बंधन भाग 18

Love, Social Issues

भाग 18
( गेल्या भागात जुनमध्ये कॉलेज सुरु होतं. कॉलेजची प्रवेशप्रक्रिया सुरु होते. अनघा उत्साहाने कॉलेजला जाते खरी पण कॉलेजला खंदारे मॅडम अालेल्या नसतात त्यामुळे अॅडमीशनच्या चौकशीसाठी मुलं तिला येऊन भेटतात. पहिल्यांदा स्टाफरुममध्ये आलेल्या मुलांच्या फॉर्मवर सह्या करताना फिची रक्कम पाहुन तिला नवल वाटतं. त्यानंतर एक विद्यार्थी आणि पालक तिला भेटतात  त्यांचीही तशीच तक्रार असते हा सगळा काय प्रकार आहे ते मात्र तिला कळत नाही पाहुया आज तरी याचा उलगडा होतो का ते)

अनघाने समजुत घालुन तो विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना पाठवुन दिलं. पण तिच्या मनातून हा विचार जात नव्हता. खंदारे मॅडम सुटीसाठी त्यांच्या भावाच्या घरी सातार्‍याला गेल्या होत्या. त्यांच्या पतीचं काही वर्षांपुर्वीचं निधन झालं होतं मुलगीही शिक्षणासाठी बेंगलोरला होती त्यामुळे सुट्टी असली की घर एकटीला खायला उठायचं त्यामुळे त्या मोठी सुटी असली की सातार्‍याला जायच्या. कॉलेजमध्ये प्राध्यापकांना हे माहित होतं आणि अनघा नवीन असली तरी त्यांच्यासोबत काम करायची म्हणून तिलाही याची कल्पना होती तरी तिने त्यांना फोन लावला. 
" हॅलो, बोल अनघा कशी आहेस ?" मॅडमनी फोन उचलल्या उचलल्या उत्साही आवाजात विचारलं.
" हो मी ठिक तुम्ही कधी येताय ?" तिने लगेच विषयाला हात घातला.
" हो मी उद्याच निघते परवा असेन कॉलेजला का गं ?"
" काही नाही मुलांच्या अॅडमिशन्स सुरु झाल्यात ना !" तिने आजचा प्रकार त्यांना सांगण्यासाठी पार्श्वभुमी तयार करायला सुरुवात केली.
" हो I know बाकी काही प्रोब्लेम नाही ना !" त्यांनी विचारलं.
" प्रोब्लेम असा नाही पण जरासा गोंधळ झालाय may be "
" कसला गोंधळ ?" त्यांनी लगेच विचारलं.
" आज काही मुलं आली होती अॅडमीशन फॉर्म्स घेऊन तर त्यांनी पस्तीस हजार फि भरली पण ब्रोशर वरती पंचवीस हजार आहे. " 
" हो पंचवीसच आहे फि अगं शेतकर्‍यांच्या मुलांना फि सवलत आहे " त्यांनी लगेच पलिकडुन म्हटलं.
" हो पण ती मुलं तर बरं असो तुम्ही आलात की बघु " ती म्हणाली हे सगळं फोनवर बोलण्यासारखं नाही आहे ते तिच्या लक्षात आलं होतं.
" हो ओके मी येते मग बघु " असं म्हणत त्यांनी पलिकडुन फोन ठेवला आणि ती स्टाफरुमचा जिना चढु लागली. तिच्या हे लक्षातही आलं नाही कि आपलं फोनवरलं बोलणं कुणीतरी ऐकतंय. शिवाने भिंतीआडुन तिचं सगळं बोलणं ऐकलं होतं आणि ते सामंतसरांना सांगणं त्याला महत्वाचं वाटलं.
.................
घरी आल्यानंतरही त्या विद्यार्थ्यांचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. काय प्रकार आहे हा सगळा ते तिला जाणून घ्यायचं होतं या सगळ्यात मुलांचा कुणी गैरफायदा तर घेत नाहीय ना त्यांच्याकडुन भरमसाठ फि उकळली जातेय का असा विचार तिच्या मनात आला. दुसरं मन हे मानायला तयार नव्हतं आपल्या कॉलेजमध्ये असले प्रकार होत नाहीत आणि भाऊसाहेबांच्या देखरेखीत असं कसं होईल हाही प्रश्न तिला पडला होता. काळे सरांना माहित असेल त्यांच्याशी बोलावं का असंही तिला वाटलं पण तो विचार तिने जरा बाजुला ठेवला. पण