजुला असावा असं तिला वाटतं होतं. पण तिथे कुणीच नव्हतं. पहिल्यांदा तिला समोर सेमिनार हॉल दिसला, एका कोपर्‍यात उजव्या बाजुला परिक्षा विभाग अशी पाटी असलेली मोठी रुम होती जी कुलुपबंद होती परिक्षांचे पेपर्स, उत्तरपत्रिका ठेवण्यासाठीची ती खास रुम होती. त्याच्या बाजुला प्राध्यापकांना पेपर्स तपासणीकरता बसण्यासाठी दुसरी एक रुम होती जीसुद्धा आता बंद होती. तिने सभोवार नजर फिरवली केबिन कुठे तेच तिला कळेना. पण ती जिथे उभी होती तिथूनच तिला एका कोपर्‍यातुन पुढे जाणारा रस्ता दिसला. ती चालत थोडी पावलं पुढे गेली आणि वळली तर समोर डोअर मॅट दिसलं. तिने वरती पाहिलं तर दारावर काळ्या अक्षरात पाटी होती,' Mr.Vikram Rajeshirke ( Managing Director) तिने हळुच दारावर नॉक केलं आतुन कमिंग असा प्रतिसाद आला. ती दरवाजा लोटुन आत गेली तर फाईल्स मधले पेपर्स वाचत त्यावर सह्या करत असणारी एक व्यक्ती खूर्चीत बसलेली दिसली. ती चालत पुढे आली." Please, Sit " त्याने फाईलमधुन डोकंही वरती न काढता म्हटलं. ती त्याप्रमाणे खुर्चीत बसली आणि स्वतःहुनच बोलायला सुरुवात केली.
" मी अनघा कारखानीस " तिच्या या वाक्यावर त्याने पटकन नजर फाईलमधुन वरती केली.
" Ya, प्रिन्सिपल म्हणाले होते मला तुम्ही भेटायला येणार आहात " तो म्हणाला.
" हो " ती म्हणाली.
" सो काय new ideas आहेत तुमच्याकडे कॉलेजच्या अॅक्टिव्हिटिजविषयी " तो फाईल बंद करित म्हणाला आणि त्याने पुर्ण लक्ष तिच्या बोलण्याकडे दिलं. यावर तिला मात्र काहीच बोलायला सुचेना. त्याच्या एकंदरीत पर्सनॅलिटीमुळे आणी मुद्द्याचं काय ते बोला अश्या फॉर्मल अॅटिट्युडमुळे तिला कुठून न कशी सुरुवात करायची तेच सुचेना. भाऊसाहेबांसोबत बोलणं म्हणजे घरातल्या माणसासोबत बोलल्यासारखं वाटायचं. इथे तर समोरचा ब्लेझर मधला माणूस, सटासट मुद्देसुद आणि मोजून मापुन बोलणारा, चेहर्‍यावर जबरदस्त आत्मविश्वास असणारा असा तो आणि त्यातून केबिनमधलं वातावरण या सगळ्याचं प्रेशर तिच्या मनावर आलं.
" मॅडम "  त्याने तिच्या नजरेसमोरुन टिचकी वाजवली तशी ती भानावर आली.
" आ काय "
" बोलताय ना " तो म्हणाला. ती मानेनेच हो म्हणत बोलू लागली.
"सर मला काय वाटतं I mean to say आपण म्हणजे तुम्ही म्हणजे कॉलेजकडून मुलांसाठी काही नवीन करता येईल का?"  ती कसंबसं बोलली पण त्याला तिला काय म्हणायचय तेच कळलं नाही.
" I don't get it काय म्हणताय जरा एक्सप्लेन करा " तो म्हणाला. तिने मन थोडं शांत केलं आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली.
" म्हणजे मुलांसाठी स्कील डेव्हलपमेंन्टच्या दृष्टीने काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंन्ट किंवा सॉफ्ट स्कील ट्रेनिंग असं काही करता येईल का ?"  ती सरळ सरळ मुद्द्याचं बोलली कधी इथून खाली जातोय असं तिला वाटतं होतं.
"  Ok अजून काही " पुढे अजुन काही तिला सागांयचं असेल असं त्याला वाटलं.
" इतकंच I mean याविषयीच तुम्हाला सांगा असं " ती बोलत होती तितक्यात तो म्हणाला," हो भाऊसाहेबांनी कानावर घातलं होत माझ्या Ok then "  तो म्हणाला. तो त्यांना 'भाऊसाहेब ' म्हणतो हे ऐकुन तिला आश्चर्य वाटलं कारण तो कधीच त्यांना सगळ्यासमोर बाबा म्हणायचा नाही त्यांचा मान त्यांना आपणही दिला पाहिजे यासाठी आणि भाऊसाहेबही त्याला किंवा अगदी जितेंद्रला सुद्धा आदराने तुम्ही म्हणायचे आपणच जर मुलांच्या पदाला साजेसा मान त्यांना दिला नाही तर बाकी लोकांकडून का अपेक्षा करा असं त्यांचं मत होत. आपण निघालं पाहिजे हे तिच्या लक्षात आलं ती खुर्चीतून उठली.
