बंधन भाग 17

Love, Social Issues

भाग 17
( गेल्या भागात समिहाला घरी आलेलं पाहून जितेंद्र नीताला समिहाविषयी सांगतो. अरुंधतीच्या मनात समिहाला घरची सुन करवुन घ्यायचा विचार आहे हे ऐकल्यानंतर नीतूला मात्र ही गोष्ट पटत नाही ती तसं जितेंद्रला बोलून दाखवते आणि तिच्या मनातल्या होणार्‍या वहिनीविषयीच्या अपेक्षा सुद्धा सांगते. दुसरीकडे अनघाच्या घरीही आईबाबा तिच्यासाठी स्थळं पाहण्याचा ठरवतात तेव्हा रिया उत्साहात ही बातमी अनघाला सांगते. तिच्या मनात तर तिच्या जिजुची वेगळीच कल्पना आहे पण गेल्या भागात इतक्या सगळ्यांचे इतके शुभप्रसंगाचे प्लॅन ठरत असतानाच देव्हार्‍यातला दिवा विझतो अर्थात म्हणजे अपशकुन मानणं बरोबर नाही पण पुढे काय होणार ते कुणी पाहिलंय पाहूया आजच्या भागात काय घडतंय )

जूनमध्ये कॉलेज पुन्हा सुरु होण्याची तारिख जवळ येऊ लागली तशी अनघा उत्साहाने तयारीला लागली. पावसाळ्यात वापरण्याजोग्या आणि सहज वाळतील अश्या साड्या आईने तिच्यासाठी खरेदी केल्या. त्यासोबत रियासाठीही अॉफिसला स्कुटीवरुन जाण्यासाठी म्हणून नवा रेनकोटही घेतला. अनघाने आपली रुम एकदा कॉलेज सुरु होण्याआधी आवरुन घेतली. अनावश्यक नोट्सचे कागद, मुलांच्या प्रॅक्टिस टेस्टचे पेपर्स असं बरंचस नको असलेलं मटेरियल तिने बाजुला काढलं. अशी स्वतःची रुम आवरताना आपणच शाळेत जाणार असल्यासारखं तिला वाटलं. कॉलेजला जायला ती उत्सुक होती त्याचं अजुन एक कारण म्हणजे यावर्षी कॉलेज सुरु होण्याच्या पहिल्या दिवसापासुन तिला काम करायचं होतं. गेल्यावर्षी ती जेव्हा कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून रुजु झाली तोपर्यंत कॉलेजची अॅडमिशन प्रक्रियासुद्धा बर्‍यापैकी पुर्ण झाली होती. यावर्षी तेही एक कारण होतं दरवर्षी विद्यार्थी म्हणून अॅडमीशनची घाईगडबड तिने अनुभवली होती. यंदा प्रथमच प्राध्यापक म्हणून त्या सगळ्याचा भाग तिला व्हायचं होतं. अखेर एकदाचा कॉलेज सुरु होण्याचा दिवस उजाडला. लवकर आटोपुन ती कॉलेजला निघाली. बाहेर अजूनही मान्सुनला सुरुवात झाली नव्हती तरी निघताना आईने सोबत छत्री दिलीच. आईबाबांनी पहिल्या दिवसासाठी बेस्ट लक दिलं आणि अनघा त्यांना बाय करुन निघाली.
...................
 कॉलेज सुरु व्हायच्या आधीच दोन दिवसांपासुन शंकर, दिनेश, शिवा आदि शिपाईवर्गाने अख्य्या कॉलेजची साफसफाई केली. कॉलेजचं गार्डन,नक्षत्रवाटिकेमधला पालापाचोळा, मैदानावरचे कागदी कपटे, कुडाकचरा सगळा साफ केला. आता कॉलेज सुरु होणार म्हटल्यावर हळुहळु हॉस्टेलमधले विद्यार्थीसुद्धा आपापल्या घरुन परतणार होते. हॉस्टेलच्या कर्मचार्‍यांनीही हॉस्टेल झाडुन पुसुन काढायला सुरुवात केली. 
कॉलेजला आल्यानंतर सगळीकडे विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रियेसाठीची गडबड, कॉलेजच्या कट्ट्यावर हातात फॉर्म्स आणि डॉक्युमेंन्ट्स घेऊन उभे असणारे विद्यार्थी, गेल्या वर्षीची टॉपर मुलं,पदवीच्या तृतीय वर्षाच्या काही परिक्षांचे जाहीर न झालेले निकाल, नव्याने कॉलेजला दिसणारी मुलं हेच जुन्या विद्यार्थ्यांचे गप्पांचे विषय होते. अनघा पहिल्यांदा खंदारे मॅडमच्या केबिनला गेली तर केबिन अजुन बंद होतं. वाटेत तिला शंकर भेटला मॅडम आज येणार नाहीत असं त्याने तिला सांगितलं. मग अजुन कोणी प्राध्यापक आलेत का ते पाहण्यासाठी ती स्टाफरुमला गेली तिथे काही प्राध्यापक आत बसले होते. टि.