साहेब कुठे चोविस तास अॉफिसात काय चाललंय, कॉलेजात काय चाल्लय ते बघत असतात याचा गैरफायदा घेऊन कुणीतरी स्वतःचा फायदा करुन घेत नसेल कशावरुन अशी शंका तिच्या मनात आली आणि तिने तिच्या स्टडीटेबलवरचा एक कागद घेतला. त्यावर पस्तीस हजार रु असा आकडा टाकला. पंचवीस हजार हि प्रवेश फि आणि मुलं भरत होती ती फि पस्तीस म्हणजे दहा हजाराचा फरक येतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामागे दहा हजार ज्यादा मग तिने आता जे द्वितीय वर्षाला जातील त्या विद्यार्थ्यांची संख्या लिहिली. एफवाय मॅनेजमेंन्टची दोन्ही तुकड्यांचे मिळून 170 विद्यार्थी होते म्हणजे एवढ्या मुलांनी गेल्या वर्षी प्रथम वर्षला अॅडमिशन घेतलं होतं. आता या प्रत्येक मुलाने गेल्या वर्षी जर पस्तीस हजार भरले असतील तर म्हणून तिने पुढची आकडेमोड करुन पाहिली. प्रत्येक विद्यार्थ्याचे पस्तीस त्यातुन कॉलेजफि पंचवीस हजार वगळली तर प्रत्येक मुलामागे ज्यादाची दहा हजार रक्कम असे समजा एकशेसत्तरजण तर त्यातुन शेवटी आलेली रक्कम हि सतरालाखाच्या घरात जात होती. तो आकडा बघून तिचे डोळे गरगरले म्हणजे कुणीतरी स्वतःचा इतका फायदा करवुन घेत होतं आणि हे पहिल्यांदाच घडत होतं कि आधीही झालं होतं काय माहित. कागदावरची ती सगळी आकडेमोड पाहुन तिने कपाळाला हात लावला आणि हे साधं प्रकरण किती मोठ्या भ्रष्टाचाराचं असु शकतं त्याची तिला कल्पना आली. शिक्षणसंस्थांमधले भ्रष्टाचार तिने फक्त ऐकले होते पण हे सगळं पाहुन किती पद्धशीरपणे मुलांच्या शिक्षणाशी, स्वप्नांशी खेळ मांडला जातो ते तिला समजत होतं. हे सगळं खंदारे मॅडमच्या कानावर घालायला हवं असं ठरवुनच ती झोपी गेली.
.......................
दुसर्‍या दिवशी अनघाने काळेसरांना गाठुन त्यांच्याशी ह्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. तुला काही चुकीचं वाटत असेल तर नक्कीच बोल गप्प नको बसु एवढंच काळेसर तिला म्हणाले. तिकडे शिवा मात्र आदल्या दिवशीचं अनघाचं फोनवर खंदारेमॅडमसोबतचं बोलणं ऐकुन अस्वस्थ झाला होता. आमच्या डिपार्टमेंन्टसंबंधी काहीही कुणीही म्हटलन तरी येउन सांग असं सामंतांनी शिवाला बजावलं होतं. खंदारे मॅडम एच.ओ.डी. झाल्यापासुन तेही अस्वस्थच होते. लायब्ररीतुन सामंतसर बाहेर आले तोच शिवा हातात झेरॉक्सकॉपीज घेऊन आला.
" सर सर हे घ्या तुम्ही दिलेल्या नोट्सच्या झेरॉक्स " तो त्यांच्यामागून धावत येत त्यांना थांबवत म्हणाला.
" ओके थँक्स काय रे खंदारे मॅडम आजपण नाहीत कि काय ?" त्यांनी सहजच विचारलं.
" अ नाहीत उद्या येतील " तो गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला.
" ओके " तेवढं बोलून ते पुढे गेले ना गेले तोच शिवा पुन्हा म्हणाला.
" सर एक सांगायचं होतं." 
" काय रे ?" त्यांनी मागे वळुन विचारलं. तो थोडा पुढे आला.
" सर त्या कारखानीस मॅडमने खंदारे मॅडमना फोन केलेला "
" हा त्यात काय मग ! " त्यांनी विचारलं त्यावर त्याने आजुबाजुला पाहत हळु आवाजात म्हटलं.
" कायतरी मुलांच्या फि बद्दल मॅडम त्यांना सांगत होत्या कि फि चे पैसे वाढवुन घेतायत पन तेवढी फि नायीच असंचं काहीतरी " ते ऐकुन सामंतसरांच्या चेहर्‍याचा रंग उडाला.
