बंधन भाग 19

Love Social Issues

भाग 19
( गेल्या भागात विद्यार्थ्यांचे फॉर्म्स आणि त्यांनी मॅनेजमेंन्ट विभागाला प्रवेश घेण्यासाठी पहिल्या वर्षीची भरलेली जास्त फि पाहून अनघा काळजीत पडते. हे सगळ तिला विचित्र वाटत आणि ती खंदारे मॅडमना फोनवरुन सगळं सांगते मात्र शिवाने तिचं बोलणं फोनवरुन ऐकलेलं असतं जे तो सामंतसरांना जाऊन सांगतोच. खंदारे मॅडम दोन दिवसांनी कॉलेजला आल्यानंतर अनघा तिला आलेल्या सगळ्या शंका त्यांना बोलून दाखवते आणि शेवटी ह्या सगळ्यामधुन कुणीतरी मुलांकडुन भरमसाठ फि उकळतय याची मॅडमनाही खात्री पटते पाहुया त्या आता काय करतायत)

अनघाला मी पाहते काय करायचं ते असं सांगून खंदारे मॅडमनी तिला लेक्चरला पाठवलं. मात्र हा सगळा प्रकार त्यांच्या डोक्यातून गेला नाही पण हे सगळं खोटं मानावं तर तेही शक्य नव्हतं आणि गप्प बसाव तर आधी प्रवेश घेतलेल्या मुलांनी पस्तीस हजाराची रक्कम आधीच भरली होती आणि गेल्या वर्षी हा प्रकार झाला नसेल कश्यावरुन किंवा त्याआधीही हे घडलं असेल अशीही शंका त्यांना आली . पुढची अॅडमिशनला येणारी मुलं तरी यातून वाचायला हवीत असही त्यांना वाटत होतं. त्यांनी आता मन शांत केलं आणि प्राचार्यांची केबिन गाठली. 
........................
" काय मॅडम तुम्ही हे बोलताय त्यावर विश्वासच बसत नाही आहे " खंदारेमॅडमनी त्यांना सगळा प्रकार सांगितला सोबत कॉलेजचं चालू अॅडमीशनचं माहितीपत्रकही दाखवलं. ते पाहून करंबेळकर सरांनाही धक्का बसला. 
" मॅडम तुम्ही दाखवताय ते बरोबर असेलही पण हे कसं शक्य आहे आणि मुळात कोण असं वागेल आपल्या कॉलेजला! " प्राचार्य करंबेळकर चिंताग्रस्त चेहर्‍याने बोलत होते.
" हो तुमचं बरोबर आहे पण असं घडतय आणि हे थांबवायला हवं. अहो आमच्या डिपार्टमेंन्टला दरवर्षी शंभरच्यावरती विद्यार्थ्यांची अॅडमिशन असते न जाणो आतापर्यंत कितीजणांनी फि भरलीय." त्या बोलल्या.
" हो You're right मी अॉफिसला स्ट्रिकली सांगतो याविषयी आणि तुम्ही कोण म्हणालात तो विद्यार्थी तो आला की त्याची अॅडमीशन आपल्या जुन्या फि प्रमाणेच होईल तेही पाहतो." सर म्हणाले.
" ओके पण मला वाटतं आपण भाऊंच्या कानावर घालावं. हे त्यांच्यापर्यंत पोचलं तर भितीने तरी निदान हा प्रकार थांबेल." मॅडम म्हणाल्या यावर आता प्राचार्यांनाही काय बोलाव कळेना त्यांनाही दुसरा पर्याय दिसत नव्हता आणि उगीच पुढेमागे हा प्रकार उघडकीस आला तर विनाकारण आपल्या इतक्या वर्षांच्या प्रमाणिक कामाला डाग लागेल याचीही त्यांना भिती होतीच. मॅडमच्या बोलण्याप्रमाणे त्यांनी भाऊंना फोन करण्याचं ठरवलं.
.....................
खंदारे मॅडमच्या सांगण्यानुसार प्राचार्यांनी दुपारी भाऊसाहेबांना फोन केला आणि त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला. त्यांनाही आश्चर्य वाटलं पण ते प्राचार्यांवरती ओरडले नाहीत ना तात्काळ या प्रकारावर अॅक्शन घेऊ असं त्यांना म्हणाले. कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेण्याची सवय त्यांना नव्हतीच मुळी त्यातून इतक्या वर्षांचा राजकारणाचा अनुभव त्यामुळे ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता आपण स्वतः शहानिशा करण्याचं त्यांनी ठरवलं. प्राचार्यांना तुम्ही चिंता करु नका. पाहु आपण हा प्रकार काय आहे असं सांगितलं. भाऊंच्या बोलण्याने प्राचार्यांना जरा हायस वाटलं निदान आपल्यावरती तरी हा प्रकार उलटणार नाही साहेबांना सांगण्याचं काम आपण केलय या विचाराने त्यांनाही बरं वाटलं.
.............
