बंधन भाग 22

Love, Social Issues

भाग 22
( गेल्या भागात सामंतसर अस्वस्थ होउन राजेशलाही कॉलेजमधल्या प्रकाराविषयी सांगतात. कॉलेजमधले आर्थिक घोळ भाऊसाहेबांपर्यंत पोहचलेत हे ऐकून त्यालाही धक्का बसतो. या प्रकारात कुणीतरी मदत करेल या आशेने सामंत माजी उपप्राचार्य जाधवसरांना फोन लावतात पण ते यात हात झटकुन मोकळे होतात. काळेसर सामंतसरांना हे सगळं थांबवा म्हणून आपुलकीने सल्ला देतात जो त्यांना पटत नाही. गेल्या भागात या सगळ्या प्रकाराला उघडकीला आणायला अनघा जबाबदार आहे हे विक्रमला समजलं पाहूया तो आता काय करणार आहे.)

अनघाच्या सर्तकतेमुळे आणि भाऊसाहेबांच्या लक्ष घालण्यामुळे कॉलेजच्या सगळ्या प्रवेशप्रक्रिया एकदाच्या सुरळीत पार पडल्या. पण या सगळ्यात लक्ष घालणं विक्रमने तुर्तास थांबवलं. त्यातून खंदारेमॅडमनी अनघाचं केलेलं कौतुकही त्याच्या चांगलंच लक्षात राहिलं. पण तो शांत राहिला. अखेर सप्टेंबर उजाडला आणि सगळ्या अॅडमिशन्स व्यवस्थितपणे पुर्ण झाल्यात हे भाऊसाहेबांच्या कानावर घालण्यासाठी एक दिवस विक्रमने अॅडमिशन रेकॉर्डच्या फाईल्स भाऊसाहेबांना नेऊन दिल्या. बघा सगळं कसं सुरळीत झालंय हेच दाखवण्याचा यामागचा त्याचा हेतू होता. 
" विक्रम या सगळ्याची काय गरज होती उगीच तुम्ही या फाईल्स दाखवताय मला! "  भाऊसाहेब फाईल्सच्या पेपर्सवरुन नजर फिरवत म्हणाले.
" तसं नाही म्हटलं तुम्ही पाहुन घ्या जुनच्या त्या प्रकारानंतर पुन्हा तसं काही घडू नये म्हणून मी स्वतः लक्ष दिलं आहे." विक्रम आपण किती प्रामाणिक आहोत आणि हे सगळं प्रकरण आपण व्यवस्थित शांत केलय हे दाखवायचा प्रयत्न करित होता. भाऊसाहेबांनी प्रत्येक पेपरन पेपर पहावा म्हणून स्वतः फाईल्सची पानं पालटुन दाखवत होता. भाऊसाहेबांना त्याची ही आत्मियता पाहून मनातून बरं वाटत होतं. त्यांनी सर्व फाईल्स पाहिल्या आणि त्या बाजूला ठेवत डोळ्यांवरचा चष्मा काढला.
" वा! विक्रम मानलं बरं तुम्हाला त्या प्रकारानंतर पुन्हा तसं काहीच घडू दिलं नाहीत आणि मुळात याविषयी मुलांपर्यंत काही पोहचु दिलं नाहीत ते बरं झालं नाहीतर विद्यार्थ्यांचा कॉलेजवरचा विश्वास उडाला असता आणि एकदा विश्वासाला तडा गेला की तो जोडणं अवघड होऊन बसतं." त्यांच्या या वाक्यावरती त्याने पटकन नजर वरती केली आणि दोन क्षण तो वडिलांच्या डोळ्यांकडे पाहत राहिला. ते पुढे बोलत होते,
" पण छान झालं तुमच्यावरती आम्ही ठेवलेला विश्वास तुम्ही पुन्हा सिद्ध करुन दाखवलात.खरच आमच्या माघारी तुम्ही सगळं छानच सांभाळता याची खात्री होती आम्हाला पण जूनमध्ये जे घडलं त्याने आम्हालाच इतका धक्का बसला होता कि समोरचा प्रत्येकजण आम्हाला दोषीच वाटत होता. मुलांच्या पैश्याशी, कष्टांशी कुणी खेळलेलं आम्हाला नाही आवडतं माहितीय तुम्हाला म्हणून मग तुम्हालाही आम्ही जरा जास्तीच बोललो तेव्हा."  भाऊसाहेबांना आपण विक्रमवरती तेव्हा विश्वास ठेवला नाही त्याचं आत्ता खूप वाईट वाटत होतं आणि हे विक्रमच्या लक्षात आलं.
" It's ok तुम्ही बोललात तर त्यात वाईट वाटुन घेण्यासारखं ते काय ! मीही विचार केला मीही थोडं लक्ष द्यायला हवं होतं तर हे घडलचं नसतं."  तो म्हणाला.
" बरं कुणी केला हा पैश्यांचा व्यवहार काही कळलं का?" या त्यांच्या अचानक आलेल्या प्रश्नावर त्याने हजरजबाबीपणाने लगेच उत्तर दिलं.
" हो म्हणजे अॉफिस स्टाफमध्येच काहींनी वाढीव फि मुलांकडून घेतली आणि वरची रक्कम स्वतःच्या खिश्यात टाकली मी समज दिलीय त्यांना आणि त्यांनी जी फि घेतली होती ती ट्रस्टला जमा केलीय आपल्या. आता सगळं नीट होईल बघा या रेकॉर्डवरुन तरी वाटतय आता पुन्हा असं काही करणार नाहीत ते!" तो बोलत होता आणि बिचारे भाऊसाहेब कौतुकाने त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होते. चला भाऊसाहेब आता पुन्हा यात लक्ष घालणार नाहीत याची पक्की खात्री आता विक्रमला झाली.