वाय.चे काही रिझल्ट जाहीर झाले होते. ते विद्यार्थी पेढे वाटण्यासाठी आले होते आणि आपापल्या विभागाच्या प्राध्यापकांभोवती त्यांनी गराडा घातला. काही विद्यार्थ्यांचे पालक अॅडमीशनबद्दल खास चौकशी करण्यासाठी काही सिनिअर प्राध्यापकांशी बोलत स्टाफरुमबाहेर उभे होते. ती आत जाऊन बसली इतक्यात काळे सरही आत आले. अनघाला पाहताच त्यांनी तिला हाक मारली.
" मॅडम कश्या आहात ?"
" मस्त सर तुम्ही कसे आहात आणि मला नावानेच हाक मारा हो लहान आहे मी तुमच्यापेक्षा " ती छान हसत म्हणाली आणि खुर्चीत बसली.
" हो ते आहेच म्हणा पण आपलं फॉरमॅलिटी म्हणून मग सुटी मजेत ना !" त्यांनी विचारलं.
" हो हो आणि तुमची ?" 
" मस्त आम्ही मी मिसेस आणि मुलं कुलु मनालीला गेलो होतो " ते आनंदाने म्हणाले.
" वा! मस्तच " 
इतक्यात त्यांनी थांब हा म्हणत मोबाईल खिश्यातून बाहेर काढला आणि ट्रिपचे फोटोज दाखवायला सुरुवात केली. 
" छान आलेत फोटोज ही तुमची छोटी काय क्युट आहे एकदम !" फोटोतल्या सहा वर्षाच्या गुलाबी फ्रॉक मधल्या मुलीकडे बोट दाखवत ती म्हणाली.
" हो थँक्यु मस्तीखोर आहे एकदम!" ते म्हणाले. त्यांच्या गप्पा अश्याच सुरु असताना काही मुलं त्यांच्यापाशी आली.
" कारखानीस मॅडम, साईन प्लीज " म्हणत त्यांनी अॅडमीशनचे भरलेले फॉर्म तिच्यासमोर ठेवले.
" एफ वाय मॅनेजमेंन्ट का ?" तिने विचारलं.
" येस मॅडम " मुलांनी म्हटलं. तिने ओके म्हणतं डेस्कवरचं पेन हातात घेतलं. सही करण्याआधी मुलांनी फॉर्म व्यवस्थित भरलाय कि नाही याची खात्री करण्यासाठी तिने फॉर्म वरुन नजर फिरवली. त्यात प्रवेशफिच्या पावत्याही होत्या पाहता पाहता तिची नजर अॅडमिशनफिच्या रकमेवर पडली. 'प्रवेशशुल्क पस्तीस हजार रु.मात्र ' असं त्यावर लिहिलं होतं. ती रक्कम पाहुन तिला जरा शंका आली. तिने अजून एकदोन मुलांना फिच्या पावत्या दाखवायला सांगितल्या. त्यावरही तिच रक्कम. तिचं शेजारच्या खुर्चीत बसलेल्या काळेसरांकडे लक्ष गेलं.
" सर, आमच्या BBA डिपार्टमेंन्टची फस्ट इयरची फी पस्तिस आहे का ?" 
" अ हा हा म्हणजे हो असेल " ते नजर चुकवीत म्हणाले.
" नाही पण आमच्यावेळी तर पंचवीस होती " ती म्हणाली.
" अगं तीन एक वर्ष झालं त्याला आता वाढली असेल may be " ते खुलासेवार म्हणाले तरी तिचं समाधान झालं नाही हे त्यांच्या लक्षात आलं.
" सह्या करतेस ना !" ते पुन्हा म्हणाले.
" अ हो " म्हणत तिने त्या तिघांच्या फॉर्मवरती सह्या दिल्या. ती मुलं थँक्यु बोलून जाऊ लागली तेवढ्यात तिने पुन्हा त्यांना थांबा म्हटलं.
"ए एक मिनिट तुम्ही इथेच राहणारे आहात की हॉस्टेलला राहणार आहात ?" त्यावर त्यातले दोघं पुढे आले. तिने त्यांच्या हॉस्टेल अॅडमिशनच्या फी पावत्या पहायला मागितल्या. खानावळ,राहण्याची सोय, आंघोळीसाठी गरम पाणी, लॉनड्री, वैद्यकीय सुविधा असे सगळे चार्जेस मिळुन ती रक्कम सत्तर हजार आठशे होती. तिने त्या पावत्या पुन्हा मुलांच्या हाती दिल्या. हॉस्टेल फी तर बरोबर होती मग कॉलेजची प्रवेश फी इतकी वाढली याबद्दल तिला आश्चर्य वाटतं होतं. काळेसरांच्या हे लक्षात आलं मात्र तिच्याशी पुन्हा बोलणं त्यांनी टाळलं.