भाऊसाहेबांनी दुसर्‍या दिवशीचे सगळे कार्यक्रम कॅन्सल केले दुसरीकडे कुठेही न जाता त्यांनी पहिल्यांदा कॉलेज गाठलं. कॉलेजमध्येही ते येणार आहेत याची प्राचार्य, उपप्राचार्यांना कल्पनाही नव्हती. आदल्या दिवशी प्राचार्यांशी बोलताना आपण उद्या येणार असल्याचं त्यांनी सांगितलं नव्हतं. ते त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि लगोलग त्यांनी प्राचार्यांना आणि उपप्राचार्य निंबाळकर सरांना आत बोलावून घेतलं. भाऊसाहेबांसाठी चहा घेऊन शंकर केबिनमध्ये आला. केबिनमधलं तणावग्रस्त वातावरण पाहुन तो फार वेळ तिथं थांबला नाही. 
" साहेब खरंच आम्हाला या प्रकरणाची कल्पना नव्हती" निंबाळकर सर केविलवाण्या नजरेनं बोलले.यावर प्राचार्यांनीही मान डोलावली.
" हो साहेब आणि असं कुणी का केलं काय माहित " ते निंबाळकरसरांकडे पाहत आपली बाजू मांडू लागले.
" असो जे घडलय ते व्हायला नको होतं निदान आपल्या 'गुरुकुल ' मध्ये तरी पालकांच्या पैश्याशी खेळ नको अहो इथल्या गरिब,होतकरु विद्यार्थ्यांना सहज आणि अल्प शुल्कात आयटी, मॅनेजमेंन्ट च्या कोर्सेसचं शिक्षण घेता यावं. आपल्या ग्रामीण मुलांनासुद्धा अश्या व्यावसायिक शिक्षणाने प्रगती करता यावी म्हणूनच या कॉलेजची उभारणी केली ना आम्ही मग आता हे असं घडुन नाही चालणार." भाऊसाहेब उद्विग्नतेने बोलत होते आणि दोघे मान खाली घालून ऐकत होते.
" असो करंबेळकर सर अॉफिसमधून आतापर्यंत जेवढ्या नवीन अॅडमिशन्स झाल्यात त्याचे रेकॉर्ड मागवून घ्या. विद्यार्थ्यांची नावं, कुठल्या डिपार्टमेंन्टला किती अॅडमिशन्स झालीत, त्यापैकी शेतकर्‍यांची मुलं किती आहेत हॉस्टेलला राहणार आहेत ती मुलं किती आहेत, नवीन मुलांपैकी बारावीला मेरिटला आलेली मुलं किती आहेत या सगळ्याची माहिती मागवून घ्या आत्ताच्या आत्ता." भाऊसाहेबांचे कडक शब्द ऐकुन प्राचार्यांनी तिथूनच लगेच अॉफिसला फोन केला आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्या फाईल्स भाऊसाहेबांच्या केबिनला पाठवायला सांगितल्या.
..........................
सकाळी भाऊसाहेबांच्या केबिनमधलं वातावरण शंकरला काही ठिक वाटलं नाही आणि ही गोष्ट त्याने त्याच्या शिपाई सहकार्‍यांना बोलून दाखवली. शिवाच्याही कानावर हे सगळ आलं. त्याने लगेच सामंतसरांना गाठुन भाऊसाहेब कॉलेजला आल्याची कल्पना दिली. भाऊसाहेब बराच वेळ प्राचार्य, उपप्राचार्यांबरोबर मिटिंग घेतायत एवढीच गोष्ट त्यांना कळली होती तरीही हे काही बरं चिन्ह दिसत नाही ते सामंतांच्या लक्षात आलं. त्यांनी विक्रमला फोन केला. 
" हॅलो साहेब मी बोलतोय "
" बोला सर आज सकाळीच काय काम काढलत ?" विक्रमने विचारलं.
" साहेब आहात कुठे तुम्ही तीन दिवसांपासुन मी फोन ट्राय करतोय तुमच्याकडून काही रिसपोन्सच नाही." सामंत घाईघाईत बोलत होते.
" मी आउट अॉफ टाउन होतो कॉलेजच्या कामासाठी बोला काय झालं." 
" अहो साहेब इथे सगळा गोंधळ झालाय ते आमच्या डिपार्टमेंन्टच्या मुलांकडून एस्क्ट्रा फि घेतली जाते ते खंदारे मॅडमच्या लक्षात आलं. त्यांनी अॅडमीशनचं ब्रोशर पाहिलं त्यावर वेगळी अमाउंन्ट होती त्यांना डाऊट आलाय त्यांनी प्रिन्सिपलना सांगितलं आणि त्या करंबेळकर सरांनी स्वतःची खुर्ची वाचवायला मोठ्या साहेबांच्या कानावर घातलय सगळं." सामंत एका फटक्यात बोलून मोकळे झाले.
" What! भाऊसाहेबांपर्यंत हे सगळं कधी पोहचलं शट I tell you Samant हे सगळ ज्या माणसाने उकरुन काढलय ना त्याला मी जन्माची अद्दल घडवीन.माझ्या रस्त्यात मुद्दामहुन कुणी आडवं गेलं तर त्याला मी सोडणार नाही.अरे यार काय प्रोब्लेम असतो या असल्या लोकांचा प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचं "  विक्रम रागाने बोलत होता.
" ते सोडा आता साहेब नंतर बघु हो ते पण आधी हे सगळं solve करा Please " सामंत सर अजीजीने बोलत होते.
" Ok मी बघतो काय ते येतोय मी आता कॉलेजलाच" एवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि तो येईपर्यंत तरी इथे काही घडु नये यासाठी सामंतांनी मनातून प्रार्थना केली.
क्रमशः

🎭 Series Post

View all