" व्हॉट ! काय सांगतोयस अजुन काही कळलं?"
" नाही एवढंच त्यांनी ठेवला फोन मग मला ऐकु आलं तेवढ सांगितलं." शिवाने प्रमाणिकपणाचं आव आणीत म्हटलं.
" ओके जा तु " ते म्हणाले. शिवा निघुन गेला मात्र त्याने आत्ता जे सांगितलं ते त्यांच्या कानात अक्षरशः घुमत राहिलं. त्यांनी लगेचच विक्रमचा नंबर डायल केला.
..........,.,.... 
दोन दिवसांनी एकदाच्या खंदारे मॅडम कॉलेजला आल्या. त्यांनी दुसर्‍या लेक्चरनंतर अनघाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. तिलाही कधी एकदा मॅडमसोबत यावर सविस्तर बोलतेय असं वाटत होतं. तिने आकडेमोड केलेला तो कागदसुद्धा आज सोबत आणला होता. ती मॅडमना भेटायला गेली.
" हा अनघा ये " तिने केबिनच्या दारावर नॉक करताच मॅडमनी तिला आत बोलावलं. ती आत जाऊन मॅडमसमोर च्या चेअरवर बसली.
" काय झालंय नक्की मला नीट सांग " ती बसल्यानंतर मॅडमनी लगेच प्रश्न केला.
" मॅडम, मी काही मुलांच्या फॉम्सवरती साईन केल्या फस्ट इयरच्या अॅडमिशनची मुलं होती ती पण त्यांच्या फॉर्म्सवरची फिची अमाउन्ट बघुन माझे डोळेच चक्रावले कारण मी जेव्हा इथे अॅडमीशन घेतली होती तेव्हा फि पंचवीसच होती आणि आपलं डिपार्टमेंन्ट ग्रॅन्टेबल आहे शिवाय शेतकर्‍यांच्या मुलांना कॉलेज फि सवलत देतं मग अचानक फि पस्तीस कशी झाली ?" तिने पटापट त्या दिवशी घडलेलं सगळ सांगून टाकलं. 
" हम्म पण मला याची कल्पनाच नव्हती. फि पंचवीस आहे हे माहित होतं पण वाढलीय कि नाही ते माहित नाही कसं आहे मी नवीनच या डिपार्टमेंन्टचा चार्ज घेतलाय." त्या म्हणाल्या त्यावर तिने आता सुरु असलेल्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातलं माहितीपत्रक मॅडमच्या समोर ठेवलं.
" हे पहा, इथे तर पंचवीसच आहे आणि हे मला एका गरिब विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी दाखवलं ते परवा भेटलेले मी त्यांनाही सांगितलंय तुम्हाला भेटायला." ती म्हणाली यावर खंदारेमॅडम विचारात पडल्या. मॅडम गोंधळलेल्या पाहून अनघाने तिच्या मनातली शंका धीर करुन उघडपणे बोलायचं ठरवलं.
" मी एक सांगु का ?"
" या शुअर बोल ना " त्या म्हणाल्या.
" भाऊसाहेबांच्या अपरोक्ष कुणी मुलांकडुन जास्तीची फि उकळून स्वतःचा प्रोफिट नसेल ना करुन घेत."
" नाही गं असं नाही काही होत आपल्या इथे you know" मॅडमच्या मनातही ती शंका काही सेकंदासाठी येउन गेली होती पण त्या बोलल्या नव्हत्या. अनघाने आपण केलेल्या आकडेमोडीचा तो कागद त्यांच्यासमोर ठेवला आणि त्यांना त्याप्रमाणे सगळ समजावायला सुरुवात केली. त्यांचं बोलणं सुरु असतानाच केबिनवरती टकटक झाली आणी दरवाजा लोटुन चार पाच विद्यार्थी आत आले.
" काय रे " 
" मॅडम फॉर्म " असं म्हणत त्यांनी हातातले फॉर्म्स खंदारे मॅडमसमोरच्या टेबलवरती ठेवले. मॅडमने प्रत्येकाचा फॉर्म व्यवस्थित न्याहाळला आणि फिची रक्कम पाहिली जी पस्तीस हजारच होती. याचा अर्थ हे चुकुन झालं नव्हतं जाणूनबुजुन कुणीतरी आपलं उखळ पांढर करुन घेत होतं. आता त्यांनाही हळूहळू अनघाचं मघाचं बोलण पटायला लागलं होतं.
क्रमशः

🎭 Series Post

View all