................
" ए अनघा काय करतेस " रेगे मॅडमनी स्टाफरुमध्ये येत विचारलं.
" काही नाही गं किर्ती न्युजपेपर वाचतेय खंदारे मॅडम नाहीयत ना मग नवी मुलं येतायत फॉर्म्स वगैरे घेऊन " अनघा पेपरमधुन वरती नजर करित म्हणाली.
" ओके गुड चल ना कँन्टिनला कॉफी तरी घेऊ आज कार्ले मॅडम नाही ना मग कॉफीला पार्टनर नाही मला " किर्ती बोअर होऊन म्हणाली त्यावर ओके म्हणत अनघाने पेपर बाजुला ठेवला आणि दोघी कँन्टिनमध्ये गेल्या. कँन्टिनमधल्या कर्मचार्‍यांनी त्यांची विचारपुस केली. तिथे काम करणार्‍या काका, मावशी, चहा नाश्ता सहर्व करणारा पोर्‍या सगळेच कर्मचारी बोलायला छान होते. कॉलेजच्या फॅमिली पैकीच आपण एक आहोत अश्या प्रकारे ते वागायचे. दोघी कॉफी पिऊन तिथून बाहेर पडल्या तोच शिवा धावत खाली आला.
" रेगे मॅडम तुमी इथं हायेत होय ते बावधनकर सर बोलवतायत तुम्हाला " 
" ओके आले " म्हणत किर्ती अनघाला मी जरा येते म्हणत बीएसस्सी च्या डिपार्टमेंन्टला निघून गेली. अनघा मग तिथून चालत एकटीच पुढे आली इतक्यात अॅडमिशनसाठी आलेल्या मुलं आणि पालकांपैकी एक विद्यार्थी आणि अंगावर साधीशी शर्ट पँन्ट, हातात कापडी पिशवी असलेले त्याचे वडिल शंकरला काहीतरी विचारत होते. शंकरने अनघाकडे बोट दाखवलं आणि शंकर निघुन गेला. ते दोघे चालत चालत अनघापाशी आले.
" एक्सक्युज मी मॅडम " तो मुलगा पुढे येत म्हणाला.
" हा बोला ना " 
" मॅडम ते जरा अॅडमीशनचं " त्याने हळुहळु विषय काढला.
" हा तुम्ही अॉफिसला चौकशी करा ना बाकी फॉर्मच्या फॉरमॅलिटीज झाल्या कि भेटा " ती त्यांना समजावून सांगत म्हणाली.
" मैडम तेच सांगायाचं व्हतं ते फि.... तेवढं पैसं नायीत ओ आमच्याकडं " ते वडिल काकुळतीनं म्हणाले.
" मॅडम फस्ट इयरची फि पस्तीस हजार आहे आणी हे पहा ना " त्याने अॅडमीशनचं ब्रोशर अनघाच्या हातात ठेवत म्हटलं.
" हे बघा प्रथम वर्ष मॅनेजमेंन्ट स्टडीची फि " त्या मुलाने बोटाने माहितीपत्रकातला अॅडमीशन फि चा रकाना तिला दाखवला आणि ती आश्चर्यचकित झाली. त्यावरचं छापील शुल्क रु. पंचवीस हजार होतं. तिला त्यांना काय सांगाव तेच कळेना. असंच अॉफिसला जावं का पण आपण जाऊन तिथे काय विचारणार खंदारे मॅडमना या सगळ्याची कल्पना असेल आपल्याला काही यातलं माहित नाही उगीच आपण जाऊन काहीतरी अॉफिसमध्ये बोलायचो त्यापेक्षा खंदारे मॅडमना फोन करुन विचारूया असे सगळे विचार तिच्या मनात आले.
" आमी काय करावं फि चे पैसं कसबसं आमी जमवून आनलेत आनी इथं आल्यावर चौकशी केली तर म्हनतात पस्तीस हजार फॉर्मसोबत ओनलाईन भरा." ते वडिल पुन्हा हताश होत म्हणाले.
" Don't worry तुम्ही दोन दिवसांनी याल का तसही अॅडमीशन ची तारिख संपायला वेळ आहे अजुन " ती त्या मुलाकडे नजर टाकीत म्हणाली.
" एच.ओ.डी. आल्या नाहीयत, अजुन तु दोन दिवसांनी येशील का बाबांसोबत "
" ओके मॅडम " तो मान हलवत म्हणाला आणि मार्कलिस्टची फाईल अॅडमीशनचं माहितीपत्रक सगळं हातात घेतलं आणि बाबांसोबत तिथुन बाहेर पडला. अनघा मात्र या सगळ्या प्रकाराने गोंधळुन गेली.
क्रमशः

🎭 Series Post

View all