...................
विक्रमने भाऊसाहेबांसमोर सगळं प्रकरण सांभाळून घेतलं असलं तरीही अनघामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला याचा राग त्याच्या मनात होता. तिने पुन्हा दुसर्‍या एखाद्या गोष्टीत लक्ष घातलं तर पुन्हा हे असच होणार आणि भाऊसाहेबांसमोर आपल्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहावं लागणार ही भीती होतीच. भाऊसाहेबांना जितकी कॉलेजची काळजी होती तितकीच विक्रमलाही होती. पण आपण प्रत्येक गोष्ट सवलतीत का द्यायची, सोयीसुविधाही विद्यार्थ्यांना हव्यात पण त्यासाठी पैसे खर्च करायला नकोत. अश्याने कॉलेज कधी मोठ होणार आणि कॉलेजचं नाव जेव्हा राज्यातल्या, आपल्या देशातल्या टॉप इन्स्टिट्युटमध्ये घेतलं जाईल तेव्हाच आपलं काम चार लोकांपर्यंत पोहचेल. नवीन माणसं कॉलेज डेव्हलप करण्यासाठी मदत करतील आणि यासगळ्यासाठीचा पैसा मुलांकडून या ना त्या मार्गाने घेतला तर काय हरकत आहे असं त्याचं मत होतं. जेव्हा कॉलेजचा कारभार त्याने पहायला तीन वर्षांपुर्वी सुरुवात केली तेव्हाच त्याच्या हे लक्षात आलं आणि त्याप्रमाणे तो सामंतसर, उपप्राचार्य जाधवसर अश्या कॉलेजमधीलच काही प्राध्यापकांच्या मदतीने त्याला हव त्याप्रमाणे वागत होता. उपप्राचार्य जाधवसरांनी या गोष्टी मात्र प्राचार्यांपर्यंत पोहचु दिल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांकडून ज्यादा फि घेणं असो कि मुलाखतीकरता आलेल्या नव्या प्राध्यापकांकडुन नोकरीच्या बदल्यात पैसे घेणं  गेले तीन वर्ष हे सगळं बिनबोभाटपणे सुरु होतं पण अनघाच्या हुशारीने या वर्षी सगळ्याला सुरुंग लागला होता. त्यामुळे विक्रमला काय करावं ते सुचत नव्हतं आणि अश्यातच अरुंधतीने त्याच्याकडे समिहाचा विषय काढला.
" विक्रम तुला एक विचारु ?" अरुंधती त्याच्या रुममध्ये सहजच आल्याचं भासवित इकडच्या तिकडच्या गप्पा मारित असताना म्हणाली. दिवसा त्याचा पाय एका ठिकाणी थांबेल तर शपथ म्हणून एक दोनदा प्रयत्न केल्यानंतरही बोलण होत नाही हे पाहिल्यानंतर तिने रात्री जेवणानंतर त्याच्या रुममध्ये जाऊन बोलायचं ठरवल होतं.
" हा मम्मा बोल पण पटकन हा झोप येतेय" तो जांभई देत म्हणाला.
" Ok डिरेक्टलीच विचारते तुला समिहा कशी वाटते लाईफपार्टनर म्हणून ?"  अरुंधतीच्या या अनपेक्षित प्रश्नाने तो चपापला. हे काय बोलतेय आई हेच त्याला समजत नव्हतं.
" काय समिहा ! "
" हो, का तुला नाही बरी वाटत का ती ?" अरुंधती त्याचा अंदाज घेत म्हणाली.
" नाही नाही असं काही नाही अगदी. ठिक आहे" तो पटकन म्हणाला त्यावर ती हसली आणि तिला काय समजायच ते समजलं. 
" ओके पण तु प्लिज भाऊसाहेबांना विचार त्यांच्याशी बोल मग बघु. I don't want any issue " तो उशी बेडला टेकवत म्हणाला. आता ह्याने तर सगळं आपल्यावरतीच ढकललय याने तिचा हिरमोड झाला. ती मग नाईलाजाने ओके म्हणाली आणि गुडनाईट बोलून निघून गेली. पण भाऊसाहेबांसमोर हा विषय काढणे हे मोठ दिव्यच होतं. तिला माहित होतं,एकदा विक्रमने निर्णय घेतला कि तो फायनल असतो. आईसाठी मन मारून काहीही करणारा गोड श्रावण बाळ तो नव्हता. त्याला एखादी गोष्ट पटली नाही तर तो अरुंधतीला तस बोलूनही दाखवायचा. आता विक्रमने समिहाच्या स्थळाला तसा विरोध केला नव्हता पण त्याचं मन उद्या पालटलं तर काय हा विचार तिच्या मनात सतत येत होता.
...............