" Ok bye " ती बोलली इतक्यात तो म्हणाला,
" By the way, Thanks for this idea" त्यावर तिने मानेनेच हो म्हटलं आणि ती तिथून बाहेर पडली. बाहेर आल्यावर तिला आपण उगीच इंन्टिरव्हियु असल्यासारखे घाबरलो अजून नीट बोलता आलं असतं असं तिला वाटलं. आपण अगदीच बावळटासारखे वागलो का असंही तिने स्वतःच्याच मनाला विचारलं आणि पुढच्या वेळी नीट बोलायचं असं तिने ठरवलं.
ती केबिनमधून निघून गेली आणि विक्रमला तिच्या मघाच्या वागण्याचं हसु आलं." Lack of confidence अजून जरा व्यवस्थित बोलली असती तर इट्स ओके आपल्याला काय पण आयडीआ छान आहे हि " असं स्वतःशीच म्हणत त्याने प्राचार्यांना फोन लावला आणि त्याप्रमाणे कसं काम करता येईल यासाठी सगळ्या सिनिअर प्रोफेसरची मिटिंग बोलवायला सांगितली.
.................
  थोड्याच दिवसांत पावसाचा जोर ओसरला. विक्रमच्या संकल्पनेतुन नक्षत्रवाटिका तयार करण्याचं काम एव्हाना पुर्ण झालं होतं. आता फक्त उद्गाघटन होणंच बाकी होतं. कॉलेजच्या मुलांपासुन ते अगदी प्राध्यापकांपर्यंत सगळ्यांनाच नक्षत्र गार्डन पाहण्याची आता उत्सुकता लागली होती. जुनच्या महिन्यापासुन ते काम सुरु होतं. सप्टेंबरच्या आसपास उद्गाघटनाची तारीख ठरवली गेली. शहराचे महापौर उद्गाटनाला येणार होते. शेवटी सगळी तयारी झाली आणि नक्षत्रवाटिका उद्गाटनाचा दिवस उजाडला. सकाळी अकरालाच महापौर आले. त्यांना उगीच खोळंबा नको म्हणून भाऊसाहेब, विक्रम त्याआधीच कॉलेजला पोहचले होते. थोड्याच वेळात सकाळशीपचे उपस्थित प्राध्यापक आणि काही दुपारशीपचे लवकर आलेले प्राध्यापकही उद्गाटनासाठी उपस्थित राहिले. महापौरांचं भाऊसाहेबांनी स्वागत केलं. पाऊस पडायला लागला तर पुन्हा थांबावं लागेल म्हणून वरती कॉलेज पाहायला न जाता आधी त्यांनी फित कापुन उद्गाघटन केलं. सगळ्यांनी मस्त टाळ्या वाजवल्या. अॉफ लेक्चर्स असलेले विद्यार्थीसुद्धा तिथं जमले आणि फित कापताच महापौरांसह प्राध्यापक आत गेले. विद्यार्थीही उत्साहाने आत कधी जाता येईल याची वाट पाहत होते. आवळा, उंबर, वड, पिंपळ, पळस अश्या रोपांसह नागचाफा,कडुलिंब, बेल, कृष्णागरु अश्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचं रोपण केलं होतं. प्रत्येक झाडाशेजारी एक फलक उभारुन त्यावर वृक्षाचं नाव त्याचं संस्कृत नाव आणि शास्त्रीय नाव, त्याचा उपयोग ही सगळी माहिती मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये त्यावर होती. आलेले पाहुणेही हे सगळं पाहून खुश झाले. प्राध्यापक विक्रमचं कौतुक करित पुढे येऊन त्याच्याशी बोलत होते. भाऊसाहेब महापौरांना सोबत घेऊन वरती कॉलेजमध्ये गेले तरी विक्रमभोवती प्राध्यापकांचा गराडा होता.
" खूपच सुंदर कल्पना विक्रम तुमची " खंदारे मॅडम त्याचं अभिनंदन करित म्हणाल्या. सोबतच काळेसरही होते.
" हो तुम्हाला आवडलं ना अजून काही सजेशन असेल तर सांगा काय काळे सर " तो हसतच म्हणाला त्यावर सरांनीही शुअर म्हणत त्याचं कौतुक केलं. त्यासोबतच निकम, बर्वे, बावधनकर आदि प्राध्यापकही बोलायला लागले. त्या घोळक्यातून पुढे येत अनघानेही अभिनंदनाचा हात पुढे केला पण त्याने लक्ष नसल्यासारखं दाखवलं इतक्यात शिवा वरुन निरोप घेऊन आला भाऊसाहेबांनी बोलावलंय मग खंदारे मॅडम, काळे सर त्यांना ओके म्हणतच तो अनघाच्या समोरुनच लक्ष न देता निघून गेला. असो कदाचित लक्ष नव्हतं असेल गर्दीत असा विचार तिने केला.
क्रमशः

🎭 Series Post

View all