विक्रमने स्वतःहुन फाईल्स आणून दाखवल्यापासून भाऊसाहेब त्याच्यावरती खूश होते. त्यांचा हा आनंद गंगाआत्यांपासुन लपुन राहिला नाही. एकदा रात्री पाण्याचा तांब्या ठेवण्यासाठी गंगाआत्या भाऊसाहेबांच्या खोलीत आली आणि तिने त्यांना त्यांच्या हल्ली आनंदी असण्याचं कारण विचारल.
" साहेब एक विचारु का ?"  ती हातातील तांब्या टेबलवरती ठेवत म्हणाली.
" ताई विक्रम किती छान सांभाळतात नाही सगळं विशेषतः आपलं 'गुरुकुल ' खरच बरं झालं ना मी गुरुकुलची जबाबदारी विक्रमकडे सोपवली." भाऊसाहेब त्यांच्या आरामखूर्चीला मागे टेकत म्हणाले.
" साहेब खुपच खुश आहात तुम्ही झालं काय ?" आत्याने विचारलं.
" कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेत आर्थिक घोळ झाला होता. नवीन प्रोफेसर आहे कारखानीस म्हणून तिच्या लक्षात आलं म्हणून मला आणि प्राचार्यांना तरी समजलं पण विक्रमने नंतर सगळ व्यवस्थित हाताळलं आणि सगळे अॅडमिशन कॉलेजच्या नियमाप्रमाणे करवून घेतले."  ते कौतुकाने बोलत होते आणि आत्याही ऐकत होती. विक्रमचं कौतुक करायला तिलाही नेहमी आवडायचं. अरुंधतीइतकाच तिचाही त्याच्यावरती जीव होता. पण त्याचवेळी तिला अरुंधतीच्या डोक्यात विक्रमच्या लग्नाचा विषय घोळत असल्याची आठवण झाली. अरुंधतीने तर समिहाला आता घरीही बोलवायला सुरुवात केली होती. दोघींचं हल्ली जरा जास्तच पटत हे आत्याच्या नजरेतुन सुटलं नव्हतं. अरुंधती समिहाच्या आईकडे विक्रमविषयी विचारण्याआधी हे सगळं भाऊसाहेबांना तिला सांगायचं होतं पण तसा वेळच मिळाला नाही. आज सुदैवाने अरुंधतीही खोलीत नव्हती हे पाहून गंगाआत्याने समिहाचा विषय काढण्याचं ठरवलं.
" कसला विचार करतेस ?" भाऊसाहेब आत्याकडे पाहत म्हणाले.
" साहेब एक बोलायचं होतं " 
" बोल बोल काही सांगायचं होतं का?" ते म्हणाले.
" साहेब, बाईसाहेब विक्रमच्या लग्नाचा विचार करतायत. आपले 'चंद्रकांत ज्वेलर्स ' चे मालक त्यांची मुलगी समिहा तिचं आणि बाईसाहेबांचं हल्ली चांगलं जमतं. ती घरीही येत असते अधुनमधुन. त्या स्वतःहून जितेंद्रपाशी बोलल्या होत्या कि त्या लवकरच विक्रमशी बोलणार आहेत." आत्याने इतक्या महिन्यांपासुन अरुंधतीच्या डोक्यात जे चाललेलं होतं ते बोलून टाकलं. 
" काय कधीपासुन सुरु आहे हे सगळं?" त्यांनी आश्चर्याने विचारलं.
" झाले सात आठ महिने " ती म्हणाली त्यावर भाऊसाहेब निश्चयाने म्हणाले,
" अरुंधतीला तू आणि मी जितक ओळखतो तितक दुसरं कुणीच नाही. ती पैसा आणि प्रतिष्ठेसाठी वाट्टेल ते करेल. मला या घरात दुसरी अरुंधती नकोय ताई हे लग्न मी होऊ देणार नाही." भाऊसाहेबांचा असा निर्धार पाहून आत्याचा जीव भांड्यात पडला. आता काही काळजी नाही भाऊसाहेब योग्य तिच मुलगी घरात सुन म्हणून आणतील याची तिला खात्री होती.
क्रमशः

🎭 Series Post

View all